माझे शेल्फ
समर्थ
समर्थ रामदासांची ही जीवनगाथा. जांब या गावातील त्यांचं बालपण, लहानपणापासूनच नदीशी, रामरायाशी, हनुमंताशी जडलेलं नातं, प्रत्यक्ष रामरायाने, हनुमंताने त्यांना दिलेला अनुग्रह, लहानपणापासूनच व्यायामाबद्दल त्यांना असलेलं प्रेम, त्यांची अखंड साधना, पुरश्चरण, बलोपासना, हिंदू धर्माच्या रक्षणासाठी ठिकठिकाणी स्थापिलेली मारुती मंदिरं, मठ, युवकांना संघटित करून, रामनवमी, हनुमानजयंती सारख्या उत्सवातून अंगीकारलेली समाजाभिमुखता, शहाजी राजे आणि शिवाजी राजांशी असलेला अनुबंध, चाफळ येथील रामंदिराची स्थापना, शिवथर घळ येथे झालेली दासबोधाची निर्मिती, त्यांनी भारतभर केलेलं भ्रमण, सज्जनगडावरील त्यांचं वास्तव्य, त्यांचा शिष्यपरिवार आणि शेवटी सज्जनगडावर त्यांचं रामरूपात विलीन होणं...असा हा रामदासांचा जीवनप्रवास ओघवत्या भाषेत शब्दबद्ध केला आहे.
माणूस कोणत्याही प्रांतातला, प्रदेशातला असो, त्याची भाषा, संस्कृती यात वेगळेपणा असो पण माणूस म्हणून तो अंतर्बाह्य फार वेगळा नसतो. त्याच्यामधील सत्-असत्, स्वार्थ, परोपकार, कठोरपणा, मृदुता, प्रेम, स्नेह, त्वेष, मत्सर, हेवा हे सारेच सर्वांच्या ठायी असतेच. अशा विविध गुणावगुणांनी युक्त माणसावर आपण प्रेम करतो. त्याच्यामधल्या अवगुणाकडे सहानुभूतीने पाहून त्याला जवळ करतो. मग त्यातच माणुसकीचं दर्शन घडतं. लेखिकेच्या अशा उदार दृष्टिकोनातून हे साध्य झालेलं दिसतं.
त्यांच्यामध्ये हा अवगुण वारशाने येत असावा. आई-वडिलांच्या शिकवणीमुळेच स्वत:वरची जबाबदारी टाळणे, स्वत:चं सुख, धन यापुढे पती, पुत्र यांचं प्रेमही दुय्यम ठरतं. सावित्री ही अशीच एक स्त्री. पराकोटीचा स्वार्थीपणा हेच त्यांचं असामान्यत्व! भागव्वा कणखर व्यक्तिमत्त्वाची, अपार आत्मविश्वास असणारी धाडसी, कोणत्याही परिस्थितीत मनाचं संतुलन ढळू न देता निर्णय घेऊ शकणारी स्त्री. बेताच्या परिस्थितीमुळे शिक्षण नाही आणि म्हणूनच बालपणीच लग्नबंधनात अडकलेली भागव्वा परिस्थितीला शरण जात नाही. तिचा नवरा रामण्णा स्वभावाने गरीब असल्याने जमिनीवर दिराचा कब्जा असतो. भागव्वा न घाबरता दिराकडे वाटणी मागते. कर्नाटकातल्या कडेकोट बंदोबस्तात, पुरुषप्रधान समाजाच्या बालेकिल्ल्याला या घटनेने प्रचंड धक्का बसतो. दिराच्या शिव्या,धमक्यांना भीक न घालता किडूकमिडूक विकून ती कोर्टात जाते. केस जिंकून जमीन ताब्यात घेते, संसार सांभाळते. प्रचंड मानसिक बळ, लीडरशिप हे तिचे अंगभूत गुण. सौदामिनीची कथाच वेगळी. सर्वसाधारण रूपाची दामिनी हुशार, धीट, चांगल्या स्वभावाची मुलगी. मध्यमवर्गीय कुटुंबात दामिनी पदवीधर होऊन बँकेत नोकरी करते. नशिबानं देखणा, डॉक्टर नवरा मिळतो. उत्कर्ष होऊन वैभव प्राप्त होतं. मग नातेवाईकांची, लोकांची, गरजूंची रीघ लागते मदतीसाठी. असं असूनही तिच्या मनात खंत आहे. दानधर्म केला तर तो काळा पैसा, केलेलं पाप फेडण्यासाठी देतात ही भावना. नाही दिले पैसे तर पेपरातून टीकास्त्र. लोकांची ही वृत्ती तिला व्यथित करते. फणीवेणी व नागवेणी या जुळ्या बहिणी. फणी चुणचुणीत, बुद्धिमान, सर्व विषयांत पहिला नंबर. म्हणून ‘फस्र्ट रँक फणी’. तर नागू सावळी, काटकुळी, सर्वसामान्य. त्यामुळे