एवढ्यात तुम्ही कोणती पुस्तके विकत घेतली आहेत? भाग - ६

ऋषिकेश

मजकूर

भाग ५ दुसर्‍या पानावर गेला त्यामुळे नवीन धागा सुरु करत आहे.

आपण अलिकडे कोणकोणती पुस्तके खरेदी केली आहेत त्यांची नावे , लेखक, व शक्य झाले तर किंमत व प्रकाशक देणे इथे अपेक्षित आहे.

या भागाची माझ्याकडून सुरूवात करतो.
रसिक च्या प्रदर्शनातून घेतलेली:
१. शाळा - मिलिंद बोकील (दशकातील दहामधे बहुदा प्रत्येकाच्या यादीत असलेलं पुस्तक, शिवाय मृत्यूंजय यांनी करून दिलेली सुंदर ओळख)
२. आहे मनोहर तरी (वाचलं आहे पण पुन्हा वाचयचं आहे. शिवाय संग्रही हवंच होतं)

बुकगंगावरून मागवलेली पुस्तके
१. साखरेचं बाळ (मिळालं रे मिळालं!! :) )
२. आवरण
३. कोबाल्ट ब्लू
(ही दोन्ही पुस्तके अर्थात मणिकर्णिका यांचे लेख वाचून मागवली आहेत)

अभिप्राय

सागर

सागर · Tue, 8 Feb 2011 - 11:11

२. आवरण
३. कोबाल्ट ब्लू
(ही दोन्ही पुस्तके अर्थात मणिकर्णिका यांचे लेख वाचून मागवली आहेत)

अगदी याच कारणासाठी मी पण ही २ पुस्तके घेतली आहेत ऋ

मणिकर्णिका

मणिकर्णिका · Wed, 9 Feb 2011 - 01:15

वाचा वाचा, चांगलंय. दोघाजणांना काहीतरी चांगलं वाचायला उद्युक्त करु शकले. माझं बहुधा स्वर्गात रिझर्व्हेशन झालंय ऑलरेडी! :)))
माझ्याकडे आलेली नवीन पुस्तकं-
ब्राह्मणकन्या- श्री.व्य.केतकर
जन हे वोळतु जिथे- शरच्चंद्र मुक्तिबोध
पैंजण-म. ना.अदवंत
धग, शिळान अधिक आठ कथा-उद्धव शेळके
पण लक्षात कोण घेतो-हरि नारायण आपटे
औदुंबर-श्री.दा.पानवलकर
दौलत-ना.सी.फडके
तपस्या, महाश्वेता-डॉ. सुमती क्षेत्रमाडे (वाचलेली आहेत, संग्रही नव्हती)
साठे फायकस-नारायण धारप (धारप फेव्हरिट असल्याने याच पुस्तकापासून सुरुवात केली. कायच्या काय भारी. नारायण धारप फ़ॅन ग्रुप-इथे लक्ष द्या. धारपांच्या समर्थ कथांपेक्षा ही एकदम हटके आहे. एकदम साय-फाय प्लॉट अधिक अतिमानवी अस्तित्व असं कॉकटेल)

आनंदयात्री

आनंदयात्री · Wed, 9 Feb 2011 - 01:48 · उत्तर

साठे फायकस ?? असे नाव आहे पुस्तकाचे ?
'फायकसची अखेर' हे पुस्तक वाचलेले स्मरते !

मणिकर्णिका

मणिकर्णिका · Wed, 9 Feb 2011 - 02:26 · उत्तर

हो, असंच नाव आहे.
'फायकसची अखेर'? सीक्वेल असेल मग त्याचा.
नायक कोण आहे त्यात?

आनंदयात्री

आनंदयात्री · Wed, 9 Feb 2011 - 02:51 · उत्तर

इतकं डिट्टेल नाही आठवत आता पण विज्ञानकथा होती. आता अवतार मधे त्या ग्रहावरची झाडे कशी एकमेकांशी कनेक्टेड असतात आणी त्यांची एक नॉलेज बँक असते, तशीच कायसी कथा होती. पण धारपांची हे नक्की !!

यशोधरा

यशोधरा · Wed, 9 Feb 2011 - 04:22 · उत्तर

ब्राह्मणकन्या- श्री.व्य.केतकर
जन हे वोळतु जिथे- शरच्चंद्र मुक्तिबोध

ह्या पुस्तकांबदल लिहिणार का मणि? धन्यवाद.

मणिकर्णिका

मणिकर्णिका · Wed, 9 Feb 2011 - 06:47 · उत्तर

यशो, वाचली की करते प्रयत्न लिहायचा.
अगदी परिचय वगैरे खासच नाही जमला तर छोटंसं काहीतरी तरी नक्की टाकीन या धाग्यावर.

मणिकर्णिका

मणिकर्णिका · Mon, 14 Feb 2011 - 10:17 · उत्तर

ब्राह्मणकन्या-
१९३० मधली कादंबरी. १९३० च्या काळापर्यंत पु नर्विवाह आणि स्त्री-शिक्षण या सुधारणा विवाद्य राहिल्या नव्हत्या. धोंडो, केशव, र.धों, फुले, बेहरामजी मलबारी, वि.रा.शिंदे सारख्या समाज-सुधार कांनी याबाबत बरेच कार्य करुन झाले होते. बहुचर्चित होता तो जातिभेदाचा प्रश्न. केतकरांनी या प्रश्नावर लक्ष केंद्रीत करुन मिश्रविवाहातून जन्माला आलेल्या स्त्रीचे चित्रण केले आहे.
स्त्रीवादी लेखन करणारे वामन मल्हार हे केतकरांना समकालीन. पण त्यांच्याही पुढे जा‌ऊन अविवाहितेचे मातृत्व या तत्कालीन समाजाला धक्कादायक वाटणारया विषयावरचे हे पहिलेवाहिले लिखाण.
केतकरांना स्त्रीवादी लिखाण करताना ’समाज’ ही संकल्पना नाकारायची नाहीये. उलट समाजाचे आणि सामाजिक नियमांचे बदलत्या स्थितीत सुखकारक ठरेल अशा स्वरुपात संघटन करायचे होते.कालबाह्य नितीनियमांविरुद्ध आघाडी उभारायची होती हे आपल्याला कळून चुकते. आजच्या काळातल्या स्त्रीवादी लेखकांच्या लिखाणात केतकरांनी १९३० मध्ये केलेल्या लिखाण/विचारांमधलेच कितीतरी घटक दिसतात.

जन हे वोळतु जिथे-
ही खरंतर त्रिधारा आहे. क्षिप्रा आणि सरहद्द या दोन कादंबरयांनंतरची ’जन हे..’ ३ री आणि अखेरची कादंबरी.
कादंबरीचा नायक बिशू उर्फ विश्वास याचे संभ्रम, घरंगळत गेल्यासारखे वाटणारे पहिले आयुष्य, नंतरचे मानसिक परिवर्तन, त्यामागच्या अतःप्रेरणा, संघर्ष यांचे प्रकटीकरण म्हणजे ’जन हे’.
काल आणि व्यक्ती, व्यक्ती आणि समूह, मन आणि माणूसपणस्तित्वाचे भान आणि सो‌उंदर्य-संवेदना याचे दर्शन हा या कादंबरीचा फॉटे. बदलती समाज-परिस्थिती आणि त्यातून बिशूचा मनोविकास. व्यक्ती आणि समाज यांच्या परस्पर-संघर्षातून पुढे जाणारया व्यक्तित्वांचा बिशू एक प्रातिनिधिक नमुना. पण हा नमुना समग्र नाही ही गोष्ट ध्यानात असली पाहिजे. कारण स्पष्ट आहे-समाज-परिस्थिती बदलत असते.

सागर

सागर · Fri, 11 Feb 2011 - 13:25 · उत्तर

मला मुख्यकरुन

चंद्राची सावली आणी
फायकस सिरिज हवी आहे

वल्ली

वल्ली · Fri, 11 Feb 2011 - 13:51 · उत्तर

चंद्राची सावली मिळणे तर अवघड आहे. पण फायकस सिरीज नक्कीच मिळेल पुण्यात.

सागर

सागर · Fri, 11 Feb 2011 - 14:01 · उत्तर

हो रे मित्रा,

आत्ताच रसिक ला फोन लावला होता
ते ही तेच म्हणाले की चंद्राची सावली आऊट ऑफ प्रिंट आहे :(
असो.. डिसमूड झालेलो असल्यामुळे सबब नारायण धारपांवरुन गाडी माझ्या लाडक्या सुशिंकडे वळवली आहे
पुढच्या आठवड्यात सुशिंची ७-८ पुस्तके असतील माझ्याकडे :)

फायकसकडे मी पुण्यात येईन तेव्हा बघेन

वल्ली

वल्ली · Fri, 11 Feb 2011 - 14:07 · उत्तर

तू खरा सुशिप्रेमी आहेस. तुझ्याकडे 'बरसात चांदण्यांची' आहे का रे?

