माझे शेल्फ

तितंबा

सारांश

तितंबा’ हा वऱ्हाडी बोली भाषेतील ‘श्री. आबासाहेब कडू’ यांचा विनोदी कथासंग्रह. या कथासंग्रहात एकूण अठरा कथांचा समावेश आहे. स्वतःच्या मनातील दुःख वा अस्वस्थता मागे सारून वाचकांना काही काळापुरते का होईना मनसोक्त हसवणे, या इतकी मोठी कला कोणतीच म्हणता येणार नाही. आणि या कथासंग्रहातील प्रत्येक कथा ही वाचकांना आनंद देते आणि तितकेच हसवते सुद्धा. काही उदाहरणे सांगायची तर, “जानू कोल्हाटीन” या कथेतील जानराव फुकट हरबरा खायच्या निमीत्तानं काय काय लीला करतो, “हात दाखवून अवलक्षण” या कथेमधील बबन्या लेखकाला हस्तरेषातज्ञ म्हणून हात दाखवतो, त्याला जे उत्तर मिळते त्यातून पुढे कसे कसे विनोद घडत जातात, असे रोजच्या जीवनातील प्रसंग हेरून लेखकाने त्यातून हास्य निर्मिती केली आहे.

“या कथांना वऱ्हाडी बोलीभाषेचा साज आहे, अनुभवाची खोली आहे. त्यामुळेच या कथा अस्सल ग्रामीण शब्दांची शाल पांघरलेल्या, लोक जीवनातील जगणं प्रतिबिंबित झालेल्या अश्या वऱ्हाडी साहित्यात मोलाची भर घालणाऱ्या आहेत,” असे प्रस्तावनेतून खुद्द ‘नरेंद्र इंगळे’ सर आपणास सांगतात. “अदलीभर दाने” हा आबासाहेबांचा पहिला कथासंग्रह देखील चांगलाच गाजला होता, त्यात विनोदी कथांसोबतच जीवनानुभव सांगणाऱ्या कथा देखील होत्या, परंतु ‘तितंबा’ हा कथासंग्रह पूर्णतः विनोदी प्रकारास अर्पण केलेला असल्याने, वाचक लोटपोट होण्यापासून राहणार नाहीत हे नक्की !

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी