मुखपृष्ठ
सीईओच्या केबिनमधून

माझे शेल्फ

सीईओच्या केबिनमधून

इंग्रजी शीर्षक
Ceo Chay Cabin Madhun
सारांश

‘सी.ई.ओ.च्या केबिनमधून’ या डॉ. गिरीश वालावलकर लिखित पुस्तकातून कॉर्पोरेट जगाची एक वेगळी झलक पाहायला मिळते. एकूण ४३ प्रकरणे असणाऱ्या या पुस्तकात आपल्या आजूबाजूला घडणारे आर्थिक बदल, त्यातून निर्माण होणाऱ्या विकासाच्या संधी आणि त्याचे देशातल्या प्रत्येकस्तरातल्या नागरिकांच्या जीवनशैलीवर होणारे परिणाम याचे ओघवत्या भाषेत वर्णन करण्यात आले आहे. लेखकाला अनेक बहुराष्ट्रीय कंपन्याच्या सी.ई.ओ. आणि संचालक पदांवर काम करण्याचा अनुभव असल्याने हे पुस्तक अतिशय अभ्यासपूर्ण झालंय. पुस्तकातल्या लेखांच्या विषयांमध्ये वैविध्य आहे. ‘उद्योगी श्रीमंती’ या लेखाची स्वतःची नीतिमूल्यं जपूनसुद्धा संपत्ती कमावता येते, हे विविध उद्योगपती आणि त्यांनी आपली औद्योगिक साम्राज्ये उभी करण्यासाठी वापरलेले मार्ग यांची उदाहरणे देऊन विशद केलं आहे. ‘स्विस बँकांची वादग्रस्त व्यावसायिकता’ या लेखात स्विस बँकांची व्यवसाय करण्याची पद्धती आणि त्यांच्या ग्राहकांचं जगभर पसरलेलं जाळं याविषयी सविस्तर चर्चा केली आहे. ‘इंग्लिश बिझनेस’ या लेखामध्ये ब्रिटिश लोकांच्या मानसिकतेवर प्रकाशझोत टाकला आहे. आज आपल्या देशात अनेक संधी उपलब्ध होत आहेत. आपल्या तरुणांजवळ एखादी नवी कल्पना असेल आणि प्रामाणिकपणे कष्ट करण्याची तयारी असेल, तर ते शेकडो कोटी रुपयांची उलाढाल करणारी कंपनी उभी करू शकतात हे ‘नावीन्यपूर्ण कल्पनेवर आधारलेली उद्योजकता’ या लेखात व्हाट्सअॅप आणि फेसबुकचे उदाहरण देऊन लेखकाने स्पष्ट केले आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात सर्वोच्च पदापर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्या प्रकारची मानसिकता जोपासावी लागते, त्याचा उहापोह ‘शिखरापर्यंतच्या वाटचालीसाठी’ या लेखात केले आहे. लेखक सांगलीसारख्या एकेकाळच्या छोट्या गावातून आलेले आहेत. त्यांना स्वतःला शाळेत जाण्यासाठी तीन किलोमीटरची पायपीट करायला लागायची. आज शेकडो कोटी बाजारमूल्य असणाऱ्या वंâपन्यांच्या सी.ई.ओ. आणि संचालकसारख्या मोठ्या पदापर्यंत पोहोचलेल्या लेखकाला मोठ्या कष्टाने मोठे होणे म्हणजे काय असते हे चांगले माहित आहे. हे पुस्तक लेखकाला असणारे फक्त आर्थिक भान दाखवते का? तर नाही. त्यांच्या सामाजिक जाणिवासुद्धा प्रचंड जागरूक असल्याचा प्रत्यय पुस्तक वाचताना येतो. याचे एक उदाहरण येथे देता येईल. ‘उंबऱ्यावरची महागाई’ या प्रकरणात कराडला काही दिवस राहात असताना त्यांच्या घराजवळच्या वस्तीतल्या माथाडी कामगारांशी त्यांची बNयांपैकी ओळख झाली. आपली कुटुंबे खेड्यात सोडून रोजीरोटीसाठी ते कराडमध्ये येऊन राहिले होते. हे कामगार एका तात्पुरत्या उभारलेल्या ताडपत्रीच्या हॉटेलात रात्री जेवायला जायचे. महागाईमुळे हॉटेल मालकाने दर वाढवल्याने त्या कामगारांवर झुणका भाकर खाण्याऐवजी फक्त भाकर मिर्ची खाण्याची वेळ आली. कधी कधी तर त्यांना अर्धपोटीही झोपावे लागायचे. सामान्य माणसावर होणारे महागाईचे परिणाम विशद करताना दिलेले माथाडी कामगारांचे वास्तवादी उदाहरण हे लेखकाचे आर्थिक बाबींवरचे विवेचन उथळ नसून देश आणि नागरिक त्याच्या केंद्रस्थानी असल्याचे दिसून येते. ‘चित्राच्या व्यापाराचे रंग’ या लेखामध्ये आपण केवळ एक कलाकृती म्हणून पाहात असलेल्या पेटिंग्जमागे किती सखोल व्यावसायिक आराखडे असतात ते उत्तम रीतीने समजावून सांगितलं आहे. जर्मनीमध्ये पहिल्यांदा गेल्यावर लेखक ज्या टॅक्सीत बसतात ती ‘मर्सिडीस बेन्झ’ असते. टॅक्सीचा ड्रायव्हर सांगतो की, जर्मनीमध्ये ‘मर्सिडीझ बेन्झ’ ही दुय्यम दर्जाची गाडी समजली जाते आणि ती टॅक्सी म्हणून वापरली जाते. भारतात अति श्रीमंतांची गाडी म्हणून मान्यता असलेल्या ‘मर्सिडीझ बेन्झ’बद्दलच, ती गाडी जिथे बनते त्या देशातीलच हे स्थानिक मत’ लेखकाप्रमाणेच आपल्यालासुद्धा आश्चर्याचा धक्का देऊन जातं. ‘उद्योग जगतात काटकसर हा फार महत्त्वाचा गुण मानला जातो. कष्ट करून श्रीमंत झालेली माणसं ही कधी अनाठायी खर्च करत नाहीत आणि जी करतात ती श्रीमंत राहात नाहीत. हा अतिशय महत्त्वाचा संदेश ‘उद्योगी श्रीमंती’ या प्रकरणात लेखक देऊन जातात. फक्त कॉर्पोरेट क्षेत्र किंवा व्यवस्थापकीय शिक्षण घेणाऱ्या विद्याथ्र्यांनीच नाही तर अगदी सामान्य माणसानेही वाचावे आणि त्याला सहजगत्या समजावे असे हे पुस्तक आहे. आज आपल्याभोवतीचे जग विलक्षण वेगाने बदलते आहे. या बदलत्या जगाची गती समजून घेऊन स्वतःची उन्नती करून घेण्यासाठी हे पुस्तक प्रेरणा देते. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या आर्थिक बदलांचे परिणामकारकपणे विवेचन करणाऱ्या पुस्तकाची मराठी साहित्यात असलेली कमतरता डॉ. गिरीश वालावलकर लिखित ‘सी.ई.ओ.च्या केबिनमधून हे पुस्तक नक्कीच भरून काढते. लेखकाची भाषाशैली साधी आणि सरळ आहे. त्यामुळे ती थेट मनाला भिडते. स्वतःचे काही अनुभव लेखकाने मिश्किल आणि मनोरंजक शब्दात सांगितेले आहेत. ते वाचताना वाचकाला खेळकर प्रसन्नता जाणवत राहते.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद