- Log in to post comments
मजकूर
परवा गोव्याला बा. भ. बोरकर जन्मशताब्दीच्या समारोप सोहळ्याला गेले होते. कन्नड लेखक अनंतमुर्ती यांनी तिथे एक मुद्दा मांडला. तो असा :
"कोंकणी भाषेला स्वतःची लिपी नाही. ( हे मत वादग्रस्त आहे, असेही त्यांनी लगेच सांगितले.) कोंकणी भाषेत लिहिणारे लेखक त्यामुळे सुमारे १८ भाषांमधून लेखन ( पुस्तके ) करतात. कुठल्याच भाषेचे लिपीवाचून काही अडत नाही. फक्त ती लिपी त्या भाषेतील सगळ्यांना येत नसल्याने अडचण होते. त्यामुळे भारत सरकारकडे मी आता अशी एक योजना मांडली आहे की कोणत्याही भाषेतील मजकुराचे हव्या त्या लिपीत लिप्यंतर करता यावे. अशी सुविधा सरकारने उपलब्ध करून द्यावी."
चर्चा प्रकार
अभिप्राय
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · Tue, 7 Dec 2010 - 19:15
"....कोणत्याही भाषेतील मजकुराचे हव्या त्या लिपीत लिप्यंतर करता यावे...."
~ पण यामुळे काय साध्य होणार ? श्री.अनंतमूर्ती यानी भाषावृध्दीसाठी तो मुद्दा मांडला असला तर ठिक आहे, पण साहित्याचा निखळ आनंद घ्यायचाच असेल तर तो प्रथम मूळ लिपीतूनच घेतला पाहिजे अन्यथा वाचकाला समजेल त्या भाषेत समर्थ 'अनुवाद' करूनच. लिप्यांतरामुळे फक्त वाचकाला ती भाषा वाचता येईल हे खरे, पण अर्थ तर मुळीच कळणार नाही.
उदा. Nanna cell phoneana busnalli KALAKONDE. ~ हे एक कन्नड भाषेतील लिप्यांतर केलेले वाक्य. इंग्लिश लेटर्समुळे मी वा अन्य सदस्य याचा उच्चार बर्यापैकी करू शकतो. पण मला या वाक्याचा अर्थ कसा कळणार?
हा थोडासा गोंधळ झाला आहे माझा.....किंवा कविताताईंना आंतरभारती साहित्याबद्दल या धाग्यातून दुसरे काही सुचवायचे आहे काय ?
इन्द्रा
ऋषिकेश
ऋषिकेश · Wed, 8 Dec 2010 - 04:09
मलाही मुद्दा नीटसा कळला नाही. स्वतः कविताताईंनी अनेक भारतीय लेखिकांचे साहित्य मराठीत आणले आहे पण ते भाषांतर / अनुवाद आहे. लिप्यंतराने काय साधेल हे समजताना वर इंद्रराज म्हणतात तसा माझाही गोंधळ उडाला आहे.
कविता महाजन
कविता महाजन · Wed, 8 Dec 2010 - 04:58
साहित्यिक देखील हळूहळू कसे 'सरकारी' होत जातात, याचा हा उत्तम नमुना आहे. ज्याने काही साधणार नाही, त्यावर वेळ-पैसा-बळ-बुद्धी खर्च करायची! तंत्रज्ञानातले काहीतरी सुचवले की आपण 'आधुनिक' आहोत, असे दिसते. यासाठी हा आटापिटा. अनंतमुर्तींना मी पहिल्यांदाच भेटले आणि ऐकले. चलाख भाषण होते. एक पुराणातली / रामायण -महाभारतातली किस्सेवजा गोष्ट सांगायची. मग ती आजही कशी उपयुक्त आहे ते सांगायचं. मग दोन-चार 'सुविचार' सांगायचे. आणि मग आजचे शिक्षण, आजचे साहित्य याविषयी असा काहीतरी निरुपयोगी तरी चकचकित मुद्दा मांडायचा."केवळ लिप्यंतराने काय साधणार?" हे अनंतमुर्तींना कोण विचारणार?