सागर

सागर · Fri, 11 Feb 2011 - 14:08 · उत्तर

बरसात चांदण्यांची एक्दम मस्त आहे. आहे माझ्याकडे
जाता-येता पण आहे.

वल्ली

वल्ली · Fri, 11 Feb 2011 - 14:14 · उत्तर

पुण्यात येतांना ते घेउन ये. ;) इथे औट ऑफ प्रिंट आहे. :)

सागर

सागर · Fri, 11 Feb 2011 - 14:15 · उत्तर

नव्या यादीत स्टार हंटर्स घेतले आहे. तुझ्यामुळे (अमरविश्वासचे पुनरागमन ) :)
बाकीचे बोलणे खरडीत करु

इंद्रराज पवार

इंद्रराज पवार · Fri, 11 Feb 2011 - 14:44 · उत्तर

श्री.सागर....

धारपांची 'चंद्राची सावली' ही कादंबरी मी वाचली आहे, कॉलेजच्या वर्षात....मला वाटते 'आनंद गोसावी' या नावाचा नायक. "छतारीया इस्टेट"...एका दूर असलेल्या गावी... आता ओसाड पडलेला वाडा.....इथे मॅनेजर म्हणून नोकरीस येतो....आणि मग त्याला ती इस्टेट भकास का पडली..? त्यामागील कारणमीमांसा शोधणे, मग त्याला येणारे अतिन्द्रीय अनुभव....फार उत्कंठावर्धक शैली वाटली होती त्यावेळे नारायण धारप यांची.

माझी आठवण दगा देत नसेल तर हे प्रकाशन 'विश्वमोहिनी' चे नसून 'कॉन्टीनेन्टल'चे असावे....आऊट ऑफ प्रिंट आहे, यातही नवल नाही....पण चुकून मिळालेच तर वाचण्यासाठी 'रात्री'ची निवांत वेळ निवडा....तरच कथानकाला न्याय दिल्यासारखे होईल.

इन्द्रा

सागर

सागर · Sat, 12 Feb 2011 - 16:34 · उत्तर

इंद्रराज,

चंद्राची सावली चे कथानक तुम्हाला बरोबर आठवते आहे. गोसावींबरोबर मोरे हवालदाराचेही पात्र यात आहे.
चंद्राच्या प्रकाशाबरोबर वाढत जाणार्‍या शक्तीमुळे आजूबाजूच्या प्रदेशावर हुकुमत गाजवणार्‍या एका चंद्रकन्येची अत्भुत कहाणी आहे ही. मीनल प्रकाशनाचे होते हे पण कालौघात हेच पुस्तक तुम्ही म्हणता त्या प्रकाशनांची असण्याची शक्यता आहे. तुम्हाला हे पुस्तक मिळाले तर अवश्य वाचा. मस्त भयकथा आहे.

धारपांची पुस्तके काय किंवा कोणतीही भयकथा काय मी शक्यतो रात्रीच वाचतो. एक भन्नाट भारावून टाकणारा फील येतोच पण अंगभर एक शिरशिरी देखील दौडत रहाते :)

धनंजय देशपांडेंचं किमिदिन, सुभाष देशपांडे यांचे शाझामचा पंजा या भयकादंबर्‍या माझ्या जास्त आवडीच्या आहेत.
तसे सुहास शिरवळकरांच्या भयकथादेखील सुंदर आहेत.
पण नारायण धारप हे शिक्का बसलेले भयकथाकार आहेत. मला धारपांच्या विज्ञानकथाही तेवढ्याच आवडतात. धारपांनी समर्थ सिरिज, फायकस आणि महंताच्या कथा निर्माण करुन एक वेगळे स्थान जरी निर्माण केले असले तरी नारायण धारपांच्या चंद्राची सावली, लुचाई, कृष्णचंद्र अशा भयकथांनी त्यांच्याविषयी एक भयकथाकार म्हणून अपार आदर माझ्या मनात निर्माण केला.

