- Log in to post comments
मजकूर
वयाच्या, परिस्थितीच्या, मन:स्थितीच्या इ. वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळे कवी, विशिष्ट कवितासंग्रह आवडीचे असतात. काही पुस्तकं कायम आवडत राहतात, तर काही 'तेव्हा का आवडली होती?' हे स्वतःलाही कळेनासे होते. कवितांची काही पुस्तकं आवडीनिवडीच्या पलीकडे जाऊन विशिष्ट आठवणी मनात जाग्या करतात, म्हणून सोबत ठेवली जातात. मधली तीनेक वर्षे मी कविताच वाचू शकत नव्हते. तरलता, तीव्रता नको वाटायची. आता पुन्हा कवितांकडे वळू शकतेय... तर तर्हातर्हांच्या कवितांची पुस्तकं समोर खुली झालीत. मराठी व इतर भाषांमधलीही. कोणतेही पुस्तक उघडावे आणि कविता वाचाव्यात... यादी तर इथं देणं अवघड आहे. पण मित्रहो, तुम्हांला असे कोणते कवितासंग्रह आज वाचनीय वाटतात हे जाणून घ्यायला आवडेल.
चर्चा प्रकार
अभिप्राय
वल्ली
वल्ली · Tue, 22 Mar 2011 - 18:00
कवितासंग्रह फारसे वाचलेले नाहीत शिवाय कवितांमधले जास्त कळतही नाही.
पण जे वाचले त्यातले आवडलेले म्हणजे आचार्य अत्रेंचे 'झेंडूची फुले' आणि मंगेश पाडगावकरांचे 'उदासबोध'
कदाचित दोन्ही संग्रह विडंबन कवितांचे असल्याने विनोदी म्हणूनच वाचले गेले होते तेव्हा. पण आवडले हे नक्कीच.
झेंडूची फुले मधल्या विडंबनांचे फारसे काही कळले नाही कारण ज्या कवितांचे विडंबन त्या कविता तर माहित हव्यात ना.
पण 'उदासबोध'चा मात्र पुरेपूर आनंद लुटता आला. प्रत्यक्ष समर्थकृत दासबोधाचे विडंबन तेही पाडगावकरांच्या मिश्किल शैलीत.
सागर
सागर · Tue, 22 Mar 2011 - 18:15
कविताजी सुंदर धागा काढलात :)
काही कवितासंग्रह मनात अगदी घर करुन बसतात त्यातला हा एक
एल्गार - सुरेश भट ( यात जवळपास सगळ्या गझलाच आहेत. पण सुरेख आहे)
माझ्या कॉलेज जीवनापासून या कवितासंग्रहाची मोहिनी अजूनही माझ्या मनावर आहे.
याशिवाय ना.धों.महानोर यांच्या कविताही आवडतात. पण त्यांचा खास असा कवितासंग्रह नाही सांगता येणार
कुसुमाग्रजांचा - विशाखा काव्यसंग्रह अप्रतिमच आहे. तो ही मनाला कायम आनंद देतो
यशोधरा
यशोधरा · Tue, 22 Mar 2011 - 18:32
चांगला धागा. केवळ हल्लीच्या कविता संग्रहांपुरते मर्यादित ठेवणार नाही, अशी आशा. कधीकधी अख्खा संग्रह नाही, पण त्यातील काही कविता विषेतत्वाने आवडून जातात.
भावार्थदीपीका, दासबोध आणि गाथा.
मुक्ताईचे आणि चोखोबांचे अभंग.
चांगदेव पासष्टी.
करुणाष्टके.
बा भ बोरकर - खंड १ व २ ज्यात त्यांच्या कविता संग्रहांमधील बहुतांश कविता समाविष्ट आहेत. कोणती कविता निवडणार? :) सगळ्याच मला अतिशय आवडतात.
इंदिरा संत - कुब्जा ही कविता. अजूनही आहेत.
मर्ढेकर - पोरसवदा होतीस कालपरवा पावेतो..
शांता शेळके - असेन मी, नसेन मी..
कवि ग्रेस, अरुणा ढेरेंची अनय..
किती नावे घ्यावीत? किती कविता उल्लेखाव्या?... माझ्या आवडत्या कविता मी येथे एकत्र करायचा एक प्रयत्न करत आहे.
चित्रा राजेन्द्र जोशी
चित्रा राजेन्द… · गुरुवार, 24 Mar 2011 - 06:40
अगदी अलिकडे मी काव्याचा आस्वाद घ्यायला शिकले. त्यामुळे एकेक काव्यसंग्रह घेण्यापेक्षा ‘निवडक / समग्र.....’ ह्या शीर्षकाचे काही कवींचे संग्रह माझ्याकडे आहेत आणि त्यातील जशा समजत राहतील तशा कवितांचा आस्वाद घ्यायला आवडते. दोन वाचनांच्या मध्ये नकळतपणे काही काळ जातो. आणि मग काव्य समजून घेण्याच्या कुवतीत बदल झाला आहे असे लक्षात आले की आनंद होतो.
त्यामुळे अमुक एक कवितासंग्रहच ‘आवडता’ असे नेमकेपणाने सांगता येणे कठीण आहे. पण ज्यांच्या कविता आवडीने वाचू शकते, समजून घेण्याचा प्रयत्न करू शकते असे कवी म्हणजे विंदा करंदीकर, कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर, बहिणाबाई, इंदिरा संत, शांता शेळके, पु. शि. रेगे, पद्मा गोळे, नारायण सुर्वे, द. भा. धामणस्कर, रवीन्द्र लाखे, गणेश विस्पुते. अरुणा ढेरेंच्या काही कविता (अनय, जाणार्या माणसाला), रवीन्द्रनाथांची नववर्षाची प्रार्थना.
सुटे आवडते कविता-संग्रह म्हणजे पद्मा गोळे ह्यांचे नीहार, श्रावणमेघ. बालकवींचा फुलराणी. विंदांचे जातक, आदिमाया. आरती प्रभूंचा नक्षत्रांचे देणे. आणि.....
अर्थातच तत्पुरुष, धुळीचा आवाज, मृगजळीचा मासा- कविता महाजन.
अगदी आजच मी गुरुनाथ धुरींचे आदिकाळोख हे पुस्तक आणले आणि त्यातील मीनाकुमारीच्या काव्याने काळीज गलबलले.
शिवाय संतकाव्य आहेच की... मग ते लता-आशा-भीमसेन-अभिषेकी-किशोरी अशा दिग्गजांच्या स्वरात भिजलेले असेल तर त्याची गोडी वर्णनातीत आहे.
टण्या
टण्या · Tue, 22 Mar 2011 - 18:59
कविता हा प्रकारच अतिशय तरलतेने अनुभावयाचा प्रकार आहे. दुर्दैवाने तितकी तरलता कधी अंगात आलीच नाही. आठवणीतल्या कवितांमधल्या (मराठी कवितांची anthology) कधी-कधी एखादी नितांतसुंदर शब्दशिल्पे देउन जातात. दिवेलागण आणि नक्षत्रांचे देणे हे माझे आवडते संग्रह (तरी एखादी कविता verbose वाटतेच). जोगवा एकदाच वाचायला मिळाले होते. बोरकरांच्या कविता अश्याच अफाट. एखादीच झळकून जाते सटकन.
देवेन्द्र प्रभुणे
देवेन्द्र प्रभुणे · Wed, 23 Mar 2011 - 04:32
रुप्गन्धा-सुरेश भट,
ग्रेस ह्यान्चे सर्व काव्यसन्ग्रह,
दशपदी-आ.रा.देशपांडॅ,
चाफा-कवी बी
विशाखा-कुसुमग्रज
रुद्र्-भा.रा.तांबॅ,जोगिया-ग्.दी.मा.,
गोलपिठा-नामदेव ढसाळ
आणखी ही खूप!
-देवेन्द्र प्रभुणॅ,यवतमाळ.
ऋषिकेश
ऋषिकेश · Wed, 23 Mar 2011 - 04:53
विशाखा, बरेच काही उगवून आलेले आणि झेंडूची फुले हे एकाच कवीचे तीन कवितासंग्रह पूर्ण वाचले - आवडले. तसेच, पौराणिक आरत्या, मनाचे श्लोक, वेगवेगळी स्तोत्रे (जसे शिवस्तुती, सूर्यस्तूती) वगैरेंतील कविता, कल्पना कायम आवडत आल्या आहेत.
याव्यतिरिक्त, कविता आवडत असल्या तरी एका कवीचा संपूर्ण संग्रह आवडावा असे झाल्याचे आठवत नाही. मात्र अनेक कवींच्या अनेक कविता आवडतात. शालेय जीवनात पाठ्यपुस्तकांत येणार्या/असणार्या कवितांचे मनात वेगळेच स्थान आहे. आणि अश्याच वेगवेगळ्या कवितांचे संकलन असलेल्या 'आठवणीतल्या कविता' (सगळे भाग) हा माझा बहुदा सर्वात आवडता कविता संग्रह असावा.
यशोधरा
यशोधरा · Wed, 23 Mar 2011 - 15:29
पब्लिक कविता वाचत नाही की काय! :(
सागर
सागर · Wed, 23 Mar 2011 - 17:40 · उत्तर
साहित्यातील हा प्रकार तसा दुर्लक्षितच आहे :(
म्हणूनच कादंबरी ४००-५०० रुपयांना आणि कवितासंग्रह ३०-७० रुपयांत मिळतात.
अर्थात काही अपवाद आहेत म्हणा. पण कविता तशा दुर्लक्षितच म्हणाव्या लागतील
नंदन
नंदन · गुरुवार, 24 Mar 2011 - 02:08
धाग्याचा विषय फार आवडला. पटकन 'आहे मनोहर तरी'च्या अर्पणपत्रिकेची आठवण झाली. माझ्यापुरतं उत्तर द्यायचं झालं तर विशाखा, झेंडुची फुले, दासू वैद्य यांचा 'तूर्तास', बोरकर आणि मर्ढेकरांच्या समग्र कविता, धामणस्करांचे 'बरेच काही उगवून आलेले' हे सहज आठवणारे. त्याशिवाय शांता शेळके, इंदिरा संत, पद्मा, सुरेश भट, अनिल, बी, गदिमा, ढसाळ, चित्रे, कवी यशवंत, आरती प्रभू, रेगे, अरुणा ढेरे ह्यांचा एकच एक कवितासंग्रह आवडतो असं नाही; तर बर्याचशा कविता आवडतात. त्यामुळे 'आठवणीतल्या कविता','विसाव्या शतकातील निवडक मराठी कविता', शांताबाईंनी त्यांच्या आवडत्या कवितांवर लिहिलेलं पुस्तक (कविता स्मरणातल्या) ही अजून काही नावं.
ज्ञानेश्वरी, अमृतानुभव किंवा तुकारामांचे अभंग मुळातून वाचलेले नाहीत. मात्र शांताबाईंच्या म्हणा किंवा म. वा. धोंडांच्या लेखनात म्हणा, जेव्हा ह्या संतसाहित्यातलं काव्य उलगडून दाखवलं जातं, तेव्हा ते मुळातूनच एकदा वाचायला हवं, असा निश्चय पुन्हा एकदा मनाशी केला जातो. सध्या विंदा करंदीकरांनी केलेला अमृतानुभवाचा समश्लोकी अनुवाद आणि यशोधराच्या सुचवणीवरून काका कालेलकरांची रवींद्रनाथांच्या गीतांची आणि कवितांची ओळख करून देणारी तीन पुस्तकं आणली आहेत. ती अजून निवांत वाचायला मिळाली नसली, तरी चांगली वाटत आहेत.
अवांतर -
आवडलेल्या कवितांची यादी बरीच मोठी होईल. लहानपणी गेय कविता अधिक आवडायच्या. शब्दसामर्थ्याबरोबरच जर ती चालीवर म्हणता येत असेल तर सहज लक्षात राहत असे. शाळेतल्या 'चिमणीला मग पोपट बोले', राजा मंगळवेढेकरांची 'पाहुणा', कवी यशवंतांची 'करिते का कधी खंत, सरिता', नववीतली शार्दूलविक्रीडितातली 'स्वप्नी गाढ निमग्न भोज असता ये जागृती त्याजला', बोरकरांची 'इंद्रनील चंद्रकांत सांध्यसुंदरी ही', बालकवींची 'पारवा', कुसुमाग्रजांची 'पृथ्वीचे प्रेमगीत' आणि 'कोलंबसाचे गर्वगीत', शांताबाईंची 'पैठणी' अशा कविता अजूनही आठवतात.
