मुखपृष्ठ
सांधा बदलताना

माझे शेल्फ

सांधा बदलताना

इंग्रजी शीर्षक
Sandha Badaltana
सारांश

संस्थानी कारभाराचा सांधा बदलताना… आपल्या देशामध्ये पूर्वापार राजेरजवाड्यांची सत्ता चालत आली आहे. या राजेरजवाड्यांच्या मनमानी आणि एककल्ली कारभारामुळे परकियांना आपली वसाहत येथे स्थापन करण्यास वेळ लागला नाही. समाजातील जाती-पोटजातीचे फुकाचे मोठेपण आणिसत्ताधीशांचे एककल्ली राजकारण यातूनच ब्रिटिशांना आपल्या देशात पाय रोवण्याची संधी मिळाली, पण समाजापासून आणि जनतेपासून फटकून राहणाऱ्या संस्थानिकांमध्ये काही अपवाद होते. त्या अपवादात्मक संस्थानिकांमध्ये काही अपवाद होते. त्या अपवादात्मक संस्थानिकांमध्ये एक होते बडोद्याचे संस्थानिक! त्याकाळी म्हणजे १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात या खंडप्राय देशातील प्रगत संस्थानांपैकी एक होते बडोदा संस्थान आणि त्याचे संस्थानिक गायकवाड घराणे. सयाजीराव गायकवाड यांनी बडोदा संस्थानामध्ये अनेक सुधारणा केल्या आणि अनेक सामाजिक बदलांची नांदी घडवून आणली, पण सयाजीराव गायकवाडांनी ही नांदी घडवली ती त्या संस्थानाच्या सुधारणावादी संस्कृतीचा कळस होता असे मानायला हरकत नाही. बडोदे संस्थानला लाभलेले गायकवाड घराणे हे अन्य संस्थानिकांपेक्षा वेगळे होते. घराण्यात अंतर्गत वाद, कलह होते पण समाज जागतिक स्तरावर किती पुढारलेला आहे, याची नोंद वेळोवेळी घेत, नव्या बदलांचे स्वागत या घराण्याने केले आहे. इतकेच नाही तर प्रगतीचा मार्ग दाखविणाऱ्या साधनांचा उपयोग आपल्या राज्यात कसा करता येईल, याबाबतही विचार होत असे. ब्रिटीशांनी १८५३ मध्ये भायखळा म्हणजे मुंबई ते ठाणे दरम्यान रेल्वे सुरू केली. ती प्रामुख्याने दळणवळण अधिक गतीने व सुलभ व्हावे यासाठी! पण यामुळेच या शहराच्या आणि पर्यायाने देशाच्या विकासाला गती मिळाली. ब्रिटीशांचा अंमल सर्व संस्थानांवर नव्हता. ब्रिटीशांनी रेल्वे सुरू केली आणि त्यातून साधली जाणारी प्रगती पाहून बडोदा संस्थाननेही स्वत:च्या संस्थानात रेल्वे सुरू केली. अर्थात तांत्रिक कारणामुळे ही रेल्वे सुरू न होता ट्राम सुरू झाली. सयाजीराव गायकवाड दत्तक म्हणून या संस्थानाच्या राजेपदी बसण्यापूर्वीचा काळ हा संस्थांनी राजकारणाच्या धामधुमीचा काळ होता. खंडेराव गायकवाड आणि मल्हारराव गायकवाड या भावंडांमध्ये धुसफूस सुरू होती. खंडेराव पोटाच्या विकाराने आजारी होते तर मल्हाररावांना तुरूंगात ठेवण्यात आले होते. या दन भावंडांच्या वादात दरबारी अधिकारी आणि काही प्रतिष्ठित जनता यांच्यातही दोन भाग पडले होते. खंडेरावांच्या निधनानंतर मल्हारराव सत्तेवर आले. खंडेरावांच्या काळात तेथे असलेल्या इंग्रज अधिकाऱ्यांचे वर्चस्व दरबारावर होते, ते काही प्रमाणात कमी झाले. ब्रिटिशांच्याच मदतीने बडोदा संस्थानात रेल्वे सुरू करण्याचा प्रयत्न कूर्मगतीने सुरू होता विंâबहुना तो थांबलाच होता. अशा वेळी या कामी नारायण संस्थानच्या मदतीला आला. शुभदा गोगटे यांची सांधा बदलताना ही कादंबरी या बडोदा संस्थानच्या एकूण सामाजिक-राजकीय परिस्थितीचे यथार्थ वर्णन करणारी आहे. १८६० ते १८७५ या संपूर्ण कालावधीतील बडोदा संस्थानमधील सामाजिक चित्र उभे करतानाच सरकारी पातळीवर कोणतीही योजना कशी राबवली जाते, त्यात कोणकोणते अडथळे येतात, ते अडथळे कसे दूर होतात याचेही बारकावे वाचायला मिळतात. डभोई ते करजण हा २० मैलांचा रेल्वेमार्ग सुरू व्हावा यासाठी बडोदे संस्थान नारायण च्या मदतीने प्रयत्न करत असतानाच काही विघ्नसंतोषी ब्रिटिश सत्ताधाऱ्यांच्या मदतीने कसा अडसर आणतात, हेही वाचायला मिळते. नारायण हा सर्वसामान्य मराठी कुटूंबातला मुलगा. रेल्वे इंजिनांच्या आवडीमुळे तो रेल्वेत कामाला लागतो. घरच्या पातळीवर तत्कालीन संयुक्त कुटुंबपद्धतीमुळे पत्नीचा झालेला छळ तो सहन करू शकत नाही आणि तो विभक्त होतो. पण बऱ्याच वर्षांनी तो घरी येतो तेव्हा घराचे बदललेले रूप पाहून तो अचंबित होतो, पण नंतर पुन्हा आपल्या प्रपंचाकडे वळतो आणि एक नवे आव्हान त्याला बडोदे संस्थानमध्ये रेल्वे सुरू करण्याच्या निमित्ताने मिळते. या कादंबरीत नारायणचे घर आणि नंतर बडोदे संस्थानमधील त्यांची कामगिरी याचा सांधा साधताना लेखिकेची लेखनगती वेगवेगळ्या पातळीवर होते आणि मध्ये सांधा बदलताना नाही तर निखळलेला वाटतो, पण ओघवत्या लेखनशैलीमुळे हे वाचकांच्या विशेष लक्षात येणार नाही. कादंबरीतील सर्वच पात्रे बदलत्या परिस्थितीत स्वत:मध्ये बदल करताना आढळतात. म्हणजेच ते त्यांच्या जीवनाचा सांधा बदलतात. सरळमार्गी जीवन जगताना अनेकदा असा सांधा बदलणे अपरिहार्य असते. त्यातूनच जीवन प्रगतीकडे नेता येते. संस्थानिक आणि ब्रिटिश रेसिडेंट यांच्यातील तो संघर्षाचा काळ होता. १८५७ मध्ये झालेल्या उठावामुळे हा संघर्ष अधिक तीव्र झाला होता. ब्रिटिशांचा प्रभाव वाढू लागला होता. मल्हारराव गायकवाड यांच्या काहीशा छंदीफ़ंदी स्वभावामुळे वैतागलेल्या रेसिडेंटने अखेर मल्हाररावांना सत्ताभ्रष्ट केले आणि दत्तक विधानाच्या माध्यमातून सयाजीरान गायकवाड सत्तेवर आले.

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
330
भाषा
मराठी
किंमत
250.00
समुदायाने जोडले
बंद