इंद्रराज पवार

इंद्रराज पवार · Sat, 12 Feb 2011 - 19:00 · उत्तर

"....तुम्हाला हे पुस्तक मिळाले तर अवश्य वाचा....."

~ नक्कीच. कारण "श्री.अशोक समर्थ, एम.ए." या पेक्षाही मला धारपांच्या स्वतंत्र आणि अन्य नायकांवर बेतलेल्या कथा फार भावल्या. (अर्थात इथे मी 'समर्थ' कथाना दुय्यम समजतो असे कृपया समजू नका...पण का कोण जाणे त्या कथा वाचताना असे सातत्याने वाटे की, अंतिमतः 'समर्थ' विजयी होणार...ही समजूत कथेच्या गाभ्यावर अन्याय करणारी ठरू शकते. पेरी मॅसन 'अ' च्या केसचा छडा लावणारच आणि होम्स 'खोट्याचे पितळ उघडे करणारच...!" हे गृहितक जसे वाचक पहिल्या पानातच मांडतो तसेच काहीसे समर्थकथात होते. मात्र अगाथा ख्रिस्तीच्या कादंबर्‍या वाचताना एक क्षणही उत्सुकतेचा लोप होत नाही, इतका वाचक स्वतःला कथानकापासून अलिप्त ठेऊ शकतो. "मर्डर ऑन ओरिएन्ट एक्स्प्रेस" वाचताना वाचक पाने पलटत नसून तो त्या रेल्वेतीलच अन्य प्रवाश्यासारखा एक असून तोही त्या विलक्षण अशा कथानकात गुंफला गेलेला आहे असे सातत्याने वाटत राहते....तर जेम्स हॅडली चेसच्या "नो ऑर्चिड्स फॉर मिस ब्लॅन्डीश" मधील असहाय्य नायिकेसोबत आपणही त्या गॅन्गस्टर्सना सामील आहोत की काय असा आभास होतो....मग त्या पळवून नेलेल्या नायिकेने "किड्नॅपरच्या"च प्रेमात पडणे हे आपल्याला खटकत नाही. असो.....एका विषयातून दुसरा विषय येणे हीच तर साहित्यावरील विषयाची खासियत मानली पाहिजे.

~ या अनुषंगानेच मला 'ऐसी रत्ने मेळवीन' फार भावली होती. कारण त्या 'ऑनलाईन काईंड एक्झाम.' मधून Extra-Ordinary Talented म्हणून निवडलेल्या त्या दोन मुलांकडून तो पडद्याआडील सूत्रधार नेमके काय साध्य करून घेणार आहे याची तळमळ वाचकाला अखेरपर्यन्त लागून राहते.....एका चांगल्या कथामांडणीचे हेच तर खरे यश.

इन्द्रा

सागर

सागर · Sat, 12 Feb 2011 - 19:54 · उत्तर

ऐसी रत्ने मेळवीन बद्दल तुमच्याकडून २-३ वेळा उल्लेख ऐकला आहे. हे पुस्तक माझ्या वाचायचे आहे यादीत जोडलेच आहे. नक्की वाचेन मी.
पण तुम्ही जेम्स हॅडली चेसचा उल्लेख करुन मला खूप सुखद धक्का दिला आहे.
जेम्स हॅडली चेस बद्दल माझ्याकडून तुम्हाला एक गरमागरम नेसकॅफे.

जेम्स हॅडली चेसच्या कित्येक कादंबर्‍यांची मी पारायणे केली आहेत. मी तरी त्यांना थरारकथांचा बादशहा समजतो. कम इझी गो इझी ही त्यांची कादंबरी माझ्या विशेष आवडीची. बाकी तुम्ही उल्लेखिलेली नो ऑर्चिड्स फॉर मिस ब्लॅन्डीश तर एकदम भन्नाट आहे. चेसची ती सर्वात गाजलेली कादंबरी म्हणता येईल. बहुधा ही कादंबरी चेसची पहिलीच कादंबरी होती. पण या कादंबरीने त्याकाळी म्हणजे १९३९ साली प्रचंड खळबळ उडवली होती. आणि दुसर्‍या महायुद्धाचा धुराळा थोडा खाली बसल्यावर थोड्या वेगाने जेम्स हॅडली चेस यांच्या थरारकथा १९८४ सालांपर्यंत वाचकांना नवी मेजवानी देत होत्या. १९८५ साली हा लेखक दिवंगत झाल्यावर थरारकथांच्या या बादशहाची गाडी थांबली.
A Coffin From Hong Kong
The Flesh Of The Orchid
The Paw In The Bottle
Hit And Run
The Soft Centre
Want To Stay Alive?
A Can Of Worms

वर दिलेल्या व अशा कित्येक थरारकथांनी जेम्स हॅडली चेसला एक विशिष्ट स्थान मिळवून दिले.

इंद्रराज पवार

इंद्रराज पवार · Sun, 13 Feb 2011 - 06:46 · उत्तर

"...थरारकथांनी जेम्स हॅडली चेसला एक विशिष्ट स्थान मिळवून दिले...."

~ होय सागर, नक्कीच. मूळ ब्रिटिश नागरिक असूनही चेसने आपले लिखाण मात्र अमेरिकन जीवनाशी (त्यातही अर्थात गुन्हेगारी जगतातील घडामोडीशी संबंधित घटना) समरसून केल्याचे आढळते. तुम्ही त्याच्या सर्वच कादंबर्‍यांची पारायणे केलेली दिसतात. ग्रेट. मी मात्र काही निवडकच वाचली असली तरी जितकी वाचली त्यावरून त्याच्या कथानक हाताळणीवर असलेली पकड लक्षात आली. विशेष म्हणजे डॉयल किंवा ख्रिस्ती यांच्या या पध्दतीच्या कथा वाचताना अखेरपर्यंत खरा 'गुन्हेगार' वा 'खुनी' कोण आहे हे लक्षात येत नाही. पण चेसने हा प्रघात मोडून काढून वाचकाला अगदी सुरुवातीलाच ते 'रहस्य' उघडे करून दाखविण्याची शैली अंगिकारली आणि तरीही शेवटच्या पानापर्यंत तो आपले पुस्तक खाली ठेवू शकणार नाही इतके ते उत्कंठावर्धक केले....हीच त्याची खरी खासियत.

"...मिस ब्लॅन्डिश' वर आधारित 'ग्रीसम गँग" हा चित्रपट पाहिला आहे? फार जबरदस्त आहे.... अगदी बॉनी एन्ड क्लॉईड सारखा.

इन्द्रा

मणिकर्णिका

मणिकर्णिका · Wed, 9 Feb 2011 - 02:56

शक्य आहे. धारपांनी एकच पॅटर्न घेऊन भरपूर पुस्तकं काढली, त्यातला प्रकार असेल.
या पुस्तकाचं नाव नंतर बदललं-बिदललं की काय असं वाटून मी आताच गूगल केली ही दोन्ही नावं. आणि माझं बरोबरच होतं! धारपांची दोन सारख्याच पॅटर्नची वेगवेगळी पुस्तकं आहेत ही.
म्हणून मी नायक कोण आहे विचारलं.

इंद्रराज पवार

इंद्रराज पवार · Wed, 9 Feb 2011 - 04:55 · उत्तर

"नॉलेज बॅन्क" वरून आठवले. नारायण धारप यानी 'समर्थ' सोडून जे अन्य विषय हाताळले त्यात ज्या कादंबर्‍यांचा समावेश होऊ शकतो तीत "ऐसी रत्ने मेळवीन" चा समावेश आहे. नेमके प्रकाशन वर्ष माहीत नाही पण सध्याच्या इंटरनेट युगात जगभरातील एका विशिष्ट वयोगटातील मुलामुलीना एका प्रश्नपत्रिकेच्या आधारे त्यांचा 'बुद्ध्यांक' किती 'हाय लेव्हल'चा आहे याची शक्यता आणि तो प्रयोग करणे सोपे वाटेल. पण १९६५ ते १९७० या कालखंडात श्री.धारप यानी अशी शक्यता वर्तवून एक रहस्यमय संस्था देशातील इयत्ता ५ मध्ये शिकणार्‍या मुलांची क्रिप्टीक पद्धतीने टेस्ट घेते....अर्थात शाळाशाळांची परवानगी घेऊन...आणि 'शिष्यवृत्तीसाठी' हजारोंतून एक मुलगा व एक मुलगी यांची निवड केली जाते....कथेतील नियमानुसार नायक असलेल्या एका शिक्षकाला व त्याच्या शाळेतून अंतिम निवड झालेल्या मुलाच्या थोरल्या बहिणीला यात काहीतरी 'वेगळा' हेतू असल्याची शंका येते....मग पुढे...असे काहीसे ढोबळमानाने कथानक आहे.

