मुखपृष्ठ
शिवचरित्रापासून आम्ही काय शिकावे

माझे शेल्फ

शिवचरित्रापासून आम्ही काय शिकावे

इंग्रजी शीर्षक
Shivcharitrapasun Aamhi Kay Shikave
सारांश

जेष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी मराठ्यांच्या इतिहासाबद्दल आणि शिवरायांच्या कामगिरीवर वेळोवेळी आणि प्रसंगानुरूप अनेक लेख लिहले आहेत. त्यातील नऊ लेखांचा संग्रह म्हणजे ‘शिवचरित्रापासून आम्ही काय शिकावे?’ हे छोटेखानी पुस्तक होय. सुरवातीच्या हिल्या लेखाचे नावच पुस्तकाला दिलेले आहे. शिवछत्रपतींचा काळ आणि आताचा काळ यात कमालीचा बदल झालेला असला तरीही शिवनीती आजच्या घडीला कशी उपयुक्त आहे, शिवचरित्रातून आपण काय बोध घ्यायला हवा, शिवरायांना रयतेचा राजा का संबोधले गेले, त्यांनी रयतेच्या सुखासाठी लोकाभिमुख प्रशासनाची निर्मिती कशी केली इत्यादी प्रशांची उत्तरे ‘शिवचरित्रापासून आम्ही काय शिकावे?’ आणि ‘शिवछत्रपती : रयतेचा राजा’ या पहिल्या दोन लेखात आपल्याला सापडतात. ज्या काळात हिंदुस्थानात समुद्र पर्यटन हे निषिद्ध समजले जात होते आणि हिंदुस्थानच्या सर्व सागरावर पोर्तुगीज‚ सिद्दी‚ इंग्रज‚ डच‚ फ्रेंच‚ अरब यांची सत्ता होती, त्या काळात शिवरायांनी एक सशक्त आरमार उभारले आणि सागरावरील गुलामगिरी संपवली. हिंदुस्थानच्या इतिहासात स्वकीय सत्ताधीशांपैकी फक्त शिवरायांनी आरमाराचे महत्व ओळखले आणि त्याची बांधणी केली, समुद्री सीमांचे रक्षण करण्यासाठी अभेद्य सागरी किल्ले बांधले. म्हणूनच शिवचरित्रकार डॉ. बाळकृष्ण यांनी : ‘The Father of the Maratha Navy and Creator of the Indian Merchantile Marine’ असे शिवरायांचे वर्णन केले आहे.शिवरायांच्या या कामगीरीबद्दलची माहिती लेख क्रमांक तीन ‘शिवछत्रपतींची आरमारी मोहीम’ व लेख क्रमांक चार ‘मराठा आरमाराचे जनक : शिवछत्रपती’ यामध्ये मिळते. तळहातावर प्राण घेऊनच शिवरायांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी स्वराजांची कल्पना सत्यात उतरवली. अनेक संकटाना ते सामोरे गेले. असाच प्रसंग सुरतेवर केलेल्या पहिल्या हल्ल्यावेळी घडला. सुरतेमध्ये शिवरायांवर अगदी अनपेक्षित झालेला खुनी हल्ला आणि सरंक्षणास असलेल्या मावळ्यांचे प्रसंगावधान याची माहिती पाचव्या लेखात दिलेली आहे. १७ व्या शतकात दक्षिणेतील एका मराठी राजाने स्वत:ला राज्याभिषेक करवून ‘स्वतंत्र व सार्वभौम’ राजा म्हणून घोषित करणे अभूतपूर्व होते. त्या काळी देशात फक्त मोगल बादशाहीच स्वतंत्र व सार्वभौम मानली जात होती. आता असेच एक स्वतंत्र व सार्वभौम राज्य मराठ्यांच्या रूपाने देशात निर्माण झाले. ही घटना सामान्य नव्हती. औरंगजेबला या गोष्टीचा मोठा धोका वाटत होता. औरंगजेब शिवरायांना व स्वराज्याला ओळखून होता. म्हणूनच हे शिवराज्य संपवायला तो स्वतः दक्षिणेत उतरला होता. अखिल हिंदुस्थानच्या इतिहासात शिवराज्याभिषेकाचे असलेले अनन्यसाधारण महत्व विशद करणारा सहावा लेख आहे. सातव्या लेखामध्ये स्वराज्य व इंग्रज यांच्यामध्ये संबंध कसे होते. शिवरायांना इंग्रजांकडून काय हवे होते. इंग्रज रंग बदलणाऱ्या सरड्यासारखे परिस्थितीनुरूप कसे बदलत होते. इंग्रज हे फक्त व्यापारी नाहीत याची शिवरायांना आलेली कल्पना व त्यांना स्वराज्यात व्यापारासाठी घालून दिलेले नियम इत्यादी गोष्टींचा मागोवा ‘शिवछत्रपती आणि मुंबईकर इंग्रज’ या लेखात घेतला आहे. ‘शिवछत्रपतींचा सेनापती : हंबीरराव मोहिते’ हा आठवा लेख म्हणजे पराक्रमी, निष्ठावंत, मुसुद्दी, संयमी, कर्तबगार परंतु मराठ्यांच्या आणि एकूणच हिंदुस्थानच्या इतिहासात उपेक्षित राहिलेल्या सरसेनापतीचे छोटेखानी चरित्रच आहे. हंबीरराव असण्याने स्वराज्याच्या सीमा कश्या वाढल्या व त्यांच्या जाण्याने कोणता अनर्थ घडला याचा उहापोह सदर लेखात केला आहे. अगदी शेवटी ‘इतिहास आणि ऐतिहासिक ललित साहित्य’ या नवव्या लेखात इतिहास व त्यावर आधारित ऐतिहासिक ललित साहित्य यांच्या संबंधांची, इतिहासकार आणि साहित्यिक यांच्या लिखाणातील फरक, इतिहासकाराचे आणि साहित्यिकाचे मतभेद कशामुळे होतात. इत्यादी बाबींची चर्चा केलीली आहे. पुस्तकातील एकूण लेख व त्यांची नावे:- १)शिवचरित्रापासून आम्ही काय शिकावे? २)शिवछत्रपती : रयतेचा राजा ३)शिवछत्रपतींची आरमारी मोहीम ४)मराठा आरमाराचे जनक : शिवछत्रपती ५)शिवछत्रपतींवरील एक खुनी हल्ला ६)शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाचा अन्वयार्थ ७)शिवछत्रपती आणि मुंबईकर इंग्रज ८)शिवछत्रपतींचा सेनापती : हंबीरराव मोहिते ९)इतिहास आणि ऐतिहासिक ललित साहित्य पुस्तकाबद्दलचे माझे मत:- शिवकालीन इतिहासातील काही महत्वाच्या घटनांवर प्रकाश टाकणारे व सद्यस्थितीत शिवचरित्रातून काय बोध घ्यायला हवा याचे उत्तम विश्लेषण असणारे हे पुस्तक संग्रही ठेवावे असे आहे. काय बदल हवा:- पुस्तकाच्या आठव्या लेखात (शिवछत्रपतींचा सेनापती : हंबीरराव मोहिते) संभाजीराजांच्या हत्येच्या संदर्भात दोन वेळा चुकीचा शब्द (वध) प्रिंट झाला आहे तो पुढील आवृत्ती मध्ये प्रकाशक, लेखकानी दुरुस्त करावा अशी विनंती आहे. हत्या(खून) आणि वध यात खूप मोठा फरक आहे. तो दुरुस्त करण्यात यावा.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद