माझे शेल्फ
रिक्त
प्रसिद्ध लेखिका मोहना जोगळेकर यांचा रिक्त हा मेहता प्रकाशनाने प्रसिद्ध केलेला कथासंग्रह वाचनात आला. बऱ्याच काळाने दर्जेदार कथा वाचल्याचं समाधान मिळालं. या कथांमधून मानवी स्वभावाचे विविध कंगोरे समर्थपणे उलगडून दाखवले आहेत. मानवी मनाच्या भावभावनांचंबारकाईने केलेलं चित्रण या कथांमधून जाणवतं. विक्षिप्त स्वभावाच्या माणसांमुळे त्यांच्या जवळच्यांना सोसावे लागणारे त्रास. पालकांच्या अमेरिका-भारत-अमेरिका अशा स्थलांतरामुळे मुलांना स्थिरावण्यात येणाऱ्या अडचणी, ताणतणाव. हुशार पण शिकायची इच्छा असूनही परिस्थितीमुळे हतबल झालेला अमर दोन मुलींचा स्वतःबद्दलचा शोध आणि त्याचे त्यांच्या कुटुंबावर होणारे परिणाम समाजसेवेच्या क्षेत्रात आलेले काही अनुभव आणि त्याचा एका तरुणीच्या आयुष्यावर होणार परिणाम. परदेशातून बऱ्याच वर्षांनी भारतात आल्यावर गावी ओळखीच्या खुणा शोधणारी स्त्री. एका चुकीमुळे आयुष्यभराची होणारी फरफट संशयी नवऱ्यामुळे द्विधा मनस्थितीत असणारी स्त्री. काही काही गोष्टी जेव्हाच्या तेव्हा होण्याला अर्थ असतो हे सांगणारी कमुताईची कथा. आईवडिलांच्या संबंधांचं पुढे मुलीच्या आयुष्यावर पडणारी छाया. प्रेमविवाहामुळे माहेरच्यांनी संबंध तोडले, तरी जिद्दीने स्वतःच्या हिंमतीवर संसार समर्थपणे निभावून नेणारी स्त्री. परक्यांच्या मुलासाठी झटणारी तरुणी. अनोरेक्सीयाशी झगडणारी युवती अशा विविध विषयांवरील कथा या संग्रहात आहेत. बरेचसे विषय मराठीत कदाचित पहिल्यांदाच हाताळले गेलेले आहेत. हे विषयांचं नावीन्य तसेच त्या विषयांचा खोल अभ्यास कथेतून जाणवतो. एवढं असूनही कथा प्रवाही आहेत. वाचकांची उत्सुकता टिकवून ठेवण्यात कथा यशस्वी ठरतात. हा कथासंग्रह किंडलवरदेखील उपलब्ध आहे. या पूर्वी मोहना जोगळेकर यांचा मेल्टिंग पॉट हा कथासंग्रह प्रकाशित झाला होता आणि त्याला कोमसापचं पारितोषिक मिळालेलं आहे. माहेर, श्री व सौ, अनुराधा, प्रसाद, रोहिणी, साप्ताहिक सकाळ, मायबोली, BMM वृत्त तसेच अमेरिकेतील विविध दिवाळी अंकांमध्ये मोहना जोगळेकर यांच्या कथा प्रकाशित होत असतात. त्या व्यतिरिक्त लोकसत्ता, रत्नागिरी टाइम्स, प्रहार, सकाळ अशा वर्तमानपत्रांमधूनही त्यांनी लेख आणि सदरलेखन केलं आहे.
फाईनमन हे असेच द्रष्टे शास्त्रज्ञ होते. भौतिकशास्त्राचा गाढा अभ्यास, शास्त्रीय विचारांची पक्की बैठक आणि विलक्षण बुद्धिमत्ता यामुळे भौतिकशास्त्रतच नव्हे; तर विज्ञानाच्या कुठल्या क्षेत्रात कशाप्रकारे प्रगती होईल किंवा होऊ शकते हे त्यांनी आग्रहाने सांगितले आहे. त्यांना क्वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्समधील सिद्धान्ताबद्दल नोबेल पारितोषिक मिळाले. त्यांनी तयार केलेल्या फाईनमन डायग्रॅममुळे भौतिकशास्त्राच्या शास्त्रज्ञांना सूक्ष्म कणांचे स्थलकालातील परस्पर संबंध समजून घेता आले. अत्यंत उत्कृष्ट शिक्षक म्हणून त्यांनी ख्याती होती. त्यांच्या सडेतोड बोलण्यामुळे आणि स्पष्टोक्तीमुळे सरकार मानसन्मानाच्या नादी ते लागले नाहीत. फाईनमन लेक्चर्स ऑन फिजिक्स हे त्यांची फिजिक्स विषयावरील पुस्तक प्रसिद्ध आहे. या पुस्तकामुळे त्यांना फिजिक्सचे निष्णात शिक्षक मानले जाते. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना ऑरस्टेट मॉडेल हा सन्मानही मिळाला. ‘द कॅरॅक्टर ऑफ फिजिक्स लॉ अँड क्युईडी स्टॅटिस्किट मेकॅनिक्स लेक्चर्स ऑन ग्रॅव्हिटी ही त्यांची गाजलेली काही पुस्तके. नॅनो टेक्नोलॉजीचे महत्त्व शास्त्रज्ञांच्या अभ्यासकांच्या लक्षात आणून देणारे ते पहिले शास्त्रज्ञ होते. जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र यामधील कित्येक रहस्ये ही नॅनो टेक्नॉलॉजीच्या अणूच्या पातळीवर जाऊश्र अभ्यास करण्याच्या प्रयत्नांतून सुटतील अशी या द्रष्ट्या शास्त्रज्ञाची दूरदृष्टी होती. अत्यंत कुशाग्र बुद्धीच्या या शास्त्रज्ञाच्या आत कुठेतरी एक खट्याळ मूल दडलेले होते याचा प्रत्यय हे चरित्र वाचताना येतो. फाईनमननी संशोधन आणि शिक्षणक्षेत्रातील आपला प्रमाणिकपणा सातत्यानं टिकवला. जीवनातील विविध अनुभवांना ते निखळ मिस्किलतेने सामोरे गेले. विज्ञान क्षेत्रात चिकित्सक वृत्ती जागृत ठेवणारे शिक्षण असे मानून त्याचा पाठपुरावा विद्याथ्र्यांना करायला लावणाऱ्या शास्त्रज्ञाचे चरित्र सुधा रिसबूड यांनी कलात्मकरीत्या, सोप्या आणि ओघवत्या शैलीत मांडले आहे वाचकांना हे चरित्र आवडले.