भाषांतर / अनुवाद

आनंदयात्री

मजकूर

नमस्कार,

पुस्तकविश्व या प्रकल्पाच्या निर्मिती प्रक्रियेत पुढील टप्पा हा भाषांतर/अनुवादाला समर्पित असावा असे वाटते. इतर भाषांतील मुख्यत्वेकरुन इंग्रजी साहित्याचे भाषांतर टप्प्याटप्प्याने आणि एकमेकांच्या सहकार्याने करता यावे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश असेल. प्रोजेक्ट गटेनबर्गच्या धर्तीवर मराठीत प्रताधिकारमुक्त भाषांतरे व्हावीत अशी मनिषा धरुन या प्रकल्पाची कल्पना मांडत आहे. या निमित्ताने आपले या विषयावरील मते मांडावीत. भाषांतरासाठी काय प्रताधिकार असतात या बद्दलही माहिती हवी आहे.

धन्यवाद.

अभिप्राय

मेघना भुस्कुटे

मेघना भुस्कुटे · Fri, 16 Jul 2010 - 04:37

’दी फाउंटनहेड’च्या (आयन रॅंड) पहिल्या पानाच्या अनुवादाचा केलेला हा प्रयत्न.
प्रताधिकाराचा प्रश्न नाही. कारण ६१५ पानांच्या कादंबरीतलं १ पान म्हणजे जेमतेम ०.२ टक्के होतात. शिवाय हे काही व्यावसायिक हेतूनं केलेले प्रकाशन नव्हे.
हे शब्दानुकारी भाषांतर नव्हे. कुठे माझा शब्द कानाला बरा लागला, अर्थाला-आशयाला अनुकूल वाटला, तर यात घातला असेल. कुठे एखादा शब्द कमी केला असेल. वाक्यरचना बदलली असेल. यातला माझा शब्द अखेरचा नव्हे. बरं-वाईट-चूक-भूल सांगा-सुचवा. मतमतांतरं असतील, तर त्यातून हाताला काही नवं लागेल. हे अगदीच इंग्रजीच्या कडेवर जाणारं / बाळबोध / भिकार होत असेल, तर तसंही निस्संकोच सांगा. स्वागत आहे.
*******************
मूळ उतारा:
HOWARD ROARK laughed.
He stood naked at the edge of a cliff. The lake lay far below him. A frozen explosion of granite burst in flight to the sky over motionless water. The water seemed immovable, the stone--flowing. The stone had the stillness of one brief moment in battle when thrust meets thrust and the currents are held in a pause more dynamic than motion. The stone glowed, wet with sunrays.
The lake below was only a thin steel ring that cut the rocks in half. The rocks went on into the depth, unchanged. They began and ended in the sky. So that the world seemed suspended in space, an island floating on nothing, anchored to the feet of the man on the cliff.
His body leaned back against the sky. It was a body of long straight lines and angles, each curve broken into planes. He stood, rigid, his hands hanging at his sides, palms out. He felt his shoulder blades drawn tight together, the curve of his neck, and the weight of the blood in his hands. He felt the wind behind him, in the hollow of his spine. The wind waved his hair against the sky. His hair
was neither blond nor red, but the exact color of ripe orange rind.
He laughed at the thing which had happened to him that morning and at the things which now lay ahead.
He knew that the days ahead would be difficult. There were questions to be faced and a plan of action to be prepared. He knew that he should think about it. He knew also that he would not think, because everything was clear to him already, because the plan had been set long ago, and because he wanted to laugh.
He tried to consider it. But he forgot. He was looking at the granite.
He did not laugh as his eyes stopped in awareness of the earth around him. His face was like a law of nature--a thing one could not question, alter or implore. It had high cheekbones over gaunt, hollow cheeks; gray eyes, cold and steady; a contemptuous mouth, shut tight, the mouth of an executioner or a
saint.
He looked at the granite. To be cut, he thought, and made into walls. He looked at a tree. To be split and made into rafters. He looked at a streak of rust on the stone and thought of iron ore under the ground. To be melted and to emerge as girders against the sky.
These rocks, he thought, are here for me; waiting for the drill, the dynamite and my voice; waiting to be split, ripped, pounded, reborn; waiting for the shape my hands will give them.
