माझे शेल्फ
तुरुंगातील सावल्या
कोवळ्या ‘सावल्या’चे अंतरंग… सामान्यत: ‘कैदी स्त्री’ म्हटली की, आपल्या डोळ्यांपुढं उभी राहते ती एखादी ‘दुष्ट प्रवृत्तीची स्त्री’! अनेकांना वाटते की, अशा स्त्रियांची जागा ही तुरूंगातच असायला हवी. त्यांच्याविषयी विचार करण्याचे कष्ट तरी का घ्यायचे? विनाारण वृथा वेळ तरी का रखडायचा? मात्र, या कैदेत असलेल्या स्त्रिया अनेकदा परिस्थितीच्या बळी ठरलेल्या असतात. ‘तुरूंगातील सावल्या’ हे रुझबेह भरुचा यांच्या मूळ इंग्रजी भाषेत लिहिलेल्या पुस्तकाचे ‘मराठी अनुवादित’ पुस्तक आहे. हे पुस्तक वाचून तर नक्कीच प्रत्येकाला आपणही त्यांच्यासाठी काही करावं... अशी इच्छा होईल. वाचकाला अंर्तबाह्य हेलावून टाकणाऱ्या अशा संवेदनाक्षम शैलीत त्यांनी या पुस्तकाची मांडणी केली आहे. तुरुंगातील कैदी स्त्रिया आणि जीवंतपणीच नरकयातना भोगणारी त्यांची मुलं यांच्या कल्पनातील आयुष्याचं अक्षरश: चित्र... भारतीय तुरुंगात राहणाऱ्या आया व त्यांच्या मुलांना ज्या व्यथांचा व वेदनेचा सामना करावा लागतो त्याची ही कहाणी आहे. लेखकाने देशभरातील असंख्य तुरुंगांना व्यक्तिश: भेट देऊन तिथे जीवन कंठणाऱ्या अनेक कैदी स्त्रिया व त्यांच्या मुलांशी संवाद साधला. तुरुंगातील कैद्यांच्या मुलाखतीप्रमाणेच तिथे प्रत्यक्ष काम करणारे समाजसेवक, तुरुंगाधिकारी आणि वकील यांच्या मुलाखतीही रोमांचकारी आहेत. तुरुंगातील परिस्थिती, असुरक्षितता, कैदी स्त्रियांची व मुलांची धडपड, आनंद, आशा आणि स्वप्ने याचे चित्रण या पुस्तकात आढळते. पुस्तक वाचताना एका वेगळ्या भावनिक कल्लोळाचा अनुभव वाचकाला येईल. आपल्या हळुवार, नाजूक व क्वचित नर्म विनोदाची झालर असलेल्या शौलीत लेखक वाचकाला या एका प्रवासाला आपल्यासोबत घेऊन जातो. पुस्तक वाचून ठेवताना वाचकांच्या हृदयात कळ आणि डोळ्यात अश्रू उभे राहतात.