श्री.धारप यांची काळाच्या पुढे जावून वैज्ञानिक शक्यता अजमावण्याची विलक्षण हातोटी 'ऐसी रत्ने मेळवीन' स्पष्ट करते.

इन्द्रा

मणिकर्णिका

मणिकर्णिका · Wed, 9 Feb 2011 - 07:01 · उत्तर

This comment has been moved here.

सागर

सागर · Wed, 9 Feb 2011 - 18:18

१. साखरेचं बाळ - ऋषिकेशच्या लेखामुळे
२. छंद माझे वेगळे - गो.नी.दां. वल्लीशी मागे एकदा गोनीदांवर चर्चा झाली त्यावेळी राहिले होते ते आता घेतले
३. भगवान बुद्ध - आनंद श्रीकृष्ण (मॅजेस्टीक प्रकाशनाच्या साईट्वर इथे पाहिले म्हणून घेतले)

यशोधरा

यशोधरा · Sat, 12 Feb 2011 - 17:12

वनवास - संत
औदुंबर - पानवलकर
समांतर जीवन - सुनीताबाई
मी हिंदू झालो - थत्ते

सागर

सागर · Sat, 12 Feb 2011 - 19:56 · उत्तर

औदुंबर - पानवलकर
मी हिंदू झालो - थत्ते

यातील ही दोन पुस्तके माझ्या निशाण्यावर आहेत :)

वल्ली

वल्ली · Sun, 13 Feb 2011 - 05:59

कालच पुण्यात एका ठिकाणी एका समारंभाच्या निमित्ताने जायचे असल्यामुळे आचार्य अत्रे येथे भरलेल्या 'साहित्यदर्शन' च्या पुस्तक प्रदर्शनाला वेळेअभावी अतिशय धावती भेट दिली. त्यात एक सुंदर पुस्तक हाती लागले.

अशी धरतीची माया (मरळि मण्णिगे) - शिवराम कारंथ - अनु. रं. शा. लोकापूर
प्रकाशक - साहित्य अकादमी - किं. फक्त १७० रू.

आता आठवडाभरात तिथे एक निवांत भेट देउन खरेदी करेनच. सरसकट सर्वच पुस्तके २०% सवलतीत उपलब्ध आहेत. शिवाय समोरच अक्षरधाराचा नुकताच सुरु झालेला पुस्तकांचा मॉल. एकंदरीत वाचकांसाठी दुग्धशर्करा योगच.

सागर

सागर · Sun, 13 Feb 2011 - 06:07 · उत्तर

दोघांच्या स्पर्धेत वाचकांना लाभ :)

यशोधरा

यशोधरा · Sun, 13 Feb 2011 - 07:49 · उत्तर

अशी धरतीची माया हे अतिशय सुरेख पुस्तक आहे. वाचले आहे आणि संग्रहातही आहे.
वल्ली, सुरेख निवड. खूप आवडेल तुम्हांला.

यशोधरा

यशोधरा · Mon, 14 Feb 2011 - 04:42

काल डॉ सरोजिनी बाबर ह्यांचे 'माझ्या खुणा, माझ्या मला' हे पुस्तक मिळाले.
रविवार सार्थकी.

रंगासेठ

रंगासेठ · Mon, 14 Feb 2011 - 15:39

१) 'माझी कॉर्पोरेट यात्रा' संजय जोशी
२) श्री विदुर यांचे 'मैत्र जीवांचे'
३) 'फिडेल, चे आणि क्रांती' व 'तिसरी क्रांती' - अरुण साधू (वाचली आहेत)

चित्रा राजेन्द्र जोशी

चित्रा राजेन्द… · Mon, 14 Feb 2011 - 16:57

१. अंतरीचे धावे - भानू काळे
२. सुनीताबाई - मंगला गोडबोले
३. मी अल्बर्ट एलिस - डॉ. अंजली जोशी
४. मनोगती - डॉ. आनंद नाडकर्णी
५.मुक्तांगणची गोष्ट - डॉ. अनिल अवचट
६. स्त्रीमिती - निवडक मिळून सार्‍याजणी - संपादित

