माझे शेल्फ
सेक्स वर्कर
केरळमधील वेश्येचे आत्मचरित्र मराठीत... स्वत: जगण्यासाठी आणि पोटच्या गोळ्यांना जगविण्यासाठी रूढता, नैतिकता ठोकरत वेश्याव्यवसायाच्या दाहकतेत उडी घेऊन तितक्याच बेधडकपणे आपली करुण कहाणी शब्दबद्ध करणाऱ्या मल्याळी नलिनीची आत्मकथा आता मराठीत उपलब्ध झाली आह. ‘सेक्स वर्कर’ नावाने सुप्रिया वकील यांनी अनुवादित केलेले हे पुस्तक मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केले आहे. ‘ओरू लैंगिक कोझिलालियुते आत्मकथा’ (एका देहविक्रेतीची आत्मकथा) हे नलिनी जमीला यांचे आत्मचरित्र. या मल्याळी भाषेतील पुस्तकाच्या १० आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या. त्यांच्या २१ हजार प्रती विकल्या गेल्या. डी.सी. बुक्स या केरळमधील प्रकाशन संस्थेने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. तमीळ, कानडी, बंगाली, इंग्रजी, फ्रेंच, मराठीसह सहा भाषांत हे पुस्तक अनुवादित झाले आहे. तिसरीपर्यंत शिकलेल्या नलिनी जमीला हिने तिच्या जीवनाविषयी लिहावे, असा आग्रह अनेकांनी केला. अखेर मुक्त पत्रकार आय. गोपीनाथ यांनी तिचे आत्मकथन शब्दबद्ध केले. कोणतीही ओळख न लपविता लिहिलेले हे पुस्तक आहे. देहविक्री करणाऱ्या महिलेने लिहिलेले हे पहिले पुस्तक असल्याचा दावा सुप्रिया वकील यांनी पत्रकार परिषदेत केला. मेहता पब्लिशिंग हाऊसचे सुनील मेहता याप्रसंगी उपस्थित होते. घरातील दारिद्र्यामुळे नलिनीला या व्यवसायात येणे भाग पडलं. उपेक्षित बालपण गेलेल्या नलिनीचा एका दादाशी विवाह झाला. तीन वर्षांतच त्याने आजारपणाला कंटाळून आत्महत्या केली. त्यानंतर दोन मुलांचे पालनपोषण करण्याची जबाबदारी तिच्यावर पडली. त्यात खाष्ट सासू, त्यामुळे नाइलाजास्तव ती या व्यवसायात आली. तिचं पहिलं गिऱ्हाईक होतं एक वरिष्ठ पोलीस अधिकारी! त्यानंतर तिने मेंगलोरच्या एकाशी लग्न केले. एक मुलगी झाल्यानंतर त्याने तिला सोडले. मग तामिळनाडूमधील एकाशी तिने विवाह केला. त्याच्याबरोबर तिने १२ वर्षे संसार केला. ती आजारी पडली. त्यानंतर तिसरा नवराही तिला सोडून गेला. माहेरचा आधार नाही. तारुण्यात पदार्पण केलेल्या मुलीसह नलिनी पुन्हा रस्त्यावर आली. स्वत:च्या मुलीला मात्र तिने यापासून दूर ठेवले. रोजच्या जगण्याशी दोन हात करत असतानाच मुलीच्या संरक्षणाचेही आव्हान तिने पेलले. टूथ इन स्ट्रेजर द फिक्शनची प्रचिती देणारी ही आत्मकथा वाचताच वाचक सुन्न होतात, असे वकील यांनी सांगितले. ‘ज्वालामुखी’ या स्वयंसेवी संस्थेत नलिनी सहभागी झाली. देहविक्री करणाऱ्या महिला नुसत्या प्रश्नावर चर्चा करतात; पण त्यावर उत्तर शोधत नाहीत. त्यामुळे त्यांच्या प्रश्नासंदर्भात सक्रिय होऊन तिने माहितीपट बनविला. देहविक्री करणाऱ्या महिलांचे प्रश्न ती सोडवित आहे. या पुस्तकातून समाजाच्या बेगडी नैतिकतेवर प्रहार करताना सुन्न करणारे प्रश्न विचारते. सध्या नलिनी तिची मुलगी आणि रिक्षावाला जावई यांच्यासमवेत राहते. तिचा जावई व विहिण यांना तिच्या पूर्वआयुष्याबद्दल कल्पना आहे, असे वकील यांनी सांगितले.