मराठी पुस्तक पायरसी!!!

मस्त कलंदर

मजकूर

परवा मैत्रिणींसोबत माटुंग्याला फिरत होते.. तिथे रस्त्यावर इंग्रजी पुस्तकांचे बरेचसे विक्रेते असतात. सहज नजर गेली, तर तिथे पहिल्यांदाच मराठी पुस्तके दिसली.. कमलाबाई ओगलेंचे रूचिरा, ययाती, मृत्युंजय,छावा आणि अशीच सतत चर्चेत असलेली आणखी काही... इंग्रजी पुस्तकांची पायरसी होते, त्यात काही नवल नाही. पण मराठी पुस्तके अशी पहिल्यांदाच पाहिली. किंमती पाहिल्या तर मूळ किंमतीपेक्षा चांगलेच स्वस्तात मिळत होते..

मनात आले, आधीच मराठी पुस्तकांना इंग्रजीसारखा वाचकवर्ग/ग्राहक नाही म्हणून ओरड आहे तर त्यात असे जर होऊ लागले, तर प्रकाशकांचे नि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे लेखकांच्या मानधनाचे काय?? अर्थातच वाचकांना काय, स्वस्तात पुस्तके मिळाली तर हवीच आहेत.. पण मग त्यामुळे पुस्तकनिर्मितीवर याचा नक्कीच परिणाम होऊ शकतो..

तुम्हांला अशा पायरसीचा अनुभव आहे का?नि तुमच्या मते याचा पुस्तकनिर्मीतीशी निगडित घटकांवर काय परिणाम होऊ शकतो??

अभिप्राय

नंदन

नंदन · Mon, 10 May 2010 - 07:17

प्रकाशक आणि लेखकाच्या दृष्टीने पायरसी अर्थातच हानिकारक. मात्र कुठेतरी ही बातमी वाचून बरंही वाटलं. मराठी पुस्तकांची पायरसी होते आहे, याचा अर्थ ह्या पुस्तकांना वाढती मागणी आहे. योग्य दरात पुरवठा झाला तर ती पूर्ण करता येईल. हे अर्थातच मुंबई-पुण्यापेक्षा उर्वरित महाराष्ट्रात अधिक खरं ठरावं. कारण पुस्तक विकत घेण्याची इच्छा असूनही ती मिळत नाहीत अशी परिस्थिती बर्‍याच ठिकाणी आहे.

याच संदर्भात काही वर्षांपूर्वी लोकसत्तेत आलेला एक लेख आठवतो. त्यात कलकत्त्यात दरवर्षी भरणार्‍या भव्य 'बोईमेल्या'चे अर्थात पुस्तकमेळ्याचं वर्णन आलं होतं. साधारण एक मराठी पुस्तक ज्या किंमतीला मिळतं त्याच्या एक तॄतीयांश किंमतीत तिथे पुस्तकं उपलब्ध होती. मौजेच्या कागदाचा, छपाईचा दर्जा नसला तरी अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचण्यासाठी असे काही बदल घडवून आणणं आवश्यक असावं. मला वाटतं लेखकाची रॉयल्टी प्रतीमागे १०%च्या आसपास असावी. प्रसिद्ध लेखक असला तर १५% (उदा. - 'आहे मनोहर तरी'). मूळ प्रत आणि पायरेटेड प्रत ह्यांच्यात प्रकाशकाला टाळता न येण्याजोगा हा एकच खर्च असावा असा अंदाज आहे. (चूभूदेघे). अर्थात यामागचं अर्थशास्त्र इतकं सोपं नाही, याची कल्पना आहे; पण यादृष्टीने काही पावलं उचलल्यास पायरसीला आळा बसणं आणि अधिक प्रतींची आवृत्ती काढता येणं शक्य होईल, असं वाटतं. अर्थात हे बरंचसं ठोकताळ्यावर आधारित अनुमान. या संबंधी कोणी माहीतगार व्यक्तीने लिहिलं तर फारच उत्तम.

निखिल देशपांडे

निखिल देशपांडे · Mon, 10 May 2010 - 08:26

एका दृष्टीने पाहिले तर मराठी पुस्तकांची पायरसी पाहुन नंदन म्हणतात तसे बरेही वाटले...
साधारणता मराठी पुस्तकांच्या किमती ईतर पुस्तकांच्या मानाने जास्तच असतात असे जाणवते. सध्याचेच एक उदाहरण घ्यायचे तर अनुवादीत शांताराम ची किंमत ९९० रुपये आहे. अर्थात त्याच पुस्तकाच्या २००५ च्या ईंग्रजी पेपरबॅक एडीशन ची किंमत ५३४ रुपये आहे. अश्या परिस्थीती डिमांड असल्यास पायरसी होण्याची शक्यता नाकारता येत नाहीच. ह्यातही पायरसी चे लेखकास किती नुकसान व प्रकाशकास किती नुकसान हे कळणे अवघडच आहे. त्यामुळे पायरसीला रोखायचे असेल तर प्रकाशंकांना ठोस पावले उचलावे लागतील असे वाटते

राधा१

राधा१ · Mon, 10 May 2010 - 12:23

पायरसी होत आहे म्हणजेच मराठी पुस्तकाला वाचक मागणी वाढली आहे अस समजायला हरकत नाही.
पण तरी सुद्धा पायरसी होणे नक्कीच चांगले नव्हे हे तितकेच खरे.

ऋषिकेश

ऋषिकेश · Mon, 10 May 2010 - 13:50

एका दृष्टीने पाहिले तर मराठी पुस्तकांची पायरसी पाहुन नंदन म्हणतो तसे बरेही (मला तर बरेच बरे) वाटले... पण..
तरीही तो पण उरतोच

श्रावण मोडक

श्रावण मोडक · Mon, 10 May 2010 - 16:57

पायरसी चांगली की वाईट? चोरी चांगली की वाईट? उत्तर एकच.
एखाद्या दरोडेखोराच्या घरी चोरी झाली तर ती चांगली की वाईट? उत्तर पुन्हा तेच.
हे झाले आदर्श. जपलेच पाहिजेत.
पायरसी होत असेल मराठी पुस्तकांची, तर छापे टाका, ती जप्त करा, पायरसी करणाऱ्यांना गजाआड टाका. कॉपीराईट कायदा आहेच त्यासाठी. इतरही कायदेशीर तरतुदी असतील.
या पायरसीचा फायदा कुणाला? वाचकाला. नुकसान कोणाचे? नुकसान व्यावसायीकाचे होत असते. मराठीतील प्रकाशकांना व्यावसायीक म्हणणे थोडे धाडसाचेच आहे. सात सक्कं त्रेचाळीसच्या निमित्ताने इतरत्र चर्चा सुरू आहे. त्यात जे लिहिले तेच येथे पुनर्प्रकाशित करतो:
मला इंद्रराज पवारांनी लिहिलं -
"'किरण नगरकर' विषयावरील चर्चेत आपण असे म्हटले की, "सात सक्कं त्रेचाळीस" ची दुसरी आवृत्ती निघाली, जी माझ्याकडे आहे...". मला साहजिकच उत्सुकता लागुन राहिली कारण सदरची कादंबरी मी माझ्या (....त्या पात्रतेच्या) काही मित्रांना भेट म्हणून देण्याच्या विचारात कायम असतो. तुमच्या त्या नोटनंतर मी लागलीच स्थानिक विक्रेत्यामार्फत थेट "मौज प्रकाशन" मुंबई यांच्याशी संपर्क साधला, पण त्यांनी सदरची कादंबरी "आऊट ऑफ प्रिंट" असल्याची बातमी दिली. मग आपणाकडे जी आवृत्ती आहे ती कुठली? प्रकाशक "मौज"च आहे की अन्य दुसरे कोण? प्लीज तसा दुसरा प्रकाशक असल्यास परत एकदा ती प्रत पाहुन मला त्याबाबतची माहिती दिल्यास मी थेट त्यांच्याशी संपर्क साधुन आवश्यक त्या प्रतींची खरेदी करेन. तसदीबद्दल क्षमस्व...."
मी त्यांना दिलेले उत्तर:
"आयला, म्हणजे या दुसऱ्या आवृत्तीलाही शनीच आहे की काय? (मी भविष्य वगैरे मानत नाही. ती बोलण्याची एक पद्धत इतकंच). ही प्रतिमा प्रकाशन. २००४ साली. किंमत २०० रुपये. या आवृत्तीला विद्युत भागवतांची एक प्रस्तावना आहे. 'सात सक्कं त्रेचाळीस'चा प्रकाशकीय आणि समीक्षात्मक प्रवास पहिल्या आवृत्तीच्या काळात कसा झाला या विषयावर त्यांनी त्यात विवेचन केलं आहे. आणि आज इथं ही स्थिती... Sad
आता आपण आहोत २०१० सालात. म्हणजे चांगल्या अर्थी (२००४ साली निघालेली) ही दुसरी आवृत्ती संपली असे म्हणता येते. पण तुमच्या पुस्तक विक्रेत्याने या आवृत्तीसाठीही मौजेकडेच संपर्क साधला याचा अर्थ प्रतिमाने ही आवृत्ती काढल्याची वार्ता त्यांच्या गावी नाही. प्रदीप यांच्या खवत चक्कर मारून या. प्रकाशनाविषयी मी तारे तोडले असावेत असे वाटत होते. सात सक्कंच्या दुसऱ्या आवृत्तीचा हा किस्सा मात्र (दुर्दैवाने) मी खरा आहे असे सांगणारा निघतोय..."
यावर त्यांचे मला आलेले उत्तर:
"अपडेटबद्दल धन्यवाद.... "प्रतिमा" कडे तात्काळ संपर्क साधण्यास आमच्या विक्रेत्यास उद्याच सांगतो. "सात..."ची दुसरी आवृती निघाली आहे की नाही याची त्याला किंवा तेथील सेल्स गर्लला माहिती नव्हती याचे मला आश्चर्य वाटले नाही.... संताप आला तो "मौज प्रकाशन" सारख्या "इंटेग्रीटी" जपणारे असा नावलौकिक असणार्‍या संस्थेतील भोंगळ कारभाराचा.... त्या तरुणीने मुंबईला फोन लावला त्यावेळी मी तिथेच होतो. फोनवर जो किंवा जे होते त्यांचा प्रतिसाद रूक्ष तर होताच, पण "सात..." ची "दुसरी आवृती निघाली आहे ना?" या साध्या आणि थेट प्रश्नाला चीड येणारे उत्तर मिळाले.... "माहीत नाही, आम्ही फक्त आमच्या प्रकाशनासंबंधीचीच माहिती ठेवतो..." बस्स !! फोन बंद...! ~~ कशाला साहित्य संमेलनात हे गळे काढतात की...."लोकांत वाचनाची आवड कमी झाली आहे..." साहित्याचे खरे शत्रु हे कुढणारे आणि असूया बाळगणारे थोर थोर प्रकाशकच आहेत. असो. श्री. प्रदीप यांचा खरड्वरील तो धागा निश्चित वाचेन."
या खरडींतील अनुभव अजिबात अतिशयोक्त नाहीत. माझा अनुभव तर बऱ्यापैकी थेट आहे. कारण मी अनुवादक आहे, कादंबरीचा लेखकही आहे. त्या अनुभवानुसार मराठीतील प्रकाशनाला व्यवसाय म्हणण्याचं धाडस मी करू शकत नाही. त्यामुळं त्यांना व्यावसायिकांच्या मापदंडात मोजणार नाही. यासंदर्भात मिपावरच प्रदीप यांच्या खरडवहीत जाऊन वाचा. ती प्रदीर्घ खरड असल्याने इथं तशीच पुनर्प्रकाशित करत नाही. तेथे या व्यवसायाचे माझ्या आकलनातील एक चित्र मी लिहिले आहे. ते पाहिल्यानंतर या पायरसीबाबत मी तरी न-नैतीक भूमिकेतूनच पाहतो. म्हणून वर मी एक अतिरिक्त प्रश्न केला - दरोडेखोराच्या घरात चोरी झाली तर ती चांगली की वाईट? वाईटच. आदर्श म्हणून. पण... इथे येणारा हा पण मी नेमका उपरोक्त दोन्ही 'पण'च्या संदर्भात अधिक व्यापकतेने वेगळ्या बाजूकडून आणतो आहे. यावर अधिक चर्चा व्हावीच.

विकास

विकास · Tue, 11 May 2010 - 22:03

पुस्तके स्वस्तात मिळत होती याचा अर्थ पायरसी केली गेली असा का घेतला गेला आहे? ती ड्युप्लीकेट वाटली का? इंग्रजी पुस्तके पण पायरसी केलेली असतात असे नक्की माहीत आहे का? पुस्तके सॉफ्टवेअर, सीडी अथवा डिव्हीडी इतके पायरेट करणे सोपे असते का? कधी काळी फोर्टमधे मी इंग्रजी पुस्तके घेयला जायचो तेंव्हा कोणीतरी ती स्वस्तात कशी मिळतात ते सांगितल्याचे आठवते. खरे-खोटे माहीत नाही, पण तेंव्हा तरी मला तार्कीकदृष्ट्या पटले होते:

तेंव्हा भारतात खूप तस्करीतून माल येत असे. ति तस्करी, बॉक्सेस मधून लपवताना, सगळ्या बाजूंनी पुस्तके लावलेली असत. शिवाय मधेही काही लेयर्स असत. कस्टमने उघडले तर पुस्तके दिसणार पण खरा धंदा त्याच्या आतील गोष्टींमधे होयचा. अर्थात त्यांचे त्या नवीन पुस्तकांमधे काहीच पैसे गुंतलेले नसायचे इतके पैसे तस्करीतून मिळत. मग ती पुस्तके फूटपाथवर स्वस्तात मिळत.

तसेच काहीसे हे प्रकरण नसेल ना?

राजे

राजे · Wed, 12 May 2010 - 08:40 · उत्तर

हीच शंका मनात आली :)

निखिल देशपांडे

निखिल देशपांडे · Wed, 12 May 2010 - 10:15 · उत्तर

इंग्रजी पुस्तके पण पायरसी केलेली असतात असे नक्की माहीत आहे का?

हो ह्याबाबत बर्‍याच केसेस भारतात झालेल्या आहेत. त्यातले सहज सापडलेले काही दुवे येथे संदर्भासाठी देत आहे.

१) http://www.indianprinterpublisher.com/news/Delhi_police_cracks_1610.html

२) http://www.dnaindia.com/lifestyle/report_book-lovers-are-robbing-authors-of-their-due_1281390

स्वःस्तात रिप्रिंट केलेली अनेक पुस्तके बाजारात दिसतात. त्यांचा क्वॉलिटी वरुन सहज ते ओळखले जाउ शकतात.
बरेच वेळा फोटिकॉपी केलेले ईंग्रजी पुस्तके सुद्धा बाजारात पाहिलेले आहेत. सगळ्यात सोप्या पद्धतीने केली जाणारी पायरसी ह्याच प्रकारची आहे. ह्याशिवाय ईतर भाषातली पुस्तके विना परवानगी अनुवादीत करणे ह्याला पायरसी म्हणता येईल का??

पुस्तके सॉफ्टवेअर, सीडी अथवा डिव्हीडी इतके पायरेट करणे सोपे असते का?

