माझे शेल्फ
शेम
घराण्याची प्रतिष्ठा क्रूर वास्तव... भारतातील, पंजाबमधील काही कुटुंब इंग्लंडमध्ये स्थायिक झाली होती. आपल्या मातृभूमीपासून दूर गेलेल्या, कुटुंबाविना एकट्या पडलेल्यांसाठी जवळची, वेळप्रसंगी आधार देऊ शकणारी एकच गोष्ट होती ती म्हणजे त्यांचा ज्ञातिसमाज. पजाबमधून इंग्लंडला येऊन स्थायिक झालेले त्यांच्या जातीचे लोक. इंग्लंडमध्ये डर्बी येथे स्थायिक झालेल्या अशाच एका पंजाबी कुटुंबातील मुलीची – जसविंदर संघेराची – ही सत्यकहाणी आहे. ‘शेम’ हे तिचं पुसतक वाचलं की तिच्या संघर्षाची कल्पना येते. चौदा वर्षांची असताना जसविंदरला, तिच्यासाठी निवडलेल्या नवऱ्याचा फोटो दाखवण्यात आला. ती घाबरली. ठरवून केलेल्या लग्नानंतर थोरल्या बहिणीचा झालेला छळ तिनं प्रत्यक्ष पाहिला होता. म्हणून ती घरातून पळून गेली. तेव्हापासून तिच्या आईवडिलांनी तिचं नावच टाकलं. ती पळून गेली नसती तर सासरी छळ सोसत जगावं लागलं असतं आणि लग्न मान्य केलं नसतं, तर तिला श्वास कोंडून मारून टाकलं असतं. श्वास कोंडून मारून टाकणाऱ्या क्रूर कुटुंबव्यवस्थेपासून तिनं पळून जाऊन स्वत:ची कशी सुटका करून घेतली, त्याची ही विलक्षण सत्यकहाणी आहे. आईवडिलांनी ठरवलेल्या मुलाशी लग्न करण्याचं अमान्य करून जसविंदरनं तिची मैत्रीण अवतार हिच्या भावाशी, जस्सीशी, एका चांभार मुलाशी लग्न केल्यानं घराण्याच्या प्रतिष्ठेला चिखल फासला म्हणून तिच्या कुटुंबानं तिला वाळीत टाकलं होतं. जमीनदार समजली जाणारी जाट घराण्यातील ही माणसं चांभारांना अस्पृश्य समजतात. अशाच एका हीन कुळातील मुलाशी जसविंदरनं लग्न केलं म्हणून आईवडील खूप संतापले होते. आपल्या अवतीभवती असंही घडत असतं. याची जाणीवही नसलेल्यांनी जसविंदरची ही आत्मकहाणी जरूर वाचावी. ‘घराण्याची प्रतिष्ठा’ ही मुलींच्या जिवापेक्षाही अधिक असते, असं वाटणाऱ्या मनोवृत्तीविरुद्ध लढणारी, आत्मसन्मानासाठी केलेल्या संघर्षाची ही कहाणी आहे. तशीच या परिस्थितीवर मात करून, अशा पीडित स्त्रियांसाठी आधारभूत होण्याचं धाडस दाखवणाऱ्या जसविंदरच्या विजयाची ही कहाणी आहे!