माझे शेल्फ
त्रिकोण
राजकारणाचे रूप... विजय नाईक हे दिल्लीतील मराठी पत्रकार. गेल्या २५ ते ३० वर्षांतल्या बदलांचे साक्षीदार, राजकीय व्यक्तींची सत्तास्पर्धा आणि हेवेदावे यांची कथाचौकट त्यांनी ती ‘त्रिकोण’ कादंबरीत फिट बसवली आहे. ‘त्रिकोण’ कादंबरीपूर्वी त्यांची एक-दोन पुस्तके प्रसिद्ध झालेली असली तरी आता ते लेखक म्हणून चांगले स्थिरावतील याची खात्री पटते. नैना ही ध्येयवादी पत्रकार, राजकारणात मुरलेले मंत्री शिवेंद्रराज, सामाजिक मूल्यांची आस धरून चळवळीच्या कामात झोकून दिलेला नैनाचा पती अभय आणि नैनाच्या वाटचालीत सहाकारी झालेला मित्र मनोहर अशा चौकोनात नाट्य खुलते. नाट्यात पत्रकारिता, राजकारणातले ढोंग आणि क्रौर्य तसेच सामाजिक चळवळीतले प्रामाणिक भाबडेपण यावर भाष्य येते. नवी दिल्ली हे राजकारणातले सर्वांत मोठे सत्ताकेंद्र. हे केंद्र सामाजिक सेवेचे क्षेत्र राहिले नसून, ते व्यावसायिक कसे झाले आहे याचा पानोपानी प्रत्यय येतो. परदेशात परिषदा होतात. शिष्टमंडळे जातात. त्यांची निवड कशी होते यावरही मग प्रकाश पडतो. नैना ही या कादंबरीतले मध्यवर्ती पात्र. ती राजस्थानातल्या पोलीस अधिकाऱ्याची मुलगी. अभयच्या प्रेमासाठी घरच्यांचा विरोध पत्करून ती त्याच्याशी लग्न करते आणि दोघेही दिल्लीत येतात. संसार रेटण्यासाठी नैना पत्रकार बनते. धडाडीमुळे तिची राजकीय वर्तुळात उठबस वाढते. राजकारणातली मुरब्बी माणसे पत्रकाराला बातम्या देतात ते त्यांच्या फायद्यासाठी. ‘त्रिकोण’मध्ये केंद्रीय मंत्री शिवेंद्रराज यांना नैनाचा सहवास हवासा वाटण्यातून लुब्ध होऊन तिला ते बातम्या देतात. याचसाठी नैना ज्युनिअर असी तरी संपादकाला फोन करून ते परदेशातल्या दौऱ्यात तिची वर्णी लावून देतात. पुढे लंडनालाही घेऊन जातात. पण शिवेंद्रराज यांचा आव असा की, तिच्या अडचणीच्यावेळी ते भल्या माणसासारखे मदतीसाठी सदैव तयार आहेत असा. तिला पैसे मिळण्यासाठी ते अनेकांचा विरोध पत्करून पैसे मिळवून देणाऱ्या माहितीपटाचे कामही देतात. मात्र हे सारे तुम्ही का करीत आहात हे नैना कधीच त्यांना विचारीत नाही. माहितीपटाच्या कामात तिच्या कार्यालयातल्या मनोहर मदत करतो. एखाद्या तरुणीसाठी मंत्र्याने नियम वगैरे तोडून कारभार करण्याचा बभ्रा होण्याला वेळ लागत नाही. योगायोग असा की, इकडे राजकीय पटही बदलू लागतो. शिवेंद्रराज हे नैनाला उमेदवारीही मिळवून देतात. पर्यटन मंडळाचे अध्यक्षपदही देतात पण नैना निवडणूक हरते. ते स्वत: निवडून येतात. याच काळात नैना आणि अभय यांच्यात भांडणे होतात, तेव्हा मनोहर तिच्याजवळ येतो. पुरते जाळे पसरल्यानंतर आणि पैशांनी अंकित केल्यानंतर शँपेनच्या नशेत शिवेंद्राज नैनाचा उपभोग घेतात. त्याहीवेळी नैना संतापत नाही. एकेकाळी संघर्षशील असणारी नैना प्रलोभनाच्या भोवऱ्यात सापडून घसरते. तिच्या आयुष्यात सतत तडजोडच येते. त्या तुलनेत तिचा नवरा सुखांना लाथाडत जातो.आशा-आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा प्रत्येक माणसाला असावी. पण ती गाठताना फरफट होऊ नये. राजकीय लाभ घेतल्याने नैनाची नोकरी जाते. अभय दूर होतो आणि मनोहरला जवळ करताना मूल होणार नाही यावर डॉक्टरी शिक्कामोर्तब होते. तेव्हा मूल दत्तक घेण्याचा निर्णय नैना घेते. अपघातात शिवेंद्रराज मरण पावतात, पण त्यापूर्वीच त्यांनी इच्छापत्र तयार करून नैनासाठी २५ लाखांची तरतूद केलेली असते. नैनाचे आयुष्य कोठून कोठवर येते याची कहाणी म्हणजे ही कादंबरी. राजकारणातील चढाओढ, कुरघोडी, शह आणि काटशह, डावपेच आणि पत्रकाराला वश करण्यासाठी सरकारी खिरापतीची खैरात आपल्याला अस्वस्थ करते. राजकारणाचे अंगप्रत्यंग किती किळसवाणे असते याची जाणीव ही कादंबरी करून देते. नाईक यांनी घटनांचा मालमसाला ठासून भरलाय. तो वाचकांना भोवंडून टाकेल.
