माझे शेल्फ
व्हायरस
विद्यापीठीय भ्रष्टाचाराचा पंचनामा… आजकाल शिक्षण क्षेत्रातदेखील राजकीय हस्तक्षेप, जातीय प्रवृत्त्ती आणि भ्रष्टाचार यांनी हौदोस मांडला आहे. ज्ञानदानासारख्या पवित्र आणि उदात्त क्षेत्रातील विद्यापीठांना अनाचाराचा जंतुसंसर्ग झाला असून या तिरस्करणीय परिस्ितीमुळे विद्वान, प्रामाणिक आणि स्वार्थत्यागी व्यक्तींचा बळी जात आहे. या विचित्र सत्यचित्राचे प्रातिनिधिक रूप म्हणजे प्रस्तुत व्हायरस ही कादंबरी होय. ग्रंथ हे ज्ञानाचे प्रतीक. या ग्रंथांना धर्म, जात, राजकारण, भ्रष्टाचार, कलह यांची कीड लागणे म्हणजे सुसंस्कृत, सज्जनांना छळणे होय, पण विद्यमान समाजयंत्रणा तशीच असून तिचा भेद करणे किती दुरापस्त असू शकते हे कादंबरीकाराने मांडले आहे. ‘कॉम्प्युटरमध्ये एखाद दुसरा प्रोग्रॅमच काय, पण संपूर्ण सिस्टिमच करप्ट व्हायरस असतो तसा हा एक व्हायरस. हा व्हायरस बाहेरून आलेला नाही. या व्यवस्थेच्या पोटातच तो आहे. किंबहुना त्यावरच ही सगळी सिस्टिम उभी आहे. मग ती कशी चांगली निपजणार तुम्ही कितीही नवे प्रोग्रॅम तयार करा... तुमच्या नकळत तो आत शिरतोच आणि सगळी सिस्टिम कॅश करून टाकतो.’ हे कादंबरीतील एका प्रधानपात्राचे निवेदन असून त्याद्वारे कादंबरीचा आशयपट कोणत्या स्वरूपाचा आहे हे ध्वनित होते. प्रस्तावनेत कादंबरीकाराने ‘सारभूत’ विधान केले आहे. ते असे असत्यच सत्याचं रूप घेऊन वावरतंय. सत्यावरच कुरघोडी करतंय. सत्य अशा बिकट परिस्थितीत सापडलंय की त्याला समोर येणं अशक्य होऊन बसलंय. सत्यवादी वेडा ठरतोय... ठरवला जातोय... यासंदर्भात स्वतंत्रपणे भाष्य करण्याची मुळीच गरज नाही. कारण तो एक बोलका ढलपा ठरावा. कादंबरीतील घटना, प्रसंग, व्यक्तिरेखा इत्यादी सर्व काही काल्पनिक... असे स्पष्टीकरण ठळक अक्षरात मुद्दामहून केले असले तरी वाचकांना मात्र हे सर्वकाही चांगलेच परिचयाचे वाटते यातच कादंबरीचे यश सामावले आहे. जातीय पातळीवरून राजकारण करून, दलित विद्यार्थी संघटनांना भडकावून आंदोलने करणे अशा घटनांची नोंदसुद्धा सविस्तरपणे केली गेली आहे. विद्यापीठ स्तवनाचे गीत, बहुजन संघटना नेत्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे भांडवल करून घरबांधणीत केलेला भ्रष्टाचार अशा प्रसंगांचा आलेख शैक्षणिक क्षेत्राची झाडाझडती घेताना दिसून येतो. ज्ञानदानापेक्षा गटबाजी, हेवेदावे, भ्रष्टाचार यामध्येच गुरफटलेले विद्वान प्राध्यापक, विद्यार्थी नेते, मंत्री यांच्यामुळे शिक्षण क्षेत्र कसे व किती पोखरले आहे याची कल्पनाच करवत नाही. हा ‘व्हायरस’ खूप हैदोस घालून सारी यंत्रणच बिघडवून टाकतो. किंबहुना तो यंत्रणेचाच एक अटळ भाग बनून सर्वांना हतबल करू शकतो हे दारूण सत्य कथन करणारी ही कादंबरी शैक्षणिक वर्तमानावर कोरडे ओढून अंतर्मुख करते. ही कादंबरी अजिबात काल्पनिक न वाटता ती वास्तवात घडणारी वाटते हे कादंबरीकाराचे सुयश म्हणता येईल.