मुखपृष्ठ

माझे शेल्फ

वेस्टेड

इंग्रजी शीर्षक
Wasted
सारांश

एका व्यसनी माणसाचं, गर्दुल्ल्याचं आयुष्य जवळून पाहायचं असेल, त्याचा व्यसनात गुरफटण्यापासून ते त्यातून मुक्त होईपर्यंतचा प्रवास अनुभवायचा असेल, तर मार्क जॉन्सन यांचं ‘वेस्टेड’ वाचायला हवं. हे त्यांचं आत्मकथन आहे. सत्य घटना आहे. ही कथा आहे, एका बालपण हरवलेल्या मुलाची. प्रेमाचा ओलावा शोधता शोधता, रखरखीत घरापासून मनानं दुरावलेल्या मुलाची. त्या शोधात लागलेल्या कुसंगतीची. त्यातून जडलेल्या व्यसनांची. व्यसनांमुळे विखुरलेल्या आयुष्याची. त्यानं भोगलेल्या तुरूंगवासाची आणि रस्त्यावरच्या जगण्याची. ही कथा आपल्याला सुन्न करते. आतून हलवून टाकते.मार्क जॉन्सनच्या बापाच्या डाव्या हातावर प्रेम हा शब्द गोंदवलेला होता; पण त्यामुळे मुलांना बसणारा मार कधी थांबला नाही. जॉन्सनच्या घरातील मुलं शाळेत यायची, ती मार खाऊन, अंगावर माराचे वळ घेऊन; परंतु त्यांचं कौटुंबिक जीवन कसं आहे, याचा तपास करण्याचा कुणीच प्रयत्न केला नाही. मार्क त्या फटीमधून खाली घसरला आणि कित्येक वर्षं त्याची अधोगती होत राहिली. ज्या घरात हिंसा आहे, काही दुष्ट गुपितं आहेत, अशा ठिकाणी तो वाढला. लहान वयातच त्याला वाईट सवयी लागल्या. शाळेत त्याचं बस्तान बसलंच नाही. सहा वर्षांचा असताना तो चो-या करू लागला आणि आठव्या वर्षी तो दारू पिऊ लागला. अकराव्या वर्षी त्यानं हेरॉईनची चव चाखली. एक भावनाशील बुद्धिमान मुलगा, पण त्याला योग्य वळण लागलं नाही. जरी आर्ट्स कॉलेज त्याला खुणावत होतं, तरी तो त्या ऐवजी पोर्टलँडच्या तुरुंगात गेला. त्याच्या सरळपणामुळे मादक द्रव्यांचं सेवन आणि गुन्हे यांच्या गर्तेत मार्कची कशी अवनती झाली, याचं अत्यंत प्रामाणिकपणे लिखाण वेस्टेडमध्ये झालं आहे. हेरॉईन आणि क्रॅकचं सेवन, लंडनच्या रस्त्यावर बेघर राहणं, त्याला ठार मारण्यासाठी दिलं जाणारं बक्षीस, या अशा परिस्थितीत कुणीही- स्वत: मार्कही आपण जिवंत राहू, अशी आशा करत नव्हता. बरं होणं तर दूरच राहिलं, पण एवढं असून यातून बाहेर पडण्याची शक्ती त्याला मिळाली आणि आता तो आपला ‘झाडांची शल्यचिकित्सा’ हा व्यवसाय जोमात चालवत आहे आणि इतर अशा जंकीजना नोकरीला ठेवून या मादक द्रव्य सेवनातून बाहेर पडण्यासाठी मदत करत आहे. त्याची ही कथा तशी बरीच धक्कादायक, पण स्फूर्तिदायक आहे. स्वत:ला वाचवण्यासाठी आणि याबरोबर त्याच्यासारख्या इतरांना वाचविण्यासाठी एका माणसानं केलेल्या प्रयत्नांची ही हृदयद्रावक आणि वाचावीशी वाटणारी कथा.एकदा व्यसनमुक्त झाल्यानंतरचा मार्कचा प्रवासही तेवढाच भव्य आहे. मुळात तो झाडांचा शल्यचिकित्सक आहे. व्यसनांच्या आवरणाखाली त्याचं हे अंग झाकलं गेलं आहे. ते आवरण दूर होताच तो मोकळा होतो. पुन्हा एकदा डाव मांडतो. आत्मविश्वासानं व्यवसायात उतरतो आणि चक्क यशस्वी होतो.नव्या वाटेवर चालतानाही तो जुने दिवस विसरत नाही, हे विशेष! तो आपल्यासारख्या पूर्वायुष्यातील गुन्हेगार आणि व्यसनी मंडळींना नोकरी देतो. त्यांनाही पुन्हा उभं करतो. मार्क जॉन्सन आज एक यशस्वी व्यावसयिक आहेत. ते आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर गुन्हेगारी न्याय व्यवस्थेचे सल्लागार म्हणून काम पाहतात. गुन्हेगार आणि व्यसनी तरुणांच्या प्रश्नांना वाचा फोडून त्यांचं पुर्नवसन करण्याचं कामही ते करत आहेत. मार्कची ही कहाणी आणि त्याची गगनभरारी मराठीत अगदी उत्तम रीतीनं पोचवली आहे स्नेहल जोशी यांनी. मार्क यांनी त्यांना ही गोष्ट सांगितली आणि त्यांनी ती लिहिली,असं सातत्यानं वाटत राहतं, हेच त्यांचं यश आहे. हे उत्तम पुस्तक उत्तम रीतीनं मराठी वाचकांपर्यंत पोचविण्याचे काम केल्याबद्दल मेहता पब्लिशिंग हाऊसचे आभारच मानायला हवेत. जाता जाता एकच. पुस्तकाची अर्पणपत्रिका आणि त्यातील विचार खूप महत्त्वाचा आहे. मार्क म्हणतो, ‘हे पुस्तक जीवनात हरवलेल्या माणसांना अर्पण. जर माणसं बदलली, तर जग बदलेल.’खरंच असंच व्हावं, हीच मनापासून इच्छा!

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2025
पृष्ठसंख्या
340
भाषा
मराठी
किंमत
560.00
ISBN
9788184980196
समुदायाने जोडले
बंद