मुखपृष्ठ
सागरतीरी

माझे शेल्फ

सागरतीरी

इंग्रजी शीर्षक
Sagartiri
सारांश

इंजिनिअर असलेल्या नायकाचं बोट पकडून आपण सौराष्ट्राच्या प्रवासाला निघतो. सागर किनाऱ्यावरच्या एका अत्यंत विरळ लोकवस्तीच्या मागासलेल्या प्रदेशात नायकाची नियुक्ती झालेली आहे. रासायनिक कारखाने उभे करण्यासाठी सरकारी जमिनींची मोजणी करायला तो आलाय. दूरवरच्याएका गजबजलेल्या शहरातून एकदम या वैराण प्रदेशात येऊन पडल्यावर तो काहीसा निराश आणि अस्वस्थ झाला आहे. या भूमीत पाऊल टाकल्यापासून जसा अभावग्रस्त जीवनाला तो सामोरा जातो आहे, त्याच जोडीला त्याला भेटत आहेत ती इथली अनोळखी माणसावर सुद्धा जीवापाड प्रेम करणारी माणसं. ज्यांच्या घरात खायला दाना नाही, अंगावर पुरेसे कपडे नाहीत, आरोग्याच्या सोयी तर सोडाच पण होड्या, गाढवं आणि एखादा घोडा याशिवाय वाहतुकीची साधनं नाहीत अशी वंचित माणसं इतकी आनंदी आणि उदार मनाची कशी? हे पाहून नायक चकित होतो. नायकाला रहाण्यासाठी आणि ऑफिस थाटण्यासाठी एक सरकारी हवेली मिळाली आहे. समुद्रकिनारी इतक्या उजाड परिसरात उभ्या असलेल्या या एकमेव वास्तूच्या पोटात अनेक रहस्यं दडलेली आहेत. हवेलीवर साहेबाला (नायकाला) मदत करण्यासाठी काही स्थानिक स्टाफ नेमलेला आहे. अफाट मेहनत करण्याची क्षमता असलेला नोकर सबूर, या वैराण प्रदेशात निगुतीनं वाढवलेल्या बाभळींवर आणि पक्ष्यांवर प्रेम करणारा जंगलअधिकारी नूरभाई, दर्यादेव येऊन राहतो त्या एका भेंसल्यावर की जिथे कोणीही जायची हिंमत करत नाही अशा ठिकाणी जाऊन येणारा शूर तांडेल किष्ना अशी काही इंटरेस्टिंग पात्रं साहेबाला या प्रदेशात भेटतात. सगळ्यात रोचक पात्रं आहेत ती म्हणजे बंगालीबाबा आणि अवल. किड्यामुंग्यांपासून समुद्रासोबत सुद्धा बोलू शकणारा बंगालीबाबा हा एक गूढ मनुष्य आहे. निसर्गाची भाषा त्याला अवगत आहे. अवल ही स्वाभिमानी आणि तत्त्वनिष्ठ स्त्री आहे, ती कोण आहे, हवेलीशी तिचा काय संबंध आहे हे जाणून घेणं फार रंजक आहे. स्थानिक जीवनाशी जुळवून घेताना साहेब हळूहळू इथलाच एक होऊन जातो. या भूमीवर, समुद्रावर आणि माणसांवर त्याचा जीव जडतो. ही भावनाशीलता त्याला नेमून दिलेलं काम करू नकोस असा आंतरिक साद घालू लागते. निसर्ग आणि मनुष्यजीवन यांचा सहसंबंध कथानकातून हळुवारपणे उलगडताना लेखकाने केलेलं सुरेख चिंतन या कादंबरीतून आढळतं. हे केवळ कथेसाठी कथा सांगणं नाही. घटनांतल्या मधल्या जागांतून जीवनाकडे बघण्याचा लेखकाचा व्यापक दृष्टिकोन आपल्याला दिसतो. काम पुढे नेऊ की राजीनामा देऊ या द्वंद्वात सापडलेला साहेब पुढे काय करतो? समुद्री वादळाबद्दल बंगालीबाबाने वर्तवलेल्या भाकिताचं पुढे काय होतं? साहेबाची गूढ भेंसल्यावर जाण्याची इच्छा पूर्ण होते का? कादंबरी वाचताना ही सारी रहस्ये उलगडत जातात. बुद्धी आणि मनगटाच्या जोरावर भव्य निर्मिती करण्याची महत्त्वाकांक्षा माणूसप्राणी बाळगून असतो. पण सर्वव्यापी, सर्वपोषी आणि सर्वनाशी क्षमता बाळगून असलेल्या निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर, त्याला समजून घेतल्यावर माणसाच्या वृत्तीत, विचारांत कसा बदल होत जातो याची ही गोष्ट आहे. थोर गुजराती लेखक ध्रुव भट्ट यांच्या समुद्रान्तिके या गुजराती साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कादंबरीचा अनुवाद अंजली नरवणे यांनी सागरतीरी नावाने केला आहे. साहित्य अकादमी मिळण्यासारखं या कादंबरीत काय विशेष आहे हे ती वाचायला घेतल्यावर लगेचच लक्षात येतं. ध्रुव भट्ट हे गुजरातीतले फार महत्त्वाचे लेखक आहेत. कथासूत्राला व्यक्तीकडून समष्टीकडे नेण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे. कथानक प्रेडिक्टेबल नसणं हे त्यांच्या लेखनाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य. आणखी गंमत तर यात आहे की ध्रुव भट्टांच्या कादंबरीतील नायकाचं नाव आपल्याला शेवटपर्यंत समजत नाही आणि तरीही तो आपल्याला आपल्यातलाच एक वाटत राहतो. आपल्याला माणूस म्हणून समृद्ध करणारी आणि जीवनाची भव्यता दाखवणारी ही कादंबरी आवर्जून वाचावी अशीच आहे.

