गांधी: नेकेड ऎम्बिशन

आनंदयात्री

मजकूर

जॅड अ‍ॅडम्स या बायॊग्राफ़रच्या "गांधी: नेकेड ऎम्बिशन" या पुस्तकाने सध्या बरीच खळबळ माजवली आहे. हे पुस्तक म्हणजे 'महात्म्यामागचा माणुस शोधायचा प्रयत्न' आहे, असे जॅड म्हणतो. वास्तवात मात्र गांधी हे महात्मा कसे नव्हते हे दाखवायचा हा प्रयत्न असावा असे वाटते. त्यांच्या आयुष्यातील विरोधाभास दर्शविण्याचा प्रयत्न असे म्हणतांना त्यांच्यावर भरपुर चिखलफेकच केलेली आहे असेही वाटते.

पुस्तकावर होणार्‍या चर्चा वाचुन ३०० पानांच्या या पुस्तकातील बहुतांश भाग हा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील बाबींवर, सेक्स लाईफवर भाष्य करणारा असावा याचा अंदाज येतो. लेखकाने "इन फॅक्ट ही वॉज अ सेक्स मॅड" अशी विधानेही बिनधास्त केलेली आढळतात. मनुचे प्रकरण, कस्तुरबांच्या निधनानंतर गांधींचे सतत स्त्रियांच्या सान्निध्यात रहाणे हे कारणीमिमांसेसह चर्चिलेले दिसते. मनु (नात), आभा (नातसुन) आणि सुशिला (सहकार्‍याची बायको) - गांधीजींच्या आयुष्यातील या तीन पात्रांबद्दल लेखकाने भरपुर अभ्यास केला आहे असे दिसुन येते. त्रावणकोरच्या पंतप्रधानाची, पंडित नेहरुंची विधाने आणि या सारख्या संदर्भांमुळे वाचकाला वाचतोय ते सगळेच सत्य आहे असा आभास निर्माण करण्यात लेखक एकंदरीत यशस्वी झाला असावा असे वाटते.

या निमित्ताने ब्रिटीश प्रसिद्धिमाध्यमांनीही गांधीवर भरपुर तोंडसुख घेतलेले आहे. द इंडिपेंडंट मधील हा लेख याच विषयांवर भाष्य करणारा आहे. हे पुस्तक आणि या पुस्तकाच्या निमित्ताने चाललेल्या जोरदार चर्चा हा बुद्धिभेद निर्माण कराण्याचा प्रयत्न वाटतो. भारत सरकारनेही यावर काही आक्षेप घेतला आहे की नाही याची अजुन कल्पना आलेली नाही, एरवी गांधीना दैवत मानणारा पक्षही या मुद्द्यावर गप्पच आहे असे दिसते.

आपल्यापैकी कोणी हे पुस्तक वाचले आहे का ?
वाचले असल्यास कसे वाटले ?
गुगलल्यावर याविषयावर बर्‍याच चर्चा सापडतात, आपण वाचल्या असतील तर आपले याबद्दल काय मत झाले ?

एकुणच बिटिशांना गांधींची प्रतिमा मलिन करण्यात इंटरेस्ट असावा किंवा हे पुस्तक असाच बुद्धिभेद निर्माण करणारे असावे असे आपल्याला वाटते का ?

काही दुवे:
१ . द इंडेपेंडंट
२. पुणे मिरर
३. जॅड अ‍ॅडम्सचे संकेतस्थळ
४. दुवा
५. द बुक बॅग

(असे हे वादग्रस्त पुस्तक आत्ताच ऑर्डर करावे म्हणतोय. इथे चांगली घसघशीत ३० टक्के सुटही मिळतेय.)

अभिप्राय

ऋषिकेश

ऋषिकेश · Sun, 4 Jul 2010 - 08:51

हे पुस्तक म्हणजे 'महात्म्यामागचा माणुस शोधायचा प्रयत्न' आहे जॅड म्हणतो. वास्तवात मात्र गांधी हे महात्मा कसे नव्हते हे दाखवायचा हा प्रयत्न असावा असे वाटते. त्यांच्या आयुष्यातील विरोधाभास दर्शविण्याचा प्रयत्न असे म्हणतांना त्यांच्यावर भरपुर चिखलफेकच केलेली आहे असेही वाटते.

सहमत आहे. मी ही असेच ऐकले आहे. हा विषय चर्चेला आणल्याबद्दल आभार

गांधींच्या तरूणपणी त्यांना सेक्स केवळ आवडायचा नाहि तर एक काळ असा होता की त्यांना त्याची आसक्ती होती हे गांधी स्वतःच कबूल करतात (माझे सत्याचे प्रयोग). त्यांचे वडील मृत्यूशय्येवर असताना ते पत्नीला शय्यासोबतीसाठी जबरदस्ती करू पाहत होते ही बोचणी त्यांच्या मनाला सतत होती. स्वतःच्या सेक्सलाईफबद्दल सर्वसामान्य भारतीयांना समजणार्‍या भाषेत (गुजरातीत) इतकं प्रामाणिकपणे लिहिणारा दुसरा नेता झाला नाहि (आता होणं कठीणच आहे). मात्र एकदा त्यांनी सामाजिक कार्याला वाहून घेतल्यावर अश्या भावनांवर ताबा मिळवल्याचेही त्यात म्हटले आहे.

तेव्हा त्यांनी ज्या गोष्टी स्वतःच कबुल केल्या आहेत त्यात उगाच संशोधन वगैरे करून त्यावर पुस्तके लिहिणे आणि गांधीजींच्या अनेक घेण्यासारख्या गुणांकडे दुर्लक्ष करून केवळ चिखल उडवणे हा मला अभ्यास वगैरे वाटत नसून केवळ जॅडरांवांचा आंबटशौक वाटतो. असो.

कोणी वाचले असेल हे पुस्तक तर लिहिलंच

श्रावण मोडक

श्रावण मोडक · Sun, 4 Jul 2010 - 17:27 · उत्तर

ऋषिकेशचे म्हणणे बरोबर आहे. गांधी आणि कामजीवन किंवा सेक्स हा विषय काही नव्याने हाताळला जात नाहीये. त्याच्याही पोथ्या झाल्याच असाव्यात. या पुस्तकात नवे काहीही नाही, अशी समीक्षा वाचल्याचे आठवते. त्यातही जेव्हा या पुस्तकासाठीच्या संदर्भांमध्ये गांधींनी केलेले लेखन आणि त्यांच्याच सामग्रीचा प्रधान आधार म्हणून समावेश होतो हे वाचल्यानंतर मात्र या पुस्तकाकडे फिरकायचे नाही असेच ठरवून टाकले त्यालाही आता काही आठवडे झाले.
आजच्या काळात ज्यांनी 'माझे सत्याचे प्रयोग' वाचले नसेल त्यांच्यासमोर "बाप मृत्यूशय्येवर होता तेव्हा गांधी बायकोसोबत गादीवर होते," असे म्हटले की काय होते? समोरच्याचा आ वासलेला असतो. ते पाहून हे बोलणाऱ्याला तो जर ('माझे सत्याचे प्रयोग'च्या) ज्ञानातूनच बोलत असेल तर, आपण गांधींच्या प्रतिमेचे भंजन केल्याचा आनंद जरूर मिळतो, आणि तो जर हे सारे अज्ञानातून ऐकीव किंवा मिळालेल्या माहितीवर हे बोलत असेल तर ती एक सनसनाटी ठरलेली असते. गांधींच्या संदर्भातच नव्हे तर आपापल्या काळात लोकोत्तर ठरलेल्या अनेक व्यक्तींबाबत असे घडते. गांधीबाबत अशी 'स्क्रुटिनी' (मराठी शब्द माहिती आहे, पण मुद्दाम इंग्रजी लिहिला तो त्यातील पहिल्या अक्षरासाठी. अशा विश्लेषणात काय घडत असते याचा साधारण अंदाज यावा यासाठी.) थोडी अधिकच घडते, कारण त्यांनीच त्यांच्या आयुष्यातील या (त्यांच्या लेखीच्या) पाप-प्रमादांविषयी खुलेपणाने खूपच लिहून, बोलून ठेवले आहे.

