माझे शेल्फ
सभेत कसे बोलावे
एकदा गुरुजींनी मुलांना प्रश्न विचारला– मुलांनो, जगामध्ये आई श्रेष्ठ, की गुरू श्रेष्ठ?’ प्रश्न ऐकून सारा वर्ग शांतपणे विचार करू लागला. खरं पाहिलं तर आई श्रेष्ठ. पण प्रश्न विचारणारे आहेत गुरुजी! ते श्रेष्ठ नाहीत कसं म्हणायचं? तेव्हा एक मुलगा उभा राहिला व म्हणाला, ‘गुरुजी मी सांगतो तुमच्या प्रश्नाचं उत्तर.’ गुरुजींनी संमती देताच तो मुलगा म्हणाला, ‘गुरुजी श्रेष्ठ!’ हे उत्तर ऐकून गुरुजी खूश झाले. ते प्रसन्न वदनाने त्याला म्हणाले, बाळ, असा पुढं ये! आणि साऱ्यां वर्गाला सांग, गुरू का श्रेष्ठ, ते!’ तो मुलगा साऱ्यांपुढं येऊन म्हणाला ‘‘आई अंगाई-गीत गाऊन, आपल्या एकाच बाळाला झोपविते! तर गुरुजी आपल्या एकसुरी आवाजात संपूर्ण वर्गाला झोपवितात!!’’ व्याख्यान कंटाळवाणे न होता आकर्षक, खुसखुशीत होण्यासाठी काय करायला हवं ते या पुस्तकात प्रभावीपणे मांडलं आहे. ज्याला भाषणाची भीती वाटते, त्याची भीती नाहीशी करण्याचा कानमंत्रही इथं सांगितलाय. जो आता भाषण करतोय् तो प्रभावी वक्ता होण्यासाठी काय करायला हवं त्याचं मार्गदर्शन इथं आहे. ज्याला भाषण हा प्रकार भीषण आहे; तो आपल्यासाठी नाहीच, असं वाटतंय, त्याला या प्रकाराकडे प्रेमानं आणण्याचं सामर्थ्य या पुस्तकात आहे. आपण हे छोटेखानी पुस्तक एकदा वाचायचं अन् हजारो व्याख्यानं द्यायला तयार व्हायचं. आपल्या व्याख्यानाच्या वेळी श्रोत्यांतून जांभया येणार नाहीत, याची खात्री आहे.