स्मृतिचित्रे
मराठी सारस्वतात अमर राहणारी जी काही थोडी पुस्तके आहेत त्यात 'स्मृतिचित्रे' चा समावेश होतो. आत्मचरित्रात तर इतके पारदर्शी, भावपूर्ण व हृदयम आत्मचरित्र दुसरे नाहीच. स्मृतिचित्रे हे केवळ आत्मचरित्र नाही, तर तो १८६० ते १९२० या कालखंडातील सामाजिक इतिहास आहे. यातील भाषा ओघवती व अकृत्रिम आहे. त्यावर इंग्रजीचा छाप नाही. अगदी बाळबोध मराठी किती गोड असू शकते ते या पुस्तकातून कळेल. हे लिखाण हृदयातून उत्स्फूर्तपणे बाहेर आलेले आहे, यामुळे त्यात ताजेपणा व जिवंतपणा आहे. लक्ष्मीबाईचे जीवन एक प्रकारे अद्भुतरम्य व तसे जगावेगळे आहे, या रम्यतेचे, अदभुततेचे प्रत्ययकारी चित्रण त्यांच्या सोप्या व शैलीदार भाषेने वाचकांच्या डोळ्यासमोर चित्रपटाप्रमाणे उभे राहते . आत्मचरित्र म्हणजे आपले दोष लपवणे व दुसऱ्याचे दाखवणे असा प्रकार असतो . तो मात्र येथे मुळीच सापडणार नाही . दोषांचे दर्शन नाही व कसलीच लपवाछपवी येथे नाही , किंवा कोणावर आरोप केलेले नाहीत . कोणतेही प्रचलित शिक्षण न घेता केवळ कठीण परिस्थितीशी लढ़ा देऊन मन किती सुसंस्कृत होऊ शकते याचे चित्र या पुस्तकात आढळते . आपल्या जीवनाकडे संपूर्ण निर्विकार मनाने पाहण्याची लक्ष्मीबाईची दृष्टी या पुस्तकात आढळून येईल . इतकेच नव्हे तर अनासक्त बुद्धीने कर्तव्य करीत राहण्याची निष्ठा आणि काळोखातही सोनेरी किनार लावणारी असामान्य विनोदबुद्धी त्यांच्या ठिकाणी होती . यातील विनोद कोणालाच बोचणारा नाही . किंबहुना स्वत : वरच केलेला आहे . प्रसन्न व गोड विनोद कसा असतो ते या पुस्तकावरून समजेल . आचार्य अत्र्यांनी लक्ष्मीबाईना साहित्यलक्ष्मी अशी पदवी दिली ती किती यथार्थ होती हे या पुस्तकावरून कळेल , कितीही कालावधी लोटला तरी लक्ष्मीबाईच्या स्मृतिचित्रांचे अनन्यसाधारण माधुर्य आणि महत्त्व मराठी रसिकांच्या दृष्टीने अबाधित राहिले आहे . जोपर्यंत मराठी भाषा या पृथ्वीवर आहे तोपर्यन्त हे चरित्र घरोघरी वाचले जाईल .