- Log in to post comments
मजकूर
अनुवादित पुस्तकांबद्दल चर्चा करण्यासाठी हा धागा सुरू करीत आहे.
आज आपण कोणत्याही पुस्तकाच्या दुकानात जा अनुवादित पुस्तकांची नवनवीन शीर्षके दिसतील. जे इंग्रजीत बेस्ट सेलर आहे त्याचे हमखास मराठी भाषांतर तुम्हाला मिळेलच. या अनुवादित पुस्तकाबद्दल मत तुमचे काय ? तुम्हाला मूळ पुस्तक वाचायला आवडते का अनुवादित ? अनुवादित पुस्तक आणी मूळ पुस्तक वाचलेले असल्यात अनुवादित पुस्तक रसभंग करणारे वाटले का ? तुमचा आवडता अनुवादक कोणता ? सर्वसाधारण पुस्तकांचे अनुवाद अभिरुचिसंपन्न असतात का ? इंग्रजी सोडून इतर भाषेच्या पुस्तकांचे मराठीत सहसा अनुवाद होत नाहीत, असे का ? कृपया आपले विचार मांडा.
चर्चा प्रकार
अभिप्राय
माया ज्ञानेश
माया ज्ञानेश · Sun, 9 May 2010 - 00:35
आनंदयात्रीजी,
छान विषय सुरु केल्याबद्दल धन्यवाद.
मला अनुवाद, स्वैर अनुवाद, भावानुवाद, अनुसर्जक रुपबंध या सगळ्या प्रकारात येणारी पुस्तके वाचायला आवडतात. इतर भाषांमधले उत्कृष्ट साहित्य केवळ ती भाषा येत नाही म्हणून वाचायची संधी घालवावी वाटत नाही. कन्नड, तमिळ, बंगाली, गुजराती, फ्रेन्च, रशियन, जर्मन, जपानी या आणि अशा असंख्य भाषांमधले साहित्य मला मराठीत जेव्हा सापडते तेव्हा खजिना सापडल्याचा आनंद होतो. त्या त्या भाषेचा नैसर्गिक गंध अनुभवणे, एका जन्मात, केवळ अशक्य आहे. ती भूक काही अंशी अनुवाद वाचताना भागते.
National Book Trust सारख्या संस्थेने असेच अनुवादांचे प्रचंड मोठे भांडार उघडे केले आहे. अनेक भारतीय आणि परकीय भाषांमधील निवडक उत्कृष्ट साहित्याचा अनुवाद अनेक भारतीय भाषांमध्ये करण्याचे महत्वाचे काम ही संस्था करते. अनेकदा अनुवादकाचे नाव त्या पुस्तकावर छापलेलेही नसते पण अनुवादाची सकसता समाधान देऊन जाते. अनेक भाषांमधल्या ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या साहित्यकृतींपासून दुर्मिळ अशा लोककथांपर्यंत अनुवादांचे संकलन मराठीत वाचायला मिळते ही किती मोठी गोष्ट आहे! शिवराम कारंथ, एस एल भैरप्पा, धृव भट्ट, मैत्रेयी देवी, अनंत मूर्ती, अमृता प्रीतम अशा रथी महारथींचा परिचय मराठीतून होणे हे भाग्यच. तो करून देण्याचे काम उमा कुळकर्णी, अंजली नरवणे, लीना सोहनी, मृणालिनी गडकरी असे लोक परिश्रमपूर्वक करताना दिसतात. ओघवत्या, रसाळ भाषाशैलीत त्या भाषेचा भूमीचा परिचय, तेथील लोकमानस, संस्कृती, लोकांच्या जाणीवा, श्रद्धा समजूती या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत सरलतेने पोहोचविणाऱ्या या लोकांबद्दल खरोखर आदर वाटतो.
काही वेळेला संस्कृत, हिंदी, इंग्रजी सारख्या भाषा येत असतानाही आळसामुळे अनुवाद वाचण्याला प्राधान्य दिले जाते. एकतर दुसरी भाषा वाचण्याची आकलनाची गती मातृभाषेपेक्षा कमी असते. त्यामुळे कमी वेळात जास्त साहित्य वाचण्यासाठी अनुवाद वाचले जातात. कधीकधी मुळ पुस्तकांपेक्षा अनुवादच सहजपणे उपलब्ध होतात. गाजलेलं पुस्तक वाचायची ईच्छा तर असते पण मराठी वाचनाची comfort level सोडायची नसते. पुस्तक वाचाण्यामागचा हेतूही अशावेळी मनोरंजन हाच असतो. त्यामुळे अनुवाद वाचणे हा सोपा पर्याय वाटतो. जेव्हा एखाद्या भाषेचा अभ्यास म्हणून पुस्तक वाचायचे असते, तेव्हा आपोआप मूळ पुस्तक शोधले जाते. तेव्हा भाषेची शैली, लय, शब्दकळा, अविष्कार या गोष्टींचा अभ्यास करायचा असतो. याच गोष्टी सहजवाचन करताना दुय्यम होतात.
वाचक म्हणून आपण विकासाच्या कोणत्या टप्यावर आहोत हा ही मुद्दा विचारात घेण्यासारखा आहे. "सेल्फ हेल्प"साठीची अनुवादित पुस्तके वाचणारा वाचक, अभिजात ग्रंथांचा अनुवाद वाचणाऱ्या वाचकाएवढा खोल पाण्यात शिरलेला नसतो. रहस्यकथा, गुप्तहेरकथा वाचायला आवडण्याचा एक टप्पा असतो. तेव्हा अनुवाद हा सोपा पर्याय आवडतो. हळूहळू वाचनातून अधिक काहीतरी मिळविण्याची भूक वाढते. विशिष्ट अभिरूची तयार होते आणि वाचनाचे प्रकारही बदलतात.
आता माझ्या आवडीविषयी:
मला स्वैर अनुवाद वाचायला जास्त आवडतात. त्यांची भाषा व्याकरण शब्दार्थ यांच्या गणितातून थोडी मोकळी होऊन भावार्थाकडे वळलेली असते. मूळ लेखकाला जे संगायचे आहे ते भावानुवादातून वाचकापर्यंत पोहोचवणं सोपही जात असावं. शांता शेळकेंनी अनुवाद केलेलं 'चौघीजणी', राम पटवर्धन यांचे 'पाडस', पु. लं. चे 'एका कोळीयाने', चेतना सरदेशमुखांचे 'तोत्तोचान', मंगला निगुडकरांचे 'चीपर बाय डझन', 'डायरी ऑफ अन फ्रांक', लेनीन, हिटलर यांची चरित्रे... हे सगळे वाचताना आपण अनुवाद वाचत आहोत असे कुठेच वाटत नाही. कधीकधी मूळ भाषेतील पुस्तक वाचतानाही मराठी अनुवाद सरस वाटतात!
उत्कृष्ट अनुवादाचे निकष प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकतात. उत्तम साहित्यकृतीच्या निकषावर उतरलेले कोणतेही पुस्तक असो, ते मूळ भाषेत वाचा किंवा अनुवाद, तो अनुभव तुम्हाला प्रगल्भ करणारा असतो हे नक्की.
आनंदयात्री
आनंदयात्री · Sun, 9 May 2010 - 05:34 · उत्तर
आपले विवेचन फ़ार उत्कृष्ट आहे माया. धन्यवाद.
National Book Trust या संस्थेची माहिती करुन दिल्याबद्दल आभार, त्यांची अनुवादित पुस्तके कुठे उपलब्ध असतात ?
त्यांचे एखादे संकेतस्थळ आहे का ? एस एल भैरप्पा,शिवराम कारंथ यांची नावे मोठ्ठे लेखक म्हणुन नेहमी घेतली जातात, त्यांचे कोणते साहित्य मराठीत उपलब्ध आहे ?
इंग्रजी सोडुनही इतर अनेक भाषांमधले साहित्य मराठीत अजुनही सातत्याने येते हे वाचुन आनंद झाला. या वाचनयात्रेसाठी तुमचे मार्गदर्शन हवेच आहे.
पुन्हा एकदा धन्यवाद.
माया ज्ञानेश
माया ज्ञानेश · Sun, 9 May 2010 - 14:01 · उत्तर
ही संस्था आपल्या मनुष्यबळ विकास मंत्रालया कडून चालविली जाते. त्याची www.nbtindia.org.in ही साखळी. अनुवादित प्रकाशनासाठी त्यांची ' आदान प्रदान ' ही योजना आहे.
आपल्याकडे होणा-या प्रत्येक ग्रंथ प्रदर्शनात नॅशनल बुक ट्र्स्ट ची पुस्तके असतात.याशिवाय त्यांचे एका मोठ्ठ्या गाडीत फिरते पुस्तक विक्री दुकानही असते. या पुस्तकांची किंमतही अविश्वसनीय वाटावी एवढी कमी असते !
कोणत्याही पुस्तकांच्या मोठ्या दुकानात तुम्हाला ही पुस्तके मिळतील. माझ्याकडे अशीच जमा केलेली भरपूर पुस्तके आहेत.पण ती भारतात घरी...! वरील लेखन केवळ स्मरणशक्तीवर झालंय. त्यात नेमकी नावं,प्रकाशक वगेरे आठवले नाहीत :(
आत्ता काही नावं आठवतायत ती देते-
भैरप्पांची उमा कुळकर्णी यांनी अनुवादित केलेली बरीच पुस्तके आहेत. त्यपैकी ' सार्थ' , 'पर्व',' वंशव्रुक्ष', ही गाजलेली पुस्तके.
मूळ जपानी भाषेतील आणि जगभरातील भाषांमध्ये अनुवाद झालेले "तोत्तोचान" हे नितांत सुंदर पुस्तक चेतना सरदेशमुख यांनी अनुवादित केलंय..
मस्त कलंदर च्या यादीत पण पुस्तकांची नावे आली आहेत..
मस्त कलंदर
मस्त कलंदर · Sun, 9 May 2010 - 11:58
माया ज्ञानेशशी सहमत...
अनेकदा इंग्रजीत वाचायचा कंटाळा म्हणून.. कधी कधी त्या भाषा येत नाहीत म्हणूनही मी अनुवादित साहित्याला प्राधान्य देते.. अनुवाद म्हणजे फक्त भाषांतर असा अनुभव सहसा मला आला नाही.. अपवाद, शोभा डेंचं एक पुस्तक.. त्याचे नांवही आता आठवत नाही.. मूळ पुस्तकातच इतकं घाण इंग्रजी होतं की अनुवाद तर त्यापलिकडे!!! तेव्हापासून मी त्यांच्या मूळ कलाकृती(!) नि त्यांची अपरूपे यांच्या वाटेस जात नाही..
पण बहुतांशी अनुवाद मूळ पुस्तकाइतकेच चांगले असतात हा अनुभव आहे.
आता मुद्दा इंग्रजी सोडून इतर भाषांचा.. मी बरेचसे हिंदी अनुवादित साहित्य वाचलेय.. त्यात मायाने सांगितलेल्या लेखक्/लेखिकांची नांवे येतातच... रशियन पुस्तकांचेही भाषांतर होते.. मी वाचलेली पहिली कादंबरी होती, मॅक्झिम गॉर्की यांची 'आई'. इयत्ता तिसरीत होते तेव्हा. त्यानंतर बाबा एकदा मुंबईला आले तेव्हा त्यांनी मूळ रशियन पण मराठीत अनुवादित दोन पुस्तके आणली होती.. "शेकोटीपासून अणुभट्टीपर्यंत" आणि "लोकांनी पृथ्वीचा आकार कसा शोधला". यातल्या दुसर्या पुस्तकाच्या लेखकाचे नांव होते- अलेक्सेय क्रिलोव. नि पुस्तक पाठवणारा पत्ताही अजून माझ्या लक्षात आहे.. १७, झुबोवास्की बुलवार, मॉस्को. ती पुस्तकं नंतर कुणीतरी ढापली.. पण अत्यंत सोप्या भाषेतून विज्ञान मी त्या पुस्तकामार्फत शिकले होते.. आणखी एक आठवणीतले रशियन पुस्तक होते- "सुंदर वासिलिस्का" हे बर्याच लोकांनी वाचलेले दिसते..बरीस पेलेवोय या रशियन लेखकाचे एक खूप लक्षात राहण्यासारखे नि अत्यंत आशावादी पुस्तक होते "एका अस्सल माणसाची कहाणी". ही सत्यकथेवर आधारित कादंबरी होती. गॉर्कींच्या आईसारखीच.. त्याबद्दल लिहिन इथे कधीतरी..
साहित्य अकादमी विजेत्या इतर भाषांतल्या पुस्तकांचे अनुवादही उपलब्ध असतात.. आता लेखकाचे नांव नाही आठवत, पण बहुधा भैरप्पांचं असावे ते-"दाटू" अर्थात "ओलांडून जा/सीमोल्लंघन". हे ही चांगले पुस्तक होते..
मनिष
मनिष · Sun, 9 May 2010 - 18:47 · उत्तर
माया ज्ञानेश ह्यांच्याशी सहमत - मराठीशिवाय इतरही भारतीय भाषात खूप सुंदर पुस्तके आहेत. तोत्तोचान ला माझेही ++१!!
इंग्लिश पुस्तके मात्र मला मुळातुन वाचायलाच आवडतात किंबहुना ती भाषा येत असल्यास कुठलेही पुस्तक त्या-त्या मूळ भाषेतूनच वाचलेले चांगले असे मला वाटते. लेखकाचे थेट म्हणणे "फ्रॉम द हॉर्सेस माउथ" असे समजवून घेता येते. अर्थातच ते नेहमीच /बर्याच्वेळा शक्य नसते, तेंव्हा अनुवादाने निदान वेगवेगळे लेखक वाचता येतात, त्याची संस्कृती, जीवनपध्दती समजून घेता येते.
सहजच आठवणारा अनुवाद म्हणजे शांता शेळकेंचे "चौघीजणी" - हे मूळ पुस्तक मी कधी वाहलेच नाही, पण आईने लायब्ररीतून आणलेले हे पुस्तक/अनुवाद वाचला आणी खरच प्रेमातच पडलो. शतशः प्रणाम शांता शेळकेंच्या प्रतिभेला.
