माझे शेल्फ
व्हर्च्युअल रिअॅलिटी
भयावह वास्तवाचे दर्शन...वेगळ्या पण वाचनीय कथा... विज्ञानकथा नामक एक प्रकारे कथा-वाङ्मयात सध्या रुजू पाहतोय. तो रुजवण्यात ज्यांचा हात आहे वा महत्त्वाचा वाटा आहे त्यात डॉ. बाळ फोंडके हे एक! सायन्स टुडेचे संपादक आणि द इमॉनॉमिक टाइम्स व महाराष्ट्र टाइम्सचे वरिष्ठ संपादक म्हणूनकाम केलेल्या फोंडके यांनी ज्या कथा व्हर्च्युअल रिअॅलिटी संग्रहात समाविष्ट केल्या आहेत, त्यासंबंधी म.टा.चे माजी संपादक कुमार केतकर म्हणतात, डॉ. फोंडके यांचे विविध शास्त्रज्ञांचे ज्ञान आणि आजूबाजूच्या सर्वंकष वास्तवाचे भान यामुळे त्यांच्या या कथांना त्रिमितीच्या पलीकडचे लाभले आहे. संग्रहात एकूण बारा कथा आहेत. या सर्व कथांना जसा सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक बेस आहे तसा तो माहिती तंत्रज्ञान व स्पर्धायुक्त जीवनाचाही आहे. पूर्वी स्पर्धा नव्हती असे नाही. पण् त्या स्पर्धेला जीवघेणी म्हणता येईल इतपत ती (क्रूर) नव्हती. त्यासंबंधी लेखक म्हणतो, गेल्या शतकाच्या उत्तरार्धात जेव्हा जैवतंत्रज्ञान आणि माहिती-तंत्रज्ञान, बायोटेक्नॉलॉजी आणि इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी यांची घोडदौड सुरू झाली तेव्हा तर या तंत्रज्ञानाच्या उत्पादनांनी राहत्या घरांचे उंबरठे ओलांडून माजघरातच नव्हे तर शेजघरातही प्रवेश करायला सुरुवात केली. माणसाच्या व्यक्तिगत आयुष्यात, अगदी त्या जीवनाच्या खासगी मानल्या जाणाऱ्या दालनांमध्येही घुसखोरी आरंभली. त्यापोटी व्यक्तीव्यक्तींची आयुष्यं तर ढवळून निघालीच, पण नीतिमूल्यांची चौकटच विस्कटू लागली. जागतिकीकरणाच्या अनावर ओढीनं तर जीवनकलहाला जीवघेण्या स्पर्धेने परिमाण प्राप्त करून दिलं.