माझे शेल्फ
सफारी आफ्रिकेतली
आफ्रिकेतल्या जंगलातलं थ्रिल!... पर्यटन हा माणसाचा आवडता छंद. मनोरंजनासाठी तर माणसे प्रवास करतातच. पण निसर्ग, वन्यजीवन यांच्या बदलाचे कुतूहल, आकर्षण व प्रेमही त्याला असते. याच ओढीमुळे निसर्गप्रेमी वन्यजीवन सफारीस जात असतात. अशा निसर्गप्रेमींसाठी पीटरअॅलिसन लिखित व मंदार गोडबोले अनुवादित ‘सफारी आफ्रिकेतली’ हे पुस्तक मार्गदर्शक व रोमांचक अनुभव देणारे ठरेल. लेखकाने आफ्रिकेत वन्यजीवन सफारीसीठी गाईड म्हणून अनेक वर्षे काम केले. सुरुवातीस सिंहाला पाहून त्याची भीतीने गाळण उडाली होती. पण कुत्री अंगावर आली तरी पळून जाऊ नये ही लहानपणाची शिकवण त्यास पुढे उपयोगी पडली. पर्यटकांना जंगलात सफारीस नेण्यासाठी सफारींचा लॅण्डरोव्हर गाडी चालवण्यास लेखक शिकला. पर्यटकांना घेऊन जंगल सफारीस जाताना कित्येकदा सिंह, चित्ते, हत्ती, गेंडे, रेडे यासयाख्या रानटी व हल्लेखोर प्राण्यांना तोंड द्यावे लागते. एकदा हत्तीला उंदीर समजण्याची चूक लेखकाने केली होती. अशा काही चुका त्याच्या हातून नकळत झाल्या होत्या. प्रचंड रेड्याने हल्ला केल्यावर कशावर तरी उंच चढायचे किंवा जमिनीवर पडून राहायचे हे माहित नसल्याने लेखक धावपळीत बाभळीच्या दाट झुडपात पडला व त्यामुळे वाचला असे काही प्रसंग त्याच्यावर आले. पण त्याला स्वत:च्या जीवापेक्षा पर्यटकांची अधिक काळजी होती. त्याने प्रसंगावधान राखून त्यातून निभावून नेले. असे करताना मोठे धाडस करावे लागले. ते सारे भयंकर अनुभव लेखकाने सांगितले आहेत. एक उदमांजर व वॉर्टहॉग हे प्राणी पाळीव कसे बनले त्याची सुरसकथा लेखक सांगतो. अजिंक्य असलेल्या हत्ती बॅजर कोल्ह्याच्या आकाराच्या प्राण्यास गाईडही घाबरून असतात. एकदा सिंहाच्या कळपामागे जाण्यासाठी लेखकाने पाण्यातून, चिखलातून गाडी नेली. अखेर गाडी त्यात अडकली. सिंहाचा पाठलाग करण्याची मोठी चूक त्याने केली होती. लेखक पाण्यात उतरला तेव्हा मगरीपासून कशीबशी सुटका करून घेतली. कॅम्पवर जाऊन इतरांच्या मदतीने त्याने पर्यटकांची सुटका करून घेतली. असे अनेक प्रसंग, चुका घडल्या. पण तरी वरिष्ठांकडे त्याच्याबद्दल चांगले मत होत होते. वन्यजीवन सफारीचे, कठीण प्रसंगाचे वर्णन करताना लेखकाची हलकीफुलकी शैली असल्याचे जाणवते. काही वेळा हास्यास्पद प्रसंगही उद्भवले. बोटस्वानमधील अप्रतिम परिसरात वन्यजीवन तर आहेच, पण विविध प्रकारचे रंगाचे, विपुल संख्येने पक्षी पण आहेत. हा नवा छंद लेखकास जडला. पर्यटकांनाही प्राण्यांबरोबर पक्ष्यांच्या निरिक्षणास नेम लागला. कित्येक पर्यटकांना पक्षी निरिक्षणात विलक्षण रस असतो अशा पर्यटकांचे गट येत असतात. सफारीवर जाताना गाईड पर्यटकांना धोकादायक प्राण्यांची यादी व सूचनाही देतो. गाईड म्हणून रुळल्यानंतर अशा प्राण्यांचा मित्रच तो बनून जातो. पण तरीही कित्येकदा जिवावरच्या प्रसंगांना तोंड देताना, साहस करताना अत्यंत भीषण पद्धतीने आयुष्य संपू शकते याचीही जाणीव असते. लेखकालाही ही जाणीव होतीच तरी याच जीवनाची ओढ असल्याने त्याने ऑफिसमधील चाकोरीबद्ध नोकरी नाकारून आफ्रिकेत गाईड म्हणून पर्याय निवडला. आता फ्लोरिडातील आफ्रिका अॅडव्हेंचर कंपनी व सिडनीतील क्लासिक सफारी कंपनीद्वारे लेखक दरवर्षी आफ्रिकेस जातो.प्रस्तुत पुस्तक वाचून सफारी जीवन अनुभवण्याचा मोह पर्यटकांना होईल निश्चित.