मुखपृष्ठ
स्त्री आणि पुरुष

माझे शेल्फ

स्त्री आणि पुरुष

इंग्रजी शीर्षक
Stree Aani Purush
सारांश

‘समर्थ स्त्री’चे सुंदर चित्रण… ‘स्त्री आणि पुरुष’ हा वि. स. खांडेकर यांचा १९४४ मध्ये प्रथम प्रसिद्ध झालेला कथासंग्रह. या कथासंग्रहाची जानेवारी १९९६मध्ये प्रकाशित झालेली ही चौथी आवृत्ती. ‘स्त्री आणि पुरुष’ ही यातील शेवटची कथा. स्वत: लेखकाला आवडलेली ह अप्रतिम कथा. या कथेबद्दल ‘भूमिका’ या शेवटच्या प्रकरणात स्वत: वि. स. खांडेकरांनी इतके अर्थवाही, मार्मिक व मर्मग्राही लिहिले आहे, की १९९६ मध्ये मुद्दाम ‘स्त्रीवादी’ चळवळ ‘स्त्रीवादी’ भूमिका घेणाऱ्यांनी ही ‘भूमिका’ मुद्दाम आवर्जून व खुल्या दिलाने वाचावी अशी. तर ही कथा मुळात आहे तरी काय? माया ही सुसंस्कृत, तरल, सुशिक्षित आणि संवेदनक्षमाची तरुणी, वामन मल्हार जोशी तिचे कॉलेजमधले आदर्श प्राध्यापक. तिचे वडील स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतलेले सच्चो गांधीवादी शाळामास्तर. तीपण पदवीधर झाल्यावर माध्यमिक शाळेत शिक्षिका. तिचे सदानंदाशी लग्न होते. त्याला कारकुनाची नोकरी असते. पण तो त्याचवेळी शिकत शिकत व स्वबळावर मोठा होतो. तो व्यापाऱ्यांकडून सत्तेच्या, अधिकाराच्या जोरावर पैसे उकळू लागतो आणि बघता-बघता तीन-चार वर्षात बढती मिळून मोठा अधिकारी बनतो. मायाला नोकरी सोडायला लावतो. मायाच्या अंगावर सोन्याचे-मोत्याचे दागिने अन् घरात अनेक श्रीमंती वस्तू येऊ लागतात. हा पापाचा तर पैसा नाही ना, याने शंकित झालेली आणि आता दिवस गेलेली माया प्रकृती स्वास्थ्यासाठी खेड्यात जाते. तिला तिथे अज्ञानी, गरीब दु:खी लोकांचे जीवन जवळून बघता येते. एका शेतमजुराचा मुलगा स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश गोळीबारात बळी पडला. त्यावेळी आपण व सदानंद सुखी संसाराच्या मायेत पोहत होतो, या विचाराने व आपण वा. म. जोशी आणि आपले स्वातंत्र्यलढ्यातील सहभागी बापाची मुलगी असूनही पापाचरणाच्या चैनीच्या संसारात बळी कशी गेलो, याचे ती दु:ख करते. एका बाजूल्या नवऱ्याबद्दलची प्रीती आणि पोटातल्या बाळाचे वात्सल्य व दुसऱ्या बाजूला काळ्या बाजाराला विकला गेलेला भ्रष्टाचारी, पापी असा आपला पती, या संभ्रमात ती सापडते. पण खेड्यात दिसणारी अमानुष दुश्ये तिच्या सामाजिक पावित्र्याच्या आदर्शाला जागृत करतात आणि तिच्यामधली मानवता तिला सदानंदाला सोडायला भाग पाडते. असा हा संक्षेपाने असलेला कथा भाग. ‘भूमिके’त या कथेची भलावण करताना वि. स. खांडेकरांनी सुशिक्षित, जागृत स्त्री सामाजिक पापाचरणाला कसे तोंड देऊ शकेल व भ्रष्टाचार दुराचार कसा दूर होऊ शकेल, याचे मोठे मनोहारी चित्रण १९५२ मध्ये रंगविले आहे. आजची स्त्री सुशिक्षित असूनही ती आपल्या पतीचे दुराचार, अत्याचार, भ्रष्टाचार थांबवू शकलेली नाही, हे आपण दैनंदिन पाहतो आहोत. या कथासंग्रहात एकूण पाच कथा आहेत. बहुतेक कथांमधील स्त्री ही वेगवेगळ्या नात्यांनी बद्ध आहे. ती सुशिक्षित आहे, घराचा उंबरठा ओलांडून नोकरी करणारी आहे (८ जून); पण तरी तिला संसार, पतिप्रेम, स्वत:चे मूल असणे या बाबींचीही स्वतंत्रतेबरोबरच अनिवार ओढ आहे. त्यामुळे तिच्या मनात द्वंद्व व कुतरओढ सुरू असते. ती स्वतंत्र स्वावलंबी होऊनही सुखी नाही. हे सिंधू या माध्यमिक शिक्षिकेच्या ‘८ जून’ या कथेतल्या व्यक्तिरेखेतून उमजते. ‘आईचा शब्द’ ही तर कॅरेल कॅपेक यांच्या ‘दि मदर’ या नाटकाच्या आधारे लिहिलेली कथा. एका बाजूला आपल्या एकुलत्या एक वाचलेल्या मुलाबद्दलचं ममत्व आईला. त्याला युद्धावर पाठवू देत नाही. मुलगा देशाच्या हाकेला ओ देणारा. आपल्या मुलाला ती आपल्याच नजरेखाली ठेवू पाहते. शेवटी तिच्या मनाची होणारी आत्यंतिक घालमेल. मुलगा तर आईचा होकाराच्या शब्दासाठी आसुसलेला. हे कथेत केलेलं भावभावनांचं अन् देशप्रेमाचं प्रतीक असलेलं रूपांतर फारच संवेदनशील झालंय. ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या वि. स. खांडेकरांच्या या १९२९ ते १९४८ या कालखंडातील लिहिलेल्या कथा. स्त्री-पुरुष संबंधातील वेगवेगळ्या भूमिका साकार करणाऱ्या. आजही त्या अतिशय वाचनीय. कारण शाश्वत भावविश्वावर त्या आधारित म्हणून या कथासंगहाची ही चौथी आवृत्ती प्रसिद्ध झालेली आहे.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद