माझे शेल्फ
शेकरा
अंतर्मुख करणारी एक विलक्षण लघु कादंबरी… रणजित देसाई यांची अखेरची अभिव्यक्ती म्हणजे सुजाण वाचकास अंतर्मुख करणारी एक विलक्षण लघु कादंबरी म्हणजे ‘शेकरा’ असे म्हणावे लागेल. या कादंबरीचा नायक शेकरा हा खारीसारखा दिसणारा पण खारीहून मोठा असलेला शाकाहारी प्रणी. कादंबरीकारांनी शेकराद्वारे केलेले निवेदन हे मनोवेधक असून कादंबरीभर जंगल जीवनाचे चित्रण अगदी हुबेहूब केले आहे, त्यामुळे कादंबरीची मांडणी सुरेख झाली आहे. वाचक ही कादंबरी वाचताना शेकराच्या जीवनाशी एकरूप तर होतोच शिवाय शेकराच्या निवेदनाबरोबर जंगलातून फेरफटका मारूनही येतो. अनोळखी प्राणी जगत पाहून आल्याचा वास्तव पातळीसारखा अनुभव या कादंबरीतून येतो. रणजित देसाई हे लेखक भूतकाळात रमणाऱ्या प्रवृत्तीचे असून वाचक जेव्हा ही कादंबरी वाचतो, तेव्हा प्राणी जीवनाशी तो आपल्या जीवनाची तुलना सहजच करतो. पशुत्वापासून मानवतापर्यंत केलेला भुतकाळातील प्रवास आहे. आदिमकाळातील जीवनाचे जिवंत अवशेष म्हणजे ‘शेकरा’तील जंगली जीवनाचा आलेख आहे. मानवाच्या केलेल्या प्रदीर्घ प्रवासाचा आरंभ बिंदू मानता येईल इतके प्रभावी कलात्मक लेखन शेकरा या कादंबरीत आकारास आले आहे. शेकरा जंगलात भटकंती एकाकी जीवन जगत असतो. त्याच्या आसपास अनेक वन्य पशुपक्षीही जीवन जगत असतात. ‘बळी तो कान पिळी’प्रमाणे जंगलातील मोठे प्राणी लहान प्राण्यांना खाऊन जीवन जगत असतात. जंगलनियमाप्रमाणे चाललेल्या घडामोडीत अनेक दुबळे प्राणी सशक्तपणाचे भक्ष्य ठरतात. त्याचे जीवननाट्य तो शेकरा आपल्या बिटबिट्या डोळ्यांनी सतत पाहात असतो. या पाहण्यातही थंड अलिप्तता असते. भरपूर उत्कंठा असते. जमेल तिथं सहभाग असतो. काही ठिकाणी पलायनाच्या शारीरिक प्रतिक्रियाही भरपूर आहेत. सबंध कादंबरीभर सगळं जंगलातील प्राणीविश्व नैसर्गिकपणे पसरलेले आहे. यात शेकरा, काळतोंडे हुप्पे, माकड, वाघ, हरीण, हत्ती, सांबर, भेकरं, अस्वलं, रानडुक्करं, गवे, घारी, गिधाडे, ससाणे, सुसर, खोकड, मोर इतर पशुपक्षी, वनस्पती, पाऊस, पाणी, कडे, पहाड, डोंगर पाण्याचे विविध प्रवाह सर्व नाट्यपूर्ण, कौशल्यपूर्ण आणि जिवंतपणे त्यांच्या सहज हालचालीसह आपल्यासमोर फिरत आहे असे दृश्य दिसते. पशु-पक्षांतील जीवनाचे अनेक बारकावे असणारे प्रसंग सिनेमासारखे पाहून सुज्ञ वाचक थक्क होऊन जातो. जंगली प्राणी जीवनाचे भक्ष्य-भक्षक संबंध त्यातील क्रौर्य, रौद्र रूप, निष्पाप, निरागसता वाचकास खिळवून ठेवते. नीतीनियम, कायदे, परंपरा, पापपुण्य, उचित-अनुचित, रुढी, संस्कृती यांनी बंदिस्त असलेला आपला मानवी समाज जंगली प्राणी जीवनापेक्षा बरा सुसह्य आहे. अशा विरोधात्मक कल्पना वाचकास सुखावतात व सुरक्षितही वाटतात. शेकरा हा ससा, हरीण यांच्याप्रमाणे निष्पाप निरागस शाकाहारी चिमुकला खारीसारखा दिसणारा भाग्यवान प्राणी असावा असा आहे.तो सुरक्षित निरागसपणे जंगल अनुभवणारा प्राणी आहे असे वाटत न वाटत तोपर्यंत तो एका खोडकाचा भक्ष्य ठरतो. प्रतिकार करायला जवळ एकही साधन नाही. असेल तर ते फक्त पलायन पण तेही करण्यास तो फसतो. असह्यपणं जंगल कायद्याचा बळी ठरतो. याचा प्रत्यय कादंबरीच्या शेवटी येतो. मानवी जीवनातही निष्पाप, निरागस, निरुपद्रवता हे सांभाळून ठेवण्याचे गुण मानले जातात. ते कोणीही कुस्करू नये अशी भावना वाचकाच्या हृदयात ठासून बसते व जीवनातील अर्थही कळतो. या कादंबरीचे लेखन एका बाजूला वास्तव, वस्तुनिष्ठ, कलात्मक अलिप्ततेने कलेले आहे. मानवी जीवनावर किंवा जंगली जीवनावर भाष्य न करताही एकाकी शेकराच्या निवेदनातून सत्य सूचित प्रतिकाचे रूप मात्र स्पष्ट हृदयाशी जाऊन भिडते. मराठीत जसे लेखन दुर्मिळ असून कादंबरीकार रणजित देसाई यांच्या दिपस्तंभासारख्या उज्ज्वल प्रतिभेला शोभणारी अशीच आहे. निरुपद्रवी, निरागस व निष्पाप अशा लोकांना व्यवहारी जगात कोणीही शेकऱ्याप्रमाणे छळू नये. असेच जणू जगाचा निरोप घेताना शेकराच्या निवेदनातून त्यांनी सांगितले असावे असे वाटून जीवाला चटका लागून राहतो.