ईंग्रजी पुस्तकांच्या बाबतीत तर हे सोपे आहे असे म्हणावेस वाटते, कारण स्कॅनर एक कॉम्पुटर आणि ओप्टिकल कॅरेक्टर रिकग्निशन सॉफ्टवेअरने पुस्तकाची सॉफ्टकॉपी बनवणे सोपे आहे. ह्या सॉफ्टकॉपी वरुन ह्या पुस्तकाचे रिप्रिंट बनवणे सोपेच आहे.
मराठी पुस्तकांच्या बाबतीत ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्नेशन सॉफ्टवेअर निटसे उपलब्ध नसल्यामुळे हे थोडे अवघड आहे पण सरळ संपुर्ण टाईप करुन प्रिंट करणे हा मार्ग सुद्धा अवलंबल्या जाउ शकतोच ना. ह्या आधीसुद्धा मराठी पुस्तकांच्या पायरसी चा मुद्दा उचलल्या गेला होता. त्यावेळेस राजहंस प्रकाशनाकडुन तक्रार पण करण्यात आलेली होती. अधिक माहीती साठी हा दुवा पाहु शकता. ही बातमी साधारणता २००८ सालाची आहे. ह्याचा अर्थ तेव्हा पासुनच रिप्रिंट केलेली मराठी पुस्तके उपलब्ध होती. ह्या शिवाय काही खाली देत आहे.

१) विनीता कामठे ह्यांचा टु द लास्ट बुलेट च्या मराठी आवृत्तीच्या पायरची बातमी.

२) http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=1506874

३) http://www.loksatta.com/old/daily/20060729/opd02.htm

कधी काळी फोर्टमधे मी इंग्रजी पुस्तके घेयला जायचो तेंव्हा कोणीतरी ती स्वस्तात कशी मिळतात ते सांगितल्याचे आठवते. खरे-खोटे माहीत नाही, पण तेंव्हा तरी मला तार्कीकदृष्ट्या पटले होते:

कदाचीत असे असेलही पण २००३ सालचा ह्या लेखानुसार सरकारने बुक पायरसी अस्तित्वात आहे हे मान्य केल्याचे दिसते.

आनंदयात्री

आनंदयात्री · Wed, 12 May 2010 - 06:26

अरे बाप रे !! ऐकावे ते नवलच !
तस्करी आणी स्वस्तातली पुस्तके, हा किस्सा भारीच.

छोटा डॉन

छोटा डॉन · Wed, 12 May 2010 - 09:58 · उत्तर

तस्करी आणि स्वस्तातली पुस्तके हा किस्सा मजेशीर आहे.
असे मराठी पुस्तकांच्या बाबत खरेच होत असेल तर कमालच म्हणायची.
असो.

पायरसीबाबत म्हणाल तर 'मराठी पुस्तकांच्या पायरेटेड प्रती बाजारात आहेत' हीच बातमी काही अंशी आनंददायक ( कारण पुस्तकांना तेवढी मागणी आहे ही बाब ) व काही अंशी दु:खद ( कारण प्रकाशक आणि लेखकाचे नुकसान) आहे असे म्हणतो.
अर्थात सामान्य वाचकांना जर स्वस्तात पुस्तके वाचायला मिळाली तर त्यांना ह्या 'पायरसी' ह्या प्रकारात काहीच स्वारस्य असणार नाही. समजा एखादे 'हलक्या प्रतीचे मटेरियल' वापरलेले पण उत्तम साहित्यमुल्य असलेले पुस्तक लेखकाने पायरेटेड कॉपीच्या स्वरुपात खरेदी केले, त्याला ते खुप आवडले व ते संग्रही असावे अशी त्याची इच्छा असली तर त्याला दुकानातुन 'ओरिजनल कॉपी' विकत घेण्याशिवाय पर्यायच राहणार नाही.
कारण पायरेटेड कॉपीची बांधणी व वापरलेला माल हे वाचकाच्या ' संग्रहाच्या दॄष्टीने ' उत्तम नसेल, तो काही काळाने खराब होईलच, मग नंतर त्याला चांगला कागद वापरुन उत्तम बांधणी असलेले 'ओरिजनल पुस्तक'च विकत घ्यावे लागेल.

पायरसीला प्रोत्साहन द्यायचे कारण नाही परंतु ह्या निमित्ताने पुस्तके जास्तीत जास्त लोकांपर्यम्त पोहचत आहेत व लोक ते आवडीने विकत घेत आहेत ही बाब सुखावणारी वाटते.