पुलंचे "एका कोळियाने" वाचले आणि अर्नेस्ट हेमिंग्वेचे "ओल्ड मॅन अँड द सी" सुध्दा...अनुवाद खूप आवडला नाही, कदाचित पुल असल्यामुळे माझ्या अपेक्षा फारच होत्या. पुढे पुलंच्या टीकांमधे पुलंनी कसे "थर्ड मॅन" चे "प्रथमपुरुषी" केले ते वाचले आणी काही अंशी ते पटले देखील. परवा मोडकांनी "रारंग ढांग" मधे प्रकाशकांनी सुचवलेला प्रथमपुरुषी ते "थर्ड मॅन" बदलाबद्दल वाचले आणी ह्या अनुवादाबद्दल आठवले.
उमा विरुपाक्ष कुलकर्णी ह्यांनी बरेच उकॄष्ट अनुवाद कानडीतुन मराठीत केलेत. पण मी वाचलेल्या अनुवादात सर्वात वरचा नंबर लागेल तो "चौघीजणी" या पुस्तकाचाच! :)
माया ज्ञानेश
माया ज्ञानेश · Sun, 9 May 2010 - 19:47 · उत्तर
मनिष,
मूळ भाषेत पुस्तक वाचण्याचा अनुभव , मजा वेगळीच असते हे तर खरेच...
'चौघीजणी' च्या बाबतीत मात्र मला " प्रत्यक्षाहुन प्रतिमा उत्कट " असा अनुभव आलाय..मी पण त्या पुस्तकाची पारायणं करते..
तुला 'पाडस' पण आवडेल असं वाटतंय. बघ मिळाले तर..
विजुभाऊ
विजुभाऊ · Sat, 24 Jul 2010 - 07:00 · उत्तर
माया
मूळ भाषेत पुस्तक वाचणे हा एक आनन्ददायी भाग असतो. पण प्रत्येकालाच ते शक्य असेल असे नाही. एखाद्या मराठी भाषीकाला रशीयन अथवा तमिळ भाषेतले वाचन शक्य होणार नाही.
भाषांतर हे कधीच हुबेहूब नसते. भाषांतर करताना मूळ भाषेतले काहीतरी निसतुन जाते. ते पकडता आले तर भाषांतर सर्वोत्कृष्ठ होते.
त्याबाबतीत पुलंनी केलेली काही पुस्तके अगदी आदर्श ठरावी. उदा: काय वाट्टेल ते होईल , कान्होजी आंग्रे.
कान्होजी आंग्रे कदाचित इथलाच आहे म्हणून अनुवादच जास्त आवडला . त्यामाने एका कोळीयाने तितकेसे आवडले नाही. कारण कदाचित त्यातील वातावरण अपरिचित होते.
मंगला निगुडकरांचे "चीपर बाय डझन" अॅन फ्रॅन्कची डायरी , पॅव्हेलियन ऑफ अ वुमन ही सुद्धा चांगलीच आहेत
नवीन पुस्तकांत म्हणावे तर " मॅजिक ऑफ थिंकिंग बिग" हे पुस्तक मी प्रथम इम्ग्रजीत वाचले. आणि नन्तर मराठीत वाचले. इंग्रजी पुस्तकापेक्षा मराठी अनुवाद काकणभर सरसच आहे.
रशियन पुस्तकांच्या बाबतीत बोलायचे झाले तर द ना शब्दरेषे नावाचे कोणीतरी ते अनुवाद करीत." बरीसपलोवाय ने लिहिलेल्या एक अस्सल माणसाची गोष्ट " चा अनुवाद हा बावीस वर्षानन्तरही तवढाच लक्षात राहीला आहे
विजुभाऊ
ऋषिकेश
ऋषिकेश · Mon, 10 May 2010 - 11:53
वरील मतांशी सहमत. त्या
तुम्हाला मूळ पुस्तक वाचायला आवडते का अनुवादित ?
दोन्ही / जे मिळेल ते
अनुवादित पुस्तक आणी मूळ पुस्तक वाचलेले असल्यात अनुवादित पुस्तक रसभंग करणारे वाटले का ?
बहुतांश वेळा नाहि
तुमचा आवडता अनुवादक कोणता ?
रविंद्र गुर्जर, भा. रा. भागवत (ज्यूल व्हर्नच्या कादंबर्यांचे बालकादंबर्यांमधे अप्रतिम भाषांतर)
सर्वसाधारण पुस्तकांचे अनुवाद अभिरुचिसंपन्न असतात का ?
बर्याचदा होय
इंग्रजी सोडून इतर भाषेच्या पुस्तकांचे मराठीत सहसा अनुवाद होत नाहीत, असे का ? कृपया आपले विचार मांडा.
मराठी लेखकांना इंग्रजी सोडून इतर भाषा येण्याचे प्रमाण कमी असावे. मात्र तरीही काहि पुस्तके आहेत. त्तोत्तोचान वर आले आहेच.. शिवाय "देनिसच्या गोष्टि" नावाचे सुंदर रशियन पुस्तक आहे (लेखकाचा उच्चार जिभेला आणि कळफलकाला त्रासदायक असल्याने देत नाही ;) ). शिवाय अनेक संस्कृत पुस्तकांचे, फ्रेंच पुस्तकांचे, जपानी हायकुंचे भाशआंतर उपलब्ध आहेच
अवांतरः
पुस्तकविश्ववर अनुवादीत पुस्तके मुळ लेखकाच्या नावे की अनुवादकाच्या नावे लोड करावी? तसेच एखादे संकलन असल्यास लेखकाचे नाव म्हणून संकलकाचे नाव द्यावे का?
निखिल देशपांडे
निखिल देशपांडे · Mon, 10 May 2010 - 14:10
आजवर जास्त करुन इंग्रजी भाषेतुन अनुवादीत झालेली पुस्तक वाचले आहेत. पण बाकी भाषातले पण पुस्तक वाचायला आवडेल.
तुम्हाला मूळ पुस्तक वाचायला आवडते का अनुवादित ?
मला मुळ पुस्तक वाचायला जास्त आवडेल पण हे खरे तर उपलब्धतेवर अवलंबुन असते. मुळ भाषेत पुस्तक वाचायची मजा काही औरच
अनुवादित पुस्तक आणी मूळ पुस्तक वाचलेले असल्यात अनुवादित पुस्तक रसभंग करणारे वाटले का ?
बहुतेक वेळा रसंभंग करणारे नाही वाटत..
आता पॅपिलॉन पुस्तक मी दोन्ही भाषेत वाचले आहे.. रसभंग झाल्यासारखे वाटले नाहिच..
तुमचा आवडता अनुवादक कोणता ?
वर ॠषिकेश म्हणतो त्याप्रेमाणे मला सुद्धा गुर्जरांचेच नाव घ्यावे वाटते, सत्तर दिवस, पॅपिलॉन हे त्यांनी अनुवादीत केलेल्यापैकी मला आवडलेले काही.
इंग्रजी सोडून इतर भाषेच्या पुस्तकांचे मराठीत सहसा अनुवाद होत नाहीत, असे का ?
ह्या धाग्याचा निमित्ताने इंग्रजी सोडुन ईतर भाषातुन भाषांतरीत पुस्तकांबद्दल चांगली माहीती मिळत आहे. ईतर भाषातुन अनुवादीत झालेली पुस्तक वाचायला आवडेल.
विजुभाऊ
विजुभाऊ · Tue, 11 May 2010 - 04:09
बरोबर आहे. मराठीच्या जवळच्या भाषा भगिनी कन्नड गुजराती वगैरे मधील उत्तम साहित्य मराझ्ठीत उपलब्ध झाले तर फार बरे होईल. पण तसे करायला किती प्रकाशक राजी असतील कोण जाणे.
पुस्तकांचा व्यवसाय हा पूर्णपणे प्रकाशकांच्या हातात आहे.
तुम्हाला मूळ पुस्तक वाचावयास आवडते की अनुवादीत हा प्रश्न गौण आहे अनुवादाला भाषेच्या आणि संस्कृतीच्या मर्यादा असतात एखादी प्रथा अनुवादीत भाषेत नसेल तर त्या प्रथेचे वर्णन कितीही उत्तम असो ते वाचायला कृत्रीमच वाटते.
अर्थात हे बरेचसे अनुवादकावर असते.
मी वाचलेले काही उत्तम अनुवाद :
चीपर बाय डझन : मंगला निगुडकर
काय वाट्टेल ते होईल : पु ल देशपांडे
कान्होजी आम्ग्रे : पुल देशपांडे
एका कोळीयाने : पु ल देशपांडे
मॅजीक ऑफ थिंकिंग बिगः
हे पुस्तक मी अगोदर इंग्रजीत वाचले मेहता पब्लिकेशन ने त्याचा मराठी अनुवाद प्रकाशीत केला हिंदीतही हे पुस्तक उपलब्ध आहे पण हिंदी अनुवाद इतका भयानक आहे की बोलायची सोय नाही. पण मराठी अनुवाद मात्र खूपच उत्तम आहे. घरी इंग्रजी आवृत्ती असूनही मी मराठी अनुवाद विकत घेतलाय
विनायक
विनायक · Sun, 16 May 2010 - 09:21
श्रावण मोडक जास्त माहिती देऊ शकतील.
shweta joshi
shweta joshi · Mon, 17 May 2010 - 14:41
खरच मला अनुवदित पुस्तके वाचायला आवद्तात मला देवनागरित लिह्ता येत नाहि तेन्व्हा जरा समजुन घ्या
मला अनुवदित पुस्तके online वाचायचि आहेत. तर मला एखादि वेब साईत suggest कराल का प्लिज
वेदश्री
वेदश्री · Mon, 12 Jul 2010 - 16:36
माझ्या विज्ञानकथा/कादंबर्यांच्या वेडामुळे क्रोमोझोम-६ घरी आले आणि मग अनुवादित पुस्तकांना आमच्या घरात अगदी बिनधोक प्रवेश मिळायला सुरूवात झाली. नोकरीनिमित्ताने पुण्यामुबईत आल्यावर इंग्लिश पुस्तकेही वाचायला सुरूवात झाली.. जमतही गेले. मला एखादे पुस्तक आवडले की मी आईला आवर्जून वाचायला सांगणे आणि व्हाईस व्हर्सा अगदी पक्के ठरलेले असल्याने 'हे पुस्तक तू वाचच..' असे मी तिला एखाद्या इंग्लिश पुस्तकाबद्दल बोलले की ती उत्साह दाखवेनासा झाली. तिचे म्हणणे की एकतर त्या पुस्तकांची छपाई बारीक अक्षरांची असल्याने डोळ्यांवर ताण येतो (तिला काचबिंदू होण्याची शक्यता आहे.. औषधांनी रोखले आहे) आणि इंग्लिश जास्त न वाचलेले असल्यामुळे लवकर पकड येत नाही कथानकावर. माझे मन खट्टू होऊन जायचे.. मग यावर उपाय म्हणून मी तिला अनुवादित पुस्तके घेऊन द्यायला लागले. ती मीही वाचत असेच. आता ती 'या झक्कास पुस्तकाचा अजून अनुवाद झालेला नाही पण तू वाच ना गं..' या माझ्या विनंतीला कधीकधी मान देऊन इंग्लिशदेखील वाचायला लागली आहे (वाचायला जास्त ताण पडणार नाही अशा अक्षरात टाइप केलेली पुस्तके मिळवायचा माझा कायमच प्रयत्न असतो) आणि माझा आनंददेखील तितक्याच उत्साहाने समजून घेते. :)
माझे म्हणण्यापेक्षा आईचे आतापर्यंतचे आवडते अनुवादक आहेत - रविंद्र गुर्जर, शांता शेळके, उमा कुलकर्णी, राम पटवर्धन, वैशाली जोशी, डॉ. प्रमोद जोगळेकर, मधुकर तोरडमल (यांचा अनुवाद आधी तिला जड वाटला पण एकदा धाटणी कळल्यावर अख्खी अनुवादित अॅगाथा वाचून काढलीये तिने!). अजूनही बरेच आहेत पण आत्ता हाताशी काही नसताना इतकेच आठवलेत.
वल्ली
वल्ली · Tue, 13 Jul 2010 - 06:46
मला अनुवादीत पुस्तके वाचायला आवडतात. एक तर घरातल्या सर्वांनाच ती वाचता येतात शिवाय मातृभाषेत असल्याने त्याचा आशय थेट समजतो. आवडते अनुवादक म्हणजे रविंद्र गुर्जर, विजय देवधर, उमा कुलकर्णी, अशोक पाध्ये ई.
तसे बरेच अनुवाद चांगले झालेत. पण हल्ली काही प्रकाशन संस्था अनुवादीत पुस्तकांची फॅक्टरी चालवत आहेत त्यामुळे त्यात दर्जेदार साहित्याबरोबरच सुमार साहित्याचीही अनुवादित साहित्यात भर पडत आहे असे खेदाने नमूद करावेसे वाटते.
मेघना भुस्कुटे
मेघना भुस्कुटे · Tue, 13 Jul 2010 - 09:39
मला प्रचंड आवडणारी काही अनुवादित पुस्तके:
(अर्थातच!) पाडस - मार्जोरी किनन रॉलिंग्ज - राम पटवर्धन
लॉर्ड ऑफ दी फ्लाईज - विल्यम गोल्डिंग - जी. ए. कुलकर्णी
रान, शिवार, गाव - कॉनराड रिक्टर - जी. ए. कुलकर्णी
लिटिल विमिन - लुइझा मे अल्कॉट - शांता शेळके
ऋषिकेश
ऋषिकेश · Tue, 13 Jul 2010 - 10:06 · उत्तर
कॉनराड रिक्टरची मुळ पुस्तके मला आजानुकर्णाने सुचवली होती ती मला प्रचंड आवडली होती.. मात्र त्याचे अनुवाद मला जास्तच शब्दबंबाळ वाटले होते. माझा जी.ए.बद्दलचा पूर्वग्रह जमेस धरला (किंवा वजा केला) तरीही हे मत कायम ठेवावेसे वाटते, कारण स्वत: रिक्टर यांचे वर्णन अतिशय, सोपे, ओघवते आणि चित्रदर्शी आहे जे भाषांतरात केवळ सुंदर वाक्यआंत गुंफलेले व काहि प्रमाणात चित्रदर्शी वाटाते मात्र त्याचा सोपा-ओघवतेपणा हरवते असे वाटते,.
बाकी आता पाडस शोधून वाचतोच.. खूप उत्सूकता ताणली गेली आहे
मेघना भुस्कुटे
मेघना भुस्कुटे · Tue, 13 Jul 2010 - 10:51 · उत्तर
मी मूळ पुस्तकं वाचलेली नाहीत. कदाचित तुम्ही म्हणता तसं असेलही. तसा त्या पुस्तकांवर एखाद्या साक्षेपी संपादकाचा हात फिरला असता तर बरं झालं असतं, असं मलाही कधीकधी वाटतं (पुस्तकं परचुर्यांनी काढलेली आहेत, मौजेनं नव्हे! :().
ती पुस्तकं आवडण्यात जीएंपेक्षाही रिश्टरचाच हात असेल.
चौघीजणी (लिटिल विमिन) चं मात्र तसं नाही. मूळ आशय फारसा आवडेनासा होऊनही आता काही वर्षं झाली, पण शांताबाईंच्या ओघवत्या प्रवाही भाषेचं कौतुक अजुनी वाटतंच.
'पाडस'चं मूळ पुस्तक (दी इयरलिंग) मी वाचायचा प्रयत्न केला होता. पण माझ्या आळसामुळे असेल कदाचित, मला तितकी गंमत नाही आली. भाषांतर कसं तालेवार आहे.... साहित्यकृतीचं भाषांतर कसं करावं याचा जणू मानदंडच.
यात 'देनिसच्या गोष्टी' (व्हिक्तर द्रागून्स्की - अनु. अनिल हवालदार) या मूळ रशियन पुस्तकाची भर घातलीच पाहिजे. आपण अनुवाद वाचतो आहोत, याची यत्किंचितही जाणीव हे पुस्तक वाचताना होत नाही. साम्यवादी रशिया आणि भारत यांच्यातले सांस्कृतिक फरक इतके असताना असं भाषांतर साधणं थोरच.
आता रशियन पुस्तकांचा विषय निघालाच आहे तर 'सुंदर वासालिसा'ची आठवण होणारच. हेपण हवालदारांनीच अनुवादित केलेलं आहे. रशियन परीकथा. फार फार सुरेख भाषांतर.
'दी लिटिल प्रिन्स' या अंतोन दे सेंत एक्झ्युपरी (उच्चार चुकला असेल (आणि तो असेलच!) तर फ्रेंचच्या जाणकारांनी (नंदनराव!) प्लीज सुधारा...)च्या पुस्तकाची आठवणही होतेच होते. त्याचंही भाषांतर सुरेख आहे.
ऋषिकेश
ऋषिकेश · Tue, 13 Jul 2010 - 10:57 · उत्तर
काय आठवण काढलीस म्हणून सांगु.. माझं बालपण व्यापणार्या अनेक पुस्तकांत ह्या पुस्तकाच्या फार मोठा हात आहे. माझ्या मामाकडे पनवेल हे पुस्तक होतं.. दर सुट्टीत तिथे गेलो की आही हे पुस्तक वाचून काढायचं आणि मग इतर.. फारच सुंदर पुस्तक!!
२६ जुलैच्या पावसात पनवेलचं ते घर अर्ध पाण्याखाली होतं.. ते ऐकल्यावर मी पहिला प्रश्न केला होता.. देनिसच्या गोष्टी आहे का गेलं.? सुदैवाने ते भिजलं तरी वाळल्यावरही वाचतायेण्याइतपत आहे (कागदाची आणि बायडींगची क्वालिटीही खूपच छान आहे).. मामा-मामी-मी-माझ्या तामाम बहिणी-भाऊ यांच्या आवडत्या पुस्तकांचा लसावि काढला तर फारच मोजकी पुस्तके निघतील त्यात देनिसच्या गोष्टी असेल हे नि:संशय!!
टण्या
टण्या · Wed, 14 Jul 2010 - 18:40
मला स्वतःला इंग्रजीमधील पुस्तके इंग्रजीतच वाचायला आवडतात. पण ह्याचे कारण इंग्रजी येते हेच.. तसेच इंग्रजीत उपलब्ध असलेली इतर कित्येक भाषांतील पुस्तके आपणास उपलब्ध होतात.. काम्यु, सार्त, दस्तोयव्हस्की, मार्क्वेझ अश्या कित्येक महान साहित्यिकांचे साहित्य नाहीतर कधीच मला वाचायला मिळाले नसते..
तीच गोष्ट कित्येक मराठी वाचकांची ज्यांना इंग्रजी येत नाही वा पुस्तक वाचण्याइतके चांगले नाही.. वर वेदश्रीने म्हटल्याप्रमाणे, पुर्वी प्रचंड वाचणारी माझी आई आता केवळ चष्मा लावायचा आळस म्हणुन पेपरबॅकला हात लावत नाही.. मग कोएट्झीचे डिसग्रेस वाचच असे मागे लागलेला मी, त्या पुस्तकाचे भाषांतर पाहून खूष झालो.. किमान आई आता हे भाषांतर तरी वाचेल म्हणुन..
इंग्रजीमध्ये भाषांतराची/अनुवादांची एक प्रचंड मोठी परंपरा आहे.. A Hundred Years of Solitude' चा इंग्रजी अनुवाद वाचून मी थक्क झालो होतो.. अशीच इतर भाषांतही असेल (मला नेदरलँडमध्ये जवळपास प्रत्येक गाजलेल्या पुस्तकाचा डच अनुवाद दिसला होता).. मराठीमध्ये हळुहळु ती तयार होईल.. जसजसा अश्या पुस्तकांचा खप वाढेल तसतशी अनुवादाची गुणवत्ताही वाढेल अशी आशा आहे..
सध्या उमा कुलकर्णींसारख्या अनुवादिका अतिशय उत्कृष्ट अनुवाद करतच आहेत.. तसेच नॅशनल बूक ट्रस्टचे अनेक अनाम अनुवादक.. कधीकधी अनुवाद अगदीच वाईट निघतात (मृत्युनंतर नावाचा शिवराम कारंथांच्या एका लघुकादंबरीचा अनुवाद) तर कधी अतिशय उत्कृष्ट (शिकार नावाची एक अनुवादीत कन्नड कादंबरी वा उमा कुलकर्णी करत असलेला भैरप्पांच्या कादंबर्यांचे अनुवाद).. एकदा रशियन लघुकथांचा अनुवाद मिळाला होता.. ५-६ कथा होत्या.. इतक्या जबरदस्त ताकदीच्या कथा मी क्वचितच वाचल्या होत्या.. त्यातली एक 'एका शेतकर्याने दोन जनरलांना खाउ घातले त्याचे गोष्ट' ही कथा तर केवळ महानच..