सागरपरिक्रमेत अचानक एक सागरी पक्षी काही दिवसांपुरता बोटीवरचा वास्तव्याला येतो तेव्हा दोंदे यांच्या बोटीवरच्या वावरामध्ये नकळत झालेले बदल, समुद्रावरच्या त्या अफाट एकांतात एका छोट्या पक्ष्याची सोबतही हवीहवीशी वाटणे, त्या पक्ष्याची काळजी घेणे हा आपल्यासाठीही हृद्य अनुभव ठरतो. दोंदे यांचे आपल्या ‘म्हादेई’ या बोटीशी असणारे नाते पुस्तकात मोजक्याच शब्दात फार छान उलगडले आहे. दोंदे यांचे मोहिमेवर निघण्यापूर्वीपासून एकांतात ‘म्हादेई’शी संवाद करणे, स्वत: मोहिमेवर एकटेच निघालेले असूनही ‘We entered the port`, We sailed safely’ अशा उल्लेखांमधून ‘म्हादेई’ला जणू एक सजीव व्यक्तिमत्त्व बहाल करणे या गोष्टी ‘म्हादेई’चे त्यांच्या मोहिमेतलेच नव्हे, तर आयुष्यातले स्थानही अकृत्रिमपणे अधोरेखित करते. मोहिमेतला एक महत्त्वाचा टप्पा ओलांडल्यामुळे अफाट कष्टांचे चीज झाल्याच्या जाणिवेने भावनांचा बांध फुटण्याच्या प्रसंगाचे दोंदे यांनी मोजक्या शब्दांत केलेले वर्णन आपल्यालाही भावूक करून जाते. पहिले सागरपरिक्रमावासी भारतीय म्हणून दिलीप दोंदे यांच्या अनुभवकथनाला महत्त्व आहेच, पण त्यांचा एकूण दृष्टिकोन आणि निवेदनशैली या पुस्तकाला अधिक उंचीवर नेऊन ठेवतात.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद