- Log in to post comments
मला न आवडलेलं पुस्तक म्हणजे : बाकी शून्य.
पुस्तकाचा विषय तसा सर्वश्रुत आहेच. एक तरूण, त्याचे लहानपण, पौगंडावस्था, कॉलेजजीवन नि नंतर उमेदवारीचे-नोकरीचे दिवस.. नि यात मालमसाला म्हणून कंटाळा, कंटाळ्याचा कंटाळा, दारू, भकाभका सिगरेट्स, मुली/बायका आणि त्यासंबंधीचे मुलांचे संभाषण, अर्वाच्य भाषा.. सतत येणारे 'झ'कार... आणि हे सगळं कमी की काय म्हणून निरर्थक तत्वज्ञान..
एखादे पुस्तक का आवडत नाही याची बरीच कारणे असू शकतात.. विषय न आवडणं, विषय आवडूनही त्याची मांडणी , सादरीकरण न आवडणं, भाषा न आवडणं!!!आता हे पुस्तक न आवडण्याचे कारण काय म्हणून सांगू??? काहीतरी तरी असायलाच पाहिजे.. तर पहिले आणि मोठे कारण म्हणजे: डोक्याला त्रास देणारे नि पानोपानी छळणारं तत्वज्ञान. पुस्तकभर 'भ', 'ल' ,'चु' आणि 'झ' काराशिवाय काही नाही.. तसे पाहायचं तर आत्मचरित्रपर पुस्तक आहे.. काही ठिकाणी विदारक, अत्यंत हेलाऊन टाकणारं आयुष्यात घडतही असेल, पण प्रत्येक वेळेस ते अशाच शब्दांत मांडायला पाहिजे असेच नाही.. या लेखकाला आपण का जगतोय, नोकरी का करायची वगैरे वगैरे आत्मपरिक्षणात्मक प्रश्न पडतात..ते तो सगळीकडे विचारत राहतो... पण ते विचार मांडून तो काय साधतो? काही नाही. नुसते प्रश्न उपस्थित करतो. बर्याचदा त्याला परिस्थितीपासून पळ काढायचाय (उदा. मृणालशी पहिल्यांदा संबंध येतात तो प्रसंग किंवा त्याला नवी नोकरी ऑफर केली जाते तो प्रसंग). बरे, ते विचार एका मार्गाने जातात का? ते ही नाही.. सगळ्या बाजूंनी घडलेल्या घटनेची कंटाळवाणी मीमांसा करत लेखक मध्येच कुठेतरी आपल्याला सोडून देतो. ठीक आहे, एखाद्याच्या मनात एकाच घटनेबाबत किती नि कसे कसे विचार येतात हेच जर दाखवायचेय, तर त्याला कधीतरी काहीतरी मानसिक बैठक तर असायला हवी. ते ही नाहीय. त्याच्या विचारातून त्याला स्वत:ला स्वतःपुरताही काहीही कधीही निष्कर्ष निघत नाही. तो स्वतःकडे काही कमीपणा घेत नाही.. काहीतरी चुकतेय पण तो चुकत नाही असे त्याला एकाच वेळी आणि नेहमीच वाटते. त्यामुळे ते सारे विचार भंपक , दांभिक, एकांगी, वरवरचे , बिनबुडाचे(आणखी कुणाकडे असले काही शब्द असतील तर उसने द्या रे..) वाटतात.
उदा. पुन्हा एकदा वरचाच प्रसंग. मृणालचा. असे घडून गेल्यानंतर एकतर अपराधी वाटेल किंवा जे झाले ते झाले, निभावून नेऊ असे वाटेल. पण यांचे त्यावरचे विचार(लग्न म्हणजे काय? लग्नसंस्था म्हणजे काय? मृणाल तिच्यावर संयम राखू शकली नाही... मग योनीशुचिता ती कसली... आणि परत असेच वाहात जाणारे शब्द) वाचून कुणाला जन्मात लग्न करण्याची इच्छा होईलसे वाटत नाही.. आणि निकिता की आणखी कोणाबरोबरच्या तरी संबंधानंतरचा निष्कर्ष म्हणजे सगळ्यावर कडी आहे.. "प्रत्येकाने लग्न करावे.. होता होईल तितके जोडीदारासोबत प्रामाणिक राहावे. शक्य नसेल तेव्हा प्रत्येकाने वेगळा जोडीदार शोधावा नि व्यभिचार करावा.. एकूणच काय बहु*वित्व ही समाजाची गरज आहे" हे वाचल्यानंतर मी कपाळावर हात मारून घेतला...