बिपिन कार्यकर्ते
बिपिन कार्यकर्ते · Wed, 8 Dec 2010 - 07:17
मला वाटते की अनंतमूर्तींना जे म्हणायचे आहे ते कोकणी भाषेच्या संदर्भात योग्य आहे. कोकणी भाषा माझ्या माहितीत तरी देवनागरी, रोमन, कन्नड आणि मल्याळम अशा ४ लिपींमधे लिहिली जाते. मग एखाद्या लेखकाचे साहित्य कोणत्या लिपीत छापायचे? मग त्या साठी लिप्यंतराची कल्पना उत्तम आहे.
तसेच काहीसे... मला गुजराती उत्तम समजते, वाचताही येते, पण समजा वाचता आली नसती तर? मग मला देवनागरी मधे लिप्यंतर करता आले तर किती मजा येईल? विशेषतः महाराष्ट्र-कर्नाटकसीमेवरच्या लोकांना कानडी मराठी येते. पण वाचता येईलच असे नाही. मग एखाद्या कोल्हापूरातल्या माणसाला कानडी पुस्तके देवनागरीतून वाचता आली तर मज्जाच मजा की नाही? काय?
मला व्यक्तिशः अशी सुविधा असावी असे फार पूर्वीपासून वाटते. अर्थात, त्यासाठी सरकारी पैसा खर्च व्हायचा असेल तर कॉस्ट बेनिफिट बघणे आवश्यक आहेच.
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · Wed, 8 Dec 2010 - 08:29
"....एखाद्या कोल्हापूरातल्या माणसाला कानडी पुस्तके देवनागरीतून वाचता आली तर मज्जाच मजा की नाही? काय?..."
~ अहो, बिपिन जी, माझा कळीचा मुद्दा हाच आहे की, यामुळे काय साध्य होणार? "मैनु किन्नू कॉन्टॅक्ट कर्ना चैदा है, वीरावली जी?" अशासारखे पंजाबी वाक्य माझ्यासारख्या मराठी भाषिकाला तिथे काही काळ राहिल्याने समजू/उमजू शकते, पण म्हणून माझ्यासमोर अमृता प्रितम वा खुशवंत सिंग यांचे गुरुमुखीत लिहिलेले साहित्य भले ते देवनागरीत लिप्यांतर होऊन आले, तर किती समजेल?
इन्द्रा
बिपिन कार्यकर्ते
बिपिन कार्यकर्ते · Wed, 8 Dec 2010 - 09:49 · उत्तर
हा मुद्दा सर्वस्वी वेगळा आहे. तुम्हाला एखादी भाषा किती येते त्यावर ते अवलंबून आहे. जर का तुम्ही भटिंड्यातच (काही कारणाने ;) ) सेटल झालात आणि ४-५ वर्षं काढल्यानंतर भाषेची जाण चांगली आली तर केवळ गुरूमुखी येत नाही म्हणून अडणार नाही ना? लिप्यंतर केले की चालू. काय?
इथे लिप्यंतराचा मुद्दा आहे. मलाही तेच म्हणायचे आहे. माझी एक नातेवाईक बंगलोरात गेलॉ १३ वर्षे आहे. उत्तम कानडी समजते / बोलते. पण लिपी नाही कळत. लिपी शिकणे आणि भाषा शिकणे हे सर्वस्वी भिन्न आहे.
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · Wed, 8 Dec 2010 - 16:46 · उत्तर
"....जर का तुम्ही भटिंड्यातच (काही कारणाने.....) सेटल झालात...!"
~ अहो बिपिन जी, नको अजिबात....ते सरसो का तेल, आणि चना-भटोरा खावून खावून मेंदुचा चिखल झाला आहे. त्यात ते रोटीच्या जागी नान् खाताना असे वाटते की याच्यापेक्षा एमआरएफ टायर चावलेली बरी.
कुणीतरी म्हटल्येय ना..." गड्या आपुला गाव बरा...." त्याच चालीवर शेवटी आमच्या पंचगंगेच्या काठावरचीच दुनिया झकास !
इन्द्रा
आरागॉर्न
आरागॉर्न · Wed, 8 Dec 2010 - 08:35
सुविधा सरकारने उपलब्ध करून द्यावी म्हणजे काय ते कळले नाही. आणि याने किती फरक पडेल याबद्दल साशंकता वाटते.