वल्ली

वल्ली · गुरुवार, 17 Feb 2011 - 07:16

काल आचार्य अत्रे सभागृहातील 'साहित्यदर्शन'च्या प्रदर्शनाला निवांत भेट देउन आलो. जवळजवळ दीड तास घालवला तिथे पण पुस्तक मात्र एकच घेतले गेले. फक्त एकच कसे काय घेउन बाहेर पडलो ते माझे मलाही कळले नाही.:( बरीच् घ्यावयाची होती. पण घेणे राहूनच गेले.
घेतले ते -
सार्थवाह (मराठी अनुवाद) - मूळ हिंदी लेखक मोतीचंद्र -प्राचीन भारताच्या दळणवळणाचा एक अभ्यासू संदर्भग्रंथ.
यात खिस्तपूर्व २०० वर्षांपासून ११ व्या शतकापर्यंतच्या दळणवळणाची, त्यांच्या मार्गांची, व्यापाराच्या व पर्यायाने त्या काळातील राजवटींविषयीची माहिती दिली आहे. संग्रही असावेच असे पुस्तक.
प्रकाशक- साहित्य अकादमी.
किं. १६० रू.

नंतर समोरच्या अक्षरधाराच्या पुस्तक मॉलला पण भेट दिली. एकदम अप्रतिमच सजावट केलीय. एव्हढी सुंदर रचना, पुस्तकांचे कप्पे, खास पुस्तकांसारखीच असणारी उघडमीट करता येणारे कप्पे इतर कुठेही पाहाण्यात आले नाहीत. एकंदरीत भेट द्यावीच असे दुकान.

सागर

सागर · गुरुवार, 17 Feb 2011 - 08:08 · उत्तर

सार्थवाह (मराठी अनुवाद) - मूळ हिंदी लेखक मोतीचंद्र

सुंदर पुस्तक आहे. चंद्रगुप्त मौर्यावर, अशोकावर आणि हर्षवर्धनावर लेखन केले त्यावेळी या पुस्तकाचाही उपयोग झाला होता. नक्की आठवत नाही पण नाणेघाटाबद्दल या पुस्तकात चांगली माहिती आहे.

सुंदर निवड

जालंदर बनकर

जालंदर बनकर · Wed, 2 Mar 2011 - 23:33

आदिपर्व * लेखिका * प्रमिला जरग * मेहता पब्लिशिंग हाऊस * किंमत ३०० रुपये.

चित्रा राजेन्द्र जोशी

चित्रा राजेन्द… · गुरुवार, 3 Mar 2011 - 09:41

`रवीन्द्रवीणा', `रविन्द्रमनन', `रविन्द्रझंकार'....... पॉप्युलर प्रकाशनची तीन पुस्तके (एकूण किंमत रु.४५०/-) म्हणजे रविन्द्रनाथ टागोरांच्या सुप्रसिध्द `गीतांजली' मधील काही गीतांची आचार्य काका कालेलकर ह्यांनी मराठी भाषेत करून दिलेली ओळख आहे.
मूळ बंगाली गीत, त्यांतील भाव विषद करणारे मनन, गीताचा स्वैर अनुवाद व कठीण बंगाली शब्दांचे अर्थ असं ह्या तिन्ही पुस्तकांचं स्वरुप आहे.

यशोधरा

यशोधरा · गुरुवार, 3 Mar 2011 - 10:48 · उत्तर

चित्रा, छान आहेत ही पुस्तके. मी वरच कुठेतरी लिहिलेय पहा ह्या पुस्तकांबद्दल :)

चित्रा राजेन्द्र जोशी

चित्रा राजेन्द… · गुरुवार, 3 Mar 2011 - 16:02 · उत्तर

यशोधरा,
तू म्हणालीस म्हणून मी वरती शोधले. पण नाही मिळाले ग! दुसरीकडे असेल तर संदर्भ देशील, प्लीज.......