वरचा प्रकार म्हणजे मनात येणारे विचार. आता त्याचे इतरांसोबतचे संभाषण पाहू. त्याचे सगळेच मित्र दिसणार्या बायकांच्या अवयवांबद्दल बोलतात. काही नुसतेच संबंध ठेवण्याबाबत बोलतात, काहींची संबंध ठेवण्यापर्यंत मजल जाते, आणि ते त्या बायका शेअर करायलाही तयार असतात. बाकी राहिलेले संभाषण म्हणजे, उगीच अश्लाघ्य भाषेत समोरच्याला प्रश्न विचारले की तो पुढे काही बोलत नाही अशा छापाचे आहे.. असे बोलले की ऐकणाराच कानकोंडा होतो.. काही उत्तर देत नाही. मग हा असाच सारखा बोलत राहातो. उदा. त्याला मनःशांतीसाठी कुणीतरी गाईला नमस्कार करायला सांगतो.. मग हा विचारतो," ती गाय नैसर्गिक विधी करत असेल तरी करायचा का?" उत्तर हो येते. मग म्हणतो, "गायच कशाला हवी? आपल्या संस्थानाचा हत्ती फळाफळा मुतत आणि फदाफदा हगत गांवभर उंडारत असतो, त्यालाच नमस्कार करतो.." समोरचा यावर काय बोलणार, कप्पाळ? तो निश्चितच गप्प बसतो. असे झाले की मग लेखकाला कंटाळा येतो.. मग कंटाळ्याचाही कंटाळा येतो.. मग तो भसाभस सिगरेटी फुंकतो नि दारू ढोसतो.. ही जर कंटाळ्याची, दारू सिगरेटची तत्त्वज्ञानाची, भ/झ/ल/चु काराची वाक्ये पुस्तकातून काढली, तर पाचशेवीसातली दहा पानेही शिल्लक राहणार नाहीत..
स्वतःच्या देखणेपणाचं कौतुक तर सगळीकडे ओसांडून वाहतं. माणून पहिले आणि आत्यंतिक प्रेम स्वतःवरच करतो हे जरी मान्य असले तरी, किती म्हणून कौतुक ते करायचे? आणि म्हणून पुस्तकात उल्लेख केलेल्या प्रत्येक मुली/अथवा बाईला याच्याकडून शरीरसंबंधाची इच्छा असते.(यात तो पाचवीत असतानाची एक सातवीतली शेजारीण येते, त्याची चुलत की मावस अशी बहीण येते नि बाकी भेटलेल्या निराळ्याच.) एक दोघी असतील एक वेळ पटलं असतं.. पण प्रत्येकजण???? कठीण आहे. आणि हो, त्या ते बिन्धास्तपणे बोलूनही दाखवतात.. बर्याचजणी त्याच्याकडून ती इच्छा पूर्ण करूनही घेतात. अपवाद फक्त एकच, निशा. कारण तिच्यावर हा एकतर्फी लाईन मारत असतो आणि तिच्या खिजगणतीतही नसतो.
भाषेच्या पलीकडे जाऊन थोडासा विचार केला. एका तरूणाच्या जीवनात काय काय घडू शकतील असे प्रसंग(काही अतिशयोक्तीपूर्ण सोडले तर) आहेत. पण कोसला पार्ट-टू म्हणण्याइतके यात काही आहे असे मात्र वाटत नाही. आणि कितीही प्रयत्न केला, तरी वरती लिहिले आहे त्या पलीकडे काही सापडत नाही.. लेखकाचा मुख्य प्रॉब्लेम काय आहे हेच कळत नाही.. कंटाळा?? बायका???? ध्येय सापडत नाही??? जग मिथ्या आहे??? जाऊ दे.. त्याचे त्यालाच माहित नाही तर मी का डोके खपऊ???
लेखकच्याच भाषेत सांगायचे झाले तर पुस्तक वाचून डोक्याची झेडझेड झाली..
(खरंतर पुस्तक वाचून माझा शब्दकोष बराच समृद्ध झाला.. या पुस्तकाबद्दल त्याच भाषेत लिहावे असेही एकवेळ वाटले होते.. पण आपण एक आपल्या पायावर कुर्हाड मारून घेतली, त्यात इथल्या वाचकांचा दोष काय , म्हणून तो विचार बाजूला ठेवला.. :) )
अभिप्राय
निखिल देशपांडे
निखिल देशपांडे · Mon, 21 Jun 2010 - 15:58
चला या विभागाची सुरवात याच पुस्तकाने झाली यात कोणतेही आश्चर्य ते उरले नाही....
यावर सविस्तर प्रतिसाद तर देउच पण सुरवात म्हणुन कोसला सोबत तुलना करण्यालायक पुस्तकात काही खास नाही असे म्हणावेसे वाटते. बाकी सविस्तर आम्हाला डॉनरावांना उपप्रतिसाद म्हणुन लिहावेच लागेल ;) असो तोपर्यंत ही पोहच समजावी
आनंदयात्री
आनंदयात्री · Mon, 21 Jun 2010 - 19:35
हेच हेच !!
>>स्वतःच्या देखणेपणाचं कौतुक तर सगळीकडे ओसांडून वाहतं. माणून पहिले आणि आत्यंतिक प्रेम स्वतःवरच करतो हे जरी मान्य असले तरी, किती म्हणून कौतुक ते करायचे? आणि म्हणून पुस्तकात उल्लेख केलेल्या प्रत्येक मुली/अथवा बाईला याच्याकडून शरीरसंबंधाची इच्छा असते.(
अतिरेक आहे !
शेवटी पुस्तकामागे फोटु छापुन घेतलाय स्वत:चा !!
अत्यंत भुक्कड पुस्तक आहे. कोसला वैगेरेशी तुलना म्हणजे मार्केटिंग पॉलिसी आहे हो.
छोटा डॉन
छोटा डॉन · Mon, 21 Jun 2010 - 20:13
माफ़ी असावी.
हा लेख ’मला न आवडलेले पुस्तक’ ह्या प्रकारातला आहे हे खरोखर माझ्या लक्षात आले नव्हते. मला ते ’ओळख किंवा परिक्षण’ वाटले म्हणुन मी एवढे दिर्घ लिहले.
त्यामुळे सदर प्रतिसाद इथे अप्रस्तुत ठरतो व मी तो मागे घेत आहे.
केवळ एका नजरचुकीने आलेल्या प्रतिसादाने ’संकेतस्थळाच्या साहित्यप्रकार’वर गोंधळ नको असल्याने मी संपुर्ण प्रतिसादच मागे घेत आहे.
लेख ’मला न आवडलेले पुस्तक’ ह्या प्रकारातला असल्याने त्यावर अजुन काही मत व्यक्त करण्यासारखे रहात नाही.
ह्याच पुस्तकाची ओळ्ख किंवा परि़क्षण आल्यावर ह्यावर लिहु.
तुर्तास तसदीबद्दल क्षमस्व !
- ( दिलगीर ) छोटा डॉन
निखिल देशपांडे
निखिल देशपांडे · Mon, 21 Jun 2010 - 20:34 · उत्तर
छोटा डॉन आपला प्रतिसाद संपादित केल्याने हाही प्रतिसाद संपादित.
डॉनरावांनी त्यांना हे पुस्तक का आवडले ते इथेच लिहावे ही त्यांना जाहीर विनंती.
मस्त कलंदर
मस्त कलंदर · Mon, 21 Jun 2010 - 20:59
अप्रस्तुत भाग संपादित.
अरे हो.. पण ती भाषा कितपत अंगावर यावी याला काही मर्यादा??? माझी भाचरे माझ्याइतकीच पुस्तकवेडी आहेत. त्यांच्या हाताला या वयात हे पुस्तक लागले तर ती किती समृद्ध होतील याची कल्पनाच नको करायला. नि मला सांगा, हा माणूस 'झेड्झेड' नि 'बहु**त्व' सारखे किती नवीन शब्द कॉईन करतो??? आणि ते कितीदा वापरतो? पुस्तकात सतत तेच तेच वाचण्याचा कंटाळा येतो. थोडं व्यक्तिगत होईल, पण तू स्वतः जितक्या वेळा हे पुस्तक वाचले असशील, त्यातल्या किती वेळा त्याचे तत्वज्ञान वाचले आहेस ते जरा सांगशील का? एकाच गोष्टीचा सतत मारा केल्याने तिचा कंटाळा येतो हे गणपाच्या मुलीला पण कळतं. पण..... जाऊ दे.
हे माझे स्वतःचे सरसकटीकरण नाही. मी उदाहरण दिले आहे त्यानंतरच्या प्रसंगानंतरच्या लेखकाने लिहिलेल्या उतार्यातलाच शब्द आहे. हवे असल्यास पान नं शोधून सांगते. (त्यासाठी पुन्हा एकदा पुस्तक चाळावे लागेल, नि त्याची बिल्कुल इच्छा नाही)
एकच उदाहरण देते. एका ठिकाणी बॉस त्याला काहीतरी सांगत असतो, तेव्हा त्याला, "ए **डू, ----" म्हणून हा उत्तर देतो. आता बॉसला या भाषेत बोलायचे असते हे मला माहित नव्हते. मी पण प्रसंगानुरूप शक्य झाल्यास असे बोलायचा प्रयत्न करते. ;) आणि शारिरीक संबंधांबद्दल जर तो दोन पानांचे डोक्यावरून जाणारे काहीतरी ठोकून नंतर 'बहु**त्व' समाजाची गरज म्हणतो, हे वाक्य तुम्हाला तरी पटते का?