Then he shook his head, because he remembered that morning and that there were many things to be done. He stepped to the edge, raised his arms, and dived down into the sky below.
*******************
हॉवर्ड रोआर्क हसत सुटला.
कड्याच्या टोकाशी तो उघडाच उभा होता. त्याच्या समोर खाली खोलवर तळं पसरलं होतं. गोठल्याश्या वाटणार्‍या ग्रॅनाईटच्या असंख्य कपच्या सुरुंगानं आकाशात उधळून दिल्या, त्यांच्या पार्श्वभूमीलाही तळं स्तब्ध पसरलेलंच होतं. जणू पाणी नि:स्तब्ध झालेलं, आणि दगडालाच पंख फुटल्यासारखे वाटणारे. एखाद्या जीवघेण्या लढाईत तलवारी एकमेकींवर आपटून जिवाच्या आकांताने खणखणतात, तो क्षणाचा तुकडा अंतहीन भासत राहावा आणि त्या थबकलेपणानंच तलवारींच्या वेगाला झळाळणारं परिमाण द्यावं, तसंच ते चित्र. सूर्यप्रकाशात चिंब होत झळाळून उठलेला दगड.
खाली पसरलेलं तळं म्हणजे दगडांना दुभंगत जाणारं एखादं लोखंडी कडं होतं निव्वळ. दगडांची मुळं निर्विकारपणे जमिनीत खोलवर घुसत गेलेली. त्यांचे शेंडे आणि बुडखेही आभाळातच विरत गेलेले. अनादिअंत काळाच्या तुकड्यावर ओठंगून राहिलेल्या जगासारखं ते अधांतरी बेट - त्याची मुळं जणू कड्यावर उभ्या असलेल्या माणसाच्या पायांशी खोलवर गेली होती.
त्याचं शरीर आभाळाकडे झुकलं. लांबलचक रेषा, काही कोन आणि काही विसर्जित होत गेलेली वळणं यांनी बनलेलं ते शरीर. दोन्ही बाजूला हात मोकळे सोडून तो ताठ उभा होता. आपल्याच खांद्यांची आक्रसलेली ताठ पाती, मानेची गोलाई आणि हातांतून सळसळणार्‍या रक्ताची स्पंदनं त्याला स्पष्ट जाणवली. पाठीच्या पन्हळीला हलकेच स्पर्शून गेलेला वाराही. वार्‍यानं त्याचे केस उधळून दिले. करडे किंवा लाल नव्हेत; पूर्ण पिकलेल्या संत्र्याच्या सालीसारखे, नारिंगी.
त्या दिवशी सकाळी त्याच्या आयुष्यात घडलेली घटना आणि आता पुढे घडणार असलेल्या गोष्टींचं त्याला हसू आलं.
येणारे दिवस अवघड असतील हे त्याला ठाऊक होतं. काही प्रश्नांना सामोरं जायला हवं होतं, काही-एक योजना ठरवायला हवी होती. त्या सार्‍याचा नीट विचार करायला हवा, हे त्याला कळत होतं. त्याचबरोबर त्याला हेही ठाऊक होतं, की तो असा काही विचार-बिचार करणार नाहीय. कारण हे असं होणार हे खूप पूर्वीच ठरलेलं होतं, हे त्याला पक्कं ठाऊक होतं. शिवाय त्याला हसूही येत होतंच.
त्या सार्‍याचा विचार करायचा त्यानं प्रयत्न केला खरा, पण परत ग्रॅनाईटकडे लक्ष गेल्यावर त्याचे विचार भरकटले.
आजूबाजूच्या परिसराचं भान त्याच्या नजरेला येताच तो हसायचा थांबला. एखाद्या निसर्गतत्त्वासारखाच होता त्याचा दूरस्थ चेहरा - ज्याला कुणी कधी कसला प्रश्न विचारू शकत नाही, ज्याच्यात कुणी बदल घडवून आणू शकत नाही, ज्याच्यापाशी कुणी कसली आर्जवं करू शकत नाही - असा. उंच गालफडं, आत गेलेले गाल, राखी रंगाचे डोळे, निर्विकार-स्थिर चेहरा आणि जगाबद्दल तुच्छता दर्शवणारी, घट्ट मिटून घेतलेली जिवणी. अशी जिवणी एखाद्या संताची तरी असू शकली असती, नाहीतर मग एखाद्या डोंबाची तरी.
त्यानं ग्रॅनाईटकडे पाहिलं. त्याचे तुकडे होतील आणि मग त्यांतून भिंती उभ्या राहतील, त्याला वाटलं. झाडांकडे पाहिलं. त्यांचे वासे होतील. खालच्या दगडांतली एक हलकीशी गंजाची रेषा त्याला दिसली आणि त्याच्या डोक्यात जमिनीखालच्या लोखंडाचा विचार आला. हे लोखंड वितळवलं जाईल आणि त्याच्या तुळया होऊन आकाशात घुसतील.
ते दगड जणू माझ्यासाठीच तिथे थांबून राहिलेत, त्याला वाटलं. माझ्या हत्यारांची, सुरुंगाची, माझ्या इशार्‍याची वाट बघत. ते आता तुटतील-फुटतील, नवा जन्म घेतील. माझ्या हातांखाली नवा आकार घेतील.
मग सकाळची आठवण होऊन त्यानं डोकं झटकलं. अजून बर्‍याच गोष्टी करायच्या होत्या. कड्यापाशी जाऊन त्यानं हात उंचावले आणि खाली पसरलेल्या आकाशात सरळ सूर मारला.
*************************************************

श्रावण मोडक

श्रावण मोडक · गुरुवार, 15 Jul 2010 - 16:42

अनुवाद आवडला.
चुका दाखवायच्याच म्हणून नाही, पण (मला) खटकलेल्या दोन गोष्टी -
"...नीट माहीत..." असे एके ठिकाणी आहे. ते चुकीचे नाही. पण मराठीत त्याच्या जागी "पक्के ठाऊक" हे अधिक उचित वाटते.
"तुच्छतादर्शक विरक्ती दर्शवणारी" इथे काही गडबड होतीये. दर्शक आणि दर्शवणारी याची एक पंचाईत आहे. आणि मुख्यतः तुच्छतादर्शक विरक्ती म्हणजे काय हे कळत नाही.

मेघना भुस्कुटे

मेघना भुस्कुटे · गुरुवार, 15 Jul 2010 - 16:52 · उत्तर

दोन्ही गोष्टी मान्य.
पहिली मला तुमच्याइतकी खटकत नाहीये, पण सुधारणा आवडलीच.
दुसरी तर सपशेल मान्य. 'जगाबद्दल तुच्छता दर्शवणारी' असं भाषांतर चालेल का?

श्रावण मोडक

श्रावण मोडक · गुरुवार, 15 Jul 2010 - 19:29 · उत्तर

तिथं मुळात जिवणी हा शब्दही मला आत्ताच्या वाचनात खटकला. त्याऐवजी "जगाविषयीच्या तुच्छतेने ओठ मुडपलेले" असं केलं तर?
त्याच परिच्छेदात एके ठिकाणी पृथ्वी असा उल्लेख आहे. तोही मला पटत नाही. मराठीत बोलताना आपण सहसा पृथ्वी वगैरे वापरत नसतो. परिसर, आसपास असा शब्द तिथं उचित असावा.

मेघना भुस्कुटे

मेघना भुस्कुटे · Fri, 16 Jul 2010 - 04:36 · उत्तर

पण मग पुढच्याच ओळीत नामाची गरज आहे. 'अशी जिवणी एखाद्या....'मध्ये 'ओठ' हा शब्द विचित्र नाही वाटायचा? की आधीच्या ओळीत "जगाविषयीच्या तुच्छतेने ओठ मुडपलेले" ठेवायचं आणि पुढच्या ओळीतली 'जिवणी' तशीच ठेवायची?
'पृथ्वी'बद्दल तुमचं बरोबर आहे! मी बदल करते आहे.
हे करायला मला खूप मजा येते आहे, खरंच आभारी आहे. :)

आनंदयात्री

आनंदयात्री · Fri, 16 Jul 2010 - 05:53 · उत्तर

क्या बात् है !!
हा अनुवाद आणि संवाद दोन्ही वाचायला मजा आली. हापिसच्या भाषेत सगळ्यांसाठीच लर्निंग आहे.

बाकी या विभागाच्या कल्पनेबद्दल काही विचार असतील तर नक्की सांगावेत. धन्यवाद.

श्रावण मोडक

श्रावण मोडक · Fri, 16 Jul 2010 - 07:29 · उत्तर

नेमकेपणानं बोलायचं तर साधारणतः जिवणी ही लहानांच्या संदर्भात येते. अर्थात, हे माझं मत. ते चुकीचे असूही शकते. त्यामुळे जिवणी हा शब्द दोन्हीही ठिकाणी येणार नाही. पहिल्या वाक्यात ओठ आले तर दुसरीकडेही ओठच येतील. आणि तिथे एक छोटी गडबड मला वाटते. तिथं आपण ओठ यावर लक्ष केंद्रित न करता चेहरा या दृष्टीनं पाहिलं पाहिजे. इंग्रजीत वाक्याच्या संदर्भाची चौकट ओठ अशी असली तरी, आशय चेहरा असा आहे, असे माझे मत आहे. संत किंवा डोंब यांचे ओठ वगैरे वैशिष्ट्य जरा अधिक तपशीलाचं होतं आणि त्यामुळं अशक्य वाटतं. मराठीकरण करताना "जगाबद्दल तुच्छता दर्शवणारे घट्ट मिटून घेतलेले ओठ, चेहरा एखाद्या संतासारखा, नाहीतर एखाद्या डोंबासारखा तरी" असे करता येऊ शकते.
'पृथ्वी'चा बदल आता वाचताना खरंच मलाही आडला.
एकूण मजकुराच्या आकारमानात हे अगदी किरकोळ तपशील आहेत. नेमकेपणाकडं नेणारे. एरवी अनुवाद आधी म्हटलं तसं आवडलेला आहे.

मेघना भुस्कुटे

मेघना भुस्कुटे · Fri, 16 Jul 2010 - 08:49 · उत्तर

जिवणी हा शब्द फक्त लहानांच्या संदर्भात येतो? मला नाही असं वाटत.
पण तुम्ही म्हणता तसा बदल केला तरी आशयात काही फारसा फरक नाही पडणार. माझा या मुद्द्याबद्दल आग्रह असा काही नाही.

श्रावण मोडक

श्रावण मोडक · Fri, 16 Jul 2010 - 08:57 · उत्तर

आता पुढचा अनुवाद...?
जिवणीविषयी इथं कोणी स्पष्ट करेल काय? माझेही मत अगदी खात्रीलायक नाहीये. कारण वापरातील माझ्या अनुभवातून ते तयार झाले आहे. असेही होऊ शकते की, मी जिवणीचा तसा मोठ्यांच्या संदर्भातील वापर पाहिलेला नसावा.

ऋषिकेश

ऋषिकेश · Fri, 16 Jul 2010 - 07:36

पहिल्या परिच्छेदाचं वेगळ्या शैलीत रुप्पंतर देत आहे. हे शब्दशः भाषांतर नव्हे पण वेगळ्या शैलीत तोच परिच्छेद द्यायचा प्रयत्न. वेळे अभावी पूर्ण भाग टंकत नाहि आहे

हॉवर्ड रोआर्क हसला.
कड्याच्या टोकाशी तो उभा होता.. उघडाच... त्याच्या खोलवर खाली पसरलेलं तळं... स्तब्ध तळ्याच्या पाश्वभूमीवर, गोठलेले ग्रॅनाईटच्या असंख्य सुळके आकाशात फुटून झेपावल्यासारखे. स्तब्ध पाणी आणि दगड मात्र झेपावणारे, पंख फुटल्यासारखे. जीवघेण्या लढाईत तलवारी एकमेकींवर आपटून जिवाच्या आकांताने खणखणाव्यात आणि तो नेमका क्षणाचा तुकडा अंतहीन भासत राहावा - थबकावा- आणि त्या थबकलेपणानंच तलवारींच्या वेगाला झळाळणारं परिमाण द्यावं, तसंच ते चित्र.

मेघना भुस्कुटे

मेघना भुस्कुटे · Fri, 16 Jul 2010 - 08:47 · उत्तर

मस्त आहे. हे अधिक सहज वाटतं आहे. तू सगळा उतारा टंक की असा.

ऋषिकेश

ऋषिकेश · Fri, 16 Jul 2010 - 19:38 · उत्तर

हॉवर्ड रोआर्क हसला.
कड्याच्या टोकाशी तो उभा होता.. उघडाच... त्याच्या खोलवर खाली पसरलेलं तळं... स्तब्ध तळ्याच्या पाश्वभूमीवर, गोठलेले ग्रॅनाईटच्या असंख्य सुळके आकाशात फुटून झेपावल्यासारखे. स्तब्ध पाणी आणि दगड मात्र झेपावणारे, पंख फुटल्यासारखे. जीवघेण्या लढाईत तलवारी एकमेकींवर आपटून जिवाच्या आकांताने खणखणाव्यात आणि तो नेमका क्षणाचा तुकडा अंतहीन भासत राहावा - थबकावा- आणि त्या थबकलेपणानंच तलवारींच्या वेगाला झळाळणारं परिमाण द्यावं, तसंच ते चित्र. सूर्यप्रकाशात चिंब होत झळाळून उठलेला दगड.
खाली पसरलेलं तळं म्हणजे दगडांना दुभंगणारं निव्वळ पातळ लोखंडी कडं. दगड त्यात खोलवर घुसलेले, निश्चल. आभाळात सुरू होऊन आभाळातच संपणारे. असं ते जग अवकाशात तरंगल्यासारखं, शुन्यावर तरंगणार्‍या बेटासारखं भासत होतं - ज्याची मुळं जणू कड्यावर उभ्या असलेल्या माणसाच्या पायांना धरून ठेवत होती.
त्याचं शरीर थोडं मागे झुकलं. लांबलचक सरळ रेषा आणि कोनांनी बनलेलं - प्रत्येक रेषेला भरीवपणा देणारं असं रेखीव - असं ते शरीर. तो स्तब्ध उभा राहिला, दोन्ही बाजूला हात मोकळे, पंजा मोकळा. आपल्याच खांद्यांची आक्रसलेली ताठ पाती, मानेची गोलाई आणि हातांतून सळसळणार्‍या रक्ताची स्पंदनं त्याला स्पष्ट जाणवली. पाठीच्या पन्हळीला हलकेच स्पर्शून गेलेला वाराही. वार्‍यानं त्याचे केस उधळून दिले. केसांना रंग पिंगटाही नव्हता की लालही तर तो होता पूर्ण पिकलेल्या संत्र्याच्या सालीसारखा, नारंगी
त्या दिवशी सकाळी त्याच्या आयुष्यात घडलेली घटना आणि आता पुढे घडणार असलेल्या गोष्टींचं त्याला हसू आलं.
येणारे दिवस अवघड असतील हे त्याला ठाऊक होतं. काही प्रश्नांना सामोरं जावं लागणार होतं आणि एक ठोस योजना आखायला हवी होती. त्या सार्‍याचा नीट विचार करायला हवा, हे त्याला कळत होतं. त्याचबरोबर त्याला हेही ठाऊक होतं, की तो असा काही विचार-बिचार करणार नाही, कारण एकतर त्याच्यादृष्टीने सारं काही स्पष्ट होतं, योजना आधीच आखलेली होती आणि शिवाय त्याला भरपूर हसायची होतंच म्हणा.
त्या सार्‍याचा विचार करायचा त्यानं प्रयत्न केला खरा, पण परत ग्रॅनाईटकडे लक्ष गेल्यावर त्याचे विचार भरकटले.
आजूबाजूच्या अचेतन विश्वाचं भान येताच तो हसायचा थांबला. त्याच्या चेहरा म्हणजे निसर्गतत्त्वासारखाच होता - कोणीही प्रश्न न विचारू शकणारा, स्थितप्रज्ञ. उंच गालफडं, आत गेलेले गाल, घारे डोळे, थंड-निर्विकार चेहरा आणि जगाबद्दल तुच्छता दर्शवणारे, एकावर एक निश्चयाने घट्ट रोवलेले ओठ. असे ओठ एखाद्या संताचे असतात नाहितर डोंबाचे तरी.
त्यानं ग्रॅनाईटकडे पाहिलं. ह्याचे तुकडे करू आणि त्यातून भिंती उभ्या राहतील, त्याचा विचार चालु होता. त्याने झाडांकडे पाहिलं. ह्यांचे वासे होतील. खालच्या दगडांतली एक हलकीशी गंजाची रेष त्याला दिसली आणि त्याच्या डोक्यात जमिनीखालच्या पोलादाचा विचार आला. हे पोलाद वितळवून त्याच्या तुळया होऊन आकाशात घुसतील.
त्याचा विचार चालु होता, ते दगड जणू माझ्यासाठीच तिथे थांबून राहिलेत. माझ्या हत्यारांची, सुरुंगाची, माझ्या इशार्‍याची वाट बघत. ते आता तुटतील-फुटतील, नवा जन्म घेतील. माझ्या हातांखाली नवा आकार घेतील.
मग सकाळची आठवण झाली अन त्यानं डोकं झटकलं. शिवाय त्याला अजून बर्‍याच गोष्टी करायच्या होत्या. तो कड्याच्या टोकाशी गेला, त्यानं हात उंचावले आणि खाली पसरलेल्या आकाशात सूर मारला.

