माझे शेल्फ
व्याधिमुक्त
व्याधिमुक्त’ पुस्तकाचं शीर्षक वाचलं तेव्हा वाटलं की असाध्य रोगाचा धीरोदत्तपणे सामना करणाऱ्या व्यक्तीच्या अनुभवांवर आधारित असं हे लेखन असेल. या प्रकारची काही पुस्तकं वाचनात आलीही होती, पण जेव्हा वाचायला सुरुवात केली तेव्हा या सत्यकथेचं वेगळेपण लक्षातयेत गेलं. अनेकदा मन भरून आलं, विस्मित, स्तिमित आणि सुन्नही झालं... अतिशय उमदा, देखणा, बुद्धिमान, उत्साही जॉन आणि सुंदर, सुस्वभावी, मुलांची आवड असणारी एलिन... या तरूण निरोगी दांपत्याची तीन मुलं... सुदृढ, निकोप, गोड, खूप चळवळ्या, हुशार जॉन ज्युनियर, मोहक, सुंदर मेगन आणि छोटुसा गोंडस पॅट्रिक हॉवर्ड बिझनेस स्कूलचा पदवीधर असलेला धडाडीचा, कर्तृत्ववान जॉन उत्तम कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत होता. सगळं छान चाललेलं होतं, पण अनपेक्षितपणे एक भयानक वास्तव, आकाशीची कुऱ्हाड कोसळावी तसं त्याच्यासमोर आलं. जॉन आणि एलिन यांच्या धाकट्या दोन मुलांना (मेगन वय साडेनऊ वर्षे आणि पॅट्रिक, वय ६ महिने) कधी न ऐकलेली व्याधी असल्याचं निदान करण्यात आलं. पॉम्पे व्याधी आणि असं सांगण्यात आलं की, या रोगावर कोणताही उपाय उपलब्ध नाही. पॉम्पे व्याधी ही एका जनुकीय दोषामुळे होणारी व्याधी असून, या रुग्णामध्ये विशिष्ट विकराच्या अभावामुळे रुग्णाचे सर्व स्नायू दुर्बल होत जातात. इतके अशक्त की, त्या बालकाला हसणे, बोलणे, श्वास घेणे अशक्य होत जाते. श्वसन यंत्राच्या साहाय्याने श्वसन चालू ठेवावे लागते. दोन-तीन वर्षांत बाळ मृत्युमुखी पडते. हे काळीज पिळवटून टाकणारं निदान ऐकल्यावर त्या दोघांच्या मनाची काय अवस्था झाली असेल याची कल्पना करणं सुद्धा कठीण. या धक्क्यातून हळूहळू मनाला सावरल्यानंतर सुरू होतो, वेगळा, फार विलक्षण असा लढा... आपल्या बाळांना वाचवण्यासाठी जॉन ज्याप्रकारे जीवाचे रान करतो आणि एलिन आपल्या मुलांची सर्वकाळ काळजी घेत असताना ज्याप्रकारे साथ देतो हे सर्व थक्क करणारेच! या व्याधीवर औषध तयार करण्याच्या/शोधून काढण्याच्या संशोधनाला गती देण्यासाठी जॉन आपलं शारीरिक, मानसिक, आर्थिक, बौद्धिक असं सर्व प्रकारचं बळ पणाला लावतो. दुर्दम्य आशावाद, अदम्य अथक प्रवास, दृढ आत्मविश्वास, तीव्र इच्छाशक्ती यांच्या बळावार ते साध्य करतो. संशोधक लिखाण करणाऱ्या वार्ताहर असलेल्या गीता आनंद यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक हे पुस्तक लिहिले आहे. स्वत: केलेले निरिक्षण, या संशोधनाशी संबंधित शेकडो लोकांच्या मुलाखती, विविध नोंदी, वर्तमापत्रे, व्हिडिओज यांचा आधार घेऊन ५ वर्षे परिश्रम घेऊन सर्व तपशील व बारकावे समोर आणत हे प्रेरणादायी पुस्तक साकारले आहे. डॉ. सुभाष दांडेकर यांनी उत्तम अनुवाद केला आहे. आणि मेहता पब्लिशिंग हाऊसने ही सत्यकथा प्रसिद्ध केली आहे.