पुढे पुढे, निरुद्देश वाचताना अचानक एखादा कवितेतला शब्द थबकून विचार करायला लावी आणि मनोमन त्या कवीच्या प्रतिभेला कुर्निसात करावासा वाटे. मर्ढेकरांची न्हालेल्या गर्भवतीच्या सोज्वळ मोहकतेने मुंबईच्या बंदरावर उजळणारी पहाट, 'सर्वेपि रुटीनः जन्तु' झाले तरीही 'अजून येतो वास फुलांना' मधली जीजिविषा; एका अनामिक, अशारीर प्रेमाच्या आठवणीने 'रतिक्लांत' झालेली गदिमांच्या 'जोगिया'मधली कंचनी; 'आज फारा दिवसांनी कोंभ मुसळाला आले, माझ्या परागंदा जीवा पुन्हा माहेर मिळाले', 'ओळखीचेसे अनोळखी कुणी, नकळत अंतर मंतरणारे, भेटावे मज वळणावरती, उन्हात गवसे मावळणारे ओळखीचेसे अनोळखी कुणी', 'या देहाची मातीच अशी प्रेमासंगे जमतो प्रमाद' अशासारख्या ओळी लिहिणारे बोरकर; 'किनारा तुला पामराला', 'श्वासांनो जा वायुसंगे ओलांडुनि भिंत' म्हणणारे कुसुमाग्रज ह्या सार्यांबरोबरच गूढ असूनही मनात एक अस्पष्ट चित्र सोडून जाणार्या ग्रेसच्या कविता,'आता सोंगं पुरे झाली, सारी ओझी जड झाली' म्हणत सौम्य स्त्रीवादी भूमिका मांडणार्या पद्मा गोळे, 'देवा याही देशात पाऊस पाड' म्हणणारे चित्रे, 'सदरहू पीक आम्ही आसवांवर काढले आहे' म्हणणारे कवी यशवंत मनोहर, 'ओचे बांधून पहाट उठते' म्हणणारे विंदा, एकही क्रियापद* नसणारी रेग्यांची 'त्रिधा राधा', नव्वदोत्तरी कवींच्या काही मुक्तछंदातील कविता ह्या थोड्या वेगळ्या वाटेवरच्या कविताही आवडू लागल्या. त्या सगळ्यांची यादी करणं हे मुश्किल काम आहे, पण ह्या लेखाच्या निमित्ताने त्यातल्या काहींचे पुन्हा स्मरण झाले आणि तितका काळ आनंदात गेला :)
*झुकले हे बनाचे विशेषण (झुकलेले) म्हणून वापरले असावे.
यशोधरा
यशोधरा · गुरुवार, 24 Mar 2011 - 03:42 · उत्तर
प्रतिसाद खूप आवडला.
श्रावण मोडक
श्रावण मोडक · गुरुवार, 7 Apr 2011 - 18:07 · उत्तर
नंदन, तू काही लिहून किती दिवस झाले आहेत हे आठवतं का? हा प्रतिसाद वाचल्यानंतर मला तरी आठवलं की काही वर्षं झाली आहेत. तेव्हा...
सागर
सागर · गुरुवार, 7 Apr 2011 - 18:14 · उत्तर
थोडा वेळ काढ रे नंदन आमच्यासाठी :)
विश्वेश
विश्वेश · गुरुवार, 7 Apr 2011 - 11:48
धर्मवीर भारती यांच्या "कनुप्रिया" ची अगणित पारायणे चालू आहेत ....
त्या आधी सुरेश भट, इलाही जमादार यांचे कविता संग्रह विशेष करून आवडले आहेत .... शाळेत होतो तेव्हा नारायण सुर्वेंचा फार पगडा होता ...
इथे जरूर डोकवा - (http://trairashik.blogspot.com/)
सागर
सागर · गुरुवार, 7 Apr 2011 - 13:51 · उत्तर
धर्मवीर भारती यांच्या "कनुप्रिया" ची अगणित पारायणे चालू आहेत ....???
अबबब... एवढी मोहिनी? जरा लिहा की या कवितासंग्रहाबद्दल मालक
माहिती करुन घ्यायला आवडेल :)
विश्वेश
विश्वेश · गुरुवार, 7 Apr 2011 - 19:24 · उत्तर
इथे वाचा - http://www.scribd.com/doc/6641644/Dharmvir-Bharti-Kanupriya
कनुप्रिया मध्ये सगळ्या राधेच्या कविता आहेत .... अतिशय गहिर्या आणि तितक्याच भाषा संपन्न आहेत
पूर्ण संग्रह नाही आहे इथे परंतु तुम्हाला कल्पना येईल .... काही कविता तर उच्च आहेत ....
सागर
सागर · Fri, 8 Apr 2011 - 09:28 · उत्तर
आता कळाले तुम्ही का पारायणे करता आहात ते :)
थोडी कल्पना आली आहे.
मी पण हा संग्रह वाचेन आता :)
एका सुरेख कवितासंग्रहाची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद
मणिकर्णिका
मणिकर्णिका · गुरुवार, 7 Apr 2011 - 18:20
सगळ्याच्या सगळा कवितासंग्रह आवडला असं कधी झालेलं नाहीये. पण बहुतेक कविता आवडल्या असे कवितासंग्रह-
१. अरुण कोलटकरच्या कविता-अरुण कोलटकर
२. रानातल्या कविता-ना.धों
३. याला कवितासंग्रह नाही म्हणता येणार पण दीर्घकाव्य-
उत्तररात्र- रॉय किणीकर
४. आरती प्रभूंचे सर्वच कवितासंग्रह.
