माझे शेल्फ
ट्वेल्व्ह रेड हेरिंग्ज
उत्कंठावर्धक कथा... जेफ्री आर्चर हे इंग्रजीतील एक बेस्ट सेलर लेखक. रहस्यमय कादंबऱ्यांबरोबरच त्यांनी कथाही लिहिल्या. त्यांचा ‘ट्वेल्व्ह रेड हेरिंग्ज’ हा कथासंग्रह अनुवादित स्वरूपात वाचकांच्या भेटीला आला आहे. मराठीत अनुवाद केला आहे डॉ. देवदत्त केतकर यंनी. ‘ट्वेल्व्ह रेड हेरिंग्ज’ हा एकूण बारा कथांचा संग्रह आहे. विविध कल्पनांमधून साकारलेल्या या कथा मनुष्य स्वभावाचे विविध नमुने दर्शवणाऱ्या आहेत. ‘करावे तसे...’ या कथेचा निवेदक एका खासगी मालवाहतूक करणाऱ्या कंपनीचा मालक असतो. रोझमेरी ही त्याची दुसरी पत्नी. रोझमेरी आणि निवेदकाचा मित्र जेरेमी यांची ओळख होते आणि त्यांचं अफेअर सुरू होतं. जेव्हा निवेदक हे प्रकरण उघडकीला आणतो, तेव्हा जेरेमी आणि निवेदक यांच्यात हाणामारी होते. त्यात जेरेमी खाली कोसळतो. निवेदक तिथून निघून जातो; पण दुसऱ्या दिवशी त्याला जेरेमीच्या खुनाच्या आरोपावरून अटक होते. रोझमेरीही त्याच्या विरोधात साक्ष देते आणि तो तुरुंगात जातो; मात्र जेरेमीचा मृतदेह पोलिसांनी पाहिलेला नसतो. त्यामुळे जेरेमी जिवंत आहे, असं निवेदकाला राहून राहून वाटत असतं. काही घटना अशा घडतात, की निवेदकाची तुरुंगातून सुटका होते आणि मग एक माजी पोलीस सुपरिंटेंडन्ट आणि एक माजी पोलीस इन्स्पेक्टर यांच्यावर तो जेरेमीला शोधण्याची कामगिरी सोपवतो. त्या दोघांसह निवेदकही त्या कामगिरीत सामील होतो. जेरेमीपर्यंत ते कसे पोचतात, त्याची ही उत्कंठावर्धक कथा आहे. ‘अर्ध्या किमतीत स्वस्त’ ही कथा आहे कॉन्सुला रोझनहाईम या चतुर स्त्रीची. व्हिक्टर रोझनहाईम हा तिचा तिसरा नवरा बडा बँकर असतो. या नवऱ्याकडून भरपूर पैसे उकळून ती पुढचं सावज हेरणार असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांतून झळकत असतात. तिच्या वाढदिवसानिमित्त कोणतं महागडं गिफ्ट नवऱ्याकडून उकळावं या विचारात ती काही दुकानं पालथी घालते. तिला आवडतो एक हिऱ्यांचा हार. ती तो हार तिच्या नवऱ्याकडून आणि प्रियकराकडून कसा मिळवते, याची ही कथा आहे. ‘डगी मॉर्टिमरचा बाहू’ मधील रॉबर्ट हेन्री केफर्ड (तिसरा) ऊर्फ बॉबला डर्गी मार्टिमरच्या उजव्या बाहूबद्दल समजतं. केंब्रिजच्या विजयी संघात सलग तीन वर्षं आघाडीचा नावाडी म्हणून त्याने स्थान मिळवलेलं असतं. हेलन ही बॉबची मैत्रीण असते. तिच्या वडिलांच्या पबमध्ये बारच्या मागच्या बाजूला डगी मॉर्टिमरच्या बाहूची ब्राँझमध्ये घडवलेली प्रतिकृती असते. युनिव्हर्सिटी बोट क्लबला एखादं स्मृतिचिन्ह दिल्याशिवाय त्याने घरी परतू नये, असं बॉबच्या वडिलांचं सांगणं असतं. डगी मॉर्टिमरच्या बाहूची ब्राँझची प्रतिकृती स्मृतिचिन्ह म्हणून केंब्रिजला द्यावी, असं बॉब ठरवतो आणि त्याप्रमाणे थोड्या प्रयत्नांनी ती प्रतिकृती मिळवतो. केंब्रिजला समारंभपूर्वक स्मृतिचिन्ह म्हणून देतो; पण त्या समारंभानंतर चार्ल्स फॉरेस्टर आणि बोटमन सिडनी फिस्क त्या बाहूला जलसमाधी देतात, हे बॉब चोरून बघतो; पण त्या दोघांना जाब न विचारता तो वृद्ध ऑक्सफर्ड ब्लू हॅरॉल्ड डियरिंग यांना गाठतो आणि त्या दोघांनी त्या बाहूला जलसमाधी का दिली असेल, याचं कारण त्याला डियरिंग यांच्या बोलण्यातून समजतं. ‘वाट चुकू नका’ ही कथा आहे हमीद झेबारी याची. हमीद हा इराकमध्ये सद्दाम हुसेनच्या मंत्रिमंडळात कृषिमंत्री असतो. एका वर्षी गव्हाचं पीक कमी आलं म्हणून त्याला बडतर्फ करण्यात येतं. इराकमधील एकूण परिस्थिती आणि सद्दामची हुकूमशाही माहीत असल्यामुळे हमीद आपल्या गर्भवती बायकोसह मोठ्या शिताफीने इराकमधून निसटतो. अमेरिकन दूतावासाच्या मदतीने तो अमेरिकेत पोचतो. जाताना त्याने काही गालिचे अमेरिकेत विकण्यासाठी घेतलेले असतात. अमेरिकेत गालिचे विकण्याचा व्यवसाय करत तो स्थिरावतो. तिकडे इराकमध्ये त्याला मृत्युदंडाची शिक्षा फर्मावण्यात आलेली असते. एकदा तो गालिचे घेण्यासाठी इस्तंबूलला गेलेला असतो. विमानाने अमेरिकेला परत येत असताना विमानात बिघाड होतो आणि विमान बगदादला उतरवण्यात येतं. इथे आपल्याला कुणी ओळखलं किंवा आपला पासपोर्ट तपासला गेला तर आपण सद्दामच्या तावडीत सापडणार, या भीतीने हमीद अक्षरश: गर्भगळीत होतो. तो त्याची ही भीती विमानाच्या कॅप्टनजवळ बोलून दाखवतो. सद्दामचा एक अधिकारी हमीदला ओळखतो; पण कॅप्टन आणि विमानातील कर्मचारी हमीदला कसे वाचवतात, त्याची ही कथा आहे. ‘बोगद्यातली दृष्टी’ या कथेचा निवेदक लेखक आहे. त्याच्या एका कादंबरीच्या पूर्वप्रसिद्धीसाठी तो न्यू यॉर्कला गेलेला असतो. त्या वेळी तो तिथे राहणाऱ्या त्याच्या लेखक मित्राकडे डंकनकडे जातो. डंकन त्याच्या डोक्यात असलेल्या नवीन कादंबरीचं कथानक निवेदकाला अगदी रंगून सांगत असतो आणि ते ऐकताना निवेदकाला मात्र काय करावं ते सुचत नसतं; कारण त्या कथानकावर निवेदकाने आधीच कादंबरी लिहिलेली असते. डंकनचं कादंबरीविषयीचं बोलणं आणि निवेदकाची अवस्था, याचं गंमतशीर चित्रण या कथेत केलं गेलं आहे.