- Log in to post comments
मजकूर
भाग ४ देखील दुसर्या पानावर गेला त्यामुळे नवीन धागा सुरु करत आहे
आपण अलिकडे कोणकोणती पुस्तके खरेदी केली आहेत त्यांची नावे , लेखक, व शक्य झाले तर किंमत व प्रकाशक देणे इथे अपेक्षित आहे.
माझी अलिकडची खरेदी भाग - ४ मध्ये दिली आहे तेव्हा इतरांनी ही माहिती द्यावी ही विनंती :)
चर्चा प्रकार
अभिप्राय
सागर
सागर · Tue, 4 Jan 2011 - 13:52
१. डिजिटल फोर्ट्रेस
२. कोल्ड स्टील
ही २ अनुवादित पुस्तके घेण्याचा खूप मोह होतो आहे कारण खूप दिवस ही दोन पुस्तके निशाण्यावर आहेत.
पण सध्या तरी खरेदी मोहीम स्थगित आहे. यापुढे घेतली तरी थोडीशीच आणि मोजकी पुस्तके घेणार आहे. :)
सागर
सागर · Sat, 8 Jan 2011 - 16:29 · उत्तर
मोह शेवटी नाहीच आवरला.
एका मित्राच्या मदतीने ही दोन पुस्तके घेतली आहेत :)
१. डिजिटल फोर्ट्रेस
२. कोल्ड स्टील
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · Tue, 4 Jan 2011 - 14:23
अचानक, ध्यानीमनी नसताना एखाद्या कर्मचार्याला मॅनेजमेंटने १ नाही ३ महिन्याचा "बोनस" दिला तर त्याची जशी हरखून जाण्याची स्थिती होईल तशी माझी झाली आहे....तीन पुस्तकामुळे.
गेलो होतो चौकशीसाठी काही इंग्रजी पुस्तकांसाठी. पण त्याबद्दल संबंधित कर्मचारी काही उत्तर देणार तोपर्यंत नेहमीच्या व्यवस्थापकाने, "इंग्रजीची नंतर चौकशी करा पवार, ही बघा तुम्ही पाहिल्या पाहिल्याच घेणार....आजच आली आहेत." उत्सुकतेने पाहिले आणि पहिल्याच देखण्या पुस्तकाच्या 'दर्शना'नेच अगदी आनंदाची उकळीच फुटली. पुस्तक होते, "जीएंची पत्रवेळा"...पॉप्युलरचे डिसेंबर २०१० म्हणजे अगदी दोन आठवड्यापूर्वीचे ताजे प्रकाशन....जी.ए.कुलकर्णी यानी कवि ग्रेस आणि त्यांची कन्या डॉ.मिथिला याना लिहिलेली १९७१ ते १९८७ या कालावधीतील पत्रे.
पुस्तकाच्या कव्हरबद्दल तर श्री.सुभाष अवचट याना 'ऑस्कर' द्यायला हवे, इतके ते कल्पक आहे. चक्का "इनलॅण्ड" पत्राचा पोस्टल स्टॅम्पसह वापर करून असे काही वातावरण दिले आहे पुस्तकाला की आपण जणू काय आता जीएंचे ग्रेसना आलेले पत्रच थेट वाचत आहोत....(२० पैशाची दोन, व एक्स्प्रेस डिलिव्हरीसाठी १० पैशाचे एक अशी तीन तिकिटे तर पाहण्यासारखीच आहेत....दहा पैशाचे तर देखणेच आहे....पैशात तिकिटे मिळत हे पाहून अंमळ गंमत वाटली) ~~ पुस्तकाविषयी म्हणजेच पत्राविषयी आता काहीच लिहू शकत नाही...अजून वाचायला सुरूवात केलेली नाही.
दुसरे ~ परत ग्रेस यांचेच "संध्यामग्न पुरुषाची लक्षणे" ~ ३०० रुपये किंमतीचा हा ललितलेखांचा संग्रह खूप दिवसापासून वाचायचे ठरविले होते....आज तब्बल आठ वर्षानी त्याची दुसरी आवृत्ती (खरे तर पुनर्मुद्रणच आहे) बाजारात आली आहे. या पुस्तकालाही सुभाष अवचट आणि बाळ ठाकूर यांची रेखाटनांचे सुंदर कोंदण आहेच... अगदी !
आणि तिसरे....याच पंक्तीतील श्री.अनिल अवचट यांचे "प्रश्न आणि प्रश्न" ~ समाज जीवन आणि प्रश्न यांचे श्री.अनिल अवचट यांच्याशी घट्ट नाते जुळलेले आहे. या पुस्तकातील 'पाणी आणि माती", "पंचगंगा", "पठार आणि खाणी". "तेंदू पानांचा प्रश्न", "बस्तरचे अरण्यरुदन"....आदी लेखांची शीर्षके सांगतातच की त्यांच्या प्रश्नांचे स्वरूप काय असेल.
अजूनही खरेदी झालेली आहेच....पण ही तीन महत्वाची आणि इथे द्यावी असे वाटल्याने (आणि थोडा आनंदीत झाल्याने) इतके खुलासेवार लिहिले आहे.
इन्द्रा
टण्या
टण्या · गुरुवार, 13 Jan 2011 - 16:47 · उत्तर
इंद्रा, ह्या पुस्तकाबाबत अधिक माहिती देउ शकाल का? मला अजून हे कुठे ऑनलाइन नाही दिसत आहे..
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · गुरुवार, 13 Jan 2011 - 18:25 · उत्तर
जीएंची पत्रवेळा....हे पुस्तक मी वर म्हटल्याप्रमाणे एकदोन आठवडेच झाले प्रकाशित होऊन. मलाही पत्ता नव्हता, पण प्रदर्शानात दिसताक्षणीच त्यावर झडप मारली. त्याला कारण श्री.सुभाष अवचट यांचे कल्पक मुखपृष्ठ. जीए यानी कवि ग्रेस आणि त्यांची कन्या मिथिला याना लिहिलेल्या पत्रांचा तो संग्रह असून पॉप्युलरने प्रकाशित केला आहे. किंमत १२५/-. नुकतेच आले असल्याने कदाचित 'ऑनलाईन' नसावे. पण असे असले तरी तुम्ही बूकगंगा.कॉम कडे चौकशी केल्यास ते स्वतःच मागवून तुमच्याकडे पाठवून देतील. फार चांगली सर्व्हिस आहे त्यांची.
इन्द्रा
टण्या
टण्या · गुरुवार, 13 Jan 2011 - 19:31 · उत्तर
हो नक्कीच मागवतो बुकगंगावरून.. मलाही त्यांच्या सेवेचा अतिशय उत्तम अनुभव आला आहे..
सागर
सागर · Tue, 4 Jan 2011 - 14:35
इंद्रराज,
ओळखही सुंदर करुन दिलीत या पुस्तकांची.
जी ए मी फारसे वाचले नव्हते.
वेदश्रीमुळे जीएंची पुस्तके ४ मास्टरस्ट्रोक पुस्तके घेतली होती. आता जी एं चं वलय मला मोहून टाकतंय
काजळमाया, पिंगळावेळ, रमलखुणा आणि सांजशकुन ही ती ४ पुस्तके.
इस्किलार ने वेड लावले. पण अजून जीएंची संग्रहातली सगळी पुस्तके वाचायची आहेत. (आणि बाकी सर्व पण ;) )
ती वाचून झाली की जीएंच्या या ही पुस्तकाकडे वळेनच :)
बाकी इतर दोघांबद्दल फारसे माहिती नाही. ( बहुतेक माझा प्रांत नसावा तो ;) )
वल्ली
वल्ली · Sat, 8 Jan 2011 - 04:42
कालच पुण्यात गेलो होतो. अप्पा बळवंत चौकाजवळच्या लोखंडे तालीमच्या बाजूला 'शुभम साहित्य'च्या दुकानात.
तिथे घेतली ती-
१. पर्व - एस. एल. भैरप्पा - अनु. उमा कुलकर्णी. किं. ३५० रू.
२. सार्थ - एस. एल. भैरप्पा - अनु. उमा कुलकर्णी. (मध्ययुगीन भारतातला (८ व्या शतकातला) एका सारथ्याचा प्रवास व त्याबरोबर त्या जीवनशैलीचाही अनुभव. भैरप्पांच्या समर्थ लेखणीतून व तितक्यात अभ्यासातून उलगडलेला. किं. २०० रू.
३. रारंगढांग - प्रभाकर पेंढारकर - किं. ८० रू.
वरील २ पुस्तके २०% सवलतीत व रारंगढांग वर १० % सवलत मिळाली.
सागर
सागर · Mon, 10 Jan 2011 - 09:23
सहज काल दुसर्या एका खरेदीसाठी सपना बुक हाऊस मधे गेलो होतो, तिथे जॉर्ज ओरवेल साहेबांची पुस्तके दिसली. इथे-१ आणि इथे-२ सुंदर चर्चा झाल्या होत्या जॉर्ज ऑरवेल वर आणि मला घ्यायची पण होतीच,
त्यामुळे
१. अॅनिमल फार्म
२. १९८४
ही दोन इंग्रजी पुस्तके घेतलीत या विकांताला
वल्ली
वल्ली · Mon, 10 Jan 2011 - 09:26 · उत्तर
अबबब.......केव्हढी जोरदार खरेदी चालू आहे रे तुझी.
सागर
सागर · Mon, 10 Jan 2011 - 09:29 · उत्तर
खरेदी थांबवलीच आहे. पण जॉर्ज ऑरवेल वाचायचा होता म्हणून ही २ पुस्तके १२५+६० एवढेच पैसे गेले. :)
आता वाचन सुरु केलेच आहे. हळू हळू त्यावर लेखनही करेन :)
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · Mon, 10 Jan 2011 - 11:21 · उत्तर
सागर...'जॉर्ज ऑरवेल' खरेदीबद्दल खरंच तुम्हाला धन्यवाद. जशी मराठी वाचनाची आहे अगदी तशीच इंग्रजी वाचनाचीही तुम्हाला गोडी लागावी अशी मी मनोमन प्रार्थना करतो. फार प्रचंड असे ते विश्व आहे आणि एकदा का त्यात गुरफटून गेला की त्या दुनियेतील किती हिर्यामाणकांना आपल्या कवेत घेऊ असे होऊन जाईल, तुम्हाला.
"हळूहळू त्यावर लेखन करेन..." असे म्हणता आहात...जरूर करा, पण त्या अगोदर असेही लेखक वाचून काढा ज्यांची आपण फक्त नावे ऐकली असतील. एक वेळ अशी आली पाहिजे इथे की, पु.वि. वर इंग्लिश पुस्तकांचा स्वतंत्र विभाग सुरू करावा असे संपादक मंडळाला वाटेल.
इन्द्रा
सागर
सागर · Mon, 10 Jan 2011 - 12:04 · उत्तर
इंद्रराज,
इंग्रजी पुस्तकांकडे मी हळूहळू वळतो आहे. पण आधी मी घेतलेली सर्व मराठी पुस्तके वाचून संपवणार आहे. अधून मधूनच इंग्रजी वाचणार आहे. इंग्रजी साहित्याकडे मी पूर्णपणे वळायला किमान वर्षभर तरी लागणार आहे. मराठी साहित्य हे क्षितिजच असे आहे की आवाक्यात आले असे वाटत आले की अजून अजून दूर जाते :)
तेव्हा अजून कितीक पुस्तके समोर येतील माहिती नाही. पण इंग्रजी साहित्य देखील नवीन वर्षात वाचणार आहे. २०१२ च्या सुरुवातीपासून प्रमाण वाढेल एवढे नक्की :)
सध्यातरी मराठी साहित्यातच रमणार आहे.
अधून मधून माळगांवकर आणि जॉर्ज ओरवेल वाचणारच आहे. माझ्या संग्रहात कमी इंग्रजी पुस्तके आहेत पण ती सगळी या वर्षी वाचून पूर्ण होतील एवढे नक्की :)
ऑरवेलचे किमान अॅनिमल फार्म तरी आधी वाचणार आहे. लहान आकार असल्यामुळे हे पुस्तक लवकर वाचून होईलसे वाटते. तसे इंग्रजी साहित्य मी आधीपण वाचले आहेच पण तेवढी ओढ मात्र मला नाही. याचे कारण मराठीवरचे असीम प्रेम कारणीभूत असावे. पण पुन्हा इंग्रजी पुस्तकांचे वाचन सुरु करतो आहे लवकरच.
धन्यवाद :)
टण्या
टण्या · Mon, 10 Jan 2011 - 16:44 · उत्तर
ऑरवेलचे १९८४ हे मी आजवर वाचलेल्या पुस्तकातले निर्विवादपणे सर्वोत्कृष्ट पुस्तक आहे (अर्थात वैयक्तिक मत. आणि ही सर्वोत्कृष्टची यादी आहे, एकच पुस्तक नव्हे :) ).. तेव्हा, सागर ह्या पुस्तकाचा आस्वाद घ्या.. नक्षत्र आहे हे पुस्तक..
सागर
सागर · Tue, 11 Jan 2011 - 06:32 · उत्तर
टण्या,
१९८४ बद्दल सांगितल्याबद्दल धन्यवाद.
आता हे पुस्तक वाचायची उत्सुकता लागली आहे. :)
खरे तर नितिन थत्तेंनी ऑरवेल च्या या पुस्तकावर दोन भागांत लेखन केले होते, त्या लेखामुळे आणि तिथे घडलेल्या चर्चेत तुम्ही व इतरांनी केलेल्या कौतुकामुळे मोह पडला होताच या पुस्तकाचा.
आता लवकरच वाचेन १९८४ :)
ऋषिकेश
ऋषिकेश · Mon, 10 Jan 2011 - 12:07
आज पहिल्यांदा मराठी पुस्तकांसाठी ऑनलाईन शॉपिंग केले :)
बुकगंगा.कॉम वरून पुढील पुस्तके ऑर्डर केली आहेत. बघु कधी आणि कश्या स्थितीत मिळतात ते
मराठी भाषेचे मुळ - चंद्रकांत खैरे (तमिळ हे मराठी भाषेचे मुळ आहे असा तर्क मांडणारे पुस्तक. हेच ते खैरे ज्यांनी संस्कृत ही अनेक भाषांची जननी नसून अनेक भाषियांना व्य्वहाराला सोयीची जावी म्हणून तत्त्कालिन पंडीतांनी विविध भाषेतील शब्द एकत्र करून व्याकरणाने बांधलेली एक कृत्रिम भाषा असल्याचा सिद्धांत मांडला आहे)
पार्टनर - व पु (बरंच ऐकलं होतं. सागरच्या परिचयानंतर वेळोवेळी केलेल्या शिफारसीवरून घेतली आहे)
चार्ली चॅप्लिन - रविंद्र गुर्जर (एक तर ह्या अवलियाबद्दल वाचायचे होतेच तेही रविंद्र गुर्जरांसारख्या लेखकाने लिहिलेले बघितल्यावर या पुस्तका बद्दल विषेश माहिती नसताना मागवले आहे. बघुया कसे आहे ते)
बरेच काही उगवून आलेले (का घेतले? नंदन, नंदन, नंदन! :) )
सागर
सागर · Mon, 10 Jan 2011 - 13:13 · उत्तर
ऋ नक्की वाच रे पार्टनर... आवडेल.
मला तर भन्नाट आवडले आहे ते
पार्टनर - व पु (बरंच ऐकलं होतं. सागरच्या परिचयानंतर वेळोवेळी केलेल्या शिफारसीवरून घेतली आहे)
याबद्दल धन्यवाद :)
वाचून झाले की नक्की सांग कसे आहे ते ...
ऋषिकेश
ऋषिकेश · गुरुवार, 13 Jan 2011 - 04:48 · उत्तर
चार्ली चॅप्लिन ऑट ऑफ प्रिंट असल्याने पाठवले नाही :(
बाकी तीनही नवी कोरी पुस्तके आली आहेत.. लगेच दोन वाचायलाही घेतली आहेत :)
सागर
सागर · गुरुवार, 13 Jan 2011 - 06:59 · उत्तर
ऋ,
पुस्तके मिळाल्याबद्दल अभिनंदन
चार्ली चॅप्लीन बद्दल भा.द.खेर यांचे हसरे दु:ख चांगले आहे. तुला हवे असलेले नाही मिळाले तर हे वाच. त्यातही चॅप्लीनचा सर्व जीवनपट आहे.
आणि पार्टनर वाचून झाले की नक्की सांग कसे वाटले ते :)
सागर
सागर · गुरुवार, 20 Jan 2011 - 13:44 · उत्तर
ऋषि दादा
पार्टनर वाचलेस की नाही अजून?
वाचून झाले असल्यास कसे वाटले ते प्लीज सांग?
अर्थात पार्टनर हे स्वतःला आलेल्या अनुभवांशी थोडेफार जुळत असल्यास जास्त आवडते असा माझा स्वतःचा अनुभव आहे. ;)
ऋषिकेश
ऋषिकेश · Mon, 24 Jan 2011 - 05:16 · उत्तर
पार्टनर आजच वाचायला सुरूवात केली आहे. वेग, मांडणी आवडली असली तरी अजूनपर्यंत कनेक्ट करू शकलेलो नाही.
पूर्ण वाचून झालं की सांगेन
आनंदयात्री
आनंदयात्री · Mon, 24 Jan 2011 - 13:31 · उत्तर
मी पुर्ण करु शकलो नाही. खरच कंटाळलो. "शी इज मेड फॉर डहाणुकर्स" वैगेरे शीर्षकाच्या धड्यांना कंटाळलो.
:(
सागर
सागर · Mon, 24 Jan 2011 - 14:25 · उत्तर
मित्रवर्या आनंदयात्री
तुझे लग्न झालेले दिसत नाही, त्यामुळे कदाचित असेन.
ऋ चा पण लग्नाचा अनुभव नवीनच आहे.
वपुंची बरीच पुस्तके अनुभवसापेक्ष असतात त्यातील पार्टनर हे एक उत्तम उदाहरण
आई आणि बायको च्या मधे नवर्याची होणारी घुसमट हा अनुभव किंवा त्याची किमान कल्पना तरी जमेस असेन तर पार्टनरची दाहकता तीव्रतेने फील करता येईल.
अन्यथा लग्नानंतर ४-५ वर्षांनी पार्टनर पुन्हा वाचा मग सांगा पार्टनर आवडले की नाही ते ;)
आनंदयात्री
आनंदयात्री · Mon, 24 Jan 2011 - 14:30 · उत्तर
;)
असो ..
यशोधरा
यशोधरा · Mon, 24 Jan 2011 - 15:09 · उत्तर
का रे यात्री? सांग बरे तुझे लग्न झालेय का नाही ते ;)
आणि सागर, अशा वाक्यांपुढे स्मायल्या द्याव्यात नाही पेक्षा कोणाला तू ते खरेच लिहिले आहेस असे वाटून त्याची टिंगल होऊ शकते :P
आनंदयात्री
आनंदयात्री · Mon, 24 Jan 2011 - 15:21 · उत्तर
लाजलो आणी लाजुन ऑफ्फलाईन झालो आहे असे समजावे !!
-
आंद्या ऑफलाईन
(लाजरा)
अवांतराबद्दल क्षमस्व.
यशोधरा
यशोधरा · Mon, 24 Jan 2011 - 17:18 · उत्तर
यात्री,तुझी टिंगल नव्हे, सागरमहाशयांनी लिहिले आहे त्याची. :)
श्रावण मोडक
श्रावण मोडक · Mon, 24 Jan 2011 - 17:04 · उत्तर
या अशा लाजण्यावर उपाय काय असतो ते जरा वैद्यांना विचारून घ्या बरं...
अवांतराबद्दल क्षमस्व. ;)
सागर
सागर · Tue, 25 Jan 2011 - 08:52 · उत्तर
आणि सागर, अशा वाक्यांपुढे स्मायल्या द्याव्यात नाही पेक्षा कोणाला तू ते खरेच लिहिले आहेस असे वाटून त्याची टिंगल होऊ शकते
यशोधरा खरे आहे तुझे.
फक्त शेवटीच स्मायली वापरली आहे माझ्या प्रतिसादात.
माझाच प्रतिसाद मी पुन्हा वाचला. तेव्हा अजून एक सांगावेसे वाटते की
मी जे लिहिले आहे ते माझे प्रकटन आहे. तसा अनुभव जमेस असलाच पाहिजे असे काही नाही.
पण तो विचार करण्याची पात्रता तरी पाहिजे एवढेच माझे म्हणणे होते.
बाकी टिंगल कोणाला करायची असेल तर करु देत बापड्याला. विचार करण्याची पात्रता नसेन तर अशांना काय बोलणार? :P
यशोधरा
यशोधरा · Tue, 25 Jan 2011 - 10:14 · उत्तर
बरोबर आहे सागर. सोडून द्यायचे :)
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · गुरुवार, 13 Jan 2011 - 08:38
या आठवड्यात खालील पुस्तकांची खरेदी झाली. शोधायला गेलो होतो बहिणीसाठी "स्पर्धात्मक पुस्तके", ती तर चटकनच हाती येतात इतकी त्याना मागणी तसेच त्यांची असणारी सहज उपलब्धता. ती खरेदी पटकन झाल्याने स्वतःसाठी काही तरी घ्यावे असे साहजिकच मनी आले [खिसाही बर्यापैकी गरम होताच, हेही कारण] आणि घेतली खालील काही :
१. मर्ढेकरांच्या कादंबर्या ~ रात्रीचा दिवस/तांबडी माती/पाणी : फार दुर्मिळ समजले गेले होते हे पुस्तक. १९६२ नंतर दुसरी आवृत्ती १९९१ मध्ये....जी मला मिळाली - किंमत ८० रुपये....प्रकाशक मौज [अर्थातच].
२. प्रवास एका लेखकाचा ~ व्यंकटेश माडगूळकर ~ मॅजेस्टिक ~ रु.१४०/- : दोन लेख वाचले. 'एका कथेला सात रुपये मानधन मिळायचे, हा उल्लेख आता मजेशीर वाटतो वाचताना, पण तात्यांच्या बेकारीच्या काळात ते सात त्याना पर्वताएवढे वाटत असतील. पुण्याच्या प्रभात रोडवर माधव आचवल यांच्या डिझाईननुसार बांधलेल्या घराचे वर्णन फार सुरेखरित्या प्रकटले आहे. माडगूळकरांचा अन्य साहित्यिकांशी झालेला पत्रव्यवहारही यात आहे.
