मुखपृष्ठ
टाइमपास

माझे शेल्फ

टाइमपास

इंग्रजी शीर्षक
Timepass
सारांश

नेहमीच्या सरधोपट आयुष्यात आपण कल्पनाही करु शकणार नाही असं एक वेगळं खळबळजनक आयुष्य प्रोतिमा बेदी सत्तर ऐंशीच्या दशकात जगली. कबीर बेदीची (एके काळची) बायको, पूजाची आई आणि गोवा बीचवरती पळताना न्यूड फोटो काढलेली बाई इतपतच हिची आधी माहिती होती. पणयापलिकडेही अफाट , बेभान आणि मनस्वी वागणारी ही बाई होती. जेव्हा जे करावं वाटेल ते केलं. कपडे बदलल्यासारखे प्रियकर बदलले. (वाचताना नंतर नंतर मी नावं लक्षात ठेवायचं आणि एकूण आकडा मोजायचं सोडून दिलं.) त्या काळातले कॉंग्रेसचे मोठे नेते रजनी पटेल (अमिषाचे आजोबा) , पं.जसराजांपासून ते तेव्हाच्या एका रसिक नभोवाणी मंत्र्यांपर्यंत तिचे संबंध होते, चांगली वट होती. या नागपूरी मंत्र्यांचं पुस्तकात नाव मनू असलं तरी ते सहज ओळखू येतात. तिचा शब्द झेलायला हे लोक सदैव तयार असायचे. रजनी पटेलांनी तर तिला एकदा मुंबईची मेयर होणार का? विचारलं होतं. ती हो म्हणाली असती तर झालीही असती. तिला या सगळ्या राजकीय गोष्टींच्यात काही रस नव्हता, पण आपल्यासारख्या नगण्य स्त्रीला ते मेयर बनवू शकतात तर ब-याचशा पदावर बसलेली माणसं कशी बसली असावीत हे लक्षात येतं असं तिने लिहिलंय. दुर्दैवाने आजही ते तितकंच खरं आहे. घडलेल्या घटना अतिशय प्रामाणिकपणे लिहिल्याचं जाणवतं. वरुन कठोर दिसणारी आणि आतून हळवी असणारी ही बंडखोर बाई आपल्या टर्म्सवरती जगली , समाजाच्या नैतिकतेच्या कल्पनांना सुरुंग लावला. त्याचे परिणामही हिंमतीने स्वीकारले. तिच्या लिखाणाला वेगवेगळे कंगोरे आहेत. लहानपणीच्या कटू आठवणी , लैंगिक अत्याचार , मॉडेलिंगचे अनुभव, आपण मनाला येईल तसं वागलो... मुलांना पुरेसा वेळ दिला नाही याची बोचरी जाणीव , आई म्हणून मुलांसाठी तीळतीळ तुटणं , एक बायको म्हणून वेळेला पझेसिव्ह होणं , नव-याच्या अफेअर्समुळे काळजीत असणं , त्याला आणि त्याच्या प्रेयसींना समजून घेणं , एक प्रेमिका म्हणून जीवाच्या आकांताने तडफडणं , एक भक्त म्हणून आलेले देवीच्या चमत्काराचे समाधानी अनुभव , गुरुंच्या, शिष्यांच्या आठवणी आहेत. घडलेल्या घटनांचा धांडोळा घेताना चुकांची कबुली, यशाचा उल्लेख आहे. तेही अगदी सहजतेने , कुठलाही आव न आणता. राजकीय नेते, त्यांची कुटूंबं आपल्यामुळे अडचणीत येऊ नयेत याची तिला जाणीव आहे. त्यासाठी तिने आणि पटेलांनी एकमेकांना लिहिलेली पत्रे (जी तिला प्रकाशित करायची होती) तिने त्यांच्या मुलाला परत केली. प्रोतिमाच्यात सतत एक प्रेमिका, अभिसारिका जाणवते. लहानपणापासून मायेला, कौतुकाला पारखी झालेली ही मनस्वी मुलगी पुढे आयुष्यभर प्रेम शोधत राहिली. हातातून काहीतरी निसटून चाललंय आणि आत्ता या क्षणी ते पकडायलाच हवं अशा भावनेने जगण्याच्या प्रवाहात भटकत राहिली. अडखळत पावलं टाकत टाकत लहान मूल जसं फुलपाखरु पकडायचा प्रयत्न करेल.. पडेल...उठेल आणि परत चालेल अगदी तसंच तिचं आयुष्य जाणवतं. वयाच्या २६ व्या वर्षी गुरु केलुचरण महापात्रांच्याकडून ओडिसी नृत्य शिकून मग यातच काही करावं या ध्यासाने ती कर्नाटकात बेंगलुरू जवळ नृत्याचं गुरुग्राम उभा करते. गरजू मुलांना नृत्य शिकण्यासाठी उपयोग व्हावा यासाठी धडपडते. नंतर योग्य व्यक्तींना ते हस्तांतरीत करुन त्यातून बाहेरही पडते. मुलगा सिद्धार्थच्या आत्महत्येनंतर ती ढासळते. पुढे कैलास मानस सरोवर यात्रेदरम्यान दरड कोसळून तिचं निधन होतं. पुस्तक वाचून संपल्यानंतर आपण काही काळ दिग्मुढ होतो. विषण्ण व्हायला होतं. एखाद्याचं आयुष्य किती प्रवाहपतीत असू शकतं असं वाटतं. दारु , ड्रग्ज , सेक्स , सोशल लाईफ , पार्ट्या हेच आयुष्य असणारी ही बाई अचानक नृत्य काय शिकते , त्यात प्राविण्य मिळवते , संस्था उभारण्यासाठी जीवाचं रान करते. मग ऐहिक गोष्टी त्यागून अध्यात्मिक होते, स्वचा अर्थ शोधायचा प्रयत्न करते. हे पुस्तक बायोपिक किंवा वेब सिरीजसाठी उत्तम आहे. सतत घडणा-या घटना , नात्यांची गुंतागुंत , परदेशातील अनुभव, प्रेम, अफेअर्स असं सगळ्या प्रकारचं वैविध्य यात आहे. सुप्रिया वकील यांनी मूळ पुस्तकाचा अतिशय सुरेख अनुवाद केला आहे. एकदाही आपण अनुवाद वाचतोय याची जाणीव होत नाही.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद