माझे शेल्फ

व्हॉट वेंट राँग अँड व्हाय

इंग्रजी शीर्षक
What Went Wrong And Why
सारांश

डॉ. किरण बेदी एक आगळंवेगळं, कणखर तरीही मृदू व्यक्तिमत्त्व. संवेदनशील, दीनांच्या कैवारी, दीनदुबळ्यांसाठी, पीडित शोषितांसाठी तळमळीने सतत प्रत्यक्ष कार्यरत असणाऱ्या किरण बेदी. हिंदुस्थानच्या पोलीस खात्यातील सर्वोच्च पद भूषविण्यचा मान प्राप्त झालेल्या त्या पहिल्या महिला पोलीस अधिकारी आहेत. मानवतावादी निर्भय दृष्टिकोन, नि:स्वार्थी सेवाभावी वृत्तीतून त्यांनी पोलीस खात्यात व तुरुंगाच्या व्यवस्थापनात असंख्य सुधारणा घडवून आणल्या. त्याबद्दल त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. त्यांनी सामाजिक समस्यांसाठी सेवाभावी संस्थांची स्थापना केली. कित्येकाचे आयुष्य मार्गी लावण्याचं कार्य या संस्थांद्वारे होत असतं. पोलीस खात्यात वरिष्ठ पदावर काम करत असताना गुन्हेगारी जगताशी त्यांच जवळून संबंध आला. त्यांच्याकडे मानवतावादी दृष्टिकोनातून बघून त्यापासून परावृत्त करणे, नव्यानं चांगलं जीवन जगण्याची संधी देणे या उद्देशानं या संस्थाची निर्मिती केली गेली. अशा व्यक्तीच्या अनुभवातून ‘मागच्यास ठेच पुढचा शहाणा’ या हेतूने या व्यक्तींची ही आत्मकथने ‘व्हॉट वेंट राँग’ या पुस्तकात मांडली आहेत. या साऱ्या व्यक्ती प्रत्यक्षातील असून किरण बेदी त्यांना प्रत्यक्ष भेटल्या आहेत. या दुर्दैवी जिवांच्या कहाण्या समाजातील इतरांना सावध करतील, त्यांचं जीवन नरक बनवण्यापासून वाचेल हा स्युत्य हेतू या पुस्तकामागे आहे. पुस्तकातील करुण कहाण्यातील हे दुर्दैवी जीव बहुतांशी गरीब, अज्ञानी, अशिक्षित व समाजातील खालच्या थरातील आहेत. त्यांच्या नरकसदृश अवस्थेची कारणं काही सारखी तर काही भिन्नही आहेत. दारिद्र्य व निरक्षरता हीच प्रामुख्याने यामागची कारणं दिसून येतात. दारिद्र्यामुळे शिक्षणाचा अभाव, त्यामुळे कुटुंबातील मुलांची वाढती संख्या, बेकारी, त्यातून येणारं नैराश्य, व्यसनाधीनता या परिस्थितीमुळे मुलांकडे होणारं दुर्लक्ष, त्यातून मुलांच्या आयुष्याची होणारी ससेहोलपट अशा दुष्टचक्रात हा सामाजिक स्तर गुरफटलेला दिसतो. आणखी एक कारण म्हणजे मुलगी हे ओझं मानण्याची हिंदुस्थानी समाजाची मानसिकता. यातूनच स्त्रीच्या आयुष्याची ससेहोलपट सुरू होते, फरफट होत राहते. अशा कित्येक कहाण्या यात अंतर्भूत आहेत. कमालीच्या दारिद्र्यामुळे, प्रतिकूल परिस्थितीमुळे आलेल्या नैराश्यातून व्यसनाधीनता आणि त्यामुळे कुटुंब देशोधडीला लागणं अशा घटनाही नित्यच घडत असतात. याचं प्रमुख कारण म्हणजे या वर्गाचा कोणीच वाली नसतो.लेखिकेने या वर्गाचं, लोकांचं, त्यांच्या परिस्थितीचं, मानसिकतेचं खूप निरीक्षण केलेलं दिसून येतं. दारू, मादक पदार्थाचं सेवन, पौगंडावस्थेतच यास बळी पडणं, कधी आईवडिलाकडूनच यासाठी केली जाणारी बळजबरी अशा धक्कादायक घटनांची मालिकाच उभी राहते. माणूस पशुवत वर्तन करतो व स्वत:सहित कुटुंबाचाही नाश ओढवून घेतो. या व्यक्तींवर अन्याय होत असतात. यास काही वेळा पोलीसही जबाबदार असतात. याकडेही लेखिका निर्भीडपणे लक्ष वेधते. परंतु अशीही क्वचित काही उदाहरणे आहेत की पोलिसांनी केलेल्या मदतीमुळे काहीचे जीवन विनाशापासून वाचले आहे. दहशतवाद, आतंकवाद, राजकीय स्थिती, पाकिस्तान, बांगलादेश फाळणी अशा घटनांमुळे ही कित्येक कुटुंबे उद्ध्वस्त कशी झाली त्याच्या करुण कहाण्या आहेत. पुस्तकातील प्रत्येक कहाणी पाझर फोडणारी, मानवतेला लांच्छनास्पद आहे. कारण कोणतंही असो, परिस्थितीला बळी जाता स्त्रियां, बालकं, तरुण वर्ग, दुबळे, संवेदनशील मनं हादरून जातील अशी ही सत्यकथनं माणसाला माणूस बनण्याकडे प्रवृत्त करतील असा आशावाद लेखिकेच्या मनात असावा. मानव्याचं निशाण हाती घेऊन समाजातील काही घटक अहोरात्र झटत आहेत. तरीही सामाजिक समस्यांची व्याप्ती व भीषणता पाहता सेवाभावी संस्थांची, व्यक्तींची संख्या कमीच पडत आहे असं वाटतं. या दृष्टीनं ‘व्हॉट वेंट राँग’ या प्रश्नापाठोपाठ असंख्या सामाजिक समस्यांच्या मुळाचा हा शोध म्हणून हे पुस्तक महत्त्वाचा ठेवा तर आहेच पण प्रेरणादायीही आहे हे निश्चित.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी