मज शोधून द्यावी बोरकरांची ही कविता...

चिंतातुर जंतू

मजकूर

ज्ञानेश्वर समाधिस्थ झाल्यानंतरचं वर्णन बा. भ. बोरकरांनी एका कवितेत असं केलेलं आहे:

‘ज्ञानदेव गेले तेव्हा, कोसळली ‘भिंत’,
वेद झाले रानभरी, गोंधळले संत.’
हा उल्लेख या दुव्यावर मिळाला.
या कवितेच्या मी शोधात आहे. कृपया आपल्याला माहिती असल्यास या धाग्यावर द्यावी. धन्यवाद!

अभिप्राय

सागर

सागर · Fri, 29 Oct 2010 - 20:58

स्त्रोत दुवा : इथे क्लिक करा

लेख काही कारणास्तव पाहता नाही आला तर कॉपी पेस्ट करत आहे. ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर यांनी हा लेख लिहिला आहे. त्यात बोरकरांची ही कविता आहे
---------------------------------------
गुरुवार, कार्तिक वद्य त्रयोदशी, शके १२१८ या दिवशी प्रात:काळी काहीशा निरुत्साहाने उगवलेला सूर्य भर माध्यान्ही क्षणभर ढगाआड गेला. एरवी कुठल्याही बर्‍यावाईट घटनेला वा अडीअडचणीला धीराने सामोरे जाणारे संत आणि गंभीर वृत्तीचे सज्जनही पार गोंधळून गेले. ' रडणे बरे दिसणार नाही ' म्हणून महत्प्रयासाने अश्रूंना थोपवून धरले तरी त्या सार्‍यांचेच कंठ पुन:पुन्हा दाटून येत होते. ज्या भिंतीवर बसून चारही भावंडे चांगदेवांना भेटण्यासाठी गेली होती ती भिंतदेखील दु:खावेगाने कोसळली.

ज्ञानदेव गेले तेव्हा, कोसळली भिंत ।
वेद झाले रानभरी, गोंधळले संत।।

ज्ञानोबांच्या सहवासाने पावन झालेली इंद्रायणी एरव्ही कशी भरभरुन वाहत असे ! पण आज अचानक तिचे पाणीच आटले. मराठीचा एवढा मोठा बहरलेला वटवृक्ष त्याच्या तळवटी पाणी जळू लागले. नेहमी स्थितप्रज्ञपणे वागणारे निवृत्तिनाथ आज पार कोसळले, तनाने आणि मनानेही ! आसवांनी भरलेले त्यांचे डोळे रडून रडून जणू निस्तेज होऊ लागले.

ज्ञानदेव गेले तेव्हा, आटे इंद्रायणी ।
मराठीच्या वडातळीं, जळूं लागे पाणी।।
ज्ञानदेव गेले तेव्हा, ढळला निवृत्ति ।
आसवांच्या डोही झाली, विझू विझू ज्योती।।

मी देवाच्या पायतळीची वीट कधी होईन बरे? अशा शब्दांत ज्ञानोबांनी जिचे कौतुक केले होते, त्या विटेलाही दु:खावेगाने तडा गेला.

प्रत्यक्ष पांडुरंगाला जे वाटत होते, ते तर नुसते व्यक्त करण्यासही योग्य शब्द नव्हते. पांडुरंगाच्या मनात भावभावनांचा कल्लोळ दाटून आला होता. सर्व भक्तमंडळी माझी लेकरे. नामदेव भोळा म्हणून जरा जास्तच लाडका. निवृत्ती योगमार्गातील अधिकारी म्हणून मला प्रिय. जनी अनाथ म्हणून तिच्याबद्दल मला अधिक जिव्हाळा, असे असले तरीही या सर्वांमध्ये उठून दिसायचा तो माझा ज्ञानी ज्ञानदेव. मी चतुराईने सार्‍यांच्या तावडीतून सुटत असे. पण ज्ञानदेवाची गोष्टच वेगळी. त्याने आपल्या टपोर्‍या, पाणीदार डोळ्यांनी नुसते माझ्याकडे बघितले तरी माझी कोण त्रेधातिरपीट उडत असे! त्याचे ते खोल जलाशयासारखे डोळे नुसत्या दृष्टिक्षेपातच खूप काही सांगून जात. कोवळ्या वयात किती किती सहन करावे लागले याला. एकाच भरारीत विश्वच जिंकून गेला. अगदी थोड्या वेळात केवढे महान कार्यकर्तृत्व याने करून दाखविले. त्याला मोठे, अधिक मोठे झालेले बघण्यातला आनंद मलाही किती सुखावीत होता. तो आनंद अगदीच अल्पजीवी ठरला. याच्यासाठी आपण काही करावे, उन्हातान्हात रानोमाळ भटकून याच्या पायाला फोड आले होते, कोणालातरी सांगून त्या पायांना लोणी लावून द्यावे, याला काय हवे-नको पाहावे, प्रेमाने जवळ घेऊन त्याची विचारपूस करावी, असे फार मनात होते. पण तसे काही विचारण्याची संधी याने मला दिलीच नाही. एके दिवशी सरळ म्हणाला, 'मी आता संजीवन समाधी घेतो' किती घाई केली याने ! मी 'नाही' कसे म्हणणार ? लेकरू इतके लाघवी की, त्याला ' नाही ' म्हणणे कोणालाही शक्य होत नसे. इतर सारी मला विठोबा, विठ्ठल, पांडुरंग अशा नावांनी हाका मारीत. याने मात्र मला बापरखुमादेविवरु म्हणून गौरविले. तेही कसे तर ' स्व 'त्व विसरुन बापरखुमादेविवरू हीच नाममुद्रा अभंगलेखनासाठी घेऊन ....'
....अशा आठवणींच्या भाऊगर्दीत लाडक्या लेकराच्या अवचित संजीवन समाधी घेण्याच्या निर्धाराने विठ्ठल देव खचला. लाडक्याच्या वियोगाने कमरेत वाकला.

ज्ञानदेव गेले तेव्हा, तडा विटे गेला।
बापरखुमादेविवरु, कटीत वाकला।।
ज्ञानदेव गेले तेव्हा , बापुडला नामा।
लागोपाठ भावंडें तीं गेली निजधामा।।
माझ्या ज्ञानराजा, तें रे कळों आले आज।
भरदुपारीं ही तशी झाली तीनसांज।।
तेव्हांच्यासारखा, पुन्हा बावला मोगरा।
भुईभर झाल्या कळ्या, तुटला आसरा।।
इथे आळंदीत आतां ऊर फाटे।
पंढरीच्या वाटेंतही, बाभळीचे काटें।।
कळ्यांचाहि वास जिवा, जाहलासे फांस।
एकाकीं प्रवास आतां, उदास उदास।।

कविवर्य बा. भ. बोरकरांनी प्रत्येक मराठी माणसाचे मनोगत या शब्दांमधून व्यक्त केले आहे. या बापरखुमादेविवराच्याच नव्हे तर तुम्हां-आम्हां सार्‍यांच्याच लाडक्या ज्ञानरायाला साश्रू नयनांनी भक्तिभावनेने नमस्कार करुया.

ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर

यशोधरा

यशोधरा · Mon, 1 Nov 2010 - 14:13 · उत्तर

सागर, धन्यवाद.
ही संपूर्ण कविता आहे.

सागर

सागर · Mon, 1 Nov 2010 - 15:58 · उत्तर

या कवितेच्या पूर्ण अस्तित्त्वावर शिक्का मारल्याबद्दल धन्यवाद :)

चिंतातुर जंतू

चिंतातुर जंतू · Sat, 30 Oct 2010 - 08:23

धन्यवाद. मला तुकड्या-तुकड्यांत मिळाली होती पण ही बहुधा संपूर्ण असावी.

सागर

सागर · Sun, 31 Oct 2010 - 16:00 · उत्तर

ज्योतिर्भास्कर जेव्हा बोरकरांच्या या सुंदर कवितेचा वापर करतात तेव्हा ते नितांत वाचनीय तर असतेच पण बोधपरही असते :)

चला या निमित्ताने (कालाच्या ओघात विसरलेल्या) एका छान कवितेची ओळख झाली
धन्यवाद तुमचे ही :)

चिंतातुर जंतू

चिंतातुर जंतू · Tue, 2 Nov 2010 - 05:41

याच कवितेविषयी आता अजून माहिती हवी आहे. ती 'चांदणवेळ' नावाच्या बोरकरांच्या संकलनात समाविष्ट आहे, पण ती मुळात कोणत्या कवितासंग्रहात होती हे हवं आहे. 'दूधसागर' (१९४७) मध्ये असावी असा अंदाज आहे पण खात्रीलायक माहिती हवी आहे. कोणापाशी असल्यास कृपया सांगावी.

सागर

सागर · Tue, 2 Nov 2010 - 07:59 · उत्तर

कोणत्या संग्रहातील ही कविता आहे हे माहिती नाही पण गूगलताच काही दुवे मिळाले आहेत

दुवा १

दुवा २

आमच्या ऑफिसातून दिसत नसल्यामुळे विश्वासार्हतेची खात्री नाही.

चिंतातुर जंतू

चिंतातुर जंतू · Tue, 2 Nov 2010 - 08:53 · उत्तर

या दुव्यांवर केवळ काही कवितांचे उल्लेख किंवा कविता उद्धृत केल्या आहेत. पण 'ज्ञानदेव गेले तेव्हा' या कवितेच्या स्रोताविषयी काही कळत नाही.

यशोधरा

यशोधरा · Tue, 2 Nov 2010 - 08:58 · उत्तर

उद्या सांगू शकेन, बोरकरांच्या समग्र कविताखंडांमध्ये कविता व ती कोणत्या संग्रहात किती साली समाविष्ट केली गेलेली आहे, हे दिलेले आहे. ते पाहून कन्फर्म करुन सांगता येऊ शकेल. (हेच अभिप्रेत आहे असे गृहीत धरुन)

सागर

सागर · Tue, 2 Nov 2010 - 09:16 · उत्तर

माझा बोरकरंच्या समग्र कविताखंडाचा अभ्यासही नाहिये आणि कविता या प्रांतात एक खास दिशा सोडली तर फारसे वाचनही नाहीये.

यशोधरा नक्की ही माहिती देईन याची खात्री आहे :)

यशोधरा

यशोधरा · Wed, 3 Nov 2010 - 06:37

सदर कविता बोरकरांनी पुणे मुक्कामी २८.३.१९५७ रोजी लिहिली.
चित्रवीणा (१९६०) ह्या संग्रहात ती आहे. त्याचप्रमाणे बोरकरांची कविता (१९६०) ह्या बोरक्रांच्या संकलीत काव्यसंग्रहातही आहे. दोन्ही पुस्तके मौज प्रकाशनाची.

चिंतातुर जंतू

चिंतातुर जंतू · Wed, 3 Nov 2010 - 06:41 · उत्तर

धन्यवाद!

चर्चा प्रकार