माझे शेल्फ
स्वामी
रणजीत देसाई यांची पहिली ऐतिहासिक कादंबरी ‘स्वामी’. मराठी वाचनप्रेमी रसिकांनी या कादंबरीवर अतोनात प्रेम केले आहे. या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कारदेखील मिळाला आहे.थोरले माधवराव पेशवे यांचे मुत्सदी, कर्तृत्ववान जीवन लेखकाने आपल्या समोर उभे केले आहे. स्वामी या कादंबरीसारखे इतिहास आणि साहित्य यांचे सुंदर मिश्रण आजतागायत कोणताही लेखक निर्माण करू शकला नाही. १६ वर्षाच्या वयात माधवरावांना पेशवे पद प्राप्त झाले. सद्गुणी आणि कर्तव्यदक्ष माधवरावांना सुरुवातीपासूनच राजद्रोही, भोळसट राघोबा दादांचा सामना करावा लागला. इतिहासाने मुत्सद्दी म्हणून माधवरावांची नोंद घेतली आहे. पण कादंबरीत लेखकाने अनेक प्रसंगांत त्यांच्या इतर गुणांवर ही प्रकाश टाकला आहे. गायकाचे कौतुक करणारे गुणग्राहक माधवराव, काका दरबारात वेळेवर आले नाहीत तरी वेळेवर दरबार सुरू करून कामाप्रती निष्ठा असलेले शासक, लुटीत झालेले प्रजेचे नुकसान खाजगितून देणारे कर्तव्यतत्पर प्रजाहितदक्ष पंतप्रधान आणि या लुटीत प्रत्यक्ष आपले मामा(मल्हारराव रस्ते) सहभागी आहेत हे कळल्यावर त्यांनी दंड ठोठावून आपल्या आईची नाराजी ओढवून घेणारे कर्तव्यकठोर शासक, मोहिमेत अग्रभागी राहून तडफ असलेले कर्तबगार पेशवा आणि स्वतःच्या अंतकाळी पत्नी रमाबाईंच्या सोबतीची अपेक्षा करणारा रमेचा हळवा पती वाचकांसमोर रणजित देसाई यांनी उभा केला आहे. कादंबरीत माधवराव, रमाबाई, राघोबा दादा या मूळ व्यक्तिरेखा उठावदार तर आहेतच पण त्यासोबत गोपिकाबाई, पर्वतिकाकु, आनंदीबाई, सखाराम बापू बोकील, गंगोबा तात्या, माधवरावांचा सेवक श्रीपती, रामजी काका, मैना या व्यक्तीरेखांनाही लेखकाने छान न्याय दिला आहे. मराठ्यांचे बिनीचे सरदार मल्हार राव होळकर आणि माधवराव यांच्यातील संवाद फारच सुंदर आहेत. माधवरावांनी गृहकलहाला तोंड देतांना रामशास्त्र्यांसारखे निस्पृह न्यायाधीश आणि नाना फडणीसांसारखे दौलतीचे इमानी सेवकही पारखले, आणि त्यांना योग्य जबाबदारीही दिली. माधवरावांनी सखाराम बापू बोकील, विठ्ठल सुंदर आणि देवाजी पंत या तीन शहाण्यांच्या मुत्सद्दीपणाला कसे तोंड दिले याचे सुंदर वर्णन लेखकाने केले आहे. सखारंबापू बोकील यांना झालेली नजर कैद आणि त्यावेळेस बुद्धिबळाचा डाव आणि त्यावर माधवरावांच्या टिप्पण्या माधवरावांचे मुत्सद्दीपण अधोरेखित करतात. राक्षसभुवनाच्या लढाईत माधवरावांनी तडफेने आपले काका म्हणजेच राघोबा दादा यांची सुटका केल्याचे वर्णन वीरश्री निर्माण करणारे आहे. या तरुण तडफदार पेशव्यास असाध्य आजाराने ग्रासले, त्यांच्या खुनाचा प्रयत्न झाला, विषप्रयोग करण्याचा प्रयत्न झाला तरी त्यांची कामावरची निष्ठा तसूभरही कमी झाले नाही याचे चित्रण लेखकाने फार छान केले आहे. रूपसंपन्न रमाबाई आणि माधवराव यांच्यातील भावोत्कट प्रसंगांचे चित्रणही लेखकाने फार उत्कटतेने आहे. “रमा, मृत्यू हा अटळ आहे. जें जें दिसते ते ते एक न एक दिवस नाहीसे होणार, मग ते आज होवो अथवा कैक वर्षांनी होवो." " जीवन व मृत्यूच भय बाळगणाऱ्याला केंव्हाही समृद्ध जीवन जगता येणार नाही—” "रमा जीवन किती वर्ष जगला याला फारसा अर्थ नाही. जीवन कसा जगला याला महत्व आहे नाहीतर चंदनाच नावही राहील नसतं." अश्या अनेक वाक्यांमधून कादंबरीच साहित्य सौंदर्य वाढवून लेखकाने अनेक त्रिकालाबाधित सत्य सांगितली आहेत. माधवरावांच्या अंत समयाच्यावेळेतील गंगा विष्णू वैद्य आणि माधवरावांचे संवादही छान आहेत. “मृत्यू येणार तो सरळ यावा यासाठीही औषधे आहेत, ही वेळेवर घेतली तर पुढील यातना कमी होतील”, “खोटी श्रद्धा जीवनात उपयोगी पडत नाही, एक न एक दिवस पश्चातापाची पाळी येतेच”, अशा वाक्यातून लेखकांनी जीवनाचे तत्त्वज्ञानच सांगितले आहे. वयाच्या २७ व्या वर्षी माधवराव पेशव्यांना राजक्षयामुळे जीवनयात्रा संपवावी लागली. पेशवेपदाच्या ११ वर्षांच्या कारकिर्दीत राघोबा दादांसोबत लढाई नंतर शरणागती, पुन्हा सत्ता प्राप्ती, सदाशिवराव भाऊ तोतया प्रकरण अशा गृहकलहांसोबत निजाम, हैदर, कर्नाटकातील स्वारी आणि त्यातून माधवरावांचे मुत्सद्दीपण जागोजागी जाणवते. लेखकाने उत्कृष्ट संवादातून सगळेच प्रसंग जिवंत उभे केलेत. राक्षभूवनाच्या लढाईत महादजी शितोळे विठ्ठल सुंदरच्या अंबारीचा वेध घेतो हा प्रसंग वाचतांना डोळ्याच्या कडा पाणावतात. माधवरावांचे निर्वाण आणि रमाबाईचे सती जाणे वाचतांना वाचकाचे मन भरून आल्याशिवाय राहत नाही. माधवरावांनी आपल्या अल्पशा कारकिर्दीत स्वराज्य विस्तार केला. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर आरमाराचे महत्त्व ओळखणारा शासक म्हणून माधवराव ज्ञात आहेत.माधवरावांच्या पदरी असलेला एक गायक माधवरावांना त्यांच्या अंतकाळी भेटतो, त्या वेळचे संवाद वाचतांना हुंदका आल्याशिवाय राहत नाही. माधवराव पेशवे कर्तव्यकठोर होते. या कर्तव्यकठोर ते मुळेच त्यांना अंतकाळी त्यांच्या मातोश्री गोपिकाबाई यांचे दर्शनही झाले नाही.