तसेही काही उपाय नसतो तेव्हा लोक लिप्यंतर वापरतातच. सध्या मी थोडे-थोडे तमिळ शिकतो आहे. लिपी शिकायला बराच वेळ लागेल म्हणून देवनागरीतूनच शिकतो आहे. पण त्यातही अडचणी येतात. बरेचदा नेमके स्वर किंवा व्यंजने उपलब्ध असतीलच असे नाही.
स्पिन डॉक्टर
स्पिन डॉक्टर · Wed, 8 Dec 2010 - 11:22 · उत्तर
सहमत आहे.
"सरकारने द्यावी" असे म्हणण्याइतकी काही ती अवघड सुविधा नाही. लिप्यंतर करणार्या सायटी आहेतच. थोडे शोधावे किंवा स्वतः कोड लिहावे. मागणी फुटकळ वाटते.
ढब्बू पैसा
ढब्बू पैसा · Wed, 8 Dec 2010 - 11:16
बिपिनदांशी पूर्णपणे सहमत. एखादी भाषा येणे म्हणजे त्याची लिपी यावीच असं नाही. मी मारवाडी भाषिक आहे. मारवाडीला स्वतःची लिपी आहे की नाही हे ही मला ठाऊक नाही. पण मूळ मारवाडी अनेक लोकगीते माझ्याकडे देवनागरीतून लिहिलेली आहेत आणि त्यातला शद्ब न् शद्ब मला कळतो आणि मी ती गाणी पूर्णपणे enjoy करू शकते!
पण हे लिप्यंतर सरकारने का उपलब्ध करून द्यावं? म्हणजे ह्याने नेमकं काय साध्य होईल?
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · Wed, 8 Dec 2010 - 16:11 · उत्तर
".....त्यातला शद्ब न् शद्ब मला कळतो...!"
~ अहो ढब्बू पैसा (हे नाव पुरुष सदस्याचे की स्त्री सदस्याचे?) तुमचा मुद्दा मान्य आहे, पण त्या लोकगीतांची भाषा तुम्हाला जन्मजातच कळते, सबब त्यामुळे देवनागरीतून आलेल्या लिप्यांतराचा तुम्हाला लाभ झाला असाच अर्थ झाला ना? मला जर ती मारवाडी लोकगीते समजून घ्यायची असली आणि तुम्ही ते देवनागरी संस्करण मला दिले तर मी त्याचा कसा काय आनंद घेऊ शकेन? यासाठी मुळात मला तुमची मारवाडी भाषा शिकायला येणे गरजेचे आहे.
वर मी पंजाबी बोली वा गुरुमुखीचे जे उदाहरण दिले आहे त्याचा फक्त स्थानिक पातळीवर इकडच्या तिकडच्या गोष्टी करणे, किरकोळ माहिती देणेघेणे या मर्यादेपर्यंतच उपयोग होतो. माझा मुद्दा त्या त्या भाषेतील साहित्याच्या आनंदाशी निगडीत आहे, आणि ज्यासाठी लिप्यांतराच्या उपयोगाबाबत साशंक आहे.
इन्द्रा
दिगम्भा
दिगम्भा · Wed, 8 Dec 2010 - 12:49
मला वाटते की यात कळीचा एकच मुद्दा आहे तो म्हणजे सरकारने आपले सर्व ई-कागदपत्र अशा रूपात (फॉर्ममध्ये) ठेवावेत ज्यायोगे त्यांचे कोणत्याही इतर लिपींत सहज लिप्यंतर करता येईल.
लिप्यंतर करण्याच्या सुविधा उपलब्ध आहेतच.
किंवा दुसर्या शब्दांत सांगायचे तर कोणतेही विशिष्ट फाँट्स न वापरता सर्वत्र युनिकोड वापरावे म्हणजे ते लिप्यंतरास सोईस्कर होईल.
वरील प्रतिसादांवरून हे स्पष्ट होते आहे की भाषा समजत असली तरी एखाद्याला लिपी येत असेलच असे नाही त्यामुळे अशा लिप्यंतराचा फायदा होऊ शकेल.