त्यांनी ज्या गोष्टी स्वतःच कबूल केल्या आहेत त्यात उगाच संशोधन वगैरे करून त्यावर पुस्तके लिहिणे आणि गांधीजींच्या अनेक घेण्यासारख्या गुणांकडे दुर्लक्ष करून केवळ चिखल उडवणे हा मला अभ्यास वगैरे वाटत नसून केवळ जॅडरांवांचा आंबटशौक वाटतो. असो.

मी वर म्हटलं तसं, सहमतच. थोडं पुढं नेऊ हा मुद्दा. "उगाच संशोधन वगैरे करून" हा मुद्दा दोन स्तरांवर येतो. एक तर ते संशोधन आहे, असे त्यात ध्वनित होते (पण ते वास्तव नाही). पुस्तकाच्या कण्टेण्टविषयी मी जे वाचले त्यानुसार त्यांनी केलं आहे ते फक्त, इकडच्या खेळातील तुकडा तिकडे लावून ती आकृती पहा कशी विकृती आहे, हे दाखवण्याचा उद्योग. ते खरोखरच संशोधन असेल तर त्यामागे विज्ञानाच्या दृष्टीने मानवी वर्तन, स्वभाव यात काही भर टाकणाऱ्या गोष्टींचे संशोधन झाले आहे का? तर त्या अर्थी मानसशास्त्रीय किंवा मानवी व्यवहारविषयाचे पुस्तकलेखक अभ्यासक आहेत असे काही दिसत नाही. आणि संशोधन झालेले नाही असा मुद्दा असेल तर तो प्रश्नच निकालात निघतो. मग पुस्तकलेखकाने जे काही केले ते वर दिलेल्या उदाहरणातील सनसनाटी निर्मात्याचेच काम आहे, बाकी काही नाही. फार वेळ घालवावा असा हा विषय नाही.
आनंदयात्री,

हे पुस्तक म्हणजे 'महात्म्यामागचा माणुस शोधायचा प्रयत्न' आहे जॅड म्हणतो.

या वाक्यात 'आहे' या शब्दानंतर एक स्वल्पविराम आणि त्यानंतर असे हा शब्द आहे असे गृहीत धरतो.

आनंदयात्री

आनंदयात्री · Mon, 5 Jul 2010 - 18:26 · उत्तर

>>त्यातही जेव्हा या पुस्तकासाठीच्या संदर्भांमध्ये गांधींनी केलेले लेखन आणि त्यांच्याच सामग्रीचा प्रधान आधार म्हणून समावेश होतो हे वाचल्यानंतर मात्र या पुस्तकाकडे फिरकायचे नाही असेच ठरवून टाकले त्यालाही आता काही आठवडे झाले.

म्हणजे काय ते नीट कळाले नाही. जॅड्चा तो दावा निखलास खोटा आहे असे म्हणायचे आहे का ?

>>ते खरोखरच संशोधन असेल तर त्यामागे विज्ञानाच्या दृष्टीने मानवी वर्तन, स्वभाव यात काही भर टाकणाऱ्या गोष्टींचे संशोधन झाले आहे का?

लेखक स्वतःला केव्हा बायोग्राफर, इतिहासकार म्हणवुन घेतो तेव्हा त्याच्याकडुन ही अपेक्षा ठेवणे किती योग्य आहे याचा मला अंदाज लागत नाही.

>>या वाक्यात 'आहे' या शब्दानंतर एक स्वल्पविराम आणि त्यानंतर असे हा शब्द आहे असे गृहीत धरतो.

योग्य तो बदल केला आहे. धन्यवाद.

