मुखपृष्ठ
थॉट लीडर्स

माझे शेल्फ

थॉट लीडर्स

इंग्रजी शीर्षक
Thought Leaders
सारांश

विचार समृद्ध थॉट लीडर्स… नव्या कल्पना प्रत्यक्षात आणणं आणि आव्हानं स्वीकारणं, स्वतंत्र होण्याची किंवा स्वायत्ततेची गरज आणि जीवनाचा दर्जा सुधारणं अशा गोष्टींची निकड आजच्या आधुनिक युगात भासते आहे. अशी निकड असणारे स्वत:चा मार्ग शोधतातच; पण त्यांना एखाद पाऊलवाट जरी मिळाली, तरी त्यावरून चालण्याचे समाधान त्यांना लाभू शकते. अशा प्रयत्नशीलांसाठी ‘थॉट लीडर्स’ हे श्रीनिवास पंडित यांचे पुस्तक सुप्रिया वकील आणि विलास वाडकर यांनी अनुवादित केले आहे. यात भारतातील एकूण बावीसजणांची व्यक्तिचित्रणे वा कार्याचा आलेख आला आहे. अन् जागा, धनंजय बखले, प्रमोद चौधरी, राजाभाऊ चितळे, हुमायून धनराजगीर, भ्ंवरलाल जैन, दीपक कानेगावकर, भाऊसाहेब केळकर, रवी खन्ना, वर्गीस कुरीयन, रघुनाथ माशेलकर, किरण मुजुमदार, नारायण मूर्ती, दीपक पारेख, प्रताप पवार, प्रकाश रत्नपारखी, रॉनी स्क्रूवाला, सरताजसिंग, अशेक सुना, विक्रम टन्नन, सुधीर टिल्लू आणि मनोज तिरोडकर या नामावलीकडे बघूनच त्यांची व्यक्तित्वे काही अशी स्मरू लागतात. मिठाई उत्पादनापासून ते माहिती तंत्रज्ञान, डेअरी, जैव रसायनं, सॉफ्टजेल्स, औषधे उत्पादने, प्रतिमानिर्मिती, इंजिनिअरिंग, विज्ञान अशा क्षेत्रांतली ही सारी मंडळी आहेत. केवळ महाराष्ट्रापुरत्या यांच्या सीमा नसून ही मंडळी इतरही ठिकाणची आहे.पस्तीस वर्षांपासून ते ७९ वर्षांपर्यंतच्या वयोगटातील हे उद्योजक आदर्शत्वाचा नमुना म्हणता येतील. विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या मतांची नोंद घेऊन या ‘लीडर्स’ची निवड केल्याचे दिसते. कार्यक्षेत्रातली अत्त्युत्तम कामगिरी. भविष्यकाळात उज्ज्वल प्रगतीची आशा, इतरांसाठी स्फूर्ती व चैतन्यदायी आणि सर्जनशीलता हे निकष यासाठी लावले गेलेले दिसतात. एकंदर दोन भागांपैकी पहिल्यात त्यांची जडणघडण, त्यांच्यावरचा अनुभवी सल्लागारांचा प्रभाव, आपल्याला कलाटणी देणारी महत्त्वाची वळणं आहेत. त्यांचे वैशिष्ट स्वभावविशेष, त्यांची विचारप्रक्रिया, त्यांची कौशल्ये-कार्यक्षमता आणि आगळेपण सिद्ध करणारे घटक या साऱ्यांचे वर्णन आहे. ‘‘ग्राहकाची स्वादिष्ट पदार्थांची भूक आम्हाला प्रेरणा देते.’’ -राजाभाऊ चितळे. ‘‘उपयोगात आणता येण्याजोगं संरक्षित ज्ञानच फक्त, संपत्तीनिर्मिती करू शकते.’’ -रघुनाथ माशेलकर ‘‘ग्राहकाला चोवीस तासांच्या आत प्रतिसाद देणं हे धार्मिक कायं आहे.’’ -अन् आगा. या तिघांची ही वाक्य त्यांच्या जीवनाचे सार दर्शवितात. अशी वाक्य प्रत्येकाच्या चित्रणात लिहिलेली दिसतात. जणू प्रत्येकाच्या यशाचा तोच मूलमंत्र आहे. दुसऱ्या भागात या यशस्वी उद्योजकांच्या जडणघडणीत आढळणाऱ्या समान घटकांचं तुलनात्मक विवेचन केलेलं दिसतं. यांच्यातले समान स्वभावविशेष आणि सोर्स कोड रेखाटले आहेत. त्यांच्या कार्यक्षेत्रातली त्यांची व्यक्तिमत्त्वे-प्रतिमा यांचाही विचार यात एकत्रितपणे केला आहे. शेवटी असलेल्या परिशिष्टात त्रोटक महितीचा तक्ता दिलेला आहे. यशस्वी नेते उद्योजकांच्या मुलाखतीवर आधारलेल्या या लेखनातून त्यांच्या अंतरंगाचं दर्शन घडतं. जवळपास तीन वर्षे चाललेला एक प्रयत्न या पुस्तकाद्वारे शब्दबद्ध झालेला दिसतो. मात्र अनुवादात वापरलेली भाषा त्यामानाने ग्रांथिक अधिक वाटते. आजच्या पिढीला इंग्रजीचा सराव असल्याने तेच शब्द वापरले असते तरी फारसे बिघडले नसते. काही वेळा वाक्यरचना, शब्दप्रयोग हे मराठीनुसार न करता इंग्रजीच्या धर्तीवर रचलेले वाटतात. आपण जे होऊ शकतो असं आपल्याला वाटतं असतं, तसं होण्यासाठी आपल्याला कुणीतरी स्फूर्तिदायी व्यक्ती असणं ही आपली मुख्य गरज असते. असं राल्फ वाल्डी इमर्सन म्हणतो. म्हणूनच जाणिवेच्या सूक्ष्म सखोल थरापर्यंत पोचून, समृद्ध आणि देदीप्यमान कामगिरी घडवण्यासाठी साहाय्यभूत ठरणाऱ्या घटकांविषयी सहाय्यभूत ठरणाऱ्या घटकांविषयी ‘थॉट लीडर्स’ आपल्याला मोलाचे मार्गदर्शन करते.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद