धोक्याची सूचना

मेघना भुस्कुटे

मजकूर

पुस्तकविश्वचे उपक्रम होते आहे काय?
'चर्चा आणि मतभेद' आणि 'एखाद्या गोष्टीचा विनाकारण कीस काढणे' या दोन गोष्टींतला फरक आपण सारे जण ओळखून आहोत. आपण ही मर्यादा वारंवार ओलांडत तर नाही आहोत ना? पुस्तके हा आपल्या सगळ्यांच्या प्रेमाचा विषय यात झाकोळून तर जात नाही ना?

अभिप्राय

स्पिन डॉक्टर

स्पिन डॉक्टर · Wed, 1 Dec 2010 - 06:00

हा विचार इंद्रराज पवार यांनी करायला हवा होता. माझा कार्यभाग उरकलेला आहे. हवे तर, बिका यांच्याशी सुरू असलेली चर्चाही (नोबल सॅवेज विषयावरील) यापुढे मी येथे करणार नाही. तसे असल्यास इतकेच म्हणेन की ओळख राहू द्या, जमलेच तर लोभही असावा.

प्रतिसाद संपादित.

मदतनीस

बिपिन कार्यकर्ते

बिपिन कार्यकर्ते · Wed, 1 Dec 2010 - 14:40

मेघनाच्या भितीशी सहमत आहे. चर्चेला ना नाही. पण कीस काढणे म्हणजे चर्चा नव्हे असे मलाही वाटते. स्पिडॉ यांच्याशी चालू असलेला संवाद आता खरडवहीतून करेन.

मुक्तसुनीत

मुक्तसुनीत · Wed, 1 Dec 2010 - 14:53

धाग्यात व्यक्त केलेल्या भीतीबद्दल असहमत आहे.

मतेमतांतरे ही होणारच. त्या संदर्भात जर का त्या त्या संस्थळाच्या एकंदर नीतीनियमांचे पालन होत नसेल तर काटछाट होईलच. सदस्यांनी एकंदर "नेटीकेट्स" चे पालन करावे. नवनवीन लोकांना केवळ असहमतीबद्दल डिस्करेज करायचे असेल तर एकंदर संस्थळांची वाढ खुंटेल आणि त्याला डबक्याचे स्वरूप प्राप्त होईल.

आनंदयात्री

आनंदयात्री · Wed, 1 Dec 2010 - 14:59 · उत्तर

सहमत आहे.
नवीन सदस्यांनीही "कार्यभाग उरकायला" न येता, इथले बनुन रहावे पुस्तकविश्वात रमावे.

स्पिन डॉक्टर

स्पिन डॉक्टर · Wed, 1 Dec 2010 - 22:59 · उत्तर

माझा 'किमान उद्देश' (पवार यांचा प्रतिवाद) पार पडला आहे, पण मी 'केवळ त्यासाठीच' आलो होतो असे नाही. मला चर्चा करायला आवडते, वाचायलाही खूप आवडते. सदस्यत्व घेतलेच आहे तर म्हणून येथेही आवडीच्या चर्चांमध्ये भाग घेण्यासाठीही पुढे सतत भेट देण्याची इच्छा होती. पण येथे "पुविचे उपक्रम होणे" नको आहे असे दिसते. त्यामुळे, मी या संस्थळावर मतांतरे नोंदवून त्रास देणार नाही.

इंद्रराज पवार

इंद्रराज पवार · गुरुवार, 2 Dec 2010 - 05:12 · उत्तर

डॉक्टरांनी थेट माझे नावच घेऊन प्रतिसाद दिला असल्याने इथे मी काही खुलासा करणे नीतांत गरजेचे आहे.

अन्यत्र कबूल केल्याप्रमाणे माझ्याकडून 'बंग', 'अवचट' यांचे सामाजिक कार्य आणि लेखनातील त्यांचे साहित्यिक मूल्य यावरचा डोस काहीना थोडासा कडवट लागला असला/वाटला तरी त्यांच्या [सदस्यांच्या] विचार स्वातंत्र्यावर वा लेखन धाटणीचा अधिक्षेप व्हावा असे माझ्याकडून झालेले नाही/नसावे अशी माझी प्रामाणिक समजूत आहे (जी कदाचित काहीना चुकीचीही वाटत असेल). मी या दोन्ही कार्यकर्त्यांच्या समवेत अल्पकाळ का होईना मती आणि शक्तीनुसार काम केले आहे, त्यांच्यासमवेत फिरलो आहे, नोंदी घेतल्या आहेत....आणि तद्वत त्यामुळे भारावलो जाणेही नैसर्गिक आहे. त्या आठवणीचे सार माझ्या मनी आजही ताजे असल्याने माझ्या प्रतिसादातील भाषा ही त्यांच्या पाटातील पाण्याचीच असणे काही गैर नव्हते. इतकेच.

पण ही कबुली देत असतानाच दुसर्‍याही एका गोष्टीची नोंद करणे तितकेच आवश्यक आहे की, एखादी व्यक्ती एखाद्या संस्थळाची सदस्य नसताना....जी तिथल्या चर्चेत प्रत्युत्तरादाखल तांत्रिक कारणामुळे खुलासा देवू शकत नसेल तर...तिच्याविषयी चेष्टेच्या स्वरूपात लिखाण करणे तिथल्या विद्वजनांना कितपत शोभते? श्री.स्पिन डॉक्टर उपक्रमचे सदस्य आहेत की नाहीत हे मला ज्ञात नाही, पण असतील तर त्याना माझ्या या भूमिकेत काही चुकत असेल असे वाटणार नाही. 'सोन्याचा पिंजरा' या धाग्यातील धागाकर्त्यांच्या विचाराचा उल्लेख मी इथे केला होता तो एवढ्यासाठीच की, मला 'तिथे' डॉ.बंग याना डिफेन्ड करता येत नव्हते (कारण, परत तेच....तांत्रिक अडचण) आणि योगायोगाने इथल्या 'अवचट' धाग्यात तो प्रवाह आला म्हणून श्रीमती देशपांडे यांच्या विचारांच्या अनुषंगाने तो संदर्भ दिला.

वेल....इतक्या खुलाशानंतर हा विषय आता 'फ्रीझ' करण्यास हरकत नसावी. तरीही श्री.स्पिन डॉक्टर (तसेच 'सोन्याचा पिंजरा' चे लेखक....हे जर डॉक्टरांचे मित्र असतील तर...) यांचा माझ्या कुठल्याही प्रतिसादातील कोणत्याही वाक्याने अपमान झालेला असेल तर मी त्या दोघांची बिनशर्त माफी मागतो.

धन्यवाद !

इन्द्रा

यशोधरा

यशोधरा · Wed, 1 Dec 2010 - 15:01 · उत्तर

सहमत. मतांतरे होणार, प्रसंगी कोणी दुखावले जाणार म्हणून चर्चा/ वाद होऊच नयेत, हे पटत नाही.

सागर

सागर · गुरुवार, 2 Dec 2010 - 07:04 · उत्तर

यशोधराशी सहमत आहे अगदी.
अजून थोडे विचार. काहि प्रमाणात मेघनाची भिती रास्तही आहे.

फक्त चर्चा करण्याच्या नादात वैचारिक ट्रॅक सोडून हमरीतुमरीवर कोणी येऊ नये एवढीच अपेक्षा

एखादी व्यक्ती विचारांचे बरेच आदान प्रदान करते याचा कोणी गैरफायदा घेऊ नये असेही स्पष्टपणे सांगावेसे वाटते आहे. विशेष करुन मोठ्या प्रमाणावर स्वतःचे अनुभव विश्व सर्वांबरोबर मोकळ्या मनाने वाटून घेणार्‍या व्यक्तीचा टोन संयमाचा असेल तर प्रतिवादीने तो संयम सुटेल असे वर्तन न करता खेळीमेळीने व सकारात्मक चर्चा करावी एवढीच अपेक्षा आहे

एक पुस्तकप्रेमी म्हणून मला चर्चा केव्हाही भुरळच घालतात पण वाद आले की मूळ चर्चेतला गोडवा जाऊन अचानक कडवटपणा येतो. कडवटपणा आला की मग जे त्यात सहभागी नसतात त्यांनाही ही चव घ्यावीच लागते, ही गोष्ट रसनिर्मिती करणार्‍यांनी ध्यानात घेतली तर माझ्यामते ती सर्व सन्माननीय सदस्यांसाठीच नव्हे तर सर्वांसाठीच खरोखर सन्मानाची गोष्ट असेल.

किमान पुस्तकांसारख्या संवेदनशील विषयांवर नकारात्मक वादविवाद होऊ नयेत एवढीच अपेक्षा.

बिपिन कार्यकर्ते

बिपिन कार्यकर्ते · Wed, 1 Dec 2010 - 15:03 · उत्तर

श्री. सुनीत आणि श्री. यात्री. मेघनाची भिती कीस काढणे या बद्दल होती असे वाटते. चर्चेचे वावडे नाही.

मुक्तसुनीत

मुक्तसुनीत · Wed, 1 Dec 2010 - 15:09 · उत्तर

...आणि कीस काढणे हे त्याज्य का ? एखाद्या गोष्टीबद्दल सूक्ष्म (रिफाइन्ड) पातळीवर मतभेद असणार.

पुन्हा एकदा हेच म्हणतो की , मतेमतांतरे होणार. सदस्यांची नैतिक जबाबदारी एकंदर नेटीकेट्स पाळण्याची आहे. संस्थळचालक मॉडरेशन करतील.
(एकंदर मराठीत मॉडरेशन, लिबरल व्ह्यूज याबद्दल चटकन प्रतिशब्द सुचण्याची पंचाईत झालेली आहे ! ;-) )

बिपिन कार्यकर्ते

बिपिन कार्यकर्ते · Wed, 1 Dec 2010 - 15:16 · उत्तर

तुम्ही जी अपेक्षा व्यक्त केलीत त्याबद्दल फारशी आशादायक अवस्था नसावी असे मेघनाला वाटत असावे. (पर्यायाने मलाही ;) )

बाकी जे शब्द तुम्हाला चटकन आठवत नाहीयेत त्या संकल्पनाच मराठी माणसाला फारशा आवडत नसाव्यात म्हणून शब्द नाहीत असे तर नसावे.

(सहज उदाहरण आठवले... ज्या संकल्पना / वस्तु आवडतात अथवा त्यावर जीवन अवलंबून असते त्या बद्दल त्या ठिकाणच्या भाषेत खूप काही पर्याय असतात... अरबी भाषेत उंटासाठी २१ का २२ शब्द आहेत म्हणे... लहान पिल्लाला एक शब्द, मोठ्या नराला एक शब्द, मादीला एक शब्द, काळ्या उंटाला अजून काही शब्द... वेगवेगळ्या वयाच्या वाढत्या अवस्थांना अजून काही शब्द असे...)

चिंतातुर जंतू

चिंतातुर जंतू · Wed, 1 Dec 2010 - 15:40

माझा अनुभव असे सांगतो की ज्याची अभिव्यक्ती *विचारांच्या गांभीर्यापोटी* उपद्रवी/खट्याळ/कीसपाडू/अभद्र वगैरे होते त्यास मराठी विचारविश्वात सहिष्णुता उपभोगावयास मिळते. याउलट विषयातील रुची वा गांभीर्य ज्यास आपल्या अभिव्यक्तीतून सिध्द करता येत नाही आणि ज्याची अभिव्यक्ती *निव्वळ* उ/ख/की वगैरे होते त्यास भद्रलोकांत आदराचे स्थान दुष्प्राप्य होते. त्याच न्यायाने मराठी विचारविश्वातही ते होते. पण, उलट बाजूने असेही म्हणता येईल की पुष्कळ लोकांस अप्रिय होणे हे प्रतिभावानाचे लक्षणही मानले गेले आहे अन मूर्खाचेही.

त्यामुळे प्रत्येकाने आपापले स्थान व आपण कोण हे आपल्या वर्तनातून सिध्द करावे हे बरे. ते सिध्द करण्याहेतु प्रत्येक इच्छुकास संधीही देणे मग अर्थातच आवश्यक ठरते.

मुक्तसुनीत

मुक्तसुनीत · Wed, 1 Dec 2010 - 15:43 · उत्तर

माझा अनुभव असे सांगतो की ज्याची अभिव्यक्ती *विचारांच्या गांभीर्यापोटी* उपद्रवी/खट्याळ/कीसपाडू/अभद्र वगैरे होते त्यास मराठी विचारविश्वात सहिष्णुता उपभोगावयास मिळते. याउलट विषयातील रुची वा गांभीर्य ज्यास आपल्या अभिव्यक्तीतून सिध्द करता येत नाही आणि ज्याची अभिव्यक्ती *निव्वळ* उ/ख/की वगैरे होते त्यास भद्रलोकांत आदराचे स्थान दुष्प्राप्य होते. त्याच न्यायाने मराठी विचारविश्वातही ते होते. पण, उलट बाजूने असेही म्हणता येईल की पुष्कळ लोकांस अप्रिय होणे हे प्रतिभावानाचे लक्षणही मानले गेले आहे अन मूर्खाचेही.
काही उदाहरणे द्या की. (मराठी आंतरजालावरची कृपया देऊ नयेत अशी विनंती.)

चिंतातुर जंतू

चिंतातुर जंतू · Wed, 1 Dec 2010 - 18:21

>>पुष्कळ लोकांस अप्रिय होणे हे प्रतिभावानाचे लक्षणही मानले गेले आहे अन मूर्खाचेही.<<
काही उदाहरणे द्या की.

आईनस्टाईनने सापेक्षतावादाचा सिध्दांत मांडला तेव्हा तो पुष्कळशा भौतिकशास्त्रज्ञांना अविश्वासार्ह वाटला होता.
पिकासोचं 'दम्वाजेल दाविन्यो' पाहून अनेक लोकांना धक्का बसला होता आणि कित्येक वर्षं ते पिकासोच्या स्टुडिओत पडून होतं.
जेम्स जॉईसची युलिसीस कादंबरी 'द लिटल रिव्ह्यू'मध्ये प्रकाशित होत होती. अश्लीलतेच्या आरोपांमुळे ते थांबवलं गेलं.

पुष्कळांस अप्रिय मूर्ख माणसांची उदाहरणे प्रत्येकाने आपापली ठरवावी. ;-)
ताज्या विकीलीक्सनुसार सध्या मी कदाचित फ्रेंच राष्ट्राध्यक्ष निकोला सार्कोझी यांचं नाव घेईन. काल कदाचित छोट्या बुशचं घेतलं असतं.

इंद्रराज पवार

इंद्रराज पवार · Wed, 1 Dec 2010 - 20:00

हा महत्वाचा (जरी नाजुक असला तरी....) विषय ज्येष्ठ सदस्या मेघना भुस्कुटे यानी वेळीच छेडल्याबद्दल त्यांच्या समयोचित भूमिकेचे स्वागत करता करता मीही इतकेच मत मांडतो की, या धाग्यातील विचार त्यानी मांडला आहे म्हणूनच उत्तर देत आहे.

गेले दोन दिवस मी येथील काही विषय तसेच "उपक्रम" या संस्थळावरील "अवचट' धाग्यावरील चर्चा वाचत आहे....आणि ज्या प्रकारे विषय आणि संबंधित शाखांचा कीस (नावासह....माझीही उपक्रमवर झालेली चेष्टा मी नोंद केली आहे....पण मी काहीच लिहिणार नाही...कारण एकतर मी उपक्रमचा सदस्य नाही....शिवाय चर्चेचा सूरही टिंगलटवाळीपलिकडे नव्हताच...) काढला गेला तो पाहता, 'पुस्तकविश्व' स्थापनेच्या मूळ हेतूलाच आघात पोहोचण्याची मला सार्थ भीती वाटली.

मी निर्विवादपणे मान्य करतो की, 'अवचट' चर्चेत मी अभय बंग मोठ्या प्रमाणात आणायला नको होते...पण आणले गेले ते एका भावनेच्या लाटेत....ती एक मर्यादा होती...जिचे मी पुढे कधीच उल्लंघन केले नाही....त्यामुळेच त्यानंतरच्या आलेल्या चर्चेत फक्त वाचनमात्र राहिलो.

पण आता असो...इनफ डिगिंग वर्क. मेघना म्हणते त्याप्रमाणे आपले मन, विचार आणि टंकणारी बोटे ही इथे "पुस्तकविश्वा"वर केवळ पुस्तकप्रेमासाठीच खर्ची पडोत. रक्त आटवून भिंतीवर टकराच मारायची हौस असेल तर जालावर अन्य संस्थळे आहेतच.

इन्द्रा

वेदश्री

वेदश्री · गुरुवार, 2 Dec 2010 - 03:00

बापरे! काय चाललेय काय इथे? अशात वेळ मिळायची जरा वानवा झाल्याने इकडे फिरकणे होत नाहीये. आज खुद्द मेघनाकडून धोक्याची सूचना (आणि तीही पुस्तक सोबत न चिकटवलेले असताना) पाहून उत्सुकता जास्तच चाळवली म्हणून बघते तर हा प्रकार!

काय घडले आणि कसे घडले याची मला अजिबात कल्पना नाही पण पुस्तकविश्वातले पुस्तक गायब झाले तर नुसत्या विश्वात मी तशीही रहातेच आहे.. इथे येणे अजिबातच बंद होईल मग माझे हे निश्चित.

पुस्तकांच्या/लेखकांच्या संदर्भानेच जर चर्चा चालू राहिली तर त्यात भावनेच्या भरात जर दुसर्‍या पुस्तका/लेखकाचा विषय निघाला आणि तो फोफावला तर मलातरी त्याचे वावडे नाही.. किंबहुना त्याचा वेगळा धागा निर्माण करण्याच्या सत्कर्मी मदतनीसाची मदत खर्ची पडली तर हरकत नसावी असे माझे मत आहे. माझ्यामते धाग्यातून स्फुर्ती घेऊन त्याच धाग्यात नवा धागा निर्माण होणे ही विधायक गोष्ट आहे.. फक्त ती पुस्तकविश्वाच्या आत्म्याला धरून असली पाहिजे की झालं.

कुठल्याही पुस्तकप्रेमीचे किमान पुस्तकविश्वात तरी मानसिक खच्चीकरण होऊ नये असे प्रामाणिकपणे वाटते. मतमतांतरे असहमतीस सहमती दर्शवूनही पूर्णविरामित नाही पण स्वल्पविरामित जरूर करू शकतो आपण.

'पुस्तक' या आपल्या जीवलग विषयाला सोडून असलेले सर्व धागे इथून उडवले जावेत ही माझी मदतनीसाला विनंती आहे.

वल्ली

वल्ली · गुरुवार, 2 Dec 2010 - 04:26

खरेच, मी पण ५/६ दिवसांची सुट्टी कोकणात मजेत घालवून कालच पुविवर परतलो. जे काही मधल्या काळात घडले ते पाहून धक्काच बसला. वाटले की पुविचे पण शाब्दिक युद्धस्थळ होतेय की काय. अर्थात असे काही होणार नाही याची काळजी पुविकर घेतीलच.

ऋषिकेश

ऋषिकेश · गुरुवार, 2 Dec 2010 - 05:20

दोन दिवस वेळेअभावी पुविवर नुसती चक्कर मारत होतो. पण जी कल्पना आली होती त्यावरून प्रकरण इतकं हातघाईवर येईल वाटलं नव्हतं ;)

असो. पुस्तकविश्वचं (उपक्रम, मिपा, मनोगत, मायबोली असे काहिहि न होता) पुस्तकविश्वच रहावं ह्या मताशी सहमत!

दिगम्भा

दिगम्भा · गुरुवार, 2 Dec 2010 - 06:38

चांगल्या ग्रंथालयातही वर्ज्यावर्ज्यतेला अति महत्व न देता सर्व प्रकारची पुस्तके ठेवण्याची सोय असते.
इथले चांगले व्यवस्थापक अशा गोष्टींची काळजी घ्यायला समर्थ आहेत असे वाटते.
तेव्हा मतमतांतरे,वादविवाद यांचे वावडे नसावे.
सूचना करतो की वादविवाद व कीस काढणे (किंवा "भांडून भुस्कट" पाडणे) यासाठी वेगळा विभाग करावा व असली सगळी प्रकरणे तिकडे (वेळोवेळी) हलवावीत.
वाटल्यास एक धोरण म्हणून एखाद्या प्रसंगी बहुमताने तशी मागणी झाल्यास हे त्वरित करावे.

मग ज्याच्या त्याच्या आवड-निवडीप्रमाणे किंवा सहनशक्ती-हौशीप्रमाणे किंवा कोमल भावना-खुमखुमीप्रमाणे सदस्य तिकडे जाणे टाळतील किंवा येजा करतील.

याने ग्रंथालयशास्त्राच्या मूलतत्वांप्रमाणें (संदर्भः शि. रा. रंगनाथन) प्रत्येक सदस्याची आवड पुरवली जाईल.

- दिगम्भा

मृदुला

मृदुला · गुरुवार, 2 Dec 2010 - 12:52

धोक्याची सूचना नक्की कोणत्या चर्चेमुळे धाग्यामुळे द्यावीशी वाटली आहे ते समजले नाही.

गेल्या दोन, तीन आठवड्यात मी पुस्तकविश्वावरचे नवे धागे बर्‍यापैकी वाचले आहेत. पुस्तके, लेखक आणि वाचक/ आस्वादक हे मुद्दे सोडून कुठलीच चर्चा झाल्याचे दिसले नाही.

चर्चा प्रकार