माझे शेल्फ
साम्राज्य बुरख्यामागचे
ओसामा तिचा दिर होता ... वाचावं असं पुस्तक ... ओसामा बिन लादेन च संपूर्ण कुटुंब कसं होतं .आणि ते किती मोठं होतं. लेखिका त्याच्या मोठ्या भावाच्या प्रेमात कशी पडते व लग्न करून सौदी त जाते . तिथं तिने काढलेल्या आयुष्याची कहाणी . ९/११ नंतर तिच्या बदेल्या आयुष्याची गोष्ट तिच्या शब्दात... जरुर वाचा.शेख महंमद बिन लादेन हा एक जबरदस्त इसम होता. एकेकाळी अरबस्तानचाच भाग असलेल्या पण आता येमेन किंवा यमन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या देशातला शेख महमंद बिन लादेन नावाचा एक सामान्य कामगार १९३० साली सौदी अरेबियात आला. आपल्या अंगचया गुणांनी तो लवकरच एक नामांकित बांधकाम कंत्राटदार म्हणजे बिल्डर झाला. ही १९४०च्या दशकातली कथा आहे. त्यावेळी बिल्डर या पदवीभोवती सत्ता, संपत्ती अगर बदमाषी असं कोणतंच वलय नव्हतं. त्या काळात दर्जेदार बांधकाम करून शेख महंमद हे सुलतान अब्दुल अजीझ यांचे आवडते बनले. १९६७ साली शेख महमंद बिन लादेन विमान अपघातात मृत्यू पावले. त्यावेळी त्यांच्या जनानखान्यात बावीस बायका आणि चोपन्न मुलं एवढा प्रचंड कुटुंब संभार जमा झालेला होता. या चोपन्नातलाच एक म्हणजे सध्याचा जागतिक खलनायक ओसामा बिन लादेन. प्रस्तुत ‘साम्राज्य बुरख्यामागचे’ या आत्मवृत्ताची लेखिका कारमेन ही ओसामाचा थोरला सावत्र भाऊ येस्लाम याची बायको. कारमेनची आई इराणी मुसलमान, तर बाप स्विस खिश्चन. त्यामुळे तिचा जन्म, बालपण जिनिव्हात स्वित्झर्लंडमध्ये गेले. त्यांच्या घरात सुट्टीच्या दिवसांत भाडेकरू म्हणून राहायला आलेल्या येस्लाम बिन लादेनच्या प्रेमात पडून ती सासुरवाशीण म्हणून सौदी अरेबियात राहायला आली. कुठे पृथ्वीवरचा स्वर्ग मानला जाणारा निसर्गसुंदर स्वित्झर्लंड नि कुठे अरबस्तानच रखरखीत वाळवंट. पण कारमेनला लागोपाठ तीन मुलीच झाल्या. त्यामुळे येस्लामचं नि तिचं फाटलं केवळ येस्लामच्या प्रेमाखातर अरबी वाळवंट नि त्यापेक्षाही दु:सह असा इस्लामी कर्मठपणा सहन करणाऱ्या कारमेनला हे सगळं असह्य झालं. ती येस्लामपासून वेगळी झाली आणि आपल्या तीन मुलींसह जिनिव्हात राहू लागली. पण आपलं बिन लादेन हे अडनाव मात्र तिने कायम ठेवले. परिणामी ११ सप्टेंबर २००१ च्या भयानक घटनेनंतर आख्ख्या युरोपच्या टेलिफोन डिरेक्टरीत बिन लादेन हे आडनाव लावणारं एकच घर दिसू लागलं. कारमेन बिन लादेन, जिनिव्हा, स्वित्झर्लंड! त्यामुळे कारमेन व तिच्या मुलींना असह्य मनस्ताप सोसावा लागला. मग कारमेनने वृत्तपत्रं, दुरदर्शन यांना मुलाखती देऊन आपली कहाणी सविस्तर सांगितली. ती कहाणी म्हणजेच प्रस्तुत पुस्तक. आजच्या अत्याधुनिक समजल्या जाणाऱ्या जगातही मुसलमान स्त्रियांना किती भयंकर जाच धर्माच्या नावावर केला जातो हे मुद्दाम वाचावं असं उतरलं आहे. विशेषत; हिंदू धर्मातल्या कर्मठपणावर येता-जाता तोंडसुख घेणाऱ्या कथित निधर्मवाद्यांनी आणि फाजील स्त्रीमुक्तीवाल्यांनी तर इस्लामी स्त्रियांची ही घुसमट अवश्य वाचावी.