१. एकटाकी टंकलं आहे. टंकनदोष खरड्/व्यनीत कळवा.. दुरुस्त करतो
२. सुचना/अभिप्राय वेगळ्या प्रतिसादात लिहा (उपप्रतिसाद नको) म्हणजे बदल करता येईल

निखिल देशपांडे

निखिल देशपांडे · Fri, 16 Jul 2010 - 08:33

हे छान चालु आहे...
वाचायला मजा येत आहे. कोणी भाषांतर करण्यालायक काही पुस्तके ज्यांचे मराठी अनुवाद नाहीएत आणी ज्यांचा प्रताधीकार पण नाहीए अशा पुस्तकांची यादी देउ शकते का?? ईथेच आपण एक यादी बनवुयात का???

आनंदयात्री

आनंदयात्री · Sat, 17 Jul 2010 - 11:25 · उत्तर

अजून मुळ चर्चाविषयावर काही प्रतिक्रिया आलेलीच नाही.

श्रावण मोडक

श्रावण मोडक · Sat, 17 Jul 2010 - 09:11

आवडला अनुवाद.

मस्त कलंदर

मस्त कलंदर · Sat, 17 Jul 2010 - 16:47

ऋ आणि मेघना, दोघांचेही अनुवाद छान. आवडले. शब्दशः भाषांतरापेक्षा स्वैरानुवाद नेहमीच मला आवडतो. माझ्या मते मनोगतावर कुणीतरी फाउंटनहेडचे भाषांतर करायला सुरूवात केली होती. चार-पाच भाग आल्याचे मला आठवतंय. पण पुन्हा माझे लक्ष नसावं अथवा ती भाषांतरकार वेळेअभावी ते पूर्ण करू शकली नसावी. याबद्दल (हलकट म्हटले नाहीय.. लागले लगेच हायलाईट करायला)मनोगतीच जास्त ठामपणे सांगू शकतील.

@ मोडक, जिवणी हा शब्द एखाद्याचे मग तो मोठा /वृद्ध का असेना त्याचे वर्णन करताना वापरल्याचे मी वाचलेय. तो फक्त ओठ अशा संदर्भात न येता साधारणतः दातांची ठेवण्+ओठांचा आकार असा संयुक्त येतो.
उदा. मुलीचे वर्णन करताना: नाजूक, पातळ जिवणी
पुरूषाचे/मुलाचे वर्णन करता: रूंद जिवणी

आमच्या चार वर्षांच्या सहवासात मी माझ्या कुर्डूवाडीच्या मैत्रीणीला बोलीभाषेत यालाच "जेवणावळ" म्हणताना बर्‍याचदा ऐकलेय.

वेदश्री

वेदश्री · Sun, 18 Jul 2010 - 05:06 · उत्तर

फाउंटनहेडबद्दल जिज्ञासा माझ्या मनात मनोगती आनंदी म्हणजेच मंदारने निर्माण केली होती. त्यानेच मग मनोगतवर त्याबद्दल लेखन सुरू केले होते, जे अनेक कारणांनी बंद पडले. तो अक्षरशः जेव्हाही ऑनलाईन यायचा तेव्हा याच पुस्तकाचे गुणगान करत रहायचा. इ-पुस्तक तर त्याने मला पाठवलेच पण 'तू हे पुस्तक वाचायलाच हवेस! आयुष्य कसे जगावे याचेच एकप्रकारे मार्गदर्शन करणारे हे पुस्तक आहे..' असा इत्तका आग्रह केला की तो मोडायची माझी काय बिशाद लागून गेली होती?! घेतलेच मग हे पुस्तक वाचायला. एकदा कथानक लक्षात यायला लागले म्हणता मला अगदी झपाटल्यासारखेच झाले. पुस्तक वाचून संपल्यावरच उसंत घेतली मग मी. त्यानंतर जेव्हा परत ऑनलाईन भेटले मंदारला, तेव्हा , 'काय जबरी आहे रे फाउंटनहेड.. अग्गदी तंतोतंतच बोललेलास तू!' असे काहिसे उद्गार काढून मी गप्प बसले. यावेळी तोही गप्प होता.. कारण वेगळ्याने काही बोलायची जरूर पडावी असे काही नव्हते मग! ऑनलाईनदेखील भावभावनांचा मूक संवाद होऊ शकतो आणि त्याचेच प्रात्यक्षिक आम्ही करतोय का काय असेच वाटत होते मला.. कारण मला इतके काही सांगायचे होते त्याला की पुस्तक कसे वाटले काय वाटले वगैरेबद्दल पण कसं बोलू तेच समजणार नाही इतके सगळेच शब्द तोकडे वाटत होते! रॉर्क आणि कॅमेरॉन माझ्या अत्यंत आवडत्या व्यक्तीरेखांमधल्या व्यक्तीरेखा आहेत. या पुस्तकाचा तितकाच कसदार अनुवाद झाला तर मला अत्यंत आनंद होईल (माझ्याकडे असे बघू नका.. माझी अजिबात लायकी नाही अनुवाद करायची किंवा केलेले तपासायचीदेखील!) कारण मग हे पुस्तक आईलादेखील वाचता येईल ना!