पूर्वी सर्रास मराठी माध्यमांच्याच शाळा होत्या. त्यामुळे आमचे शालेय शिक्षण मातृभाषेतून झाले. नंतर वाचनाची आवड निर्माण झाली. वेगवेगळ्या विषयांच्या वाचनांतून भरपूर माहिती मिळायची. तेव्हा विज्ञान ह्या विषयांवर जास्तीत जास्त पुस्तक ही इंग्रजी विषयांमध्ये असायची. पूढे मग डॉ. जयंत नारळीकर, मोहन आपटे, अच्युत गोडबोले ह्यांच्या मराठी भाषेतील विज्ञानविषयक पुस्तकांनी आमच्या सारख्या वाचकांची तृप्ती केली. आज डॉ. जयंत नारळीकर ह्यांचा वाढदिवस. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि नमस्कार.
काही व्यक्ती ह्या इतक्या कर्तृत्ववान असतात की त्या व्यक्तीच जणू त्यांच्या कार्याची, त्यांच्या गावाची ओळख, अभिमान बनतात. आज आधीच "पूणं" ह्या सांस्कृतिक तसेच शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या शहराबद्दल प्रत्येक व्यक्तीच्या मनात आदराची,कौतुकाची भावना ही आहेच. आणि ह्या पुण्याच्या ओळखीचा एक हिस्सा म्हणजे डॉ. नारळीकरांची "आयुका" ही संस्था. प्रत्येक भारतीयांच्या मनात ह्या संस्थेबद्दल आणि ही संस्था उभी करुनही अत्यंत साध्या व्यक्तीमत्वाच्या डॉ. नारळीकरांबद्दल अभिमान, आदर हा आहेच.
जयंत विष्णू नारळीकर हे भारतीय खगोलशास्त्रज्ञ व लेखक आहेत. जयंत नारळीकरांचा जन्म कोल्हापूर येथे 19 जुलै 1938 रोजी झाला. नारळीकरांच्या घरी जणू कायमचा सरस्वती चा वास असावा. त्यांचे वडील, रॅंग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ, वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या. जयंत नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. इ.स. 1957साली त्यांनी विज्ञानात पदवी (B.Sc.) प्राप्त केली.या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटन मधील केंब्रिज येथे गेले. तेथे त्यांनी बीए, एमए व पीएचडीच्या पदव्या मिळविल्या.ह्या शिवाय रॅंग्लर ही पदवी,खगोलशास्त्राचे टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार व इतर अनेक बक्षिसेही त्यांना मिळालीत.
१९६६ साली नारळीकर यांचा विवाह मंगला सदाशिव राजवाडे (गणितज्ञ) ह्यांच्याशी झाला. त्यांना तीन मुली आहेत - गीता, गिरिजा व लीलावती. 1972 साली ते भारतात परतले. त्यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टी.आय.एफ.आर.) खगोलशास्त्र विभागात प्रमुख म्हणून पद स्वीकारले. 1988 साली त्यांची पुणे येथील आयुका संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली.
त्यांच "आकाशाशी जडले नाते"हे अत्यंत माहितीपूर्ण पुस्तक वाचून आपल्या माहितीत ज्ञानात मोलाची भर पडते. ह्या पुस्तकातील फोटो आपल्या मनातील खगोलशास्त्रातील शंका दूर करतात. नारळीकरांनी 'चार नगरांतले माझे विश्व' या विलक्षण ओघवत्या आणि साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेल्या आत्मकथनाचा समारोप करताना 'विज्ञानप्रसार आणि अंधश्रद्धानिर्मूलन यांच्या मागे लागताना पदोपदी जाणवते की, आपल्या सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या समाजावर देखील अंधश्रद्धांचा पगडा आहे,' असे खेदाने म्हटले आहे. मात्र, लगेच संस्कृत सुभाषिताचे उदाहरण देऊन त्यांनी 'कितीही विघ्ने कोसळली तरी शहाणी माणसे आपले नियतकर्तव्य सोडत नाहीत' असाही उतारा त्याला जोडला आहे.
असे कर्तव्य नारळीकर जन्मभर विविध माध्यमांमधून करत आले आहेत. त्यांनी विज्ञान प्रसाराकरीता साध्या सोप्या मराठी भाषेला प्राधान्य दिले . त्यांनी ह्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भाषणे, लेख, कथा, मुलांची शिबिरे हे सारे मार्ग अवलंबिले ते पण कुठलाही स्वार्थ,फायदा ह्याचा विचारही न करता. 'महाराष्ट्र टाइम्स'मध्येही त्यांनी बरेच लेखन केले आहे. त्यांना आवडणाऱ्या सौम्य इंग्रजी विनोदाप्रमाणे ते गमतीने व्याख्यानबाजी असा आपल्याच भाषणांचा उल्लेख करीत. त्यांनी हा वसा सातत्याने अनेक वर्ष जोपासला.
विविध मराठी नियतकालिकांतून जयंत नारळीकर यांचे विज्ञानविषयक माहितीने भरलेले ललित लेखन सातत्याने प्रसिद्ध झालेत. नारळीकरांच्या पुस्तकांची जगांतील अनेक भाषांत रूपांतरे झाली आहेत.
अशा महान थोर विभूतींकडे त्यांच्या कर्तृत्वामुळे पुरस्कारांचा नुसता ओघ वाहतो. 1965 मध्ये पद्मभूषण पुरस्कार, 2004
मध्ये पद्मविभूषण पुरस्कार, 2010 मध्ये
महाराष्ट्र भूषण पुरस्कार ,आणि ह्या सोबतच त्यांना भटनागर पुरस्कार, व बिर्ला पुरस्कार त्यांना प्राप्त झालेत.
प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल अशा डॉ नारळीकरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या निरामय आरोग्यासाठी देवाकडे प्रार्थना करुन आजच्या पोस्ट ची सांगता करतो.