४. सुनीताबाई ~ मंगला गोडबोले [अरुणा ढेरे यांच्या स्वतंत्र लेखासह] ~ राजहंस - रु.२५०/- ~ पुस्तकाबद्दल बरेचसे वाचले आहे. पण अजून प्रत्यक्ष पुस्तक मी वाचलेले नव्हते, ते आता होऊन जाईल. बाकी राजहंस पाळत असलेली निर्मितीमूल्ये पाहून खरेदीच्यावेली फार संतोष होतो. हे अन्य प्रकाशकांनीही नोंद करण्यासारखे आहे....[विशेषतः पॉप्युलरवाल्यांनी....निव्वळ बाजार करतात भटकळ अॅण्ड को. !]
५. निवडक सदानंद रेगे : संपादक वसंत आबाजी डहाके ~ सदानंद रेगे या लोकविलक्षण प्रतिमासृष्टी उभा करणार्या लेखकाबद्दल सदैव मनी एक औत्सुक्य आहे...विशेषतः त्यांनी मर्ढेकर आणि बालकवी यांच्यावर लिहिलेल्या कविता पाहाण्यात आल्यावर, जास्तच. कवी, कथाकार आणि ललित लेखन या प्रांतातील त्यांचे लेखन फुटकळ स्वरूपात वाचल्याने त्यांच्याकडे असलेली शब्दसंपदा स्तीमित करणारी वाटली. आज साहित्य अकादमीने प्रकाशित केलेले हे पुस्तक अचानकच हाती आले ~ किंमत रुपये ९५/-
६. सौंदर्यानुभव : प्रभाकर पाध्ये ~ साहित्य आणि कलात्मक अनुभव या प्रांतातील एक आदरणीय नाव म्हणजे प्रभाकर पाध्ये. या ग्रंथात असलेल्या प्रकरणांची नावेच त्यांच्या विषयातील सखोलता सिद्ध करण्यास पुरेशी आहेत - "केलेचे अनुभवपूर्व तत्त्व, बोधना, कलानुभव, तीन मेंदू, प्रतिभासाखळी, अस्मितेचा आविष्कार, कलेचे प्रयोजन..." भाषाशास्त्र हा माझाही अभ्यासाचा विषय असल्याने त्याला सौंदर्यशास्त्राची जोड दिल्यास जागतिक साहित्याची अनुभूती कशा प्रकारे घेता येते याचे पानोपानी प्रतीक या ग्रंथात येते. श्री.पाध्ये याना याच पुस्तकाबद्दल 'साहित्य अकादमी'चा यथायोग्य पुरस्कार लाभला होता. ~ मौज प्रकाशन : किंमत रुपये २२०/-
६. मला भावलेले संगीतकार ~ डॉ.अशोक दा. रानडे : "सुंदर पुस्तक, तितकीच सुंदर निर्मिती' (अर्थातच परत राजहंस प्रकाशन) : भारतीय शास्त्रीय संगीतातील दिग्गज सर्वश्री पं.विष्णू नारायण भातखंडे, रामकृष्णबुवा वझे, अब्दुल करीमखाँ, विष्णू दिगंबर पलुस्कर, अनंत मनोहर जोशी, फैय्याजखाँ, बालगंधर्व, केसरबाई केरकर, ओंकारनाथ ठाकूर, कृष्णराव फुलंब्रीकर, बडे गुलाम अलीखाँ, बा.र.देवधर, जगन्नथबुवा पुरोहित, हिराबाई बडोदेकर, गजाननराव अनंत जोशी, भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, माणिक वर्मा यांची निव्वळ ओळख नसून या दिग्गज कलावंतांनी आपल्या नितनव्या सादरीकरणातून उभ्या केलेल्या प्रयोगकल्पना, आणि त्यांच्या संगीतनिर्मितीचा गाभा आपल्या सिद्धहस्त लेखणीतून उलगडून दाखविणारे डॉ.अशोक रानडे यांची विलक्षण प्रतिभा...यांचा सुरेख संगम म्हणजे हे पुस्तक. ~ प्रकाशक राजहंस - किंमत रु. ३००/- [यातील पं.मल्लिकार्जुन मन्सूर, भीमसेन जोशी आणि माणिक वर्मा यांचे फोटो तर अगदी त्यांच्या हायस्कूल वा कॉलेज जीवनातील आहेत, ते पाहताना एक वेगळाच आनंद लाभतो.]
इन्द्रा
ऋषिकेश
ऋषिकेश · Fri, 14 Jan 2011 - 04:25 · उत्तर
चांगली खरेदी.
यातील 'प्रवास एका लेखकाचा ~ व्यंकटेश माडगूळकर' वाचले आहे. मला तरी 'ठिक ठिक' वाटले होते. बाकी मर्देकरांच्या कादंबर्यांबद्दल उत्सूकता आहेच. कश्या वाटल्या ते वाचून झाल्यावर नक्की लिहा
नंदन
नंदन · Fri, 21 Jan 2011 - 22:42
धन्यवाद, इंद्रा. 'जीएंची पत्रवेळा'बद्दल माहीत नव्हतं. आता यादीत त्याची भर घालतो :).
