माझे शेल्फ
तळ
उत्तम कथासंग्रह... मानवी भावभावनांवर आधारित अनेक कथासंग्रह मराठी साहित्यात उपलब्ध आहेत. यामध्ये बहुतकरून स्त्रीकेंद्री कथांचं प्रमाण जास्त आहे. त्यानंतर नातेसंबंधावरील कथाही आहेत. असाच एक मनाचा वेध घेणारा कथासंग्रह स्नेहल जोशी घेऊन आल्या आहेत. माणसाे मन एखाद्या तळ्यासारखे असते. वरून शांत, स्थिर असणाऱ्या तळ्यात तळाशी का असतं हे फक्त तळचं जाणतं. तसचं मनाचंही असतं. एखादा माणूस वरून कसाही दिसला तरी त्याच्या मनात काय सुरू आहे हे त्याला ठाऊक असतं. मनाचा वेध घेणाऱ्या कथा ‘तळं’ या संग्रहात समाविष्ट केल्या आहेत. या संग्रहातील सर्व कथा कौटुंबिक आशयावरच्या आहेत. माणसाच्या मनात विचारांच्या अनेक लहरी तरंगत असतात. ते उलगडत जाणाऱ्या कथा या संग्रहात आहेत. ‘तिघी’, ‘वाटचाल’, ‘खरं आहे’, ‘मोरपिस’, ‘तळं’ अशा काही कथा माणसाच्या मन:स्थितचा आढावा घेणारे आहेत तर ‘सोबत’ ‘सावट’, ‘संध्याछाया’, ‘प्रवाह’, ‘देस-परदेस’ या कथा वयस्कर लोकांच्या समस्यांबाबत भाष्य करणाऱ्या आहेत. विविध दृष्टिकोनातून मनाची अवस्था मांडलेल्या कथांमुळे ‘तळं’ हा संग्रह वाचनीय झाला आहे.