अवांतर :
अशा घटना जर मोठ्ठ्या प्रमाणावर घडत असतील तर प्रकाशकांनीच इंग्रजी पुस्तकांच्या धर्तीवर २ प्रकारची पुस्तके बाजारात आणण्याचा विचार करावा.
'लो कॉस्ट एडिशन' ची इंग्रजी पुस्तके हे त्याच्याच 'चांगल्या प्रतीच्य' तुलनेत केवळ २०% किमतीत मिळतात आणि ती ही त्याच प्रकाशकाने प्रसिद्ध केली असतात.
माझ्याकडे अशी काही इंग्रजी पुस्तके आहेत की जी पायरेटेड नाहीत पण तुलनेने कमी क्वालिटीची व म्हणुनच कमी किमतीतली आहेत ....

अतिअवांतर :
दक्षिण भारतातही अशा स्थानिक ( कन्नड आणि तमिळ प्रामुख्याने ) भाषेतल्या प्रसिद्ध पुस्तकांच्या लो कॉस्ट पायरेटेड कॉपीज काही लोकांकडे पाहिल्या आहेत. अर्थात ती पायटेडच असावीत असा अंदाज आहे कारण एकुणच पुस्तकाची पाने व बांधणी ह्याची प्रत नेमकी 'पायरसी' प्रकारात आढळते अशीच असते.

- छोटा डॉन

मस्त कलंदर

मस्त कलंदर · Wed, 12 May 2010 - 15:50

पुस्तकात वापरलेला कागद, त्यातला मजकूर ही मूळ मजकुराची फोटोप्रत आहे हे समजून येते. मुखपृष्टाचा दर्जा, त्यावरचे रंग या सगळ्या गोष्टी पाहिल्या, तर ती दुय्यम प्रतीची पायरेटेड वस्तू आहे हे त्यातकळते... नि आश्चर्य म्हणजे पायरसीतही पुन्हा पायरसी आहे... मी माझ्या मैत्रिणीला ती तिन्ही पुस्तके घेण्यास घासाघीस करण्यास मदत केली.. तेव्हा छावा , मृत्युंजय प्रत्येकी ४०० रूपयांचे १६०/- तर ययाती २०० चे १००/- रूंना मिळाले. त्याहून किंमत कमी करून मागितली तेव्हा त्याने रॉकेल फोटोप्रत दाखवली नि हे पुस्तक घ्या आणखी स्वस्त पडेल पण आता जे तुम्हाला विकतोय ते ओरिजिनल आहे, नि हे दुसरे डुप्लिकेट आहे असे सांगितले.. आम्ही लगेच तिथे खी करून घेतले हे वेगळे सांगायला नकोच!!!!

भोचक

भोचक · Mon, 17 May 2010 - 08:49

पायरसीला आळा घालण्यासाठी आता प्रकाशकांनीच काही करायला हवे. उदा. हिंदीमध्ये नॅशनल बुक ट्रस्ट आणि इतर काही संस्थांनी हिंदीतील अतिशय मान्यवर लेखकांची पुस्तके अगदी स्वस्तात काढली आहेत. रेणुंच्या सर्वोत्तम २१ कथांचे पुस्तक जेमतेम ५५-६० रूपयाला मिळाले. इतरही अनेक मान्यवर लेखकांची पुस्तके याच रेंजमध्ये होती. या पुस्तकांच्या कागदाचा दर्जाही चांगला होता. कव्हर पातळ होते. पण ते चालण्यासारखे आहे. याशिवाय कॉपीराईट संपलेली पुस्तके (उदा. प्रेमचंद वगैरे लेखक) प्रकाशित करण्यासाठी चढाओढच लागलेली आहे. ही पुस्तकेही अतिशय स्वस्तात मिळत आहेत. त्या तुलनेत आपल्याकडे वि.स.खांडेकर वा इतर लेखकांची पुस्तके आजही महागातच विकली जात आहेत.

कैवल्य

कैवल्य · Mon, 17 May 2010 - 16:52

पण मराठी प्रकाशक्/प्रकाशन संस्था ह्यांचे काय अनुभव येतात?