मस्त कलंदर

मस्त कलंदर · Sun, 18 Jul 2010 - 10:24 · उत्तर

मी पुष्कळदा ठरवूनही ही कादंबरी संपवू नाही शकलेय. असो. पण तुकड्या-तुकड्यातून कथानक माहित आहे.. माझा एक आर्किटेक्ट मित्र तिचे इतके गुणगाण करायचा की शेवटी मी त्याला आता बास्स म्हणून सांगितले एकदा!!! :)
कादंबरी पूर्ण वाचली नाही तर निदान चित्रपत पाहू म्हणून पाहायला घेतला, पण खरं सांगायचं तर थोडासा अपेक्षाभंगच झाला.. तो खुप जुना म्हणजे ४९ चे चित्रण. त्यामुळे बराचसा संथ तर होताच.. आणि काही व्यक्तिरेखा नीट फुलल्या नाहीत, अथवा दोन तासांत सगळेच बसवणं शक्य नसल्याने बरेचसे बारकावे जे मूळ कादंबरीत अतिशय छान आहेत ते इथे हरवले असे वाटले.
कादंवरीतले सगळेच तपशील जरी लक्षात नसले, तरी मूव्ही बनवताना सिनेमॅटिक्लिबर्टीही पुष्कळ घेतलीय असे वाटले. अर्थात त्यांनी शेवट मात्र कादंबरीबरहुकूम केलाय हे मात्र खरं.

टण्या

टण्या · Sun, 18 Jul 2010 - 11:08 · उत्तर

फाउंटनहेड चित्रपटाबद्दल खूप वादविवाद आहेत.. अ‍ॅनने पण तो चित्रपट बनवताना बरेच ऑटोक्रॅटिक निर्णय घेतले व बट्ट्याबोळ वाजला असे म्हटले जाते..

फाउंटनहेडवर स्वतंत्र लिहायला लागेल :) नवा धागा उघडुया का? वेगवेगळ्या वयात वेगवेगळ्या प्रकारे हे पुस्तक भावले आहे (पहिल्या वाचनात इंजिनीअरींगला असताना मात्र जो प्रभाव पडला होता तो नंतर कमी कमी होत गेला).. मला त्यातली सर्वात सशक्त व्यक्तिरेखा (लेखनाच्या दृष्टीने) वाटते ती 'एल्सवर्थ टूही'

मस्त कलंदर

मस्त कलंदर · Sun, 18 Jul 2010 - 12:09 · उत्तर

नवा धागा चालेल.. इथले भाषांतर कधी पूर्ण होईल ते माहित नाही.. पण पुविला इंग्रजी पुस्तकांचे काही वावडे ही नाही.. मला स्वतःला पुस्तकाच्या १०%ही परिणाम चित्रपटाचा जाणवला नाही.. हिरो गॅरी कूपर तर अगदी म्हातारा होता.. त्यातल्यात्यात हिरॉईन बरी होती.. पण एकूणातच किटिंग/निटिंग, टूही या व्यक्तिरेखा जशा पुस्तकात भेटतात तशा पिक्चरमध्ये नाही प्रभाव पाडू शकल्या..
आणि त्याही पुढे जाऊन मला रोर्कचा त्याच्या ठरवलेल्या डिझाईननुसार नाही, म्हणून आख्खी बिल्डिंग पाडली, हे बरोबर की चूक यावरही चर्चा झालेली आवडेल.. शेवटी हा विचार एका लेखकाने मांडला होता.. आणि पुस्तकाबद्दल चर्चा करताना लेखकाच्या मांडलेल्या विचारांवर आपण नक्कीच काथ्याकूट करू शकतो.

निखिल देशपांडे

निखिल देशपांडे · Mon, 19 Jul 2010 - 18:14

मुख्य धाग्याचा प्रस्तावावर प्रतिसाद देणे राहुनच गेले होते...
आनंदयात्री ने एक चांगला प्रस्ताव मांडला आहे आणि त्याला मी माझे अनुमोदन देत आहे.

पुस्तकविश्व वर एक विभाग असावा जिथे अनेक सदस्य एकाच वेळेस एका पुस्तकाचा वेगवेगळया भागाचे अनुवाद करु शकतील. एखादा सदस्य ज्या भागाचा अनुवाद करत आहे, तो भाग इतर सदस्य फक्त वाचु शकतील आणि प्रतिसादातुन सुचना/बदल सांगु शकतील.