दोघींची नकळत तुलना होईल. दोघींमुळे स्नेह नव्हता. नागू अबोल. ती सामान्य स्थळी पडली पण सासरी कौतुक होतं. उलट फणीचं रूप, गुण, बुद्धिमत्ता हे अवगुण ठरले. नवरा अतिबुद्धिमान, गर्विष्ठ म्हणून फणीला दुय्यम मानून तिची अवहेलना होत राहिली. फणीची ‘ईर्षा’ नाहीशी होऊन तिचं मन कोमेजून जातं. पीएच. डी. करायची इच्छा अपूर्ण राहते. करिअर नाही, स्वत:चं अस्तित्वच उरत नाही. गुणी फणीच्या नशिबी असं जिणं येतं. शीनप्पा-सीताबाई हे मेड फॉर इच अदर जोडपं. दोघांनाही पैसा हेच सर्वस्व.त्यांच्या जीवनाची मूल्येच वेगळी. दोघंही गर्भश्रीमंत त्यामुळे फक्त बरोबरीच्या लोकांशीच संबंध ठेवणे, त्यांचे आदरातिथ्य करणे ही वृत्ती. गरिबांच्या वेदना, दु:खाशी त्यांचा काहीच संबंध नाही. पण कधी कधी काळाचा महिमा अगाध असतो. सून व मुलगी यांच्या उधळपट्टीमुळे, स्वार्थी वृत्तीमुळे संपत्तीस ओहोटी लागते आणि काळाच्या प्रवाहात सारे सामान्य होऊन जाते. सरसक्का सुंदर आहे पण बेताचं शिक्षण, बेताची परिस्थिती यामुळे रेड्यासारख्या श्रीपादशी विवाह होतो. श्रीमंत घराणं पण श्रीपाद अवगुणी, बाहेरख्याली असल्याने रोगग्रस्त असतो. फसवणूक झालेली सरसक्का वर्षभरातच विधवा होते आणि अपशकुनी म्हणून अवमानित होते. पण कोणाचं भाग्य कसं पालटेल ते कल्पनेच्या पलीकडचं असतं. तिचे कुटुंब बद्रीकेदारला यात्रेला जाते. तिथं लक्ष्मणझुल्यावर योगयोगाने सरसक्का व दीर श्रीहरी नदीत फेकले जातात. त्यांचा पत्ता लागत नाही पण ते सुदैवाने वाचतात. दूर निघून जाऊन विवाह करतात, सुखी होतात. जीवण्णा एक गर्भश्रीमंत माणूस, पण त्याच्या बाह्यरूपावरून व चिकट स्वभावावरून याची कल्पना येणेही कठीण. भिक्षुकासारखे कपडे, जेवणातही काटकसर. त्याच्या या स्वभावामुळे मुलगा व मुलगी दुरावले पण अर्धांगवायू व परावलंबित याने चिकट जीवण्णाला चांगलाच धडा शिकला. अंबक्का सर्वसामान्य पण सुगरण, स्वयंपाकघरात रमणारी गृहिणी. तिचा सुशिक्षित पती यामुळे कंटाळलेला पण तिच्या आजारपणामुळे तिचं महत्त्व पटतं. ताराबाईला भांडण अतिशय प्रिय. त्यासाठी तिला कोणत्याही प्रसंगाची गरज वाटत नाही. भांडण समोर आलं की तिचं व्यक्तिमत्त्व वेगळं होतं. उत्साह द्विगुणित होतो. समोरच्याला हिणवण्यात, नामोहरम करण्यात तिचा हात कुणीही धरणार नाही पण भांडण संपल्यावर मन शांत होऊन त्याचा मागमूसही राहत नाही. अशा शब्दात लेखिका तिचं वर्णन करते. सीमा संधिसाधू, चतुर आहे. कुणी डोनेशन मागायला आलं तर सरळ सासूच्या हातात अधिकार आहेत म्हणून सुटका करून घेते. डब्बावाली नलिनी एक अजब व्यक्तिमत्त्व. कार्याला जायला जमलं नाही तर रिकामा डबा पाठवून देऊन कोणाकडून मागवते. वरकरणी हे विचित्र वायतं पण तिचं मन निर्मळ आहे, हेतू उदात्त आहे, डबा आणणाऱ्याशी बोलता येतं. स्वत: डबा पोचवायला, परत करायला जाते तेव्हा त्यांच्याशी बोलून त्यांची दु:खं हलकी करता येतात. सांत्वन करता येतं. मन मोकळं होतं, हा चांगला हेतू त्यामागे असतो. याची किती जणांना जाणीव असते? माणसामध्ये असलेले गुण-अवगुण हेरून ते शब्दबद्ध करताना लेखिकेने कुठेही वाईट हेतू किंवा अढी ठेवलेली नाही. माणसाच्या स्वभावाचे हे विविध पैलू उलगडणे एवढाच हेतू.