माझे शेल्फ
तरंग
नेताजी पालकर यांच्या जीवनावर ‘अग्निदिव्य’ ही विलक्षण कादंबरी लिहिणारे कल्याणीरमण बेन्नुरवार यांचा ‘तरंग’ हा विविध सत्य घटना, आठवणी आणि शीतल व दाहक अनुभवांवर आधारित वैशिष्ट्यपूर्ण असा कथासंग्रह आहे. बेन्नुरवार यांच्या बालपणापासून आतापर्यंतच्या विविध कडू-गोड कौटुंबिक आठवणींबरोबरच त्यांना आयुष्यात भेटलेले चित्र-विचित्र तऱ्हेचे नानाविध लोक तसेच सामाजिक जीवनातील अनेक छोट्या-मोठ्या, बऱ्या-वाईट नाट्यपूर्ण घटना-प्रसंगांवर आधारित असा हा कथासंग्रह आहे.लेखकाने चरित्र, कथा, कादंबरी, बालसाहित्य असे विपुल लेखन केले असून त्यांच्या तर भाषांमध्ये अनेक आवृत्त्याही निघाल्या आहेत. लेखकाच्या भावविश्वातल्या विविध आठवणींच्या पदरांमधून हे ‘तरंग’ उमटलेले आहेत. यात काही कडूगोड क्षण आहेत, काही समर्पित तर काही वैचित्र्यपूर्ण व्यक्तिचित्रे आहेत. काही प्रसंग काही आठवणी आणि काही गोष्टी आहेत. ‘पीआयएल.’ ‘पाच नंबर सिंगल रूम’ या कथांची भट्टी उत्तम जमली आहे. पुरावा ही कथा एक जोरदार धक्का देते. ‘नाडीपरीक्षा’, ‘गौरीहार’ या फसवणुकीच्या कथा असूनही त्यांचा पोत मात्र भिन्न आहे. ‘बडा साब’चा राउंड’, ‘दिवसा पण खेळ चाले’ या कथा तुम्ही विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, पण जगात भुते आहेतच असे सहज सांगून जातात. ‘पावलीची कोपरी’ चटका लावणारी कथा. खरंच असे कधी होते का? असा एक जिव्हारी लागणारा खडा सवालही टाकते. ‘श्रमही निमाले’मधील आणि ‘पावलीची कोपरी’मधील आईचा मृत्यू ही घटना कशी सुन्न करते याचा गहिरा अनुभव देते. ‘अश्रू’मधील हरिपंत चापेकरांची व्यक्तिरेखा भावुकता आणि कठोर वास्तव यांच्या सीमेवरील अश्रूंची किंमत सांगते. मयूर गोरे हे पात्र अगदी अस्सल साकारले आहे त्याचा दुर्दैवी शेवट हा त्याच्याच कर्माने झालेला असूनही हे पात्र सगळ्यांना गुतवून ठेवते हे त्याचे यश आहे. बालय्या स्वामी हे आपल्या विचारशक्तीच्या आणि कल्पनाशक्तीच्या मर्यादा ओलांडून पांढरपेशा समाजातील अपरिचित असा जीवनपट उलगडत जाते. ‘सिंगल रूम’मधील संघर्ष वास्तववादी आहे, पण शेवट मात्र धक्का नक्की देतो. ‘पीआयएल’मधील ‘पोएटिक जस्टीस’ एक पाठ देते तर ‘कर्मयोगी’मधील अनंत राव एक उत्तम वस्तुपाठ घालून देतात. ‘पाच नंबर’मधील नायिकेची घालमेल आपली कधी होऊन जाते ते कळतच नाही म्हणूनच हे ‘तरंग’ अवश्य अनुभवण्यासारखे आहेत.