वल्ली

वल्ली · गुरुवार, 7 Apr 2011 - 05:19

काल पुण्यात जाउन घेतलेली पुस्तके-
सुशिंची-प्रयास, सालम, क्रमशः
आणि ड्रॅक्युला-ब्रॅम स्टोकर-अनु. स्नेहल जोशी, प्रकाशन-साकेत

सागर

सागर · Sun, 17 Apr 2011 - 18:29

महेश एलकुंचवारांचे स्वानुभवांवर आधारीत असे मौनराग हे पुस्तक बहुतेक ऑफप्रिंट होते की काय माहिती नाही.
पण फ्लिपकार्टवर विशलिस्ट मधे अ‍ॅड करुन ठेवले होते ३-४ महिन्यांपूर्वी.
३ दिवसांपूर्वीच त्यांची ईमेल आली होती, म्हणून तेवढेच पुस्तक ऑर्डरवले आहे

यशोधरा

यशोधरा · Mon, 18 Apr 2011 - 08:30 · उत्तर

तेवढेच पुस्तक ऑर्डरवले आहे

मायमराठीला नवीन शब्द दिल्याबद्दल अभिनंदन रे सागर! :D
मौनराग सुंदर पुस्तक आहे अगदी. अभिनंदन :)

सागर

सागर · Mon, 18 Apr 2011 - 10:41 · उत्तर

यशोधरे
पुस्तकाबद्दल बोल. तू वाचले आहेस तर लिहि की थोडेसे त्यावर ;)

असे नवे शब्द वापरायला मजा येते तरी खरेदी केले आहे याचा संक्षेप केला
तो देखील आळसामुळे :)

यशोधरा

यशोधरा · Mon, 18 Apr 2011 - 11:42 · उत्तर

पुस्तकाबद्दल म्यां पामरे काय बोलावे :) एलकुंचवारांचे खूप सहृदय आणि संवेदनशील मनाने केलेले ललित लिखाण.
जरुर वाच. पुन्हा पुन्हा वाचावे असे आहे.

अवांतर : संवादाचा सुवावो नावाचे त्यांचेच राम शेवाळकरांच्या मुलाखतीचे असेच शब्ददेखणे म्हणावे, असे पुस्तक आहे. मिळाल्यास जरुर वाचणे. :)

सागर

सागर · Mon, 18 Apr 2011 - 12:26 · उत्तर

निशाण्यावर ठेवत आहे हे देखील पुस्तक
आधी मौनराग वाचतो :)

चित्रा राजेन्द्र जोशी

चित्रा राजेन्द… · Sun, 17 Apr 2011 - 18:50

सागर,
`मौनराग' हे पुस्तक नक्की वाच. मला ते खूप आवडले. विशेषकरून एलकुंचवारांच्या बालपणीचे चित्रण वाचून थक्क झाले. माणसाच्या अभिव्यक्तीची तसेच वागण्याची संगती लागण्यास अशा लेखांचा उपयोग होतो. अर्थात असे लेख वाचून मन पूर्वग्रहदूषित होण्याचा संभव असतो. पण ते सारे बाजूला सारून अशा कलावंताच्या कलेचा आस्वाद घेता यायला हवा. असो. हा एक मोठ्ठ्या लेखाचा विषय आहे.
ह्याच पुस्तकातील दोनच लेखांच्या अभिवाचनाचा अभिनव प्रयोग चंद्रकांत कुलकर्णी आणि सचिन खेडेकर ह्यांनी केला होता. ठाण्याच्या गडकरी रंगायतन मध्ये मोजक्या १५-२० प्रेक्षकांच्या उपस्थितीत तो सादर झाला, नव्हे, छान रंगला. दोन्ही कलाकारांनी उत्तम सादरीकरण केले. एखादा ललित लेख तोंड्पाठ करून (एकही शब्द न बदलता) जसाच्या तसा सादर करण्याचं अवघड काम सचिन खेडेकर ह्या कलाकाराने मोठ्या ताकदीने पेलले. अगदी साधे नेपथ्य पण जुन्या वाड्याचा उत्तम फिल देणारे, आणि संपूर्ण रंगमंचाचा केलेला सुयोग्य वापर ह्यामुळे हा प्रयोग बघताना आम्ही सारे रंगून गेलो होतो. आणखी एखाद्या लेखाचा समावेश केला असता तरी चालले असते असे राहून राहून वाटत होते.....

सागर

सागर · Mon, 18 Apr 2011 - 10:43 · उत्तर

चित्रा,

या पुस्तकाबद्दल ऐकले होतेच. पण तुझ्या मतामुळे तर उत्सुकता अधिकच वाढली आहे मौनराग वाचायची
लवकरच वाचेन हे पुस्तक :)

चर्चा प्रकार