कालच अमेझॉनचं एक कार्ड मिळालं. ते वापरून घेतलेली ही पुस्तकं -
१. ट्रॅव्हल्स ऑफ मार्को पोलो - मार्को पोलोने लिहिलेलं प्रवासवर्णन.
२. मार्क ट्वेनच्या आत्मचरित्राचा पहिला भाग
३. ओमू - हर्मन मेलव्हिल
४. द गर्ल विथ द ड्रॅगन टॅटू - 'मिलेनियम ट्रायलॉजी'मधली पहिली कादंबरी
५. द लास्ट ऑफ द मोहिकन्स - जेम्स कूपर
ऋ,'बरेच काही...'बद्दल तुझं मत वाचायला उत्सुक आहे.
रोचीन
रोचीन · Sat, 22 Jan 2011 - 05:53 · उत्तर
द लास्ट ऑफ द मोहिकन्स वर चित्रपट निघाला आहे का?? हे फिक्शन आहे ना?
नंदन
नंदन · Sat, 22 Jan 2011 - 06:32 · उत्तर
याच कादंबरीवर चित्रपट निघाला आहे. पुस्तक हिस्टॉरिकल फिक्शन स्वरूपाचं म्हणता येईल.
आनंदयात्री
आनंदयात्री · Sat, 22 Jan 2011 - 06:37 · उत्तर
>>२. मार्क ट्वेनच्या आत्मचरित्राचा पहिला भाग
हे आधी वाच आणी सांग कसे वाटले. भाषा कशी आहे (सोपी, जड ई) इथपासुन ट्वेनच्या साहित्याबद्दल उत्सुकता आहे.
दूरदर्शी
दूरदर्शी · Sat, 22 Jan 2011 - 09:26
James Hadley Chase Complete Collection (set Of 88 Titles)
The Final Prophecies of Nostradamus - एरिका चिथॅम
The OThe r Side of Midnight - सिडने शेल्डन
And Then There Were None- अगाथा ख्रिस्ती
SHE:A History Of Adventure- रायडर हॅगार्ड
ऋषिकेश
ऋषिकेश · Mon, 24 Jan 2011 - 05:19
विकांताला पाथफाईंडरला गेलो होतो तेव्हा 'अॅन फ्रँकच्या डायरीचा' मंगला निगुडकरांनी केलेला अनुवाद दिसला तो घेतला आहे. आतापर्यंत (माझ्या) वेगवेगळ्या वयात (इंग्रजीतून) भेटलेल्या अॅन फ्रँकला आता मराठीत भेटून (वाचताना)येणारा अनुभव घ्यायला अपार उत्सूक आहे.
यशोधरा
यशोधरा · Mon, 24 Jan 2011 - 07:32
चौथ्या भागातच लिहिले. ५ वा भाग आला आहे हे काहीसे ठाऊक होते, पण सापडला नव्हता. तिथले उडवते.
१. रविंद्र वीणा
२. रविंद्र झंकार
दोनही पुस्तकांचे लेखक काका कालेलकर. रविंद्रनाथ टागोर यांच्या गीतांजलीचे मनन व भाषांतर. कालेलकरांचे रविंद्र मनन मिळाले नाही.
सागर
सागर · Sat, 29 Jan 2011 - 09:06
शोध मर्ढेकरांचा - विजया राजाध्यक्ष (दशकातील दहा मधे गौरवली गेली असल्यामुळे घेतली)
उत्खनन - गौरी देशपांडे (मणिकर्णिका मुळे - खरे तर मणिकर्णिका नावाचे रहस्य उलगडावे या उत्सुकतेपोटी घेतली)
मनसा - अनिल अवचट (१२ वी आवृत्ती)
वाडा चिरेबंदी - महेश एलकुंचवार (५वी आवृत्ती)
वरील सर्व लेखक मी वाचलेले नाहियेत (अपवाद गौरी देशपांडेंचं एक पुस्तक). पण पुवि वर अनेक वेळा चर्चा झाल्यामुळे घेतो आहे.
