आमची पुस्तक भिशी

माया ज्ञानेश

मजकूर

मित्रमंडळींच्या घोळक्यात एक दिवस असे लक्षात आले की खूप जण पुस्तकावर प्रेम करणारे आहेत. वाचतात. जमेल तशी पुस्तक खरेदी करतात. खूप जणांना स्वतःची पुस्तकं असावी असे वाटते. पण पुस्तकांच्या दुकानात गेल्यावर एकदम खूप सारी पुस्तकं खरेदी करायला मध्यमवर्गीय खिसा नको म्हणायचा. वाचनाची ओढ तर स्वस्थ बसू देत नाही. घरात हवे ते पुस्तक हवे तेव्हा हाताशी असणे हे सूख पण वेगळेच ! मग एका सुपिक डोक्यातून एक कल्पना उगवली पुस्तक भिशी.

मराठवाड्यात , पुण्यातही असे गट चालतात असे ऐकून माहीत होते. सुवर्ण भिशी, साड्यांची , भांड्यांची सुद्धा भिशी असते हे पण माहीत होते. आम्ही पुस्तक भिशी सुरू केली.

सुरुवातीला केवळ ६ लोक एकत्र आलो. प्रत्येकी १०० रु. जमा करायचे. मग नावांच्या चिठ्ठ्या करायच्या. एक चिठ्ठी उचलायची. त्यात ज्याचे नाव निघेल त्याने सगळ्या पैशांची फक्त पुस्तकं घ्यायची. स्वतःला हवी ती ! पुस्तकांची मालकी त्याची असली तरी प्रत्येक सदस्याला ती वाचायला मिळावी.
अट एकच, ही पुस्तकं कुठल्याही अभ्यासक्रमाची नकोत. ( कारण ती आपोआप गरज म्हणून घेतली जातात. )

हळूहळू इतर मित्रांनाही यात रस वाटू लागला. भिशीची संख्या वाढली. जमा होणारे पैसे वाढले. एकदम दीड दोन हजारांची पुस्तकं घेणं शक्य होऊ लागलं. प्रत्येकाच्या संग्रहातली पुस्तकं वाढली. आनंद वाढला. कित्येक दिवस मनाच्या कोपर्‍यात ढकललेल्या पुस्तकांच्या याद्या बाहेर आल्या.

वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारा, वेगवेगळ्या आवडीनिवडी असणारा असा हा गट. त्यामुळे प्रत्येकाच्या आवडीची पुस्तकं जमा होऊ लागली. मग ठरवलं की प्रत्येक वेळी ज्याने पुस्तकं घेतली त्याने किमान एक तरी पुस्तकाचा परिचय करून द्यायचा. त्याचा सर्वांना अजून फायदा झाला. साहित्यातले आपल्याला आवडतात त्यापेक्षा वेगळे प्रकार वाचून बघण्याची मनाची तयारी झाली. वाचनानुभव समृद्ध व्हायला लागला. पुस्तकं अधिक डोळसपणे वाचली जावू लागली. जवळचा पुस्तकसंग्रह अधिक रंगीबेरंगी व्हायला लागला. काही दिवसांनी 'संग्रहात पाहिजेच' अशा स्वतःच्या पुस्तकांची यादी संपली. अगदी नवी, माहीत नसलेली पुस्तके घेण्याचा, प्रयोग म्हणून अगदीच नव्या लेखकाचे पुस्तक घेण्याचा धीर होऊ लागला. अर्थात सगळीकडची पुस्तक परीक्षणं नजरेखाली घालून खरेदी होऊ लागली.

या कार्यक्रमाने अजून एक अमूल्य आनंद दिला. यानिमित्ताने महिन्यातून एकदा सगळे एकत्र भेटू लागलो. रोजच्या कामापेक्षा वेगळ्या विषयांवर बोलू लागलो. चेष्टा मस्करीत विचारांची, बातम्यांची देवाण घेवाण होऊ लागली. सणावाराला एक संदेश किंवा मेल पाठवतानाच आठवण व्हायची.. ते लोक आता प्रत्यक्ष संवादू लागले. अडचणींवर उपाय - मदत हे ओघाने आले. आणि अजून एक म्हणजे एकत्र खादाडी !!!! :D

खरंच खूप भरभरून दिलं आम्हाला या पुस्तक भिशी ने ! या महिन्यात आम्ही हा उपक्रम सुरू करून चक्क ५ वर्षे झालीत. पण अजूनही त्यातला ताजेपणा तसाच आहे. भरभरून मिळणारा आनंद वाढतोच आहे...

तुम्ही पण सुरु करा ना असा मासिक आनंदोत्सव... :)

( मीमराठीवर काही दिवसांपूर्वी प्रकाशित केलेला हा लेख पुस्तकांच्या हक्काच्या संस्थळावर आज देत आहे )

अभिप्राय

वेदश्री

वेदश्री · Tue, 29 Jun 2010 - 06:19

धासू कल्पना आहे अगदी! एकदम आवड्या!! पुस्तकांच्या भिशीसाठी पुण्यात कोणी आहे का? मला आणि आईला आवडेल अशा भिशीत भाग घ्यायला. तसेही दर महिन्याला ठराविक रकमेची पुस्तके मी घेतच असते. त्यात अजून एखादवेळी अशी ही भिशीची भरघोस रक्कम हाती आली तर सुभानल्लाह! नवे दोस्त मिळतील, वाचलेल्या पुस्तकांबद्दलच्या तोंडी परीचयाची देवाणघेवाण देखील करता येईल. अशी भिशी पैसे ऑनलाईन एकमेकांच्या बँकखात्यात पैसे जमा करूनही करता येईल का याचा विचार करतेय. याबद्दलही कळू देत काय ती मतं..

ऋषिकेश

ऋषिकेश · Tue, 29 Jun 2010 - 06:59

:) आयडीयाची कल्पना मस्त आहे.
मुंबई-पुण्यातील मंडळींना मिळून अशी भिशी काढता यावी. सहभागी होईनच

मस्त कलंदर

मस्त कलंदर · Tue, 29 Jun 2010 - 14:38 · उत्तर

ही कल्पना अंमलात येईल तेव्हा येईल.. आधी आपल्या देवघेव ग्रंथालयाचं पाहूयात ऋ राव..

बाकी, मला पण ही आयडिया आवडली..

यशोधरा

यशोधरा · Tue, 29 Jun 2010 - 07:28

सह्ही आहे ही पुस्तक भिशी!

३_१४ अदिती

३_१४ अदिती · Tue, 29 Jun 2010 - 09:22

मस्त कल्पना आहे.

निखिल देशपांडे

निखिल देशपांडे · Tue, 29 Jun 2010 - 09:58

कल्पना चांगली आहे आणि नक्कीच आमलात आणण्यासारखी आहे :-)

वेदश्री

वेदश्री · Wed, 30 Jun 2010 - 11:48

नुसतं कल्पना चांगली आहे म्हणून गप्प काय बसताय सगळे? महिनाखेर येऊन ठेपलीये.. थोड्यावेळात पगार होईल.. नव्या खरेदीचे वेध लागलेत.. आणि अजून काही भरीव प्लॅन नाही या भिशीचा.. :(

मलातर कधीची स्वप्नंदेखील पडायला लागलीयत की पहिली पुस्तक भिशी मलाच मिळाली म्हणून! ;-)

कैवल्य

कैवल्य · Wed, 30 Jun 2010 - 16:57

माया,
छान कल्पना दिलीत.
चला रे, पुण्यात कोण कोण आहात? कोण कोण तयार आहात? 'उद्या एक तारीख आहे, उद्या एक तारीख आहे!' :D
बोला, कुठे भेटायचं, किती पैसे काढायचे..चला आता रेंगाळु नका. चटचट निर्णय घ्या. हवं तर माझ्या घरी जमुया.

वेदश्री

वेदश्री · गुरुवार, 1 Jul 2010 - 07:12 · उत्तर

मी आहे पुण्यात. १०० पासून ते १००० रुपयापर्यंत कितीचीही ठेवलीत पुस्तक भिशी तरी मला चालेल. भेटायला एखादा विकेंड बरा राहिल..

माया ज्ञानेश

माया ज्ञानेश · Wed, 30 Jun 2010 - 21:46

अजुन एक पुस्तकभिशी !!!!
मस्त झाले.. मी आले भारतात की येतेच तुमच्यात :)

आनंदयात्री

आनंदयात्री · गुरुवार, 1 Jul 2010 - 20:54

कल्पना छान आहे.
मलाही सहभागी व्हायला आवडेल.
सध्या इतर कामातल्या व्यग्रतेमुळे या पुस्तकभिशी प्रकल्पाच्या व्यवस्थापनात इच्छा असुनही वेळ घालु शकणार नाही.
कुणी स्वयंसेवेसाठी या साठी तयार असल्यास त्याने पुढाकार घेउन व्यवस्थापन करावे.
साधारण खालील गोष्टींची गरज पडेल
१. प्रकल्पात सहभागी होणार्‍या सदस्यांची यादी बनविणे
२. भिशीची किंमत ठरवणे
३. तारिख ठरवणे
४, भेटीची वेळ, जागा, खर्च याचे योग्य ते व्यवस्थापन करणे

प्रकल्प पुढे सुरु झाल्यास, त्याच्या ट्रॅकिंगसाठी लागणार्‍या सॉफ्टवेअरची (म्हणजे पुविवरच) जबाबदारी मी घेउ शकेन असे वाटते.

टण्या

टण्या · Tue, 6 Jul 2010 - 14:35

माझी आई व तिच्या मैत्रिणी मिरजेत अशी पुस्तकभिशी गेली ६-७ वर्षे चालवत आहेत.. मस्त उपक्रम आहे हा.. वरील लेखात म्हटल्याप्रमाणे सर्वात चांगली गोष्ट म्हणजे विविध लेखकांची, विषयांवरची पुस्तके आणली जातात.. आपण वैयक्तिक पुस्तके घेतो त्यावर आपल्या आवडीचा ठसा राहतोच..

सतिश देवकरे

सतिश देवकरे · Tue, 13 Jul 2010 - 07:40

आपल्याला तर आपली कल्पना आवडली बुवा!
पण मि खेडेगावात राहणारा आहे. खेडेगा॑वतील लोका॑ना वाचनाची आवड व्हावी म्हणुन मि आमच्या गा॑वात वाचनालय सुरु केले आहे. पण मला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. सव्र तरुन तर फक्त रुपया॑च्या मागे लागले आहेत. काहि उपाय सुचवाल ? (मीही एक तरुणच आहे.)नंतर सविस्तर लिहिनच.आता वे़ळ कमी आहे.

वेदश्री

वेदश्री · गुरुवार, 15 Jul 2010 - 06:20 · उत्तर

>खेडेगा॑वतील लोका॑ना वाचनाची आवड व्हावी म्हणुन मि आमच्या गा॑वात वाचनालय सुरु केले आहे.

खूप कौतुक वाटते तुमचे तुमच्या या प्रयत्नाबद्दल. अभिनंदन!

>पण मला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. सव्र तरुन तर फक्त रुपया॑च्या मागे लागले आहेत. काहि उपाय सुचवाल ?

मला वाटते तुम्ही तुमचा हा प्रश्न जर एक चर्चा म्हणून वेगळ्याने टाकलात तर तुम्हाला जास्त प्रतिसाद मिळू शकेल. असो. माझ्यामते वाचनाची गोडी डायरेक्ट तारूण्यात लागण्याचे प्रमाण अगदीच कमी असावे. वाचनाची आवड ही लहानपणापासूनच असावी/निर्माण करावी लागते असे माझे आतापर्यंतचे निरिक्षण आहे. त्यामुळे तुम्ही तरूणवर्गाला लक्ष्य करण्यापेक्षा आधी बालवर्गाला प्राधान्य दिलेत तर जास्त श्रेयस्कर होईल, असे वाटते. तरूण वर्गाला आकर्षित करण्यासाठी त्यांच्या व्यवसायाची अथवा छंदांची माहिती असल्यास त्यावरील पुस्तकांवर भर द्यावा लागेल. हे दोन्ही वर्ग सोडून वयस्कर लोकांमध्ये वाचनालयात जाणे रुजवायचे असल्यास धार्मिक, अध्यात्मिक पुस्तके असल्यास ते होऊ शकेल बहुदा. यावरील इतरांचीही मते जाणून घ्यायला आवडेल.

चर्चा प्रकार