माझे शेल्फ
टॉक्सिन
स्वर्ग आणि नरक... आज संपूर्ण जगाच्या दृष्टीने अमेरिका हा पृथ्वीवरचा स्वर्ग आहे. म्हणाल ती सुखं, म्हणाल त्या सोयी, अफाट वैज्ञानिक प्रगतीमुळे तिथे उपलब्ध आहेत. तसे पश्चिम युरोपातले देशही पुढारलेले आहेत. पण तिथले जीवन भयंकर महागडे आहे. अमेरिकेत सर्व परकारची श्रीमंती, सुबत्ता आहेच; पण तिथे स्वस्ताईदेखील आहे हे महत्त्वाचे. जगभरच्या हुशार आणि होतकरू तरुण-तरुणींना अमेरिकेत जाऊन नशीब काढायचे असते, ते त्याचमुळे. पण ही ‘घी देखा, लेकिन बडगा नही देखा’ अशी स्थिती आहे. दुनियेतील सर्व सुखं, अमर्याद व्यक्तिस्वातंत्र्य असणाऱ्या या देशातला उपभोगवाद आता अशा थराला जाऊन पोहोचलाय की, त्यांना इतर कोणत्याही मानवी मूल्यांची कसलीही पत्रास उरलेली नाही. त्यांना फक्त एक मूल्य माहीत राहिलेय - पैसा! डॉ. किम रेग्गीस हा स्वत: एक अव्वल दर्जाचा हृदयरोगतज्ज्ञ असतो. त्याची मुलगी बेकी ही एक कुशल खेळाडू असते. तिला ‘बीफ’ म्हणजे गोमांसयुक्त खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे विषाणू संसर्ग होतो. वेळेवर आणि योग्य ते उपचार न झाल्यामुळे बेकी मरते. डॉक्टर किम मुळापासून हादरतो. ज्या रुग्णालयात तो स्वत: प्रथम श्रेणीचा डॉक्टर असतो त्याच रुग्णालयात त्याला आणि त्याच्या मुलीला मिळालेली माणुसकीविहीन वागणूक पाहून तो भयंकर संतापतो. लेखकाने हा प्रसंग अशा कौशल्याने शब्दबद्ध केला आहे की,वैज्ञानिक प्रगतीच्या सर्वोच्च शिखरावर आरूढ झालेल्या अमेरिकेतही रुग्णांना अशाच म्हणजे आपल्याकडच्या सारख्याच बेपर्वाईने वागवले जाते, हे वाचून आपण थक्क होतो. मुलीच्या मृत्यूमुळे चिडलेला डॉ. किम बीफमध्ये विषाणू आले कुठून नि कसे याचा छडा लावू पाहतो आणि त्याच्यासमोर एक महाभयानक वस्तुस्थिती उलगडत जाते. अमेरिकेत गाई, म्हशी, शेळ्या या आपल्याकडल्याप्रमाणे दुधासाठी किंवा लोकरीसाठी पाळल्या जात नाहीत; तर त्यांच्या मांसासाठी पाळल्या जातात. या सर्व पशूंना भरपूर खायला घालून गलेलठ्ठ बनवायचे आणि त्यांना कापून त्यांच्या मांसाचे विविध पदार्थ बनवायचे. या उद्योगात प्रचंड पैसा गुंतलेला आहे. डॉ. किमला असे आढळते की, रोगट गार्इंचे मांस बेधडकपणे पुरवले जात आहे. त्यामुळेच हा जीवघेणा विषाणू संसर्ग होत आहे. पण ‘बीफ’ उद्योगातल्या बड्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना मरणाऱ्या माणसांची काडीचीही पर्वा नाही. त्यांना हवाय नफ! फक्त नफा! डॉ. रॉबिन कुक हा प्रस्तुत ‘टॉक्सिन’ या कादंबरीचा लेखक स्वत: वैद्यकीय व्यावसायिक आहे. त्यामुळे या कथानकातले शास्त्रीय तपशील त्याने अतिशय बारकाईने टिपले आहेत. वाचकाला सुन्न करून टाकण्याची ताकद त्याच्या लेखणीत आहे. प्रमोद जोगळेकर यांचा अनुवाद चंद्रमोहन कुलकणी यांचे मुखपृष्ठ मेहता प्रकाशनाची एकंदर निर्मिती उत्तम.