उत्तम लेखक उत्तम भाषांतर करेलच असे नाही.. पुलंनी केलेले Old Man and the Sea चे एका कोळियाने हे असे एक उदाहरण.. पण ह्याच पुलंनी ती फुलराणी सारखे उत्तम रुपांतर केलेच की..
जीएंच्या रुपांतरात जीएंचा छाप जाणवत राहतो.. पैलपाखरे मधल्या कथा घ्या वा माशांचा राजा घ्या.. The man who died ची सहजता 'मेलेला माणुस' मध्ये येत नाही असे माझे मत.. किंवा माशांचा राजामधील काही काही शब्द अजून सुलभ वापरता आले असते असे वाटत राहते.. पण जीएंनी भाषांतरात शिवधनुष्ये पेलली हे लक्षात घेतले पाहिजे.. त्यांचे 'एक अरबी गोष्ट' मात्र मस्तच..
इथे येणार्या अनेकांचे मराठी वाचन तर अफाट आहेच.. पण बरोबरीने इंग्रजी वाचनसुद्धा उत्तम आहे.. आपल्यापैकी प्रत्येकाने किमान एका इंग्रजी पुस्तकाचे चांगले मराठी भाषांतर वा अनुवाद केला तरी मराठीत अनेकोत्तम पुस्तके उपलब्ध होतील, नाही का?
आनंदयात्री
आनंदयात्री · गुरुवार, 15 Jul 2010 - 04:08 · उत्तर
धन्यवाद टण्ण्या.
अतिशय सुरेख प्रतिसाद.
नॅशनल बुक ट्रस्ट्ची पुस्तके पुण्यात कुठे मिळतील ?
>>आपल्यापैकी प्रत्येकाने किमान एका इंग्रजी पुस्तकाचे चांगले मराठी भाषांतर वा अनुवाद केला तरी मराठीत अनेकोत्तम पुस्तके उपलब्ध होतील, नाही का?
खरे आहे.
१. कोणत्याही इंग्रजी पुस्तकाचे भाषांतर करायचे तर आधी त्याच्या प्रकाशकाची परवानगी लागेल ना ?
२. पुस्तकविश्व प्रकल्पात भाषांतर हा विभाग तयार करण्याचा प्रयत्न आहे. जिथे अनेकांना एकत्र मिळुन किंवा स्वतंत्रपणे प्रताधिकार मुक्त पुस्तकांचे भाषांतर करता येइल. मला वाटते गटेनबर्गवर असलेली प्रताधिकार मुक्त पुस्तके विनापरवानगी भाषांतरीत करायला काही हरकत नसावी. या संदर्भात आपले आणि इतर सदस्यांचे विचार जाणुन घ्यायला आवडतील.
मेघना भुस्कुटे
मेघना भुस्कुटे · गुरुवार, 15 Jul 2010 - 06:55 · उत्तर
>>आपल्यापैकी प्रत्येकाने किमान एका इंग्रजी पुस्तकाचे चांगले मराठी भाषांतर वा अनुवाद केला तरी मराठीत अनेकोत्तम पुस्तके उपलब्ध होतील, नाही का?
अगदी खरं आहे. उत्तम प्रस्ताव आहे. टण्या आणि इतर मंडळी, 'अमुक एका इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद असायला हवा, पण तो मराठीत उपलब्ध नाही' अशा पुस्तकांची नावे या धाग्यावर टाकाल का? आपापल्या आवडीनिवडीप्रमाणे, आवाक्याप्रमाणे, वेळाच्या उपलब्धतेप्रमाणे लोक त्यातून निवड करू शकतील.
एखाद्या पूर्ण पुस्तकाचे भाषांतर हा वेळखाऊ (आणि चिकाटीखाऊ!) मुद्धा आहे. ते पूर्ण झाल्यानंतर (झालं तर!) प्रताधिकाराचा विचार, प्रकाशकाची परवानगी वगैरे घेता येईल.
या संदर्भातला साने गुरुजी स्मारक ट्रस्टचा हा उपक्रम जरूर पाहा. इंट्रेष्टिंग आहे.
बाकी, 'भाषांतर' विभाग तयार झाला, तर उत्तमच.
मेघना भुस्कुटे
मेघना भुस्कुटे · गुरुवार, 15 Jul 2010 - 06:57
रँडच्या 'फाउंटनहेड'चं मराठी भाषांतर उपलब्ध आहे का? मी तरी ते पाहिलेले नाही. कुणाला काही माहिती आहे का?
टण्या
टण्या · गुरुवार, 15 Jul 2010 - 08:07
मेघना, तू घेच हाती :) तुला'च' शक्य आहे..
टण्या
टण्या · गुरुवार, 15 Jul 2010 - 08:16
आनंदयात्री, नॅशनल बूक ट्रस्टची पुस्तके पुण्यात 'पाथफाइंडर'मध्ये नक्की मिळतात.. तिथे एक वेगळा विभागच आहे ह्या पुस्तकांसाठी.. हे दुकान नीलायम टॉकीजच्या शेजारीच आहे..
http://www.nbtindia.org.in/ इथे अजून माहिती मिळेलच.. पण फार काही उपयोगाचे नाही हे संकेतस्थळ
ह्या नॅशनल बूक ट्रस्टच्या मुळे विविध भारतीय भाषांतील लघुकथा, 'राग दरबारी, शिकार' इत्यादी कादंबर्या वाचायला मिळाल्या आहेत.. गेल्या काही वर्षात मी नवीन काय अॅड झालय ते बघितलेले नाही.. पण बहुतकरुन भाषांतराचा दर्जा चांगला असतो nbt चा..
वेदश्री
वेदश्री · गुरुवार, 15 Jul 2010 - 10:07 · उत्तर
अरे वा! पाथफाईंडरमध्ये चक्कर मारावी लागेल लवकरच. महिनाखेर कधी येतेय असे झालेय आता!
आनंदयात्री
आनंदयात्री · Fri, 16 Jul 2010 - 06:15 · उत्तर
धन्यवाद. कारण या पुस्तकांबद्दल अप्पा बळवंत चौकात चौकशी केल्यावर काही विशेष निष्पन्न झाले नव्हते. पाथफाईडर कडे आहेत म्हटल्यावर चिंता नाही.
बाकी त्यांच्या साईटबद्दल सहमत.
टण्या
टण्या · गुरुवार, 15 Jul 2010 - 13:14
मी पुण्यात आलो की कटाक्षाने जायचे टाळतो.. :) माझ्या खिशाची नाहीतर वाट लागते..
वेदश्री, पाथफाइंडरमधून 'राग दरबारी' नक्की घे मिळाले तर.. श्रीलाल शुक्लांची ही कादंबरी catch-22 च्या दर्जाचे satire आहे..
मेघना भुस्कुटे
मेघना भुस्कुटे · गुरुवार, 15 Jul 2010 - 14:42 · उत्तर
मुकुंद संगोराम का रे? कशाबद्दल आहे?
श्रावण मोडक
श्रावण मोडक · गुरुवार, 15 Jul 2010 - 16:50 · उत्तर
ओ.. नाही. श्रीलाल शुक्लांची कादंबरी म्हणताहेत ना ते... :)
संगोरामांचं ते सदर आहे 'लोकसत्ता'तलं. आणि माझ्या मते त्याचं पुस्तक अद्याप झालेलं नाहीये...
वेदश्री
वेदश्री · Sun, 18 Jul 2010 - 07:57 · उत्तर
अरेच्चा! हा प्रतिसाद कसा काय राहून गेला माझा वाचायचा..
>मी पुण्यात आलो की कटाक्षाने जायचे टाळतो.. माझ्या खिशाची नाहीतर वाट लागते..
:D तूर्तास मी आईच्या खिशाची दोनदा वाट लावली बलवंतमधल्या मायबोली कुसुमाग्रज प्रदर्शनातून पुस्तकं घेण्यासाठी. एकदा किराणा आणि भाजी घ्यायला निघालेलो तर रस्त्यात प्रदर्शन लागलेले दिसल्यावर आईला ओढून तिकडे नेले आणि सग्गळ्या पैशांची पुस्तकं घेऊन रिक्षाने घरी गेलो.. रिक्षाचे पैसे अर्थातच बाबांनी दिले! काल दुसर्यांदा गेलो तर आईने सज्जड दम देऊन देऊन कमीतकमी किती खर्च होतील असे बघून पुस्तकखरेदी करू दिली.. भाजी-किराणा घेण्यापुरतेच पैसे तिच्याकडे उरले होते हेवेसांनलगे! :) कपड्यांची खरेदी ३ वर्षातून एकदा झाली तरी चालेल पण पुस्तकं मात्र दर आठवड्याला नाहीतरी दर महिन्यालातरी मनसोक्त घेता (आणि मग वाचता) यावीत हा माझा हट्ट तिला माहिती असल्याने ती ओरडली तरी ते जास्त लावून धरत नाही. आता महिनाखेरीला माझा स्वतःचा खिसा रिकामा करायला पाथफाईंडर नक्की! ;-)
>वेदश्री, पाथफाइंडरमधून 'राग दरबारी' नक्की घे मिळाले तर..
जशी आपली आज्ञा महाराज!
>श्रीलाल शुक्लांची ही कादंबरी catch-22 च्या दर्जाचे satire आहे..
इतक्याने काय समजले मला? श्रीलाल शुक्लांचे नावच मी आत्ता पहिल्यांदा वाचतेय तर त्यांचे लेखन वाचणे म्हणजे माझ्यासाठी घोड्याचे शिंग शोधणेच की आणि सटायर शब्द ऐकलेला असलातरी तो साहित्यप्रकार तसा मला अज्ञातच.. त्यामुळे थोडे तपशिलात समजावून सांग की!
टण्या
टण्या · Sun, 18 Jul 2010 - 08:40
तर थोडे राग दरबारी बद्दल.. साधारण ६०च्या दशकात लिहिलेली ही कादंबरी आहे (आत्ता हाताशी नसल्याने नक्की प्रकाशनवर्ष लक्षात नाही).. स्वतंत्र होउन दहा-वीस वर्षे झालेल्या भारतभूमध्ये लोकशाही चांगलीच 'रुजू' लागली.. पूर्व युपी-बिहारमध्ये आणि विशेषतः खेडोपाडी तर लोकशाहीने धुमाकुळ घातला.. लोकांच्या अंगी ती इतकी भिनली, इतकी चढली की होळीच्या दिवशी भांगसुद्धा इतकी चढत नाही :) तर अश्या ह्या लोकशाहीने संपृक्त बिहारच्या एका शिवपालगंज खेड्यातली ही हकीकत आहे. वाचता वाचता लोटपोट हसाल. हसु चक्क आवरत नाही हे पुस्तक वाचताना. आणि अंतर्मुखही व्हाल (अशी आशा करतो).
साहित्य अकादमीच्या सन्मानाने पुरस्कृत श्रीलाल शुक्ल हे हिंदीतल्या काही महत्वाच्या लेखकांपैकी एक गणले जातात. मी त्यांचे केवळ राग दरबारी हे एकच पुस्तक वाचले आहे. त्यांच्याबद्दल अधिक माहिती इथे: http://en.wikipedia.org/wiki/Sri_Lal_Sukla
थोडेसे सटायरबद्दलः सटायरला बहुतेक मराठीत 'उपरोधिक' साहित्य म्हणत असावेत. सटायर बहुतकरुन नर्मविनोदी असतात. ह्यात बरेचदा गोष्टींची अतिशयोक्ती असते. पण त्यामागे बरेचदा समाजातील अनिष्ट प्रथा, रुढी, ढोंगे, वा अगदी युद्धखोरी सारख्या विषयांवर सडकून टिका असते.
चार्ली चॅपलिनचा 'The Great Dictator' बघितला असेल तर ह्या कलाप्रकाराची ताकद जाणवून येईल.
कॅच-२२ ही जोसेफ हेलरची कादंबरी one of the best satires मानली जाते. दुसर्या महायुद्धात बॉम्बर विमानांमध्ये बंबार्डियर असणार्या 'योझेरिअन' नावाच्या रिक्रुटाची आणि त्याच्या आजूबाजूला असलेल्या इतर रिक्रुट/ऑफिसर/चॅप्लेन/वेश्या ह्यांची कथा. ह्या कादंबरीतला विनोद, शैली हे सगळेच अफाट. पण युद्धाची, नोकरशाहीची, नियमावलींची इतकी अचाट चिरफाड क्वचितच कुणी केली असेल. कॅच२२ बद्दल मुबलक साहित्य आंतरजालावर उपलब्ध आहेच. आज कॅच२२ हा वाक्-प्रचार रोजच्या बोलण्यात पडून गेलाय.
मराठीत मी ह्या प्रकारची केवळ एकच कादंबरी वाचली आहे (ह्याचा अर्थ मराठीत अशी एकच कादंबरी आहे असा नाही :) ). नंदा खरेंची 'अंताजीची बखर'. ग्रंथाली प्रकाशनाची ही कादंबरी १८५७च्या समरात योगायोगाने अडकलेल्या अंताजी नामक ब्राह्मणाची कथा सांगते. ही बखर वाचण्यातच मजा आहे.
वेदश्री
वेदश्री · Sun, 18 Jul 2010 - 19:18 · उत्तर
आता मात्र राग दरबारी माझ्या पुस्तकदरबारी असायलाच हवी असे वाटतेय. माझे वाचन यथातथाच असल्याने अशा दिग्गज लेखकांबद्दल मला माहिती नव्हते.. असो. देर आए दुरुस्त आए नुसार देरीने का असेना दुरुस्ती करता येईल ना.. त्यात मदत केल्याबद्दल १०क्स, टण्या! :)
माया ज्ञानेश
माया ज्ञानेश · Tue, 20 Jul 2010 - 08:38
दरबारी पण यादीत टाकले...
स्वाती
स्वाती · गुरुवार, 22 Jul 2010 - 14:06
राग दरबारी, मस्त ओळख. वाचले पाहिजे आता.
कॅच-२२ कादंबरी नाही वाचली अजुन पण मुव्ही पाहिला. खरच खुप भारी आहे. हसता हसता अंतर्मुख नक्कीच व्हायला होते. बाकी माझ्याकडे शब्द नाहीत कॅच-२२ बद्दल लिहायला.
मेघना, फाउंटनहेड चा बहुतेक "शि़खर" हा अनुवाद आहे. मी अनुवाद वाचला नाहीये पण पुस्तक चाळले तेव्हा तो अनुवाद आहे असे वाटलेले.
सागर
सागर · Fri, 23 Jul 2010 - 10:24
माझ्या आवडीच्या अनुवादीत पुस्तकांची यादी मोठी आहे तरी निवडक नावे देतो
दा विंची कोड - डॅन ब्राऊन - मराठी अनुवाद : अजित ठाकूर
एन्जल्स अॅन्ड डिमॉन्स - डॅन ब्राऊन - मराठी अनुवाद : बाळ भागवत
ब्लडलाईन - सिडने शेल्डन - मराठी अनुवाद : विजय देवधर
द सेवन्थ सिक्रेट - आयर्विंग वॅलेस - - मराठी अनुवाद - विजय देवधर
सेकंड लेडी - आयर्विंग वॅलेस - - मराठी अनुवाद - रविंद्र गुर्जर
गॉडफादर - मारियो पुझो - मराठी अनुवाद - रविंद्र गुर्जर
पॅपिलॉन - हेन्री शॅरियर - मराठी अनुवाद - आठवत नाही
डेझर्टर - गंथर बान्हमान - मराठी अनुवाद - विजय देवधर
यातील एन्जल्स अॅन्ड डिमॉन्स ही कादंबरी नुकतीच वाचून संपवली. खिळवून ठेवणार्या डॅन ब्राऊनच्या या दोन्ही कादंबर्यांवर चित्रपट निघाले. पण कादंबर्यांमधील थरार चित्रपटात तेवढ्या ताकदीने न उतरल्यामुळे हे चित्रपट फ्लॉपशो झाले.
एकंदरीत चांगला अनुवादक कोण हा मुद्दा कदाचित वादाचा असू शकेन. पण माझे मत सांगतो
अनुवादकाचे काम तसे जिकरीचे तर असतेच शिवाय मूळ साहित्याची गोडी दुसर्या भाषेत त्याच चवीत उतरवण्याचे मोठे आव्हान त्याच्यासमोर असते.
तरी मला असे वाटते की, मूळ कथानकातच दम नसेन तर अनुवादक तरी काय करणार? त्यामुळे अनुवादीत कथानकाचे यशापयश हे सर्वस्वी मूळ कथानकाच्या ताकदीवर असते असे मला वाटते. त्यानंतर येतो तो अनुवादकाचा
सहभाग. अनुवादकाने अनुवाद करताना रसभंग न होता मूळ कलाकृती जशीच्या तशी वाचकांच्या पुढे ठेवणे हे आव्हान यशस्वीपणे पेलले की त्याची जबाबदारी संपते. प्रामाणिकपणा ही अनुवादकाची सर्वात मोठी गुणवत्ता व जबाबदारीही असते असे मला वाटते.
अनेक उत्तमोत्तम अनुवादक मराठी साहित्याला लाभले आहेत. विजय देवधर, रविंद्र गुर्जर, अनिल गुजर, बाळ भागवत व इतरही अनेक उदयोन्मुख अनुवादक येत आहेत. मराठी साहित्यासाठी ही नक्कीच चांगली गोष्ट आहे. कधी नव्हे तेवढी सध्या लोक मराठी पुस्तके विकत घेऊन संग्रही ठेवत आहेत, वाचत आहेत.
आनंदयात्री
आनंदयात्री · Sun, 25 Jul 2010 - 19:06
पॅपिलॉन - हेन्री शॅरियर - मराठी अनुवाद - रविंद्र गुर्जर
सागर
सागर · Fri, 30 Jul 2010 - 15:49 · उत्तर
येस्स्स अगदी बरोब्बर
धन्यवाद आनंदयात्री या माहिती बद्दल
पॅपिलॉन बरोबर बँको पण मस्त आहे. रविंद्र गुर्जर छान अनुवाद करतात :)
रोचीन
रोचीन · गुरुवार, 9 Sep 2010 - 13:21
तुम्हाला मूळ पुस्तक वाचायला आवडते का अनुवादित ?
पुस्तके वाचायला खूप आवडत असल्याने दोन्ही / जे मिळेल ते!!
अनुवादित पुस्तक आणी मूळ पुस्तक वाचलेले असल्यात अनुवादित पुस्तक रसभंग करणारे वाटले का ?
काहि वेळा!!
तुमचा आवडता अनुवादक कोणता ?
शांता शेळके, भा. रा. भागवत (ज्यूल व्हर्नच्या कादंबर्यांचे बालकादंबर्यांमधे अप्रतिम भाषांतर), अशॉक जैन, राम पटवर्धन, पु. ल. देशपांडे.
सर्वसाधारण पुस्तकांचे अनुवाद अभिरुचिसंपन्न असतात का ?
बर्याचदा होय
इंग्रजी सोडून इतर भाषेच्या पुस्तकांचे मराठीत सहसा अनुवाद होत नाहीत, असे का ? कृपया आपले विचार मांडा.
मला असे वाटत नाही.पण असे तुमचे निरिक्शण असल्यास, त्याच प्रमुख कारण हे असाव, कि ईंग्रजि पुस्तके भारतात सहज उपलब्ध आहेत. त्यामानाने, ईतर परदेशी भाषांतील पुस्तके उपलब्ध नसावीत. ति भाषा शिकून, त्या भाषेतील साँदर्य स्थळं समजाऊन घेऊन मग त्या पुस्तकांचा रोचक अनूवाद करणं हे खुपच जिकीरिचं काम आहे. त्यासाठि प्रचंड ज्ञान, अभ्यास व चिकाटि हवी. अनुवाद वाचतांना १ स्वतंत्र पुस्तक वाचल्याची जाणिव मनात निर्माण झाली तरच ते त्या पुस्तकाचं यश आहे असं मी समजते. शब्द्शहा भाषांतर असेल तर ते घासात येणार्या खड्यासारखे टोचत रहाते.
मला आवडलेले काही अनुवाद म्हणजे,चॉघीजणी, देनिसच्या गोष्टि, त्तोत्तोचान, पोरवय, ज्यूल व्हर्नच्या कादंबर्या, इंदिरा, पाडस वगैरे!!!
अजिबात न आवडलेले: गॉड्फादर!!
(येथे मी बर्याच जणांचा रोष ओढ्वून घेते आहे याअची कल्पना आहे.)
@माया -- >>'चौघीजणी' च्या बाबतीत मात्र मला " प्रत्यक्षाहुन प्रतिमा उत्कट " असा अनुभव आलाय..मी पण त्या पुस्तकाची पारायणं करते..
सहमत!!!!
****ईथे व्यक्त केलेली मते ही माझी वैयक्तिक मते आहेत. तुमची मते वेगळि असू शकतात आणि मला त्याबद्दल पुर्ण आदर आहे.