वल्ली
वल्ली · Sat, 29 Jan 2011 - 09:10 · उत्तर
तुझी खरेदी अजून चालूच आहे की. :)
सागर
सागर · Sat, 29 Jan 2011 - 09:23 · उत्तर
शोध मर्ढेकरांचा घ्यायचे होतेच रे. त्यात महत्त्वाची उचलली एवढेच. :)
मनसा - अनिल अवचट (१२ वी आवृत्ती)
पुस्तकाचे नाव माणसं आहे
संपादित करता येत नव्हते म्ह्णून दुरुस्ती इथे देतो आहे
यशोधरा
यशोधरा · Sat, 29 Jan 2011 - 09:14
पंखा, झुंबर्,शारदा संगीत - प्रकाश संत
संस्मरणे - शांता शेळके
रवींद्र मनन - काका कालेलकर
सागर
सागर · Sat, 29 Jan 2011 - 09:24 · उत्तर
यशोधरा,
रवींद्र मनन मिळाले एकदाचे तुला. :)
तिन्ही रविंद्र पुस्तके वाचून एक लेख लिही अशी विनंती आहे माझी तुला
यशोधरा
यशोधरा · Sat, 29 Jan 2011 - 09:41 · उत्तर
हो, मिळाले रे. वाचायचा मुहुर्त कधी लागतो पाहू. :-)
सागर
सागर · Sat, 29 Jan 2011 - 09:43 · उत्तर
पुढच्या पुण्यनगरीच्या भेटीत ही ३ पुस्तके तुझ्याकडून उचलीन ;)
मुन्जा
मुन्जा · Sun, 30 Jan 2011 - 01:58
मी विकत घेतलेली पुस्तके
१.A Happy Death By Albert Camus
2.Exile and the Kingdom By Albert Camus
3.Resistance,Rebellion and Death By Albert Camus
पहिले वाचुन झाले आहे पन बकिचि वाचायला वेळ्च मिळ्त नाहि. :(
सुरेश गुप्ते
सुरेश गुप्ते · Fri, 4 Feb 2011 - 16:14
अन्ताजीची बखर ले. नन्दा खरे.(काल्पनिक्)ऐतिहासिक कादम्बरीलेखकान्चा कल्पनाविलास आनि वस्तुस्थिति
ह्यावर महामिश्किल भाश्य. ह्या लेखकाची सर्व पुस्तके वाचायची आहेत.
चकवाचान्दन ले. मारुती चितम्पल्लि. उत्तम पुस्तक्.लेखकाचे परिश्रम थक्क करतात.
किमयागार ले.अतुल गोदबोले विद्यानमहर्शी आनि त्यानी लावलेले शोध यान्चा अतिशय सोप्या भाशेत परिचय
करुन देनारे उत्तम पुस्तक.
पुन्याची अपुर्वाई ले. अनिल अवचत. चान्ग्ले पुस्तक
नंदन
नंदन · Sat, 5 Feb 2011 - 04:01
१. अ पर्सनल मॅटर - Kenzaburō Ōe
अलीकडेच 'रायटर्स अल्मानॅक' ह्या कार्यक्रमात ह्या पुस्तकाबद्दल ऐकलं. १९९४ सालचा साहित्याचा नोबेल पुरस्कार जिंकणारा हा लेखक. जन्मतःच मानसिकदृष्ट्या विकलांग असलेल्या आपल्या मुलाशी असलेलं नातं टप्प्याटप्प्याने कसं विकसित होत गेलं आणि त्यातूनच काही पातळीवर जपानी समाजाचा हिरोशिमा व नागासाकीच्या नरसंहाराकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे, त्याच्याशी आपण नाळ कशी जोडू शकलो; त्याचं चित्रण ह्या पुस्तकात तो करतो.
प्रवासवर्णनावरची एका परिचिताने सुचवलेली ही तीन पुस्तकं:
२. डार्क लँड सफारी: ओवरलँड फ्रॉम कैरो टू केपटाऊन - पॉल थोरो
३. द वे ऑफ द वर्ल्ड - Nicolas Bouvier
४. अ विंटर इन अरेबिया: अ जर्नी थ्रू येमेन - फ्रेया स्टार्क
इतरः
५. रनअवे - अॅलिस मन्रो
६. द अॅनॉटमी ऑफ मेलँकली - रॉबर्ट बर्टन
७. मेटामॉर्फॉसिस आणि इतर कथा - काफ्का
८. फादर्स अँड सन्स - इव्हान टर्गेन्येव्ह
९. द डायरी ऑफ अ सुपरफ्ल्युअस मॅन आणि इतर कथा - इव्हान टर्गेन्येव्ह
१०. द जंगल - अपटन सिन्क्लेअर
सागर
सागर · Sat, 5 Feb 2011 - 07:47
फ्लिपकार्टवरुन घेतली
१. कोबाल्ट ब्लू - ऑल क्रेडीट गोज टू मणिकर्णिका
२. संभाजी - विश्वास पाटील (कोबाल्ट ब्लू च्या वाहत्या गंगेत हे पुस्तक पण धुऊन घेतले)