श्रावण मोडक

श्रावण मोडक · Tue, 6 Jul 2010 - 08:04 · उत्तर

जॅडचा दावा? गांधीनीच लिहून ठेवलेल्या सामग्रीचा आधार घेत त्यांनी आपल्या आकलनानुसार अर्थ लावलेले आहेत, असे मी वाचलेल्या परिचयांवरून दिसते. त्याला दावा कसे म्हणायचे? आपल्याला कामभावनेची आसक्ती होती, हे गांधीनीच लिहिल्यानंतर तेच वाक्य आपल्या शब्दांत मी लिहिले तर तो माझा दावा ठरतो की काय?
या दृष्टीनेच जॅड यांना बायोग्राफर किंवा इतिहासकारही मानता येणार नाही. बायोग्राफीइतका गांधींचा त्यांचा अभ्यासच नाही. त्यांनी गांधींच्या जगण्यातील एक मुद्दा घेतला. त्यावर गांधीनी लिहून ठेवलेल्या सामग्रीचाच वापर केला आणि अर्थ काढला आहे. त्या दृष्टीने हा सारा उद्योग भंपकपणाचा आहे. कारण, जॅड यांनी जुनेच मुद्दे नव्याने मांडले इतकाच त्याचा अर्थ आहे. ज्यांच्यासाठी या गोष्टी नवीन आहेत त्यांनी जॅडचे पुस्तक वाचावे; आणि जॅडच्याही पलीकडे जाऊन इतर संदर्भ तपासून आपली मते बनवावीत. तशा अभ्यासांती एखाद्याने "गांधी कामपिसाट होते, असे माझे मत बनले आहे," असे म्हटले तर माझी त्याला हरकत नाही. कारण त्या मताची किती दखल घ्यायची हे ठरवण्याचा माझा अधिकार कायम राहतोच. ते त्याचे मत असेल, मी त्याच्याशी असहमत असेन.
या पुस्तकाविषयी अधिक चर्चा अशक्य आहे. कारण पुस्तकाचा जीवच तेवढा आहे.
'गांधी' हा विषय मात्र चर्चेला घेता येतो.
आनंदयात्री, तू हे पुस्तक जरूर वाच. मी पुस्तक वाचणार नाही. आपण तुझ्या वाचनानंतर चर्चा करू. गांधीनीच लिहिलेल्या मूळ गोष्टींचा आधार मी घेईन. जॅडच्या मुद्यांच्या आधारे तू बोलू शकशील.

ऋषिकेश

ऋषिकेश · Tue, 6 Jul 2010 - 15:30 · उत्तर

पूर्ण सहमत आहे.

श्रामो,
शिवाय माझ्या वरील प्रतिसादातही तुम्ही म्हणता तसे संशोधन न म्हणता "संशोधनाचा दावा" अशी शब्दरचना हवी होती

आनंदयात्री

आनंदयात्री · Tue, 6 Jul 2010 - 19:42 · उत्तर

>>या दृष्टीनेच जॅड यांना बायोग्राफर किंवा इतिहासकारही मानता येणार नाही.

बरोबर. माझे म्हणने एवढेच होते की जेव्हा लेखक स्वतःला इतिहासकार, बायोग्राफर 'म्हणवुन' घेतोय तेव्हा त्याच्याकडुन 'विज्ञानाच्या दृष्टीने मानवी वर्तन, स्वभाव यात काही भर टाकणाऱ्या गोष्टींचे संशोधन' अपेक्षा ठेवणे किती योग्य आहे याचा मला अंदाज लागत नाही.

>>कारण त्या मताची किती दखल घ्यायची हे ठरवण्याचा माझा अधिकार कायम राहतोच. ते त्याचे मत असेल, मी त्याच्याशी असहमत असेन.

खरे आहे, असहमत तर आपण आहोतच. म्हणुनच चर्चेच्या मसुद्यात मी 'हे पुस्तक आणि या पुस्तकाच्या निमित्ताने चाललेल्या जोरदार चर्चा हा बुद्धिभेद निर्माण कराण्याचा प्रयत्न वाटतो.' असे लिहले आहे.

>>आनंदयात्री, तू हे पुस्तक जरूर वाच. मी पुस्तक वाचणार नाही. आपण तुझ्या वाचनानंतर चर्चा करू.

येस्स. याचबरोबर 'माझे सत्याचे प्रयोग' ही आणुन ठेवले आहे. आधी हे वाचेन मग जॅड्चे पुस्तक.

>>जॅडच्या मुद्यांच्या आधारे तू बोलू शकशील.

नक्की चर्चा करु. पण मी जॅडच्या मुद्द्यांच्या आधारे बोलेन असे वाटत नाही. कारण मला आजही (चर्चेच्या मसुद्यात लिहल्याप्रमाणे) जॅडचा उद्देश चिखलफेक करणे हा आहे असे वाटते.

ऋषिकेश

ऋषिकेश · Tue, 6 Jul 2010 - 21:17 · उत्तर

सत्याचे प्रयोग वाचतो आहेस हे वाचून आनंद झाला. नीट सावकाश शांतपणे वाच. :)

चर्चा प्रकार