माझे शेल्फ
ट्रॅव्हलिंग टू इन्फिनिटी : माय लाइफ विथ स्टीफन
केंब्रिज विद्यापीठातील नावाजलेला प्राध्यापक,प्रचंड बुद्धिमत्ता असलेला आंतरराष्ट्रीय कीर्तीचा वैज्ञानिक, आइंस्टाईन चा खरा वारसदार अशी ख्याती असलेल्या स्टीफन हॉकिंग च्या अर्धांगिनीच, जेन हॉकिंगच हे आत्मचरित्र. ऐन तारुण्यात मोटर न्यू्रॉन सारखया जीवघेण्या आजाराने, स्टीफनना व्हील चेअर ला कायमच खिळवून ठेवलं. पण तरीही दुर्दम्य इच्छाशक्तीने आणि प्रखर बुद्धिमत्तेने,त्यांनी भौतिकशास्र आणि विश्वउत्पत्तीशास्त्र ह्यात अतुलनीय कामगिरी केली. ह्या त्यांच्या संपूर्ण प्रवासात त्यांना सावली प्रमाणे साथ देणारी त्यांची पत्नी जेन म्हणजे स्री शक्तीचा, सोशिकतेचा मानदंडच म्हणावा लागेल.किती भूमिका जेन ने एका आयुष्यात निभावल्या याच राहून राहून आश्चर्य वाटत.विकलांग नवऱ्याची दिवस रात्र सुश्रुषा करणारी नर्स, त्याची ड्राईव्हर, सेक्रेटरी, टायपिस्ट, देशविदेशात प्रबंध/परिषदा/पुरस्कारांच्या निमित्त्याने नवऱ्या बरोबर जाणारी त्याची सहकारी ,तीन मुलांचं निगुतीने संगोपन करणारी आई, तुटपुंज्या पगारात घराचं आर्थिक नियोजन करणारी ते घर बदलताना वेळप्रसंगी घराचं रंगकाम करणारी रंगारी, घरी कायम होणाऱ्या वैज्ञानिक /शास्त्रज्ञा च्या पार्ट्याना, पार्टी ची संपूर्ण व्यवस्था बघणारी मॅनेजर . नवरा दिवस रात्र त्याच्या संशोधनात, कामा च्या व्यापात बुडालेला आणि इंग्लंड मध्ये घर कामाला मदतनीस मिळणे कठीण त्या मुळे एकटीने एवढ्या जवाबदाऱ्या पार पडताना त्यांची फार शारीरिक , मानसिक दमछाक व्हायची.हॉकिंग कुटुंबाला इंग्लंड च्या खडूस, कोत्या मनोवृतीच्या लोकांचा बराच त्रास सहन करावा लागला. अपंग स्टीफन साठी कामाच्या ठिकाणी छोट्या मोठ्या सोई सुविधा उपलब्ध होण्यासाठी, त्यांच्या कामाचं योग्य ते मानधन मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. त्यात स्टीफन कमालीचे लहरी आणि विक्षिप्त.नवऱ्या च्या तर्हेवाईक स्वभावाशी जुळवून घेताना जेन ना कठीण जायचं.पण त्याच्या असामान्य कर्तृत्वा कडे पाहून त्या निमूटपणे सहन करायच्या. एवढं सगळं करून,सोसून स्टीफन नी एका नर्सच्या प्रेमात पडून 25 वर्षाचा संसार मोडून टाकला तेव्हा मात्र जेन आतून फार दुखावल्या गेल्या,त्यांना फार मानसिक यातना झाल्या. हे पुस्तक जेन आणि स्टीफन ह्यांच्या सहप्रवासाच असल तरी माहितीचा खजाना सापडतो ह्यात. देशविदेशातील प्रसिद्ध स्थळे/शहरे , विद्यापीठे , वैज्ञानिक, नेते, संगीतकार, चित्रकार ह्यांचे उल्लेख आहेत.आपण शाळेत असताना वाचलेल्या /शिकलेल्या बऱ्याच गोष्टी आठवतात. एका आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या वैज्ञानिका चा शारीरिक व्याधिंवर मात करत केलेला झुंजार प्रवास आणि एका स्त्री च्या कष्टाच,सहन शक्तीच्या परिसीमे च दर्शन घडवणार हे पुस्तक नक्कीच आपल्या संग्रही असाव.