परवाच आपण मिसळपाव वर असाच एक प्रयोग केला ज्यात फिडे ची चेस च्या नियमावलीच्र ८-१० सदस्यांनी मिळुन भाषांतर केले आहे. भाषांतर पुर्ण होत आले आहे. त्याची पिडिएफ पुस्तिका बनवायचे काम चालु आहे.

प्रत्येक पुस्तकामागे एक प्रवर्तक असेल ज्याची जवाबदारी त्या पुस्तकाचे भाषांतर पुर्ण करुन घेण्याची असेल. तसेच सर्व सदस्यांमधे एकसुत्रता यावी यासाठी या सदस्याने (प्रवर्तकाने) सुरवातिलाच इतरांशी विनिमय करुन नियम ठरवुन घ्यावेत. संपुर्ण पुस्तक अनुवादीत झाल्यानंतर एखाद्या सदस्यास आपण संपादक म्हणुन नेमु शकतो जो या संपुर्ण पुस्तकावर शेवटचा संपादनाचा हात फिरवु शकेलच. त्या नुसार शेवटी हे पुस्तक पुस्तक्विश्व सदस्यांद्वारे ईथेच विविध स्वरुपात प्रकाशित केले जाउ शकते.

याच सोबत एखाद्या सदस्यास संपुर्ण पुस्तकाचा अनुवाद करायचा असल्यास तशी सोय पण उपलब्ध करुन देता येउ शकते. फक्त ते पुर्ण व्हावे यासाठी ईतर सदस्यांनी लक्ष घालणे गरजेचे आहे ;)

या प्रकल्पाचा समन्वयक अर्थातच आनंदयात्री असेल. त्याला विनंती आहे की हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी एखादे छोटे पुस्तक निवडुन सुरवात करावी.

माया ज्ञानेश

माया ज्ञानेश · Tue, 20 Jul 2010 - 08:28

मी डच बालकथांचा अनुवाद करत आहे. त्या इथे देऊ का?

आनंदयात्री

आनंदयात्री · Wed, 21 Jul 2010 - 20:09 · उत्तर

नक्की नक्की. त्यात विचारायचे काय ?

माया ज्ञानेश

माया ज्ञानेश · गुरुवार, 22 Jul 2010 - 09:48 · उत्तर

मूळ डच कथा पण टंकू ? हे वर इंग्रजीत टंकलय तसे ??

मजा येतेय ते वाचायला. मस्त उपक्रम होईल हा.

माया ज्ञानेश

माया ज्ञानेश · Tue, 3 Aug 2010 - 21:58 · उत्तर

खूप कंटाळा येतोय डच टंकून पुन्हा मराठी टंकायचा.. :) नुसते अनुवाद लिहितेय !
टण्या, तुम्हाला पण डच येतं ?

ऋषिकेश

ऋषिकेश · Tue, 20 Jul 2010 - 12:42

एखाद्या संपूर्ण ललित पुस्तकाचे भाषांतर करायचे तर ते एकाने करावे असे वाटते. नाहितर शैलीत सतत बदल खटकेल. संपादकाने हात फिरवण्याऐवजी सगळे पुन्हा लिहिल्यासारखे होईल. इतर पुस्तके (जसे ऐतिहासिक, संदर्भग्रंथ) मात्र अनेकांनी मिळुन भाषांतरीत करता येतील

असो. मी सध्या सराव म्हणून काहि उतारे भाषांतरीत करून बघतो आहे. कालच पाकिस्तानच्या डॉन वृत्तपत्रातील एक लेख इथे मुळ लेखकाच्या परवानगी घेऊन भाषांतरीत केला आहे.

जेव्हा पुस्तक भाषांतरीत करण्याइतका वेळ व सहजता येईल तेव्हाच एखाद्या पुस्तकाला हात लावेन म्हणतो. तोपर्यंत कोणाला भाषांतरासाठी मदत हवी असेल तर कळवावे नक्की करेन

वेदश्री

वेदश्री · Tue, 20 Jul 2010 - 14:01 · उत्तर

<ऋ>एखाद्या संपूर्ण ललित पुस्तकाचे भाषांतर करायचे तर ते एकाने करावे असे वाटते. नाहितर शैलीत सतत बदल खटकेल. संपादकाने हात फिरवण्याऐवजी सगळे पुन्हा लिहिल्यासारखे होईल. < /ऋ>

अग्गदी हेच म्हणायचे होते मला.

वेदश्री

वेदश्री · Tue, 20 Jul 2010 - 13:59

प्रकल्पाला शुभेच्छा!

मेघना भुस्कुटे

मेघना भुस्कुटे · Wed, 21 Jul 2010 - 16:04

माझ्याही प्रकल्पाला शुभेच्छा. (माझ्या आरंभशूर स्वभावाला अनुसरून माझा उत्साह ओसरला आहे, हे वेगळे सांगणे न लगे!)

