माझे शेल्फ
रुपेरी सिंधू
२०१२ च्या लंडन ऑलिंपिकमध्ये साईना नेहवालने कास्यपदक पटकावले आणि त्यानंतरच्या म्हणजेच २०१६ च्या रिओ ऑलिंपिकला पी.व्ही.सिंधू अंतिम सामन्यात प्रवेश करून रौप्य पदक मिळवणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली. या अभूतपूर्व यशामुळे भारतात बॅडमिंटनकडे बघण्याचा दृष्टिोनच बदलून गेला. चमत्काराशिवाय नमस्कार नाही हे उगीच नाही म्हटलं! अत्यंत साध्या परिस्थितीत वाढलेल्या सिंधूनं, साईनानं जिद्द, परिश्रम, अथक सराव आणि प्रशिक्षकांचा सल्ला प्रमाण मानून केलेले कष्ट या सगळ्या गोष्टींमुळे दोघी जागतिक पातळीवर इतक्या यशोशिखरावर जाऊन पोहोचल्या आहेत. आपल्या ग्रंथालयात पी.व्ही.सिंधू विषयी माहिती देणारे पुस्तक नव्याने दाखल झाले होते. उत्सुकतेपोटी मी ते लगेच वाचले. अतुल कहाते लिखित हे छोटेखानी पुस्तक एका बैठकीतच वाचून पूर्ण होते. बॅडमिंटन खेळाच्या इतिहासाचा शोध, सिंधूचे बालपण, प्रशिक्षक गोपीचंद यांचे थोडक्यात चरित्र, प्रशिक्षण अकादमी, सिंधूची जडणघडण, रिओसाठी तयारी, रिओनंतरचा पुढचा प्रवास याविषयीची माहिती वाचायला मिळते. पी.व्ही.सिंधू म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहते तिची आकर्षक उंची, प्रसन्नचित्त चेहरा आणि बॅडमिंटन कोर्टवरचा आत्मविश्वासपूर्ण वावर! पहाटे चार वाजता उठून आवरून सरावाला आलेली सिंधू दुपारचा सूर्य डोक्यावर आला तरी सरावच करत असते! या पुस्तकातून तिच्या कठोर परिश्रमाची, कसून केलेल्या सरावाची कल्पना येते. कडक डायट, सिनेमा, पार्टीज्, मित्र मैत्रिणींबरोबर सहली कौटुंबिक सणवार गप्पाटप्पांच्या त्यागातूनच ऑलिंपिकच्या यशाची चव सिंधूला चाखता आली हे समजते. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित अशा पी.व्ही.सिंधूचे हे पुस्तक एका खेळाडूच्या चॅम्पियन बनण्यापर्यंतचा प्रवास उत्कटपणे उलगडून दाखवते. ग्रंथालयातील सभासदांनी आवर्जून वाचावे असे हे पुस्तक.