माझे शेल्फ
सेव्हिंग फेथ
अमेरिकेतील दोन गुप्तचर संघटनांमधील राजकीय सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर घडून येणारा सुष्ट आणि दुष्ट प्रवृत्तीचा लढा आणि मृत्यूच्या छायेतही बहरणारं निसीम प्रेम ....
वेगळ्याच थराराचा अनुभव देणारी रहस्यमय कादंबरी.
गुंतवून ठेवणारी रहस्यकथा
मानवी स्वभाव वैशिष्ट्यांचे असंख्य धागे आणि या धाग्यांच्या घट्ट विणीत गुरफटलेले रहस्य असेच 'सेव्हिंग फेथ' या कादंबरीचे वर्णन करावे लागेल. पैसा, कीर्ती, प्रतिष्ठा या सर्वांचा समन्वय ज्या शक्तीत होतो ती शक्ती म्हणजेच सत्ता. 'सीआये' व 'एफबीआय' या दोन गुप्तचर यंत्रणांमध्ये असलेला सत्तासंघर्ष हे या कादंबरीचे मुख्य सूत्र आहे. यासोबतच अमेरिकेतून अविकासित देशांमध्ये जाणार्या आर्थिक निधीसाठी चाललेल्या डावपेचांमधून उभे राहिलेले नाट्यही येथे अनुभवास येते.
फेथ ही या कादंबरीची नायिका, राजकीय पटावरील डावपेचांच्या नाट्यात अनेक रहस्ये तिला कळली आहेत. विवेक जागृत असलेल्या फेथला आता ही रहस्ये मोकळी करायची असतात. ती 'एफबीआय'ला शरण जाते आणि तिचे साधे सरळ आयुष्य एकदम रोमांचक बनू लागते. तिच्याबरोबरच्या 'एफबीआय' एजंटचा खून होतो. त्याचवेळेत अंधारातून अवतरलेला डिटेकिटव्हली अॅडम्स तिच्या आयुष्यात प्रवेश करतो. फेथसमोर त्याच्यासोबत पलायन करण्याशिवाय पर्यायच राहत नाही. मग सुरु होतो एक जीवघेणा पाठलाग. संशय, अविश्वास, गूढ कारस्थानं यांनी खच्चून भरलेला प्रवास. सुष्ट आणि दुष्ट शक्तींमधील ही चिरपरिचित लढाई लेखकाने अत्यंत थरारक रंगात येथे रंगविलेली आहे. या कथाप्रवाहात असंख्य सुष्टदुष्ट व्यक्तिरेखा आपल्याला भेटत राहतात. त्यांचे सुख-दु:ख, रागलोभ, सगळं आपलं म्हणून अनुभवावं असं. मृत्यूच्या सावटात फेथ आणि ली अॅडम्स या जोडीची प्रेमकहाणी फुलते. 'प्रेम' ही भावना मृत्यूलाही जिंकण्याइतपत समर्थ असते असाच अनुभव अधोरेखित करणारी ही प्रेमकहाणी विविध गहिर्या विलोभनीय रंगछटांचे दर्शन घडविते.
जीवन-मरणाच्या सीमारेषेवरील चक्रावून टाकणारा पाठलाग या कादंबरीत थरार निर्माण करतो. थरारकता ही या कादंबरीतील एक समर्थ व्यक्तिरेखाच आहे.
छोटी छोटी पण परिणामकारक प्रकरणे, वेगवान घटना, धककादायक प्रसंग, मानसिक संघर्ष, शारीरिक द्वंद्व, बुद्धिमत्तेचे वैभव, विस्मयकारक पण सुखान्त या कादंबरीच्या जमेच्या बाजू.
चंद्रमोहन कुलकर्णी यांनी केलेले 'सेव्हिंग फेथ'चे मुखपृष्ठ साधे आहे. मात्र अर्थप्रकटीकरणात ते तसूभरही कमी पडत नाही. हिरव्यागार चलनी नोटांच्या पार्श्वभूमीवर ऑटोमॅटिक रिव्हॉल्व्हर आणि वेगाचा आभास निर्माण करणारी उच्चभरू नायक नायिकेची जोडी; त्यांचे चेहरे महत्त्वाचे नाहीत तर त्यांच्या जीवनाला आलेला वेगच अधोरेखित झालेला. जीवनमूल्यांना अधोरेखित करणारी ही कादंबरी एकदातरी अनुभवावीच.