मुखपृष्ठ
सर्जा

माझे शेल्फ

सर्जा

इंग्रजी शीर्षक
Sarja
सारांश

जीवनकहाणी सर्जाची... ‘एका बैलाची हृद्य जीवनकहाणी-सर्जा’ या रामचंद्र खाटमोडे लिखित पुस्तकातील कथेचा प्रारंभ होतो तेव्हा कथानायकाला टेम्पोतून कुठंतरी नेलं जात असतं. सोबत असतात त्याचे जिवलग साथी - राजा आणि खिलारी. एके ठिकाणी खिलारीला उतरवून सर्जा आणि रजाला कत्तलखान्यात नेलं जातं. कत्तलखान्यातून सर्जा बाहेर पडतो. त्या धडपडीत जीवावरचं शेपटीवर निभावतं आणि तो बिनशेपटीचा बैल होतो. आता त्याला ओढ लागते ती खिलारीला भेटण्याची. त्या नादात केलेल्या वाटचालीत त्याला आठवतो तो भूतकाळ. त्याची आई, त्याचं बालपण. त्याच्या मालकाचं कुटुंब आणि त्याचा मैतर कृष्णा. आपल्यासारखं सर्जालाही आहे त्याच्या पहिल्यावहिल्या गोष्टीचं कौतुक. मग ते बत्ताशासोबत गाडीला जोडणं असो, नांगराला जुंपणं असो, औत फिरवणं असो. गणेशोत्सवात पाहिलेल्या चित्रपटांबद्दलची चर्चा असो किंवा कीर्तन सप्ताह असो ते पाहणं, ऐकणं आणि त्याचा विचार करणं ही सर्जाची प्रवृत्ती होती. बैलांसाठीच्या महत्त्वाच्या सणाचं अर्थात बैलपोळ्याचं वर्णन त्याच ओघात येतं. बैलांच्या गप्पांतल्या विषयांत नंदीबैल हा त्यांच देव आणि बैल हे सगळ्यांचं आडनाव ठरतं. एका टप्प्यावर सर्जाला विकलं जातं. मालक त्याच्या हातातलं दावं समोरच्या माणसाच्या हातात देतो,सर्जाची त्यावर टिप्पणी अशी की, सरकारी अधिकाऱ्यांच्या कशा बदल्या होतात, तशी माझी जणू बदलीच झाली होती- कामासाठी. इकडून तिकडे. भूतकाळातून बाहेर येताना सर्जा शहरातल्या जीवनाला सामोरा जातो. तिथं एका सहा जन्म उपाशी असावा असा माणूस गाठतो. सर्जा त्या माणसाचं नाव उपाशा ठेवतो. उपाशा रातोरात सर्जाला नंदीबैल करतो आणि मनातून कितीही नाकारलं तरी जगण्यासाठीचा व्यवसाय म्हणून तो नंदीबैल होणं स्वीकारतो. स्वत:च्या नावात होणारे बदल पाहून त्याचा अहं दुखावला जातो. नंतर ते अनेक शहरांत फिरतात. तिथली वैशिष्ट्य तो सांगतो. दरम्यान त्याला पुन्हा एकदा भूतकाळ आठवायला लागतो. नव्या मालकाचं घरदार, तिथलं वातावरण आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे खिलारी. राजाशी झालेली ओळख आणि पुढं पक्की दोस्तीदेखील. मग खिलारीशी जुळलेले भावबंध, सर्जा-राजाचं शर्यतीत पळणं आणि सततचं जिंकणं. चित्रपटात दाखवतात तशी कॅलेंडरची पानं झरझर सरतात. शरीर थकतं. ट्रॅक्टरसारख्या यंत्रांचं आक्रमण होतं. त्यातच दुष्काळाचा तेरावा महिना उगवतो. तिथून सर्जाची कत्तलखान्यातली रवानगी होते. त्यातून वाचल्यावर खिलारी दिसते. सर्जा आणि तिची भेट होते का, ते कसे जगतात हे कथेतच वाचलेलं चांगलं. या कादंबरीचा जीव लहान असला, तरी तिचा आवाका मोठा आहे. केवळ कृषीसंस्कृतीच नव्हे तर शहरी जीवन, त्याचं खेड्यांत होणारं अंधानुकरण, श्रद्धा-अंधश्रद्धा, दृष्टावा आणि माणुसकी, परिस्थितीशरणता आणि आल्या संकटांना बेधडक सामोरं जायची वृत्ती हा सगळ्या मानवी मनातल्या-जीवनातल्या बाबींचं रोपण सर्जाच्या कथेत झालेलं दिसतं. त्याच्या सुखाच्या गाठोड्याच्या शोधाची गोष्ट वाचण्याजोगी आहे.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2018
पृष्ठसंख्या
128
भाषा
मराठी
किंमत
150.00
ISBN
9789387789999
समुदायाने जोडले
बंद