माझे शेल्फ
रूपमहाल
रणजित देसाईंच्या कसदार ग्रामीणकथा… शालेय जीवनातच ‘भैरव’या कथेने लेखनाची सुरुवात केलेल्या रणजित देसाईंचा पहिला कथासंग्रह १९५२मध्ये ‘रूपमहाल’द्वारे प्रकाशित झाला. त्यांच्या बहुतांश कथा ग्रामीण समाजजीवनावर आधारित असून काही ऐतिहासिक, प्राणिविषयक, संगितविषयक आणि विनोदी कथा त्यांनी लिहिल्या आहेत. ‘रूपमहाल’या पहिल्या कथासंग्रहात नऊ कथा असून त्यातील आठ ग्रामीण जीवनावरील तर एक कथा ऐतिहासिक स्वरूपाची आहे. विशेष म्हणजे ‘रूपमहाल’ ही एकच कथा ऐतिहासिक असूनही तिचे शिर्षक लेखकाने कथासंग्रहाला दिलेले आहे. यावरून ‘रूपमहाल’चे महत्त्व लक्षात येते. ग्रामीण समाजजीवन हा या कथासंग्रहाचा गाभा असून बैलांच्या शर्यती, हत्तीची साठमारी, कुस्ती, शिकार इत्यादी विषय त्यांनी हाताळले आहेत. प्रत्येक कथेत एका संघर्षाची योजना करून त्याभोवती पोषक अशा घटनांची व ग्रामीण वातावरणाची पाश्र्वभूमी त्यांनी कलात्मकरित्या रंगविली आहे. म्हणूनच या सर्व कथा वाचकांच्या मनाची पकड घेतात. भोवतालच्या रूक्ष व कृत्रिम वातावरणातून काहीशा अद्भूतरम्य सृष्टीत घेऊन जातात. नाट्यपूर्ण संघर्ष रंगवताना रणजित देसाईच्या भाषेच्या सामथ्र्याची आणि सूक्ष्म अवलोकनशक्तीची प्रचिती येते. मग ते ‘भैरव’मधील बैलांच्या शर्यतीचे रोमहर्षक वर्णन असो, ‘नंदा’मधील जीवघेण्या शिकारीचे वर्णन असो, ‘मैदान’मधील भैरू आणि शिद्दा यांच्यातील अटीतटीच्या निकाली कुस्त्यांचे वर्णन असो किंवा ‘चै आनंद चै’ या कथेतील साठमारीचे वर्णन असो; ही सर्व वर्णने वाचत असताना ते ते प्रसंग परिणामकारक रीतीने वाचकांच्या नजरेसमोर उभे करण्याचे शब्दसामर्थ्य दिसून येते. किंबहुना आकर्षक वर्णनशैली हेच या कथांच्या लोकप्रियतेचे रहस्य असल्याचे सतत जाणवते. संघर्षाचे परिणामकारक वर्णन करण्याबरोबरच प्रभावी समरप्रसंग हेही रणजित देसाईंच्या कथालेखनाचे एक वैशिष्ट्य प्रस्तुत कथासंग्रहात पाहावयास मिळते. त्यांच्या कथेतील व्यक्ती किंवा प्राणी यांची वर्णने वाचकांच्या मनाला चटकन आकर्षित करून घेतात. हा पहिला कथासंग्रह असूनही यात पहिलेपणाच्या मर्यादा किंवा उणिवा अभावानेच व्यक्त होतात. कोल्हापुरातील संस्थानी वातावरणात वावरल्याच्या पाऊलखुणा यातून प्रकर्षाने जाणवतात. विशेषत: ‘भैरव’, ‘नंदा’, ‘चै अगद् चै’ यासारख्या प्राणिकथांतील जिवंत चित्रण पाहता लेखकाच्या संवेदनशील व्यक्तित्वाची आणि प्राणिविषयक जिव्हाळ्याची कल्पना येते.