माझे शेल्फ
सागरी परिक्रमेचा पराक्रम
रोमांचक प्रवास... फर्डिनांड मॅगेलन आणि खिस्तोफर कोलंबसच्या काळातल्या आणि आजच्या शिडाच्या नावांमध्ये प्रचंड फरक असला तरी आजही समुद्र तोच आहे, हवामान तितकेच बेभरवशाचे आहे. तुमच्या हाताशी नानाविध साधने असली तरी उधाणलेल्या समुद्रावर स्वार होऊन पुढे जाण्ासाठी आजही तितकेच कौशल्य आवश्यक आहे. यामुळेच एकविसाव्या शतकातही असे धाडस कुणी करायला गेले तर त्याचे जगाला अप्रूप वाटतेच. दिलीप दोंदे यांनी हे धाडस केले आणि शिडाच्या नावेतून एकट्याने पृथ्वीप्रदक्षिणा करणारे पहिलेच भारतीय ठरले! त्यांच्या कामगिरीची रोचक कहाणी म्हणजेच त्यांनी लिहिलेले पुस्तक ‘द फर्स्ट इंडियन.’ या विलक्षण कामगिरीची सुरुवात होण्यामागे प्रेरणा होती, ती व्हाईस अॅडमिरल मनोहर आवटी यांची. ‘भारतीय व्यक्तीची शिडाच्या बोटीतून पृथ्वीप्रदक्षिणा’ हे त्यांनी उराशी बाळगलेले स्वप्न होते. ते स्वप्न भारतीय नौदलाचे कमांडर दिलीप दोंदे यांनी साकार केले. दिलीप दोंदे यांना आपल्या कामाचा भाग म्हणून नौदलाच्या बोटीवर काम करण्याचा अनुभव होता, परंतु याट (Yacht) मधून नौकाविहार करण्याचा त्यांना कोणताही अनुभव नव्हता, तरीही त्यांनी आव्हान स्वीकारले. या प्रकल्पासाठी दोंदे यांना नौदलाच्या परवानगीपासून अनेक तांत्रिक बाबींची पूर्तता करावी लागली आणि भारतीय नोकरशाही काय चीज आहे याची खऱ्या अर्थाने जाणीव होऊ लागली. समुद्रातल्या दिव्यातून पार पडण्यापूर्वी लालफितीच्या दिव्यातून पार पाडण्यासाठी काय काय करावे लागले याचे तपशील पुस्तकाच्या पूर्वार्धात विस्ताराने मांडले आहेत. पुस्तकाचा हा भाग अतिशय उत्तम प्रकारे जमून आलेला आहे. ‘आपल्या देशातच तयार झालेली नौका या प्रवासासाठी वापरली जावी,’ असा नौदलाचा आग्रह होता. पृथ्वीप्रदक्षिणेच्या या मोहिमेत एक खूप मोठे आव्हान होते ते म्हणजे नौकाबांधणीचे. भारतात हौशी नौकानयन हा प्रकार मुळातच इतका कमी आहे, की स्वाभाविकपणे त्यासाठी लागणाऱ्या नौकेच्या बांधणीबद्दलही अतिशय थोडी माहिती भारतातल्या कंपन्यांना आहे. अशा परिस्थितीत गोव्याच्या नौकाबांधणी कंपनीचे प्रमुख रत्नाकर यांनी स्वत:देखील नौकाबांधणीच्या या संधीकडे एक आव्हान म्हणून पाहिले. देशविदेशांतून कच्चा माल मिळवणे, त्यामध्ये ऐनवेळी काही समस्य असल्याचे निदर्शनास आल्यावर आपले संपूर्ण व्यावसायिक ज्ञान, अनुभव यांचा वापर करून चटकन दुसरे पर्याय शोधणे, ‘डेडलाईन्स’चे संपूर्ण भान राखत सर्व अडचणींवर मात करत दिलीप दोंदे आणि रत्नाकर यांच्या समन्वयातून आकाराला येत जाणारी बोट आणि अखेर ती बोट सज्ज होऊन समुद्रात उतरणे हा प्रवास मुख्य सागरप्रवासाइतकाच खिळवून ठेवणारा आहे. सेलिंग (Sailing) म्हणजेच नौकानयन ही अशी गोष्ट आहे, की ‘थिअरी’ कितीही व्यवस्थित असली तरी प्रत्यक्ष ‘प्रॅक्टिकल’ कसे पार पडेल, कुठली आव्हाने उभी राहतील याबद्दल खात्रीशीरपणे काही सांगणे अशक्य असतं. दिलीप दोंदे यांना समुद्रप्रवासातही अकल्पित संकटांचा सामना करावा लागला. कधी शिडाच्या डोलकाठीला तडा जाणे, कधी शीड फाटणे, कधी जनरेटर बंद पडणे, कधी महत्त्वाचा भाग तुटणे अशा गोष्टींचा त्यांना भर समुद्रात सामना करावा लागला. कधी आपल्या पूर्वानुभवांच्या, आपल्या अंतर्मनाच्या कौलाच्या जोरावर त्यांनी पटापट निर्णय घेत त्या समस्यांवर ज्या प्रकारे मात केली ते वाचून दिलीप दोंदे यांच्या कौशल्याला आणि समयसूचकतेला दाद द्यावीशी वाटते. दिलीप दोंदे यांचे अनुभव अनोखे असले, तरी पुस्तक अतिशय वाचनीय होण्यास कारणीभूत ठरली आहे ती त्यांची निवेदनशैली! उपहास, कोपरखळ्या, मिश्किलपणा यांचे मिश्रण असलेली दोंदे यांची लेखनशैली पुस्तकाला कमालीचे प्रवाही करते. त्यांच्या सागरपरिक्रमेचे अनुभव वाचण्यासाठी उत्सुक असलेल्या वाचकाला मोहिमेच्या पूर्वतयारीला वाहिलेल्या पुस्तकाच्या पूर्वार्धात कुठेही कंटाळा येऊ न देणे हे लेखक म्हणून दोंदेंचे यश आहे. भारतासाठी पहिल्यावाहिल्या असणाऱ्या या मोहिमेसाठी परवानग्या मिळवण्यासाठी, फाइल्स पुढे सरकवण्यासाठी नौदलाचे प्रोटोकॉल पाळत, कोरड्या आणि अज्ञानमूलक सरकारी प्रश्नांना उत्तरे देत एकट्याने धावपळ करणे, त्याचवेळी एकीकडे शिडाच्या बोटीच्या निर्मितीवर जातीने लक्ष ठेवणे आणि या सगळ्यांतून वेळ काढून शिडाची बोट चालवण्याचा सराव करणे या सगळ्या गोष्टी मोहीम सुरू होण्याआधीच थकवणाऱ्या ठरल्या. पण त्या सगळ्या रगाड्यातही दोंदे यांची विनोदबुद्धी शाबूत राहिली आणि त्यांनी आपल्या बोचऱ्या अनुभवांना खुसखुशीतपणाचे वेष्टण चढवले ही गोष्ट विशेष म्हटली पाहिजे. दिलीप दोंदे यांचे अनुभवकथन हसरे, खेळकर असले तरी त्याला भावनेचे अस्तरही आहे.