माझे शेल्फ
तंत्रज्ञानाची मुळाक्षरे
तंत्रज्ञानाचा संदर्भकोश… आज आपण एकविसाव्या शतकात प्रवास करीत असताना विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक शोधांमुळे मानवी जीवन सुखकर झाले आहे. तसं पाहायला गेलं तर जगातील सर्वात महत्त्वाचा शोध कुठला, तसा विचार करायला गेलं तर त्याचं उत्तर ‘चाक’ असेच दयावे लागेल. कारण या चाकावरच आज सगळे जग फिरते आहे. कुतूहल व जिज्ञासेसून माणसाला अनेक प्रश्नांची उत्तरे सापडत गेली. त्यातून नवनवे शोध लागत गेले. आज आपण गगनचुंबी इमारतीत गेल्यानंतर चटकन लिफ्टमध्ये बसतो आणि काही सेकंदात कुठल्याही मजल्यावर जाऊ शकतो. ग्रह, तारे यांचे दर्शन अत्याधुनिक दुर्बिणींच्या मदतीने घेऊ शकतो. तंत्रज्ञानाने दिलेल्या अशा अनेक गोष्टींचा वावर आपण रोजच्या रोज करतो पण लिफ्ट, दुर्बिण, सायकल यासारख्या असंख्य गोष्टींचा शोध कुणी लावला, कसा लावला असे प्रश्न आपल्याला पडत नाहीत .शाळेतल्या मुलांनाही घडत नाहीत कारण क्रमिक पुस्तकांच्या ठोकळेबाज अभ्यासक्रमांच्या साच्यात हे बसत नाही. एखाद्या विद्यार्थ्याने कुतुहलाने असला काही वेगळा प्रश्न विचारला तर शिक्षकांनाही त्याची उत्तरे देता येतीलच याची खात्री देता येत नाही. पण विद्यार्थ्यांनी अवांतर वाचन केले तर त्यांना त्यांच्या ज्ञानात भर टाकता येईल. तंत्रज्ञानाची वाटचाल अतिशय रंजक भाषेत रेखाटणारे कविता भालेराव यांचे ‘तंत्रज्ञानाची मुळाक्षरे’ हे पुस्तक जणू काही अशा ज्ञानपिपासूंना मेजवानीच आहे. या पुस्तकात रोजच्या वापरात असणाऱ्या अनेक वस्तूंचा शोध कसा लागला, कुणी लावला यावर प्रकाश टाकला आहे. प्रेशर कुकरपासून, मायक्रोवेव्ह ओव्हनपर्यंत असंख्य साधनांचा शोध कसा लागला हे लेखिकेने अगदी ओघवत्या निवेदन शैलीत सांगितले आहे. त्यामुळे विज्ञान व तंत्रज्ञान विषय म्हणजे काहीतरी अवघडच असते हे समीकरण खोटे ठरविण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत. ओघवती भाषाशैली, चटपटीत शीर्षके त्याला चित्रांची जोड यामुळे पुस्तकाची रंजकताही वाढली आहे. पुस्तकाच्या शेवटी विषयसूचीही आहे. त्यामुळे चटकन संदर्भ शोधता येतात. त्याचबरोबर महत्त्वाचे शोध व शोधकर्ते यांची यादीही दिली आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांसाठीही संदर्भग्रंथ म्हणून त्याचा उपयोग होऊ शकतो. विद्यार्थी व शिक्षकांनी तर हे पुस्तक संग्रही ठेवण्यासारखे आहे. विशेषत: शाळांच्या वाचनालयांमध्येही हे पुस्तक असणे गरजेचे आहे. शिक्षकांनाही मार्गदर्शक ठरेल, असे हे पुस्तक आहे. विज्ञानविषयावरील या पुस्तकाने अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या मराठी भाषेत निश्चितच मोलाची भर टाकली आहे.