कोकणीला अधिक फायदा आहे हे उघडच आहे.
मृदुला
मृदुला · Wed, 8 Dec 2010 - 19:02 · उत्तर
दिगम्भांशी सहमत. आधी सहज लिप्यंतर व नंतर सहज भाषांतर अश्या पायर्या हव्यात.
दिगम्भा
दिगम्भा · गुरुवार, 9 Dec 2010 - 07:26
थोडा विचार करता सहज लक्षात आले की आपल्यापैकी बहुतेक शायरीशौकीनांना उर्दू शेरोशायरी ही देवनागरीतूनच वाचायची सवय आहे आणि शायरी देवनागरीत उपलब्ध नसेल तर ती कितीशा रसिकाना समजेल याची शंकाच आहे.
लिप्यंतराची सोपी सोय असेल तर निदान उर्दू शायरीसाठी तरी ते एक वरदानच ठरेल असे वाटते.
यासाठी सर्व उर्दू अक्षरांसाठी देवनागरीमध्ये एकास-एक सर्वमान्य मॅपिंग असणे आवश्यक आहे, पण ही गोष्ट समजा या क्षणी उपलब्ध नसलीच तरी प्रयत्नसाध्य असावी असे वाटते आहे.
- दिगम्भा
ऋषिकेश
ऋषिकेश · Fri, 10 Dec 2010 - 07:07 · उत्तर
अरे हो की!किती नेहमीचे उदा. दिलेत.
हे खरेच आहे.. उर्दु सारख्या संपन्नभाषेतील मजा लुटताना नस्तालिक/नस्ख शिकत बसण्यापेक्षा देवनागरी उत्तम!
ज्योति कामत
ज्योति कामत · Fri, 10 Dec 2010 - 19:06 · उत्तर
उर्दूचे युनिकोडमध्ये लिप्यंतर कठीण असावे, कारण ती लिपी उलट दिशेने (उजवीकडून डावीकडे)लिहिली जाते.
फक्त कोकणीबद्दल बोलायचं झालं तर, गोव्यातच पेडण्याची कोकणी आणि साळशेत (मडगावची) कोकणी यात एवढा फरक आहे की त्या दोन वेगवेगळ्या भाषा वाटतात. तोच प्रकार ख्रिश्चन समाज आणि हिंदू समाज यांच्या बोलीच्या बाबतीत आहे. कारवारी कोकणी, मंगलोरी कोकणी आणि केरळमधली कोकणी यासुद्धा वेगवेगळ्या भाषा वाटतात.
इथे गोव्यात आल्यावर मी रोमी कोकणीत छापलेला एक पेपर वाचायचा जीव तोडून प्रयत्न केला, पण शेवट एका स्थानिक मैत्रिणीने सांगितलं की, "आम्हाला पण तो पेपर वाचायला तेवढाच त्रास होतो", तेव्हा नाद सोडून दिला.
अगदी मराठीच्या बाबत बोलायचं झालं तर, आमची रत्नागिरीची मराठी घेऊन आम्ही जेव्हा काकांकडे वर्ध्याला गेलो, तेव्हा त्यांच्या मोलकरणीबरोबर बोलणं जवळ जवळ अशक्यच होतं. कारण तिची वर्हाडी बोलीभाषा; पण तीही मराठीच!
आंतरजालावर गुगलबाबा या लिप्यंतराच्या सोयीला "भाषांतर" म्हणतात. कधीतरी गंमत म्हणून प्रयोग करून बघा. एकदम विनोदी प्रकार वाटतो.
एकुणात काय, कविताताई म्हणतात, तसं फक्त भाषण चमकदार करण्यासाठी श्री अनंतमूर्तीनी 'लिप्यंतराचा' मुद्दा मांडला असावा. त्याचा व्यवहारात फारसा उपयोग होण्यासारखा नाही. कारण इन्द्राने म्हटल्याप्रमाणे भाषा केवळ समजणे आणि लिपी शिकून त्यात लेखन वाचन करणे या पूर्ण वेगळ्या गोष्टी आहेत. लिप्यंतरापेक्षा चांगले भाषांतर नक्कीच जास्त मनोरंजक ठरेल.