वेदश्री

वेदश्री · गुरुवार, 22 Jul 2010 - 07:13 · उत्तर

<मेघना> माझ्या आरंभशूर स्वभावाला अनुसरून माझा उत्साह ओसरला आहे, हे वेगळे सांगणे न लगे! < /मेघना>

असं अजिबात चालणार नाही. उत्साहाला ओहोटी लागते तशी भरतीही येतेच की.. त्या भरतीच्या काळात तरी का होईना अनुवाद तो तुमको करनाच पडींगा, मामू! मी सुचवू का एखादे छोटे पुस्तक?

वेदश्री

वेदश्री · गुरुवार, 22 Jul 2010 - 07:17

आईने वाचावे म्हणून मी रॉबिन कुकच्या फिव्हरचा अनुवाद अर्ध्यापर्यंत केलाय पण मध्येच हापिसातले प्रोजेक्ट पेटल्याने खंड पडला आणि परत हाती घेतले तेव्हा कथानकाचा सूर पक्का समजून घेण्यासाठी मीच माझा अनुवाद परत वाचला आणि अनुवाद मेरे बसकी बात नहीं म्हणून ठेवून दिलं ते फसलेलं कलाबूत बाजुला. असो.

आता मी एखाद्या लोकरीच्या विणकामाच्या पुस्तकाचा अनुवाद करावा म्हणतेय. आटोपशीर आणि अगदी मन रंगून जाईल असे काम होईल हे माझ्यासाठी. शिवाय अनुवाद करण्याअगोदर मूळ कलाकृती चुकीची दिलेली नाही ना हे तपासण्यासाठी विणकामही होईल ते वेगळेच! असे एकेक विणकामाचे नमुने इथे अनुवादीत करुन टाकले तर चालतील का? कुठल्या विभागात टाकायचे?

स्वाती

स्वाती · गुरुवार, 22 Jul 2010 - 13:52

टण्या, प्लीज प्लीज नवा धागा उघडा ना फाउंटनहेड साठी. मागे मी मायबोलीवर सुद्धा तुम्हाला विनंती केली होती.
हे फाउंटनहेड जबरदस्त डोक्यात जाउन बसल होत. वाइइट्ट त्रास झाला तेव्हा कोणी आजुबाजुला पण अस नव्हत ज्याच्या बरोबर या पुस्त्काची चर्चा करता येइल आता खुळ उतरलय तरी पण परत वाचायला सुरुवात केली पाहिजे. या रँड बाईंचे अ‍ॅटलास श्रग्ड राहिलेय वाचायचे.

अनुवाद छान चाललाय. बायदवे या फाउंटनहेडचा "शिखर" म्हणुन कोणी मराठीत अनुवाद केला आहे का? मागे कुठे ते आठवत नाहीये पण शिखर हातात पडल होत पहिली पान चाळुन पाहिल्यावर कळल की हा तर फाउंटनहेडचा अनुवाद. पण मी बाकिचे काही वाचु नाही शकले त्या अनुवादीत पुस्तकावरचे.

अदिती

अदिती · Fri, 23 Jul 2010 - 07:26

फाऊंटनहेड आणि अनुवाद हे दोन्हीही माझ्या प्रचंड जिव्हाळ्याचे विषय असल्यामुळे या चर्चेत भाग घ्यायची इच्छा असूनही इतके दिवस संयम पाळला होता. कारण एकच - ते म्हणजे या विषयावर जरा वेळ काढून लिहायचं आहे. पण प्रयत्न करूनही तसा वेळ मिळेना तेंव्हा लहान प्रतिसादावर तहान भागवून घेते.

फाउंटनहेड आजवर अनेक वेळा वाचलंय. प्रत्येक वेळा त्याचे वेगळे रंग दिसले आहेत.
इथले दोन्हीही अनुवाद अनुवाद म्हणून सुंदर झाले आहेत. व्यक्तिश: मला ऋ चा अनुवाद जरा जास्त आवडला.
तरीही असं म्हणावंसं वाटतं की 'फाउंटनहेड' मधून त्याची वैशिष्ट्यपूर्ण भाषा काढून टाकली तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं. अर्थात यात अनुवादकाचा दोष नाही.
या चर्चेची कल्पना मात्र सुंदर आहे. खूपच आवडली. ज्यांचा कॉपीराईट संपला आहे अशा पुस्तकांमधल्या लघुकथांचं भाषांतर एक प्रकल्प म्हणून इथे करता येईल का? भाषांतर करणार्‍याला मजा येईल आणि वाचकांना तर काय मेजवानीच!
बाय द वे, फाउंटनहेड याकांदंबरीच्या एकाच परिच्छेदाचा अनुवाद अनेक जणांनी करायचा ही एक 'हाईट ऑफ ईंडिव्हिज्युअ‍ॅलिझम' आहे अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया एका मैत्रिणीने दिली. ती फारच बोलकी आणि नेमकी असल्यामुळे इथे देण्याचा मोह आवरला नाही.
याच पुस्तकातल्या आपल्याला आवडलेल्या परिच्छेदांचा अनुवाद इथे लिहिता येईल असेही वाटले. मला जमेल तेंव्हा रोआर्कच्या कोर्टातल्या भाषणाचा अनुवाद करायला आवडेल. कधी जमेल हे मात्र सांगता येणार नाही.
या चर्चेबद्दल मनःपूर्वक आभार आणि अनुवादकांना शुभेच्छा!

अदिती

चर्चा प्रकार