माझे शेल्फ
विश्वसत्ता
काही-काही पुस्तकं वाचून सुन्न-बधिर व्हायला होतं. त्यातील अचाट कथानक-शेवटपर्यंत लीलया खेळवलेली रोमहर्षक रहस्यं, आकर्षक मांडणी, गुंगवून टाकणारी शैली, ‘पुढे काय होईल?’ची वाढवत नेलेली उत्कंठा. सर्व काही, तुमच्यावर असं आणि इतकं कोसळतं, की पुस्तक संपल्यावरदेखी कितीतरी दिसव, दुसरं पुस्तक हातात धरवत नाही. कोणाशी काही बोलू नये, कसली चर्चा करू नये, काहीही वाचू नये... अशी ज्ञानोबांच्या शब्दात सांगायचे तर पुस्तकाशी तादात्म्य पावलेली अशी अवस्था होते. अगदी अशीच अवस्था टॉम मार्टिक लिखित ‘किंगडम’ ही कादंबरी वाचून होते. यातील जागांचे, माणसाचे प्रसंगाचे खरेखुरे संदर्भ वाचून कुठेही ही काल्पनिक कादंबरी असेल, अशी पुसटशीही शंका येत नाही. तिबेट राज्य, त्यातील प्रदेश, पॅगोडा आश्रम, तिथल्या दऱ्या-खोरी, माणसं, लामा, बौद्ध धर्म, स्तूप मठ, निसर्ग, औषध व भविष्य सांगणार ज्ञानग्रंथ, पोथ्या, पुराण, चीन, जर्मनी, अमेरिक-रशिया - भारत हे देश - त्यांचे निबेटी लोकांशी संबंध, आर्य लोकांचे मूळ, देवी-देवता, उपासना, साधना, काळी जादू, जगाच्या मन:शांतीवर साम्राज्य करणारे साधक, विनाश ठरवणारा ज्ञानग्रंथ आणि जगावर नियंत्रण करणारे शांग्री-ला हे अदृश्य राज्य... यांची ही चित्तथरारक कथा आहे. न्यूयॉर्कहून पत्रकार नॅन्सी केलीची अचानक दिल्लीला बदली होते. इंटरनॅशनल हेराल्ड, ट्रिब्युन वार्तापत्रात ती नोकरीला असते. ती ज्याच्या जागेवर कामाला येते तो आन्तोन हरझोग हा हरहुन्नरी, एक अत्यंत बुद्धिमान व चमकदार पत्रकार गेले कित्येक महिने काहीही न सांगता गायब आहे. त्याच्यावर हेरगिरी करत असल्याचा आरोप आहे व त्याने कुठून तरी नॅन्सीच्या नावे एक पुरातन हाडाची तुतारी पाठवल्याचे पार्सल पोलिसांकडे आहे, म्हणून ते नॅन्सीला पहिल्याच दिवशी अटक करतात. नॅन्सी कशीबशी सुटका करवून घेते, ती हाडाची तुतारी ताब्यात घेते व सुरू होतो तो न संपणार शोध व भटकंती. तिला या खडतर प्रवासात कोण कोण कसे-कसे भेटतात, एकापेक्षा एक पुरावे तिला कसे मिळत जातात, ती त्या आन्तोन हरझोगला शोधत निबेटला कशी पोचते व शेवटी वाटेत येणारे हजार अडथळे दूर करत लक्ष्य साध्य करते का? तो तिला जिवंत सोडतो काय? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवायला ही कादंबरी वाचायला हवी. एक अप्रतिम कादंबरी एवढ्या मोजक्या शब्दांत, तिची सर्व गुणवैशिष्ट्ये समावूच शकत नाहीत. यातील निसर्गवर्णन वाचताना, आपण अक्षरश: तिबेटमधील त्या गूढ दऱ्याखोऱ्यातून जंगलातून प्रवास करतोय अशी अनुभूती येते. पहिले महायुद्ध, दलाई लामा, शांग्री-ला, लामा, त्यांची औषधे-गुहा-भाषा अचूक उत्तरे देणार गूढ ज्ञानग्रंथ, ताओ तत्त्वप्रणाली यातील सर्व संदर्भ कथानकात असे काही जोडले आहेत की शेवटपर्यंत ती एक सत्यकथाच वाटत राहते. या कादंबरीचे सर्व काही अफाटच आहे. जितकी उत्तम कादंबरी तितकाच उत्तम तिचा अनुवाद केला आहे उदय भिडे यांनी. शिवाय अफलातून शेवट, एक धक्का तंत्राने, जिथे कथा संपते तिथेच ती एका नव्या रहस्याला जन्म देवून थांबते... परत वाचकांनी पुढे काय झाले असेलची हुरहूर लावून. पुस्तक परिचय
पुस्तक परिचय - तुमची वाचनाची आवड वाढविण्यासाठी येथे चांगल्या दर्जेदार मराठी पुस्तकांचा परिचय करून देण्यात येतो.