लोक पुस्तके विकत घेतात ते पदरमोड करुन...त्यांना खरेदीची ईच्छा असतानाही पुस्तकं मिळत नाहीत हे काय खोटं आहे?
उत्तरं कशी मिळतात? तुसडेपणानं..जसं काही उपकारच करताहेत पुस्तकं विकायला ठेऊन.
उत्तरं काय मिळतात? आउट ऑफ स्टॉक्/प्रिंट आहे. आम्ही ठेवत नाही. आमच्या प्रकाशनाचं नाही ते पुस्तक.. इ.इ.इ.

केवळ मराठी पुस्तकांच्याच किमती इतक्या अव्वाच्यासव्वा का? हा प्रश्न मला नेहमीच पडतो.
हल्लीची प्रकाशनाची गणितंही बरीच बदलली आहेत असं ऐकतो.

प्रकाशकांच्या मनमानीला कंटाळुन मध्यंतरी 'फुटपाथ रिलीज' असा काहीसा प्रयत्न केला गेला होता असं अंधुकसं आठवतं.

मग, मी केवळ एक सर्वसामान्य वाचक म्हणुन विचार केला, तर
माझी गरज काय आहे?
ती वाट्टेल ती किंमत देऊनही भागते आहे का?
नसेल तर काय करता येईल?
माझी अव्वाच्यासव्वा पैसे देण्याची तयारी/परिस्थिती नाही, मग मी साहित्यालाच मुकावं का?
असे प्रश्न मला पडतात. आणि अशा वेळी पायरसी योग्य की अयोग्य हा प्रश्न मला कितपत पडेल?

माझ्या कोण्या मित्रानं एखाद्या पुस्तकाचं तोंडभर कौतुक केलं आहे, आणि ते पुस्तक काही केल्या मला मिळतच नाहीये, अशा वेळी मी एखाद्या फुटपाथवर मांडलेल्या पुस्तकांच्या राशीत त्या पुस्तकाची 'राकेल प्रिंट' पाहतो. मी: एक सर्वसामान्य हौशी वाचक म्हणुन काय करेन? उत्तर फार सोपं आहे, नाही का? :)

बरं, हे वरचं सगळं मी बोलतोय ते शहरांमधलं-तेही पुणे,मुंबई आणि तत्सम. तालुक्याच्या ठिकाणी किती आणि कुठे पुस्तके मिळतात? तिथल्या वाचकांनी काय करायचे? तिथे मागणी आहे, आणि प्रकाशक म्हणतात 'प्रिंट्स शिल्लक नाहीत' अशा वेळी जर एखाद्यानं गचाळ कागद, भकास छपाई असलेली देखील पुस्तके आणुन फुटपाथवर ठेवली तर ती का नाही विकत घेतली जाणार?

पायरसी चुकच. त्याबद्दल वाद नाही. पण, ह्याचा खरोखर तोटा ज्यांना होतोय, त्यांनी ह्याविरोधात काय पाऊलं उचलली?
चित्रपटांबाबत मोझरबेअरने स्वस्तात डिव्हिडी पुरवायला सुरुवात केली. पडद्यामागची नफ्यातोट्याची गणिते ठाऊक नाहीत, पण आज फुटपाथवरुन ४०-५० रुपये देऊन खराब प्रतीची सिडी घेण्यापेक्षा मोझरबेअरची सिडी दोन पैसे जास्त मोजुन घेण्याची तयारी आहेच ना लोकांची?

मुळात महत्वाचा मुद्दा काय आहे, - पायरसी का होते?
मागणी आहे, पुरवठा कमी, किंमत जास्त.... ह्याला पुर्वापार चालत आलेलं उत्तर आहे हे पायरसी म्हणजे.

आता ठरवायचं कुणी की पायरसी कशी मोडुन काढायची?
भुर्दंड सोसुन खरेदी करणार्‍या वाचकांनी?
एकाच पुस्तकासाठी दहादहादा चकरा माराव्या लागणार्‍या रसिकांनी?
की उत्पादनसंस्थांनी?

चर्चा प्रकार