माझे शेल्फ
यलाई
‘यलाई’ ही कादंबरी खुद्द महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य ‘पुष्पराज गावंडे’ यांनी लिहली आहे. आणि त्यातही प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस यांची अत्यंत कलात्मक शब्दातील प्रस्तावना या कादंबरीस लाभली आहे. त्यांनीच म्हटल्याप्रमाणे, “व्यक्तीच्या सुप्त मनातील गुंता शब्दांच्या चिमटीत अभिव्यक्त करणे ही साधी बाब नव्हेच ! पण पुष्पराज गावंडे यांनी कादंबरीचा नायक दत्तात्रयच्या मनातील तळ जाणिवा, नेणिवेचे संदर्भ शोधून कादंबरीभर अभिव्यक्त केल्यात.”
नातेसंबंधांमधील गुंतागुंत, त्यातून निर्माण होत जाणारे प्रश्न, जीवनातील इतर अनेक अनुभव, आणि संस्कृतीच्या हजारो वर्षाच्या संचितानंतर आणि वैज्ञानिक शोध प्रक्रियेतून जन्मलेल्या आधुनिक युगाच्या उदयानंतरही मानव हा त्याच्याजवळ असलेल्या सुखाच्या शाश्वतीचे आश्वासन देऊ शकतो का ? अशा व्यापक आणि वास्तव जाणिवेपर्यंत ही कादंबरी वाचकाला आणून सोडते. सरते शेवटी वाचकाला मंत्रमुग्ध करून, विचार करण्यास भाग पडणारी ही कादंबरी वाचकांनी नक्की अनुभवावी, ही विनंती !