मी केली नाही. आतापर्यंत जेव्हा या पुस्तकाबद्दल वाचले, तेव्हा पहिली प्रतिक्रिया हीच ऐकायला मिळते की, कोसला-२ करण्याचा प्रयत्न केला आहे.. त्यानंतरची ,फसला आहे की जमला आहे, ही प्रत्येकाची वैयक्तिक मते असतात.
अगदीच नाही.. पण भडकपणे रंगवलीय यावर मात्र मी ठाम आहे. इतकेपण मोकळेचाकळे लिहू नये अशा मताची मी आहे..
तुमच्या दीर्घ प्रतिसादाच्या प्रतिक्षेत,
मक
आनंदयात्री
आनंदयात्री · Tue, 22 Jun 2010 - 05:19 · उत्तर
>>अगदीच नाही.. पण भडकपणे रंगवलीय यावर मात्र मी ठाम आहे. इतकेपण मोकळेचाकळे लिहू नये अशा मताची मी आहे..
अगदी बरोबर, सर्वसामान्य मराठी माणुस असाच म्हणेल, मी सहमत आहे.
बाकी काही शंका:
मराठीला हा प्रयोग नवीन आहे का ?
वैयक्तिक आयुष्य 'मोकळे' पणे मांडणारे मेघना पेठें इत्यादी प्रभुती आहेत की ! की मग त्यांत कोणते उजवे वाटते ?
'बाकी शून्य' हा प्रयोग कितपत यशस्वी होता ?
आनंदयात्री
आनंदयात्री · Tue, 22 Jun 2010 - 05:13
प्रति डॉन आणि मकी-
डॉनचा प्रतिसाद मी वाचण्याआधीच संपादित झालेला असल्याने तो मी वाचला नाही. अर्थातच वाचायला आवडेल.
त्याचा प्रतिसाद संपादित झाल्यामुळे मकीनेही तिच्या प्रतिसादातील अनावश्यक भाग वगळावा ही विनंती.
जसे मकी मला न आवडलेले पुस्तक असे लिहु शकते तसे डॉन तुम्ही मला आवडलेले पुस्तक म्हणुनही एक वेगळा धागा सुरु करु शकता.
जाता जाता, पुविवरचे सर्व 'व्यवस्थापक सदस्य' लिखाण-प्रतिसाद इत्यांदींमधे सदस्य म्हणुनच वावरतात याचा मला पूर्ण विश्वास आहे.
धन्यवाद.
ऋषिकेश
ऋषिकेश · Tue, 22 Jun 2010 - 06:39
आला रे आला!!!! बहुप्रतिक्षित परिचय आला
वाटच बघत होतो या परिक्षणाची.. पुस्तक वाचलेले नाहि कारण नुकतेच लायब्ररीतील काहि मित्रांनी + मैत्रिणींनी कोसलाशी तुलनाही करायच्या लायकीचे नाहि असा शेरा दिला.
अर्थात स्वतः पुस्तक वाचलेले नसल्याने स्वतःचे असे काहिच मत नाहि. पण एकुणच हे पुस्तक "यु कॅन लाईक इट ऑर हेट इट बट कान्ट इग्नोऽर इट" या वर्गातील दिसतंय.. तेव्हा आता मिळाल्यास वाचेन म्हणतोय.
-ऋ
३_१४ अदिती
३_१४ अदिती · Tue, 22 Jun 2010 - 08:54 · उत्तर
ऋशी सहमत आहे. आधीही घडलेल्या अनेक चर्चांमधून या पुस्तकाबद्दल कुतूहल होतेच आता आणखी वाढले आहे.
काहीसे अवांतरः किती शिव्या किंवा अपशब्द असतील तर ते सह्य असतात हा व्यक्तीगत प्रश्न आहे. एखादीला एक अपशब्दही खपवून घेता येणार नाही तर काहींच्या बोलण्याची सुरूवातच शिव्यांनी होईल.
मस्त कलंदर
मस्त कलंदर · Tue, 22 Jun 2010 - 08:09
परिचय आणि परिक्षणे सगळीकडेच येऊन गेली; पण पुस्तक का आवडले नाही हे थेट इथेच लिहिता आलंय आणि लिहिलंयही. तेव्हा डॉनरावांनी परिचय परिक्षणाची वाट न पाहत पुस्तकात काय चांगले आहे हे दाखऊन द्यावे. त्यांचे काही मुद्दे मी स्वीकारेन, माझे काही मुद्दे ते स्वीकारतील. आहेच काय त्यात?
तेव्हा म्यान केलेली लेखणी बाहेर काढा, आणि होऊन जाऊ दे.
@ आनंदयात्री: एका प्रतिसादास उपप्रतिसाद दिल्यास तो सामान्य सदस्यास संपादित करता येत नाही. (जाऊ दे, इथे त्यावर खवचटपणे काही लिहित नाही)