५. आणि तरीही मी..- सौमित्र
यशोधरा
यशोधरा · गुरुवार, 7 Apr 2011 - 18:40 · उत्तर
येस, उत्तर रात्र! रुबायांच्या धर्तीवरचं काव्य. अफाट आहे हा संग्रह!
धन्यवाद मणि.
मणिकर्णिका
मणिकर्णिका · Fri, 8 Apr 2011 - 18:21 · उत्तर
खरंच अफाट आहे! 'अफाट' हा एकमेव शब्द लागू होतो. वरती कुठेही उल्लेख नाही झाला म्हणून कळवळून लिहीलं.
त्यातली माझी सर्वात आवडती रुबाई-
पण लिहावयाचे लिहून झाले नाही
पण सांगायचे सांगून झाले नाही
संपली कथा जी कुणी ऐकली नाही
संपली रात्र, वेदना संपली नाही
यशोधरा
यशोधरा · Sat, 9 Apr 2011 - 06:05 · उत्तर
>>म्हणून कळवळून लिहीलं.
अगं, एका/की चा उल्लेख करावा तर दुसरं कोणी राहून जातं.. :(
gaurishevatekar
gaurishevatekar · Tue, 19 Apr 2011 - 19:32
कविताताई,
कवितांचं विश्व खरंच खूप तरल असतं...आयुष्याच्या विविध वळणांवर कधी वयाप्रमाणे, कधी अनुभवांप्रमाणे तर कधी मानसिकअवस्थे प्रमाणे अनेक कविता/कवी आवडतात..मनात घर करून जातात...इथे तुम्हाला काही वाचलेले आणि वारंवार वाचले तरी मनाला तेवढाच आनंद देणारे असे काही माझे आवडते कवितासंग्रह सांगते. नक्की वाचा.
विशाखा: कुसुमाग्रज
मुक्तायन: कुसुमाग्रज
हिमरेषा: कुसुमाग्रज
मारवा: कुसुमाग्रज
बोलगाणी: श्री मंगेश पाडगावकर
त्रिवेणी: श्री मंगेश पाडगावकर
मौनाची भाषांतरे: श्री संदीप खरे
नेणिवेची अक्षरे: श्री संदीप खरे
चांदणवेल: श्री बा. भ. बोरकर
एल्गार : श्री सुरेश भट
उत्तररात्र : श्री रॉय किणीकर
मी माझा : श्री चंद्रशेखर गोखले
हिंदी कविता आवडत असतील वाचायला, तर श्री हरिवंशराय बच्चन यांचे " मेरी श्रेष्ठ कविताए" आणि " मधुशाला " हे काव्यसंग्रह नक्की वाचा. कुसुमाग्रज लिखित आणखी एक पुस्तक आहे : "समिधा" , कविता नाहीत त्यात, पण कविता इतकेच मनोहर ललित आहे.. नक्की वाचाल. खूप खूप सुंदर कविता संग्रह आहेत वाचलेले पण सध्या इतकेच स्मरणात आहेत...कविता हा विषयच खूप आवडीचा, जवळचा आहे..आणखी संग्रह आठवले ना की पुन्हा लिहीन..तोपर्यंत इतकेच..सरते शेवटी कुसुमाग्रज लिखित माझ्या अत्यंत आवडत्या कविता लिहून आज थांबते.
" विजयासाठी कविता माझी कधीच नव्हती,
म्हणून नव्हती भीती तिजला पराजयाची,
जन्मासाठी हटून केव्हा नव्हती बसली,
म्हणून नाही खंतही तिजला मरावयाची "
काव्यसंग्रह: हिमरेषा, कवी: कुसुमाग्रज
" गाता गाता जाईन मी,
जाता जाता गाईन मी,
गेल्यावरही या गगनातील,
गीतान्मधुनी राहीन मी "..........
कवी: कुसुमाग्रज
gaurishevatekar
gaurishevatekar · Tue, 19 Apr 2011 - 19:46 · उत्तर
सध्या श्री रवींद्रनाथ टागोर यांचा :गीतांजली" हा काव्यसंग्रह वाचत आहे...शब्दांच्या पलीकडला आहे अनुभव....त्यांच्या शब्दांमधून व्यक्त होणारी प्रीती, लीनता आणि तन्मयता अनुभवावी अशीच आहे...नक्की वाचा.